ॲक्टन, लॉर्ड जॉन ई. ई. डी. : (१० जानेवारी १८३४ – १९ जून १९०२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. नेपल्स (इटली) येथे जन्मला. त्याचे सर्व शिक्षण ओस्कॉट (इंग्‍लंड) व म्यूनिक (जर्मनी) येथे झाले. जर्मनीत शिकत असताना जर्मन तत्त्वज्ञ डलिंगरने त्याला जर्मन ऐतिहासिक अन्वेषणपद्धती शिकविली. शिक्षणाच्या निमित्ताने व प्रवासाच्या आवडीमुळे त्याने यूरोपात व अमेरिकेत खूप प्रवास केला. रॅम्बलर ह्या रोमन कॅथलिक मासिकाचा १८५९ मध्ये तो संपादक झाला. याचेच पुढे त्याने होम अँड फॉरिन रिव्ह्यूत रूपांतर केले. तो रोमन कॅथलिक होता व अखेरपर्यंत रोमन कॅथलिकच राहिला. परंतु रोमन कॅथलिक परिषदेत ‘पोप कधी चुकत नाही ’ ह्या रूढ कल्पनेस त्याने विरोध केला. त्यामुळे त्यास १८६४ त वरील मासिकाचे संपादकत्व सोडावे लागले. तो हाउस ऑफ कॉमन्सचा १८५९ ते ६५ पर्यंत सभासद होता. ह्या काळात त्याचे डब्ल्यू. ई. ग्‍लॅडस्टनशी मैत्रीचे संबंध होते. डब्ल्यू. ई. ग्‍लॅडस्टनच्या शिफारशीनेच त्यास उमरावपद मिळाले. १८९५ मध्ये तो केंब्रिज विद्यापीठात इतिहासाचा प्राध्यापक झाला व तेथे तो शेवटपर्यंत राहिला. सत्तेच्या राजकारणातील नीतिमत्तेच्या प्रश्नावरील आणि लोकशाही, समाजवादी किंवा अन्य प्रकारच्या राज्यसंस्था यांमधील मानवी स्वातंत्र्याच्या प्रश्नांवरील त्याच्या मीमांसेमुळे त्याला मोठी कीर्ती लाभली. त्याने दिलेली इतिहास विषयावरील व्याख्याने व त्याचे ऐतिहासिक निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. उदा., हिस्टरी ऑफ फ्रीडम अँड अदर एसेज (१९०७) हिस्टॉरिकल एसेज अँड स्टडीज (१९०७). मॉडर्न केंब्रिज हिस्टरीच्या खंडांची आखणी त्यानेच १८९६ मध्ये केली होती. त्याने लिहिलेली अनेक पत्रे त्याच्या मृत्यूनंतर लेटर्स ऑफ लॉर्ड ॲक्टन टू मेरी…ग्‍लॅडस्टन (१९०४) पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत.

संदर्भ : Himmelfarb, G. Lord Acton: a Study in Conscience and Politics, London, 1952.

देशपांडे, सु. र.