जैनेंद्रकुमार : (? १९०५ – ). प्रख्यात हिंदी कादंबरीकार, कथाकार, निबंधकार व समीक्षक. त्यांचा जन्म अलीगढ जिल्ह्यातील कौडियागंज येथे झाला. ते दोन वर्षांचे असतानाच त्यांचे वडिल वारले. नंतर आईने व मामाने त्यांचे पालनपोषण केले. त्यांच्या मामाने हस्तिनापूर येथे एक गुरुकुल स्थापन केले होते. ह्या गुरुकुलातच त्यांचे आरंभीचे शिक्षण झाले. त्यांचे मूळ नाव आनंदीलाल होते तथापि नंतर त्यांनी ते बदलून जैनेंद्रकुमार हे नाव धारण केले व सर्व लेखनही याच नावाने केले. १९१२ मध्ये गुरुकुल सोडून खाजगी रीत्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्यासाठी ते बिजनौर येथे आले व १९१९ मध्ये मॅट्रिक झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण बनारस हिंदू विश्वविद्यालयात झाले तथापि १९२१ मध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडून दिले आणि असहकारितेच्या चळवळीत भाग घेतला. राजकीय चळवळीत त्यांना तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. काही काळ त्यांनी व्यापारही केला पण नंतर त्यांनी स्वतःला लेखनास सर्वस्वी वाहून घेतले.
जैनेंद्रांची परख ही पहिली कादंबरी १९२९ मध्ये प्रसिद्ध झाली व हिंदी कादंबरीस प्रेमचंदांच्या कादंबऱ्यापेक्षा वेगळे वळण मिळाले. हे वळण म्हणजे व्यक्तिवादी कादंबरीचे. पुढे त्यांच्या अनेक कादंबऱ्या हिंदी साहित्यात प्रतिष्ठा पावल्या. त्यांच्या कादंबऱ्या आकाराने लहान असल्या, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने त्या श्रेष्ठ समजल्या जातात. भारतीय स्त्रीजीवनाचे काही महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मनोविश्लेणात्मक पद्धतीने आपल्या कादंबऱ्यात हातळले आहेत. विधवेचा प्रेम करण्याचा हक्क (परख ), विवाहित स्त्रीच्या जीवनात परपुरुषाच्या आगमनाने निर्माण झालेले मानसिक वादळ (सुनीता, १९३५), मध्यम वर्गाच्या खोट्या नैतिक कल्पनांमुळे अत्यंत शोकान्त आणि कारुण्यपूर्ण झालेल्या स्त्रीजीवनाची वेदना (त्यागपत्र, १९३७), स्त्रीकडे अर्थप्राप्तीचे साधन म्हणून पाहणाऱ्या परंतु त्याचसोबत पातिव्रत्याचीही तिच्याकडून अपेक्षा करणाऱ्या पुरुषाच्या कचाट्यात सापडलेल्या स्त्रीचे दुःख (कल्याणी, १९३९), परपुरुषाच्या आकर्षणामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ हरवून बसलेल्या स्त्रीची व्यथा (सुखदा, १९५३) असे अनेक विषय व समस्या जैनेंद्रांनी मोठ्या कलात्मकतेने आणि साक्षेपाने आपल्या कादंबऱ्यांतून यशस्वीपणे हाताळल्या आहेत. विवर्त (१९५३), व्यतीत (१९५३), जयवर्द्धन (१९५६), अनामस्वामी (१९६५), मुक्तिबोध (१९७१) ह्याही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या होत. जैनेंद्रांचा नेसर्गिक कल तत्त्वज्ञानाकडे असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या सर्वसामान्य वाचकाला किंचित नीरस वाटण्याची शक्यता आहे. मानसिक आंदोलनांचे सूक्ष्म चित्रण आणि प्रत्येक पात्राचे मार्मिक स्वभावचित्रण ही जैनेंद्रांची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या त्यागपत्र ह्या कादंबरीचे विविध भारतीय तसेच परकीय भाषांतही अनुवाद झालेले आहेत. त्यांनी कथालेखनही विपुल प्रमाणात केले असून त्यांच्या कथांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. प्रेमचंदाप्रमाणेच त्यांना एक श्रेष्ठ कथाकार म्हणून हिंदीत मनाचे स्थान आहे. फाँसी (१९२९), वातायन (१९३०), नीलमदेश की राजकन्या (१९३३), एक रात (१९३४), दो चिडियाँ (१९३९), पाजेब (१९४२), जयसंधि (१९४९) इ. त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत. त्यांच्या कथा जैनेंद्रकी कहानियाँ नावाने सात भागांत विषयावार संकलित झाल्या आहेत. जैनेंद्रांची शैली अत्यंत आगळी असून ती त्यांच्या स्वतंत्र व मौलिक व्यक्तिमत्त्वाची निर्दशक आहे. एक श्रेष्ठ विचारवंत व समीक्षक म्हणूनही जैनेंद्र हिंदी जगतात प्रसिद्ध आहेत. समकालीन सामाजिक, राजकीय, साहित्यिक सांस्कृतिक, वैचारिक इ. विषयांवर मौलिक विचार आपल्या निबंधांतून त्यांनी व्यक्त केले आहेत. गांधीवादाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडलेला आहे. प्रस्तुत प्रश्न (१९३६), जड की बात (१९४५), पूर्वोदय (१९५१), साहित्य का श्रेय और प्रेय (१९५३), मंथन (१९५३), काम, प्रेम और परिवार (१९५३), सोच विचार (१९५३), ये और वे (१९५४), इतस्ततः (१९६२), समय और हम (१९६२) हे त्यांचे महत्त्वपूर्ण निबंधसंग्रह होत. त्यांनी माटरलिंक आणि टॉलस्टॉय यांच्या एकेका नाटकाचा अनुक्रमे मंदालिनी (१९३५) व पाप और प्रकाश (१९५३) ह्या नावांनी हिंदीत अनुवाद केला. टॉलस्टॉयच्या काही कथाही त्यांनी प्रेममें भगवान (१९३७) नावाच्या संग्रहात अनुवादिल्या आहेत.
संदर्भ : १. झालानी, रघुवीरशरण, जैनेंद्र और उनके उपन्यास, दिल्ली, १९५६.
२. भटनागर, बांकेबिहारी, जैनेंद्र-व्यक्ति, कथाकार और चिंतक, दिल्ली, १९६४.
३. भटनागर, रामरतन, जैनेंद्र–साहित्य और समीक्षा, दिल्ली, १९५८.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“