जुलै : ग्रेगरियन पंचांगाप्रमाणे सातवा महिना. अगदी पूर्वी जेव्हा एक मार्चला वर्षारंभ मानीत तेव्हा याला क्विंटिलिस (पाचवा) म्हणत. याचे जुने डच नाव ह्यूमांड होते. १२ जुलै हा ज्युलियस सीझर यांचा जन्मदिवस असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्यांच्या बहुमानार्थ मार्कस अँटोनायनस यांनी हे नाव दिले. जुन्या रोमन पंचांगात याचे ३६ दिवस होते, न्यूमा यांनी ते ३१ केले, नंतर ३० झाले व पुन्हा ३१ करण्यात आले. जुलैच्या २ तारखेस पृथ्वी कक्षेमध्ये अपबिंदूपाशी म्हणजे सूर्यापासून दूरात दूर असते व तिचा वेग कमीत कमी असतो. या महिन्याच्या १६ तारखेस सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो. हिंदू पंचांगाप्रमाणे जुलै महिना सामान्यतः आषाढ-श्रावण या महिन्यांत येतो.

दिनांक ४ अमेरिका आणि फिलिपीन्स, दि. ५ व्हेनेझुएला, दि. ९ अर्जेटिना, दि. २३ बेल्जियम, दि. २५ नेदर्लंड्स, दि. २८ पेरू असे निरनिराळ्या राष्ट्रांचे स्वातंत्र्यदिन या महिन्यात आहेत. शिवाय दि. ३ नामदेव समाधी, दि. ४ विवेकानंद निर्याण, दि. २० तुळशीदासांचा जन्म, दि. २३ लोकमान्य टिळकांचा जन्म व दि. ३० तुळशीदासांचा देहत्याग असे भारतीय महत्त्वाचे दिवस या महिन्यात असतात.

ठाकूर, अ. ना.