जुन्नर : पुणे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १४,९५२ (१९७१). हे पुण्याच्या उत्तरेस सु. ९० किमी. वर असून कुकडी नदीच्या उजव्या तीरावर, चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या परिसरात वसलेले आहे. शहराच्या नैर्ऋत्येस सु. २ किमी. वर असलेल्या सुप्रसिद्ध शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. क्षत्रपांच्या काळापासून जुन्नर व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. इ. स. पू. १०० वर्षांपासून येथील नाणे घाटामधून घाटमाथा आणि तळकोकण यांमध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. आजही मुंबईच्या बाजारात येथून फळफळावळ जाते. याच्या आसपास अनेक बौद्ध व जैन लेणी आहेत. जुन्नरचा परिसर ऐतिहासिक घटना आणि घडामोडी यांनी समृद्ध आहे. शहराला प्राचीन काळी बांधलेला कोट असून त्यातच शासकीय कचेऱ्या आहेत.
शहरात अनेक हिंदू व जैन मंदिरे असून अष्टविनायकांपैकी लेण्याद्री हे स्थान येथून जवळच आहे. येथे जुम्मा मशीद, सौदागार घुमट व दोन दर्गेही आहेत. आसमंतात होणाऱ्या शेतमालाची बाजारपेठ म्हणून आजही जुन्नरची ख्याती आहे. व्यापारी जमाखर्चाच्या वह्यांसाठी लागणाऱ्या घोटीव हातकागदासाठीही जुन्नर प्रख्यात होते.
कापडी, सुलभा
“