जीवोपजीवन : (पॅरॅसिटिझम). सर्व सजीवांच्या उपजीविकेच्या प्रकारांचा विचार केला  तर असे आढळते की, त्यांपैकी काही  (वनस्पती व प्राणी) स्वतः आपले अन्न स्वतंत्रपणे बनवितात किंवा मिळवितात, तर कित्येक ते इतर सजीव किंवा  मृत कार्बनी (जैव) वस्तूंतून घेतात. ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या सजीवांना ‘स्वोपजीवी’ (स्वावलंबनाने निसर्गातून अन्न मिळविणारे) व दुसऱ्या प्रकारच्या अवलंबित सजीवांना ‘परोपजीवी’ म्हणतात दुसऱ्या प्रकारातील सजीव व्यक्ती इतर सजीवांपासून अन्नपाणी प्रत्यक्षपणे घेत असल्यास त्यांना ‘जीवोपजीवी’ व प्राण्यांच्या विष्ठा, मृत प्राणी व मृत वनस्पती यांपासून प्रत्यक्षपणे पोषण घेत असल्यास त्यांना ‘शवोपजीवी’(मृतोपजीवी) असे म्हणतात. सजीव व्यक्तींतील हे फरक काटेकोर मानणे कठीण आहे. स्वतंत्रपणे दुसरे जिवंत प्राणी मारून खाणारा एकादा हिंस्त्र पशू किंवा पालवी, फुले व फळे खाणारे माकड स्वोपजीवी  गटात घातले तरी ते जीवोपजीवीच आहेत हे नाकारता येत नाही ह्या दृष्टीने ⇨कीटकभक्षक वनस्पती  अंशतः जीवोपजीवी होत. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीप्रमाणे सर्वच सजीव जीवोपजीवी  ठरतात, तथापि बहुसंख्य वनस्पती हरितद्रव्ययुक्त असल्याने सृष्टीत उपलब्ध असलेल्या निर्जीव (अकार्बनी, निरिंद्रीय) पदार्थांतून आपले अन्न बनवितात व त्यावर त्यांची व इतर सजीवांची (हरितद्रव्यहीन वनस्पती व प्राणी) प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उपजीविका होते त्याच खऱ्या स्वोपजीवी होत. जीवोपजीवी ह्या संज्ञेची व्याप्ती वाढवून तीमध्ये अन्नाऐवजी सजीवांकडून फक्त आसरा व संरक्षण घेणाऱ्या सजीवांचाही कधीकधी समावेश केला जातो त्यांमध्ये आश्रय देणारी व्यक्ती (आश्रय) ही मोठी व तो घेणारी (आश्रित) ही लहान असा संकेत मानतात. ‘जीवोपजीवी’ व ‘जीवोपजीवी रोग’ ही संज्ञा कधीकधी संकुचित अर्थाने फक्त जीवोपजीवी प्राण्यांना लावलेल्या आढळतात.

जीवोपजीवनविज्ञानात (पॅरासिटॉलॉजी) जीवोपजीवी व्यक्ती, जीवोपजीवनाची पद्धत व जीवोपजीवनाचा आश्रय आणि जीवोपजीवी यांचा परस्परांवर होणारा परिणाम इत्यादींचा अभ्यास अंतर्भूत असतो. दोन किंवा अधिक सजीव व्यक्तींच्या दीर्घकाल किंवा अल्पकाल एकत्र होणाऱ्या सहवासाला ⇨सहजीवन  म्हणतात यामध्ये पोषणाचा संबंध असतोच असे नाही हा संबंध शुद्ध सामाजिक स्वरूपाचाही असू शकतो (उदा., वृक्ष व त्यावर चढणारी वेल). आपल्या  आश्रयास कसलीही हानी न करता आपले अवलंबित जीवन लाभदायक करणारे साहचर्य सजीव सृष्टीत आढळते, त्याला ‘सहभोजिता’ म्हणतात तसेच परस्परांना लाभदायक ठरणारे परस्परावलंबी  सहजीवन [उदा., दगडफूल → शैवाक] आढळते. परिस्थितीनुसार सहजीवनातील व्यक्तींचे परस्परसंबंध बदलतात. मनुष्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती असमर्थतेमुळे भारभूत झाल्यास तिला जीवोपजीवी  म्हणतात, तर कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून ती कावळीकडून उबवून घेणाऱ्या कोकिळेला परभृत म्हणतात. परभक्षी वटवाघळापासून ते जीवोपजीवी ऊपर्यंत जीवोपजीवींचे अनेक नमुने आढळतात. जीवोपजीवन (जीवोपजीविता) ह्या सहजीवनाच्या प्रकारात दोन सजीवांत पोषणसंबंध तर असतोच शिवाय विरोधही असतो पोषणाची ही पद्धत अनित्य समजली जाते.

आश्रय व जीवोपजीवी यांचे परस्परसंबंध : जीवोपजीविता सृष्टीमध्ये सामान्यपणे सर्वत्र आढळते काही वनस्पती व प्राणी आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या जीवोपजीवींना आश्रय देतात तसेच काही जीवोपजीवी इतर जीवोपजीवींकडून अन्नपाणी घेतात, त्यास ‘अतिजीवोपजीविता’ म्हणतात. आपल्या आश्रयावर राहून फक्त पाणी व खनिजे शोषून घेणाऱ्या बांडगुळासारख्या वनस्पती अर्धजीवोपजीवी, तर तंबाखूच्या झाडापासून अन्न घेणाऱ्या बंबाखू (ब्रूमरेप) सारख्यांना पूर्ण जीवोपजीवी म्हणतात. जीवोपजीवी व्यक्ती आश्रयाच्या शरीरात राहून अन्नशोषण करीत असल्यास (उदा., जंत, काणी, बाजरीवरील अरगट इ.) तिला अंतर्जीवोपजीवी व शरीराबाहेर पृष्ठभागावर राहून अन्नपाणी घेत असल्यास (उदा., ढेकूण, पिसू, ऊ, चूर्णभुरी इ.) तिला बाह्यजीवोपजीवी म्हणतात. काही जीवोपजीवी विशिष्ठ आश्रयावरच जगतात, तर इतर काहींचे अनेक आश्रय असतात. काही जीवोपजीवी कवक (हरितद्रव्यहीन कायक वनस्पती, उदा., पिथियम  ) आश्रय वनस्पतींच्या मृत्यूनंतर शवोपजीवी बनतात, तर काही शवोपजीवी (बॉट्रिटीस ) कधी जीवोपजीवी होतात त्यांना ‘प्रासंगिक’ म्हणतात याउलट तांबेरा, काणी इ. पिकांवरील रोग  ‘अनिवार्य’ जीवोपजीवींपासून होतात. काही (उदा., अरगट) जीवोपजीवी त्यांच्या क्रियाशील जीवनात किंवा पिढ्यान्‌पिढ्या एकाच आश्रयावर (उदा., बाजरी) राहतात, तर काही जीवनचक्रातील काही काळ [उदा., डिंभावस्थेत (अळी अवस्थेत) बॉट माश्या व प्रौढावस्थेत अंकुशकृमी] राहतात. बहुतेक जीवोपजीवींचा उगम स्वोपजीवींपासून झाला असावा असे मानतात. अपघाताने किंवा प्रयोगाने जीवोपजीवन लाभदायक असल्याचे अनुभवल्यामुळे त्यांपैकी काहींचा क्रमविकास (उत्क्रांती) त्या मार्गाने होत असताना त्यांची संरचना व क्रियाविज्ञान ह्यांमध्ये आवश्यक ते बदल होत आले असावेत.

जीवोपजीवींच्या जीवनचक्रात काहींनी (उदा., गव्हावरचा तांबेरा, मनुष्यातील फीतकृमी, नारू इ.) एकापेक्षा अधिक आश्रयांचा उपयोग क्रमाने केलेला आढळतो. ज्या आश्रयात सलिंग प्रजोत्पादन घडून येते, तो आश्रय अंत्य व इतर सर्व मध्यस्थ समजले जातात. अनेकदा मध्यस्थ आश्रय अंत्याकडे पोहोचण्यास सोयीस्कर (पर्यायी) म्हणून स्वीकारला जात असावा. फीतकृमींना मनुष्यप्राणी हा अंत्य (व डुक्कर हे मध्यस्थ) व मलेरियाच्या जीवोपजीवीला तो मध्यस्थ (व डास हा अंत्य) आश्रय मानतात. काही पूर्ण जीवोपजीवींच्या जीवनचक्रात प्रतिरोधक अवस्थेच्या अभावी आश्रयाच्या मरणाबरोबर त्यांचा नाश अटळ असतो अशा परिस्थितीशी जमवून घेण्यास त्याच्या जीवनचक्राची एक अवस्था (सलिंग प्रजोत्पादक) एका प्रमुख आश्रयावर व दुसरी अवस्था (अलिंग प्रजोत्पादक) मध्यस्थावर असते यामुळे पिढ्यांचे एकांतरण घडून येते [→एकांतरण, पिढ्यांचे] उदा., गव्हावरच्या तांबेऱ्याची सलिंग अवस्था दारुहळद या झाडावर व अलिंग अवस्था गव्हाच्या पानांवर होते अशा परिस्थितीत एक आश्रय सोडून दुसऱ्याकडे जाण्यास व पुढे पुन्हा पहिल्याकडे येण्यास भरपूर प्रमाणात प्रजोत्पादन होणे आवश्यक असते ते न झाल्यास जीवनकलहात अपयश येणे संभवनीय असते.


आश्रयावर परिणाम: जीवोपजीवीमुळे आश्रयाला कमीजास्त प्रमाणात हानी होते, तिला ‘विकृती ’ म्हणतात व तिला जबाबदार असणाऱ्या जीवोपजीवीस विकृतकारक (रोगकारक) म्हणतात. ही विकृती कमीअधिक गंभीर स्वरूपाची असू शकते. ह्यामध्ये जखमा होणे, वाहिन्या तुंबणे, रसस्राव होणे, इतर हानिकारक सजीवांचा प्रवेश होण्यास मदत होणे, आश्रयांना अन्नाचा तुटवडा भासणे, जीवनसत्त्वांची लूट होणे इत्यादींचा समावेश होतो शिवाय विषबाधाही होते. अपवृद्धी (नित्यापेक्षा कमी वाढ) व अतिवृद्धी (नित्यापेक्षा जास्त वाढ) ही  लक्षणेही कधीकधी असतात. जीवोपजीवींमध्ये वनस्पतींपैकी काही सूक्ष्मजंतूंपासून ते चंदनासारख्या महत्त्वाच्या वृक्षांपर्यंत अनेक लहानमोठ्यांचा समावेश होतो. तथापि त्यांत सूक्ष्मजंतूंची व कवकांची संख्या जास्त आहे. काही सूक्ष्मजंतूंमुळे वनस्पतींच्या पानांवर ठिपके येणे, पाने कोमेजून लोंबणे किंवा गळून पडणे, वनस्पतींचे भाग कुजणे, अर्बुदे किंवा गाठी येणे इ. रोगलक्षणे दिसतात [→ वनस्पतिरोगविज्ञान]. कित्येक सूक्ष्मजंतूंमुळे मानवास क्षय, गळू, प्लेग, विषमज्वर इ. रोग होतात [→ सूक्ष्मजीवविज्ञान].कित्येक कवकांमुळे आश्रय वनस्पतींना, मानवांना व इतर प्राण्यांना रोग होतात [→ कवक कवकसंसर्ग रोग] इतकेच नव्हे, तर मृत्यूही येतो. पिके, उपयुक्त वृक्ष व झुडुपे यांवर जीवोपजीवी वाढल्याने कमीजास्त प्रमाणात आर्थिक नुकसान होते. आयर्लंडात १८४५–४६ मध्ये बटाट्यांवर कवकजन्य रोग (फायटोप्थोरा इन्फेस्टॅन्स ) पडल्याने दुष्काळ पडला व फार मोठी मनुष्यहानीही झाली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात फ्रान्समध्ये द्राक्षावरच्या चूर्णभुरीमुळे (एरिसायफे टकेरी ) तेथील द्राक्षमळे नष्ट झाले तसेच श्रीलंकेतील कॉफीच्या मळ्यांचेही तांबेऱ्यामुळे (हॅमीलिया व्हेस्टॅट्रिक्स ) फार नुकसान झाले.

जीवोपजीवी  फुलझाडांची संख्या फार कमी आहे. ऑरोबॅंकेसी, बॅलॅनोफोरेसी, रॅफ्लेसिएसी आणि लोरँथेसी ह्या कुलांतील सर्वच जाती व इतर कुलांतील काही पूर्णपणे किंवा अंशतः जीवोपजीवी असून आश्रयाची हानी करतात. तंबाखूच्या किंवा ⇨क्लोव्हरच्या मुळांवर वाढणारी बंबाखू (आकृती १ अ)  आणि जोंधळ्यावर वाढणारी टारफुला त्या त्या पिकाची वाढ खुंटवून नुकसान करतात. मेंदी, डुरांटा, कण्हेर, विलायती चिंच इ. अनेक आश्रयांवर जलद वाढणारी ⇨अमरवेल  तसेच फार मोठे नुकसान करते. टारफुल्याशिवाय इतर हरितद्रव्यहीन असल्याने पूर्ण जीवोपजीवी आहेत. टारफुल्याला हिरवी पाने असल्याने ती अर्धजीवोपजीवी आहे. बांडगूळ, हाडमोड (मिसल्टो) ह्या वनस्पतीही अर्धजीवोपजीवी असून फक्त आवश्यक ती खनिजे आणि पाणी आश्रय वृक्षांच्या खोडातून (उदा., आंबा, निंब इ. ) येतात ह्यांची संख्या वाढून आश्रय वनस्पतींची वाढ कमी होते व कधी तर त्यांचा नाशही होतो, ह्यांना स्तंभोपजीवी म्हणतात. चंदन व ऑस्ट्रेलियातील नुइट्‌सिया  हे मोठे अर्धजीवोपजीवी वृक्ष दुसऱ्या जवळच्या सामान्य वनस्पतींच्या मुळात आपली काही मुळे घुसवून पाणी, खनिजे व बहुधा काही कार्बनी (सेंद्रिय) पदार्थ शोषून घेतात टारफुला ही तशीच आहे ह्या सर्व मूलोपजीवी होत. रॅफ्लेसिया पत्‌मा  (आकृती १ आ) ही सुमात्रातील मूलोपजीवी सिसस  आ. १. जीवोपजीवन : (अ) मूलोपजीवी वनस्पती : (१) बंबाखू (ब्रूमरेप), (२) क्लोव्हर (आश्रय वनस्पती) (आ) रॅफ्लेसिया पत्‌मा : (१) पुं.-पुष्पकलिका, (२) स्त्री-पुष्प, (३) स्त्री-पुष्पाचा छेद.

वंशातील जातीच्या (वनस्पतींच्या) मुळांतून आपले सर्वच अन्नपाणी शोषून घेते कारण ती हरितद्रव्यहीन असते. काही शैवले जीवोपजीवी असतात उदा., एक्टोकार्पसच्या काही जाती रिकार्डिया  ही लॉरेन्शियावर वाढते. बहुतेक सर्व जीवोपजीवी आपली रूपांतरित मुळे (शोषके) आश्रयातून अन्नपाणी शोषून घेण्यास वापरतात. ह्या शोषकांतील प्रकाष्ठ (जलीय विद्राव वाहून नेणे व वनस्पतीला आधार देणे ही कार्ये  करणारे वाहक घटकांचे समूह) व परिकाष्ठ (अन्नरसाची ने-आण करणारे पेशींचे समूह) आश्रयांतील त्या त्या ऊतकांशी (समान रचना व कार्ये करणाऱ्या पेशींच्या समूहांशी) जुळून वाढतात, त्यामुळे आश्रयाच्या वाढीबरोबर जीवोपजीवीच्या शोषकांचीही वाढ होत राहते. शोषकांचा उपयोग जीवोपजीवीस आधार मिळण्यासही होतो. कवकांपैकी काहींचे तंतू आश्रयांच्या कोशिकांत (पेशींत) वाढून (अंतःकोशिकी) त्यातील अन्नरस घेतात. इतर कवक अंतराकोशिकी पोकळ्यांत पसरून शोषकांद्वारे अन्न घेतात.

प्राणिसृष्टीमध्ये सर्वसाधारणपणे जीवोपजीवनाचा आश्रयावर अपायकारक परिणाम होतो पण त्यामुळे आश्रय एकदम मरत नाही पण त्याला प्रौढ दशा केव्हाच प्राप्त होत नाही आणि म्हणून प्रजोत्पादन अशक्य होते. शिवाय पुष्कळदा जीवोपजीवनामुळे जनन ग्रंथींचा नाश तरी होतो किंवा त्यांची वाढ थांबते. याचा परिणामही पुढील पिढ्या उत्पन्न न होण्यातच होतो (उदा., अनेक कीटक).

जीवोपजीवीवर परिणाम : जीवोपजीवनामुळे आश्रित (जीवोपजीवी) वनस्पतींच्या शरीरावर परिणाम झालेला आढळतो त्यामध्ये शारीरिक ऱ्हास ही बाब प्रमुख आहे. वर उल्लेखिलेल्या रॅफ्लेसियाच्या खोडाचे जमिनीत अत्यंत साध्या, हरितद्रव्यहीन, तंतूत रूपांतर झालेले असून जमिनीवर फक्त सु. एक मी. व्यासाचे एक मोठे दुर्गंधी फूल (वनस्पतिसृष्टीत वजनात व आकारमानात पहिल्या क्रमांकाचे) येते. ह्या तंतूचा आश्रय वनस्पतींच्या मुळाशी संपर्क असतो. ⇨बांडगूळ  व ⇨हाडमोड  यांची चिकट बीजे पक्ष्यांकडून आश्रय वनस्पतींवर आल्यानंतर ती तेथे रुजतात. त्यानंतर आदिमूलापासून (वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाच्या खालच्या भागापासून) एक चकतीसारखा अवयव प्रथम बनतो व त्यापासून निर्माण झालेला शोषक (रूपांतरित मूळ) फांदीत वाढत राहतो ह्या जीवोपजीवींच्या शरीराचा इतर भाग म्हणजे लहान पण जाडजूड खोड आणि काही हिरवी पाने इतकाच असतो. हाडमोडीस पाने नसतात. बंबाखूला खवल्यांसारखी हरितद्रव्यहीन पाने, भूमिस्थित लहान गाठीसारखे खोड, शोषकरूप मुळे आणि जमिनीवर फुलोऱ्याचा दांडा असतो. अमरवेलीस फक्त पिवळट दोऱ्यासारखे खोड आणि लहान फुले असतात हिचे बी जमिनीत रुजल्यावर येणारे आदिमूळ खोडाने आश्रयास गुंडाळून शोषके बनविल्यावर ऱ्हास पावते.


याशिवाय जीवोपजीवींमध्ये परिस्थितीशी जमवून घेण्याचे वैशिष्ट्य आढळते. प्राण्यांत जीवोपजीवनात अनावश्यक असे पण एरवी असलेले हालचालीचे अवयव, विशिष्ट ज्ञानेंद्रिये आणि तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) इत्यादींचा ऱ्हास किंवा अभाव आढळतो स्वोपजीवीत आढळणाऱ्या चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतील) अनेक विक्रियाही जीवोपजीवीत नसतात याचे आत्यंतिक प्रत्यंतर वनस्पतीतील काही विषाणूंत (व्हायरसांमध्ये) दिसून येते.

आश्रय व जीवोपजीवी यांच्यावर जीवोपजीवनापासून होणारे दुष्परिणाम टळणे दोघांच्याही फायद्याचे असते. बराच काळपर्यंत टिकून राहणाऱ्या अशा संबंधात दोघांमध्ये परस्परांचा सोशिकपणा वाढून प्रतिरोधकत्व येत असावे. जीवोपजीवीपासून संरक्षण मिळण्यास आश्रयात हळूहळू प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. भिन्न आश्रयांची प्रतिकारशक्ती आनुवंशिकतेवर अवलंबून असल्यास भिन्न वाण किंवा प्रकार ओळखले जातात. हाच न्याय जीवोपजीवीसही लागू पडतो. जीवोपजीवींच्या नियंत्रणाकरिता फवारलेल्या नाशकद्रव्याविरुद्ध ते हळूहळू प्रतिकारशक्ती मिळवितात, त्यामुळे ती नाशकद्रव्येही निरुपयोगी ठरू लागतात. जीवोपजीवींनी घडवून आणलेल्या आश्रयावरच्या परिणामांची लक्षणे, त्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास, भोवतालच्या परिस्थितीची माहिती इत्यादींमुळे जीवोपजीवींचे नियंत्रण किंवा नाश करून आश्रयांचे संरक्षण करण्याचे मार्ग आज उपलब्ध झाले आहेत व याबाबत अधिक संशोधन सुरू आहे.

जीवोपजीवविज्ञानाची सामान्य रूपरेखा व वनस्पतींतील जीवोपजीवनाचा तपशील वर दिल्याप्रमाणे आहे. पुढे दिलेल्या मजकुरात मनुष्यासह इतर काही प्राण्यांतील जीवोपजीवनाचा तपशील मानवी रोगांच्या संदर्भात दिला आहे.

जीवोपजीवनविज्ञान : हा अलीकडे एक महत्त्वाचा विषय गणला  जाऊ लागला आहे, कारण त्यामध्ये मानव, पाळीव प्राणी व वनस्पती यांना जीवोपजीवींमुळे जे रोग उत्पन्न होतात, त्या रोगांचा अभ्यास हा प्रमुख उद्देश असतो. मनुष्यांचे, पाळीव प्राण्यांचे व वनस्पतींचे आरोग्य आणि शेती उत्पादन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांशी तो निगडित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपला बराचसा पैसा व वेळ हिवतापासारख्या (मलेरियासारख्या) जीवोपजीवीजन्य रोगाच्या उच्चाटनाकरिता व आफ्रिकेतील ⇨ निद्रारोग, द. अमेरिका आणि मेक्सिकोतील चागा यांचा रोग, ईजिप्तमधील रक्तमेह (रक्तमिश्रित मूत्र) इ. जीवोपजीवीजन्य रोगांच्या अभ्यासाकरिता खर्च केला आहे. जीवोपजीवनविज्ञानाचा अभ्यास मानवी वैद्यक, पशुवैद्यक, प्राणिविज्ञान आणि वनस्पतिविज्ञान या शाखांतून केला जातो. मानवी वैद्यकाच्या विकृतिविज्ञान शाखेतील तो एक स्वतंत्र विषय असून त्यामध्ये आदिजीवसंघविज्ञान, जीवोपपजीवी कृमिविज्ञान (हेल्मिंथॉलॉजी) व कीटकविज्ञान यांचा समावेश असतो.

आश्रय देणाऱ्या जीवांमध्ये (पोषकांमध्ये) रोग उत्पन्न करणाऱ्या जीवोपजीवींना ‘रोगकारक’ म्हणतात. सर्वसाधारणपणे सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग मग ते विषाणूमुळे (व्हायरसामुळे), सूक्ष्मजंतूंमुळे, रिकेट्‌सियामुळे (सूक्ष्मजंतूंपेक्षा लहान परंतु विषाणूपेक्षा मोठ्या आकाराच्या सूक्ष्मजीवांमुळे) किंवा अन्य जीवोपजीवींमुळे झाले, तरी सर्वांचा जीवोपजीवीजन्य रोग म्हणून उल्लेख करण्यास हरकत नाही मात्र रूढीप्रमाणे फक्त जीवोपजीवी प्राण्यांमुळे होणाऱ्या रोगांनाच ही संज्ञा लावतात.

डास, ऊ, गोचीड इ. जीवोपजीवी पोषकाशिवाय काही काळ राहू शकतात. म्हणून त्यांना प्रासंगिक (वैकल्पिक) व जंतासारख्या कायम वस्ती करणाऱ्यांना अनिवार्य म्हणतात. प्रासंगिक जीवोपजीवींच्या नैसर्गिक आकारमानावर त्यांच्या जीवनरीतीचा फारसा परिणाम होत नाही मात्र रक्त, प्लीहा (पानथरी), आतडी वगैरे अंतर्भागात शिरून जगणाऱ्याच्या आकारमानावर व रचनेवर अतिशय परिणाम होतात हे कधीकधी  शिगेस पोहोचून त्यांमध्ये झालेले बदलाचे टप्पे ओळखणे कठीण जाते. या बदलांमध्ये त्यांच्या चलनविषयक उपांगांचा, पचनेंद्रियांचा व तंत्रिका तंत्राचा अपकर्ष (ऱ्हास) झाल्याचे आढळते. याउलट त्यांची प्रजोत्पादनक्षमता वाढल्याचे आढळते. काहींत चूषक (शोषण करणाऱ्या) अवयवांची किंवा आकड्यांची वाढ झाल्याचे आढळते. प्रजोत्पादनक्षमतेच्या भरमसाठ वाढीचे उदाहरण जंत आणि पट्टकृमींचे (फीतकृमींचे) देता येईल मानवी आतड्यातील एक जंत दरवर्षी अंदाजे ६,४०,००,००० अंडी घालतो, तर एक पट्टकृमी तेवढ्याच काळात ८,००,००,००० अंडी घालतो यातील मुख्य हेतू नव्या पोषकापर्यंत पोहोचण्याचा असतो. ज्या जीवोपजीवींच्या जीवनचक्रामध्ये दोन वा अधिक पोषकांची गरज असते, त्यांना तर अशा भरमसाठ प्रजानिर्मितीची नितांत गरज असते,  कारण त्यांच्या जीवनचक्रातील वर्धनीय अवस्थांतून असंख्य प्रजा नाश पावत असते.

याच कारणाकरिता जीवोपजीवींच्या प्रजोत्पादनातील प्रमुख बदलांमध्ये अतिपुष्टी (प्रमाणाबाहेर वाढ) व उभयलिंगता (एकाच व्यक्तीत दोन्ही प्रकारच्या लिंगप्रधान अवयवांचे अस्तित्व) वा लैंगिक द्विरूपता (लिंगभेदाप्रमाणे भिन्न लक्षणे असणे) हमखास आढळतात. स्त्रीलिंगी व्यक्तीचा आकार बहुधा फार मोठा होतो व पुल्लिंगी व्यक्ती लहान बनते. कधीकधी पुल्लिंगी जीव स्त्रीलिंगीपासूनच पोषकद्रव्ये मिळवू लागतात. कॅरिबियन समुद्रातील इड्रिओलिक्नस श्मिड्टी  नावाच्या माशांची मादी एवढी वाढलेली आढळते की, तिच्या अंगावर चिकटलेले नर मासे तिच्या अवयवांसारखे लहान दिसतात. हे मासे लहान असले, तरी पोषकाच्या रुधिराभिसरणाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतात या प्रकारच्या जीवोपजीवनास ‘सत्य जीवोपजीविता’ म्हणतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्राण्यांमध्येही सहजीवनाचे प्रकार आढऴतात. जीवोपजीवीच्या प्रौढावस्थेत पोषण करणाऱ्या किंवा त्याच्या प्रजोत्पादनाच्या काळात आश्रयस्थान असतो त्याला ‘निश्चित पोषक’ व

आ. २. सत्य जीवोपजीविता : इड्रिओलिक्नस श्मिड्टी : (१) माशाची वाढलेली मादी, (२) मादीच्या रक्तावर पोसले जाणारे नर मासे.

जीवोपजीवींची डिंभावस्था किंवा अलैंगिक अवस्था सांभाळणाऱ्यास ‘मध्यस्थ पोषक’ म्हणतात. दोन पोषकांत जीवन घालविणाऱ्या जीवोपजीवीचा प्रत्येक पोषक ‘पर्यायी ’ असतो. ⇨हिवतापाच्या जीवोपजीवीचा स्त्रीलिंगी ॲनॉफेलीस  डास निश्चित पोषक असतो, तर मानव हा मध्यस्थ पोषक असतो. याउलट क्युलेक्स फॅस्टिगस  डास वुच्छेरिया बॅन्क्रॉफ्टी  [→ हत्तीरोग] या जीवोपजीवींचा मध्यस्थ असतो. मानव आणि डुक्कर हे जंताचे पर्यायी पोषक आहेत. पोषक आणि जीवोपजीवी यांमध्ये जेव्हा पोषणाचा संबंध नसतो व त्यांपैकी पोषक फक्त वाहकाचे कार्य करतो तेव्हा अशा संबंधास सहवाहक म्हणतात उदा., कालवाच्या कवचावरील स्पंज व समुद्रपुष्पे (ॲनिमोने). काही खेकडे व काही समुद्रपुष्पे यांचे विशिष्ट संबंध प्रस्थापित झाल्याचेही आढळते. सगारिटा पॅरासिटिका  नावाचे समुद्रपुष्प ज्या कवचावर असेल, अशाच कवचामध्ये पागुरस अरोसॉर  जातीचे खेकडे आश्रय घेतात. आकाराने वाढल्यानंतर कवच बदलताना नव्या कवचावर टाकलेल्या कवचावरील समुद्रपुष्प ठेवण्याची काळजी हे खेकडे घेतात. प्राण्यांच्या सहजीवनात परस्परावलंबनाची उदाहरणे आढळतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या रोमंथिकेत लक्षावधी लोमश (सिलिएटा) वर्गातील आदिजीव असतात. यांची दिवसाच्या चोवीस तासांत भरमसाठ म्हणजे जवळजवळ दुप्पट वाढ होते. मात्र मूळ संख्येच्या निम्मे नाश पावत असल्यामुळे संख्या कायम असते. नाश झालेल्या आदिजीवापासून पोषकाला भरपूर प्रथिने मिळतात. काही आदिजीव पोषकाने घेतलेल्या अन्नातील तुलीर (सेल्युलोज) पचनसुलभ करणारी वितंचके (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे पदार्थ, एंझाइमे) तयार करतात व अशा रीतीने पोषकाने भक्षिलेल्या अन्नावर जगतात.


ज्या पोषकामध्ये एक प्रकारचे जीवोपजीवी बराच काळपर्यंत राहतात ते त्याची फारशी हानी करीत नाहीत, परंतु ज्या पोषकात जीवोपजीवींचा नव्यानेच शिरकाव झाला आहे त्यावर ते गंभीर परिणाम करतात. उदा., हिवताप रोगाच्या प्रदेशनिष्ठ भागातील एखादा रहिवासी बालपणापासून त्याच्या शरीरात हिवतापाचे जीवोपजीवी असूनही उत्तम शरीर प्रकृतीचा असेल  याउलट तेथे नव्याने आलेल्या व्यक्तीच्या शरीरात हे जीवोपजीवी शिरताच गंभीर आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते.

जीवोपजीवींचे जीवनचक्र पूर्ण होण्याकरिता ज्या पोषकांची गरज असते, त्यांना जैव रोगवाहक म्हणतात.

आ. ३. मानवाला होणारे काही जीवोपजीवीजन्य रोग व जीवोपजीवांचे पोषक : वर्तुळात जीवोपजीवींची संसर्गी अवस्था दाखविली आहे. 

विषमज्वराचे सूक्ष्मजंतू घरमाशीच्या पायांना चिकटून एका पदार्थावरून दुसऱ्यावर पोहोचतात, म्हणून माशीसारख्या रोगवाहकांना ‘निष्क्रिय किंवा यांत्रिक रोगवाहक’ म्हणतात. पोषक आणि जीवोपजीवी भिन्न जातीचे असले पाहिजेत असे नाही. कधीकधी एकाच जातीतील अपकृष्ट पुल्लिंगी जीव त्याच जातीच्या स्त्रीलिंगी पोषकावर जगतो याला ‘लैंगिक जीवोपजीवन’ म्हणतात.

बहुतेक जीवोपजीवी कनिष्ठ दर्जाचे जीव (उदा., विषाणू, सूक्ष्मजंतू, कवके, आदिजीव, हेल्मिंथ कृमी, संधिपाद संघातील काही प्राणी इ.) असल्यामुळे मानव, पशू व अनेक वनस्पती यांच्यातील अनेक रोग जीवोपजीवीजन्य म्हणता येतील. पोषकाच्या शरीरातील पचन झालेल्या अन्नावर जीवोपजीवी (उदा., पट्टकृमी) जगत असल्यास व त्यांची संख्या वाढल्यास पोषकाला मिळणाऱ्या अन्नात घट होऊन त्याची उपासमार होते व तिचे परिणाम शरीरावर दिसतात. अंकुशकृमींची वाढ पोषकास रक्तक्षय होण्यास कारणीभूत होते तसेच जंतांची बेसुमार वाढ कधीकधी आतड्याची पोकळी संपूर्ण व्यापून अडथळा उत्पन्न करते. हत्तीरोगाचे जीवोपजीवी लसीकावाहिन्यांत (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांत) वाढून अडथळा उत्पन्न करतात व त्यामुळे सूज येते. रक्तप्रवाहातून वाहणाऱ्या जीवोपजीवींमुळे अंतर्कील [→ अंतर्कीलन] बनून तो हृदयाच्या सूक्ष्म रोहिण्यांत अडकून मृत्यूही ओढवतो. काही जीवोपजीवी मोठ्या प्रमाणावर ऊतकनाश (सूक्ष्म शरीर घटकांच्या समूहाचा नाश) करतात. उदा., काटेरी मस्तककृमी (ॲकँथोसेफाला ) आतड्याची भिंत पोखरून भोक पाडतात व त्यातून सूक्ष्मजंतूंचा पर्युदरगुहेत (उदरातील इंद्रिये ज्या पोकळीत असतात तीत) प्रवेश होताच पर्युदर शोथ (उदरातील इंद्रियांच्याभोवती असणाऱ्या पातळ पटलाची दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो. ⇨ आमांशास कारणीभूत असणारे जीवोपजीवी (एंटामीबा हिस्टॉलिटिका ) आतड्याच्या पोकळीतील अस्तराच्या ऊतकाचा नाश करून व्रण उत्पन्न करतात. कधीकधी रक्तप्रवाहात शिरून हे जीवोपजीवी यकृत व फुफ्फुसे यांसारख्या अवयवांपर्यंत पोहोचून तेथे विद्रधी (गळू) उत्पन्न होतो.

प्रत्यक्ष नाश आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या दुष्परिणामांशिवाय पोषक शरीरावर जीवोपजीवी विषोत्पादनामुळे गंभीर परिणाम करू शकतात. हे विषारी पदार्थ (१) उत्सर्जित, (२) अपघटनजन्य (रेणूचे तुकडे होऊन निर्णाण झालेले) किंवा (३) विशिष्ट असतात. त्यांपैकी विशिष्ट विषे अधिक महत्त्वाची असतात. उदा., ट्रिपॅनोसोमा  नावाचे जीवोपजीवी जो विषारी पदार्थ बनवितात, तो रक्तप्रवाहात असेपर्यंत ज्वर उत्पन्न करतो परंतु तोच जेव्हा तंत्रिका तंत्रात शिरतो तेव्हा निद्रारोग होतो. अंकुशकृमींच्या विषांमुळे रक्तक्लथन (रक्त साखळणे) नेहमीप्रमाणे लवकर होत नाही, त्यामुळे आतड्यातील रक्तवाहिन्यांतून सतत रक्त वाहते व हेच जीवोपजीवी अन्न म्हणून वापरतात. सार्कोसिस्टीस  नावाचे जीवोपजीवी सस्तन प्राण्यांच्या हृदयाच्या स्नायूत सापडतात व ते सार्कोसिस्टीन  हे विष बनवितात ते इतके प्रभावी असते की, अत्यल्प प्रमाणातही सशासारख्या प्राण्यांना अंतःक्षेपणाद्वारे (इंजेक्शनाद्वारे) दिल्यास मृत्यू  येतो. जीवोपजीवीमुळे पोषकाच्या रक्तातील घटकांमध्ये भौतिक व रासायनिक बदल होतात. काही बदल पोषकास हितावह तर काही हानिकारक असतात उदा., प्रतिरक्षात्मक (रोगाला रोखून धरणारे) पदार्थ अग्लुटिनिने, प्रेसिपिटिने, ऑपसोनिने इ. हितावह असतात, तर रक्तक्षय आणि पांढऱ्या कोशिकांच्या संख्येतील घट हानिकारक असते. जीवोपजीवींच्या अस्तित्वामुळे रक्तातील  अरुणकर्षी कोशिकांची (एक प्रकारच्या रंगाचे विशिष्ट आकर्षण असणाऱ्या पांढऱ्या कोशिकांची, इओसिनोफीलची) संख्या वाढल्याचे आढळते. या घटनेचा जीवोपजीवींच्या निदानाकरिता उपयोग होतो. जीवोपजीवी पोषकातील विशिष्ट कोशिकांत, ऊतकांत किंवा शरीराच्या भागात आश्रय घेतात उदा., हिवतापाचे जीवोपजीवी रक्तातील तांबड्या कोशिकांत, ⇨काळ्या आजाराचे लिश्मेनिया  बृहत् कोशिकांत आणि अंकुशकृमी आतड्यात आश्रय घेतात.


जीवोपजीवीचा पोषकाच्या शरीरावरील परिणाम लक्षात घेऊन पुढील सात प्रकारची हानी वर्णिता येते. (१) आघातजन्य : ऊतके किंवा कोशिका यांची हानी उदा., अंकुशकृमींचा आतड्याच्या श्लेष्मकलेवरील (बुळबुळीत अस्तरावरील) परिणाम. (२) अडथळाजन्य : उदा., जंतांमुळे आतडे भरून जाणे एखादाच जंत सामाइक पित्तनलिकेत अडथऴा आणून कावीळ होऊ शकते. (३) अपघटनजन्य : जीवोपजीवीने निर्मिलेल्या वितंचकामुळे कोशिकांचा व ऊतकांचा नाश उदा., एंटामीबा. (४) पोषणद्रव्याची न्यूनता : पोषकाच्या अन्नावर होणारी जीवोपजीवीची उपजीविका उदा., पट्टकृमी. (५) विषबाधाजन्य : जीवोपजीवीपासून बनलेल्या पदार्थाचा विषारी परिणाम उदा., सूक्ष्मजंतूंची बहिर्विषे (धनुर्वात). (६) अधिहर्षताजन्य : (ॲलर्जीजन्य). हिवतापातील थंडी भरून येणारा ताप, हा जीवोपजीवींनी बनविलेल्या प्रथिने व इतर काही पदार्थांच्या अधिहर्षतेमुळे (अतिसंवेदनशीलतेमुळे) होणारा परिणाम असतो हत्तीरोगातील लसीका ग्रंथींची (लसीका वाहिन्यांतील लसीका कोशिकांच्या आवरणयुक्त समूहांची) वाढ वुच्छेरियाच्या अधिहर्षतेमुळे होते. (७) प्रचुर जनन : काळ्या आजारातील बृहत् कोशिकांची  भरमसाठ वाढ लिश्मेनियामुळे होते व तांबड्या कोशिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

पोषक व जीवोपजीवी यांचे संबंध : हे संबंध पुरातन असावेत. त्यांच्या जीवनचक्रात परिस्थितीशी अनुयोजन झालेले भरपूर आढळते. उदा., डर्माटोबिया होमिनीस  ही माशी आपली अंडी घालण्यास एक मोठा डास पकडून त्याला इजा न करता त्याच्या पोटावर अंडी घालते. हा डास मनुष्याच्या त्वचेवर बसून त्याचे रक्त शोषून घेतो. त्या वेळी त्या अंड्यातील अळ्या त्वचेवर टपकतात व त्वचा पोखरून तेथील ऊतकातून पोषण घेतात पुढे यथाकाल कोशावस्थेच्या सुमारास त्वचेतून त्या बाहेर पडतात व त्यांच्या माश्या बनतात. या संबंधाच्या बाबतीत अधिक विचार करता असे आढळते की, पोषक जीवोपजीवींचा कधीकधी नाश करतो, त्यांचा प्रतिकार करतो किंवा त्यांना आश्रय देतो. प्रतिकार करण्यात त्वचेचे कार्य अतिमहत्त्वाचे असते. अखंड त्वचा जीवोपजीवींना अटकाव करते ती भंगल्यावर मात्र (उदा., डास चावणे) जीवोपजीवीला प्रवेश मिळतो. काही जीवोपजीवी त्वचेला चिकटून वितंचकाद्वारे त्वचाखंडन करतात. उदा., खंडितकायी कृमी असलेले पाणी वितंचकाद्वारे त्वचाखंडन करतात. उदा., खंडितकायी कृमी असलेले पाणी त्वचेवर राहून वाळल्यास तेथे त्यचाखंडन करू शकतात. त्वचेइतकेच महत्त्वाचे कार्य श्लेष्मकलाही करते उदा., आतड्यातील श्लेष्मकला अखंडित असेपर्यंत एंटामीबा हिस्टॉलिटिकामुळे आमांश रोग होत नाही श्वसनमार्गातील व मूत्र-जनन मार्गातील श्लेष्मकला याच सदरात येतात. ऊतकाची भौतिक व रासायनिक संरचना, ऊतकद्रवाचा विशिष्ट प्रवाह, तापमान, वाढीस लागणारा वेळ इ. गोष्टींमुळे जीवोपजीवीस प्रतिकार होणे शक्य असते. कधीकधी पोषकामध्ये जीवोपजीवींबद्दल सहिष्णुता तयार होते उदा., जंत अनेक मृत मानवी शरीरांतील आतड्यांत निर्धास्तपणे जगलेले आहेत. ही सहिष्णुता एकतर्फी नसून बहुधा पोषक व जीवोपजीवी ह्या दोन्हींच्या अनुयोजनेने बनते, अनेकदा ती पोषकाच्या प्रतिरक्षात्मक प्रतिक्रियेचा परिणाम असते उदा., काळा आजार झालेल्या रोग्याच्या तपासणीत त्याच्या रक्तद्रवामध्ये विशिष्ट प्रतिरक्षात्मक घटक आढळतात. या व इतर काही जीवोपजीवीजन्य रोगांच्या निदानाकरिता या घटनेचा उपयोग करतात. प्रतिरक्षा उत्पादनाशी पोषकाचा वंश आणि वय यांचा संबंध नसतो. याला काही अपवाद मात्र आहेत. उदा., व्हायव्हॅक्स प्रकारच्या हिवतापाचे जीवोपजीवी निग्रोवर परिणाम करीत नाहीत, परंतु क्वार्टन प्रकारच्या हिवतापाचे जीवोपजीवी त्यांच्यावर गोऱ्या माणसाएवढाच गंभीर परिणाम करू शकतात. गियार्डिया लॅम्बलिया  हे आतड्यातील जीवोपजीवी प्रौढांपेक्षा लहान मुलांत अधिक आढळतात. बराच काळ सहजीवनात घालविल्यामुळे पोषकामध्येही प्रतिरक्षा निर्माण होत असावी.

मानवी जीवन आणि जीवोपजीवनविज्ञानाचा घनिष्ट संबंध आहे. जगात हृद्‌रोगाचे १८,००,००,००० रोगी असावेत त्यामानाने अंकुशकृमी, एं. हिस्टॉलिटिका, जंत इ. जीवोपजीवींनी ग्रस्त झालेले पोषक (आश्रय) अगणित आहेत. आग्नेय भारतात ८०% जनता अंकुशकृमींची पोषक असल्याचे आढळले आहे. जगातील बहुतेक सर्व सुधारलेल्या नागरी रहिवाशांच्या आतड्यांत टाचणीसारखे असंख्य कृमी (एंटेरोलोबियस व्हर्मिक्युलॅरिस, पिनवर्म) आश्रय घेतात. जीवोपजीवीजन्य रोगांच्या बाबतीत आर्थिक परिणामांचा विचार करावा लागतो. जगातील पंधरा कोटी लोक हिवतापाने पछाडलेले असतात व त्यामुळे गैरहजेरी, अकार्यक्षमता, आरोग्यसेवा इ. हिवतापजन्य कारणे जो सांपत्तिक नाश करतात तो प्रतिवर्षी कित्येक कोटी रुपये असावा. त्या मानाने हिवतापाचे उच्चाटन करण्याकरिता लागणारा खर्च याच्या /६ सुद्धा नाही. अमेरिकेसारख्या ज्या देशांत पोषणाचा दर्जा उंचावलेला आहे, त्या देशांतून जीवोपजीवीजन्य रोग बळावत नाहीत. या उलट अपपोषण (कमी दर्जाचे किंवा अपुरे पोषण) व दारिद्र्य यांचा जवळचा संबंध असून या गोष्टी हे रोग फोफावण्यास मदत करतात. जीवोपजीवींबद्दलचे अज्ञानही रोगांच्या वाढीस कारणीभूत असते उदा., कच्चे मासे किंवा अर्धवट शिजवलेले मासे पर्णकृमी रोगास कारणीभूत होतात. ही गोष्ट थायलंड, चीन, जपान इ. देशांतील जनतेस माहीत नसल्याने तिकडे हा रोग आढळतो.

पहा : अंकुशकृमि रोग कवक कृमि क्लोव्हर खंडितकायी-कृमिरोग डेंग्यू ज्वर पट्टकृमि परिस्थितिविज्ञान पुनरावर्ती ज्वर रोगवाहक वालुमक्षिका ज्वर शवोपजीवन हिवताप.

संदर्भ :

1. Chandler, A. C. Clark, P. R. Introduction to Parasitology, New York, 1961.

2. Chatterji, K. D. Parasitology, Protozoology and Helminthology, Calcutta, 1973.

3. Dey, N. C. Medicinal Parasitology, Calcutta, 1958.

4. Jarry, D. M. Human Parasitology, Oxford, 1967.

5. Jones, A. W.  Introduction to Parasitology, Ontario,1967.

6. Mitra, J. N. An  Introduction to  Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

7. Skene, M. The Biology of flowering Plants, 1924.

8. Taylor, T. W. Webber, R. J. General Botany, New York, 1959.

परांडेकर, शं. आ.  भालेराव, य. त्र्यं.