जीवनसत्त्वे : (व्हिटॅमिन्स). सर्व जीवांच्या योग्य वाढीसाठी तसेच आरोग्यरक्षणाकरिता कार्बोहायड्रेटे (स्टार्च, शर्करा इ.), मेद (स्निग्ध पदार्थ), प्रथिने (नायट्रोजनयुक्त संयुगे), एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ), हॉर्मोने (वाहिनीविहीन ग्रंथींतून स्त्रवणारे स्त्राव) इत्यांदीव्यतिरिक्त अत्यंत अल्प प्रमाणात (०·००००२% ते ०·००५%) काही विशिष्ट कार्बनी संयुगांची आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास जीवांची वाढ तर खुंटतेच शिवाय त्यामुळे त्यांना काही रोगही होतात. अशा कार्बनी संयुगांना ‘जीवनसत्त्वे’ म्हणतात. वनस्पतींत जवळजवळ सर्व जीवनसत्त्वांची किंवा निदान त्यांच्या पूर्वगामी संयुगांची तरी निर्मिती (संश्लेषण) होते. याउलट मानव व इतर प्राणी यांना मात्र आवश्यक त्या जीवनसत्त्वांसाठी मुख्यत्वेकरून आपापल्या आहारातील पदार्थांवरच अवलंबून रहावे लागते. कमीजास्त प्रमाणात सर्व वनस्पती व प्राणी यांना निरनिराळ्या जीवनसत्त्वांची त्यांच्या जीवनात अत्यंत आवश्यकता असते. सर्व प्राणी व काही शवोपजीवी (मृत शरीरावर जगणाऱ्या) वनस्पती ( काही कवक म्हणजे बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती सूक्ष्मजंतू इ.) प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आहार पदार्थांकरिता स्वोपजीवी (स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या) वनस्पतींवर अवलंबून असल्याने त्यांना जीवनसत्त्वांचा पुरवठा बव्हंशी वनस्पतींकडून होतो हे उघड आहे.
रंवथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये काही जीवनसत्त्वे खाद्यपदार्थांत नसली, तरी त्याचे दुष्परिणाम आढळून येत नाहीत, कारण त्यांच्या शरीरांत आंत्रमार्गातील (आतड्यातील) सूक्ष्मजंतू आवश्यक त्या जीवनसत्त्वांची निर्मिती करू शकतात. मानवी शरीरात पुरेशा प्रमाणात (संश्लेषणाने) जीवनसत्त्वांची निर्मिती होत नसल्याने, त्यांचा पुरवठा बव्हंशी रोजच्या आहारातूनच व्हावा लागतो तथापि सूर्यप्रकाशात त्वचेखाली ड जीवनसत्त्वाचे संश्लेषण व आतड्यातील सूक्ष्मजंतूद्वारे ब१२ जीवनसत्त्वाचे संश्लेषण त्याच्या शरीरात होते असे आढळले आहे. इतर अन्नघटकांप्रमाणे (कार्बोहायड्रेटे, प्रथिने व मेद) जीवनसत्त्वांपासून ऊर्जा मिळत नाही, परंतु चयापचयाचे (शरीरातील भौतिक व रासायनिक घडामोडींचे) योग्य नियंत्रण व शक्तीचे रूपांतरण यांकरिता ती आवश्यक असतात. काही कार्बनी संयुगांचे प्राण्यांच्या शरीरांत विशिष्ट जीवनसत्त्वात रूपांतर होते अशा संयुगांना ‘पूर्वगामी जीवनसत्त्व’ म्हणतात. सध्या ‘पूर्वगामी अ’ आणि ‘पूर्वगामी ड’ ही दोनच संयुगे माहीत आहेत. इतर कार्बनी अन्न पदार्थांशी जीवनसत्त्वांची तुलना केल्यास एक महत्त्वाचा फरक आढळतो. ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) जीवनसत्त्वे अंतस्थ घटक नसून शरीराला ऊर्जेचा पुरवठा करण्यास अन्नघटकांप्रमाणे त्यांचे अपघटन (मोठ्या रेणूचे लहान तुकडे होणे) होत नाही.
इतिहास : इतिहासपूर्व कालीन मानवी सांगाड्यांच्या तपासणीत जीवनसत्त्वांच्या न्यूनतेमुळे उद्भवणारे ⇨स्कर्व्ही व ⇨मुडदूस यांसारखे रोग अस्तित्वात असल्याचे आढळून आले आहे. बायबलकालीन वैद्यांना बकऱ्याचे यकृत खाण्यामुळे रातांधळेपणा बरा होतो हे माहीत होते. लिंबासारखी फळे खाण्याने स्कर्व्ही हा रोग होत नाही हे अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात जगातील अनेक लोकांना माहीत होते. ⇨बेरीबेरी नावाचा रोग पौर्वात्यांना फार पूर्वीपासून माहीत होता. जपानी नौदलातील बहुतेक खलाशी बेरीबेरी या रोगाने ग्रासले जात. १८८० मध्ये ॲडमिरल के. टकाकी यांनी खलाशांच्या आहारात पुढील बदल केला ताजे मांस व पालेभाज्या यांत वाढ केली व पाश्चरीकृत (सूक्ष्मजीवांची संख्या कमी करण्याकरिता ६२·८०–६५·५०से. तापमानास सु. अर्धा तास ठेवलेले) दूध मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या रोगाने ग्रासलेले खलाशी तर सुधारलेच परंतु नवीन रोग्यांचे प्रमाणही बरेच कमी झाले. १८८१ मध्ये ल्यूनिन यांनी अंशतः शुद्ध केलेले प्रथिन (केसीन), लोणी, कार्बोहायड्रेटे व खनिजे यांच्या मिश्रणापासून बनविलेले अन्न उंदरांना नियमितपणे दिले. अशा अन्नावर ते जास्त दिवस जगू शकत नाहीत, परंतु दुधासारख्या नैसर्गिक अन्नावर उत्तम जोपसले जातात असे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून दूध किंवा तत्सम अन्नात प्रथिन, मेद (कार्बोहायड्रेट) या ज्ञात घटकांव्यतिरिक्त काही अज्ञात घटकही असावेत हे लक्षात येऊन, ते शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले.
अन्नातील विशिष्ट पदार्थांच्या न्यूनतेमुळे रोग उत्पन्न होतो ही कल्पना क्रिस्तीआन आइकमान ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांना डच ईस्ट इंडीजमध्ये बेरीबेरी रोगाच्या अभ्यासाकरिता केलेल्या प्रयोगावरून सुचली. १८९३ ते १८९७ या काळात त्यांनी कोंबडीच्या पिलांवर प्रयोग केले. त्यांनी पिलांना फक्त गिरणीत सडलेले तांदूळ चारून बेरीबेरीसारखी विकृती निर्माण केली व ती हातसडीचे (कोंड्यासहित) तांदूळ चारण्याने बरी होते, तसेच ती टाळता येते हे सिद्ध केले.
ए. हॉल्स्ट व टी. फ्रलिख या नॉर्वेजिअन शास्त्रज्ञांनी १९०७ साली गिनीपिगवर प्रयोग केले. या प्राण्यांमध्ये त्यांनी स्कर्व्ही हा रोग निर्माण केला व कोबी अल्प प्रमाणात चारून तो बरा करता येतो हे दाखविले. १९०६–१२ या काळात इंग्लंडमध्ये सर फ्रेड्रिक गोलॅन्ड हॉफकिन्स यांनी उंदरांवर प्रयोग केले. अन्नातील ऊर्जादायक घटकांव्यतिरिक्त आणखी काही आवश्यक घटक असावेत असा निष्कर्ष काढला या घटकांना त्यांनी ‘साहाय्यक अन्नघटक’ असे नाव दिले. १९१२ मध्ये कॅसिमिर फून्क या अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञांनी या विषयावरील सर्व माहिती संकलित केली. हॉफकिन्स यांच्या ‘साहाय्यक अन्नघटकां’ना त्यांनी ‘व्हिटॅमिन्स’ हे नाव दिले. लॅटिन भाषेतील ‘व्हिटा’ म्हणजे जीवन व ‘अमाइन्स’ (म्हणजे ॲमिने) मिळून हे नाव सुचले. कालांतराने सर्वच व्हिटॅमिन्स रासायनिक दृष्ट्या अमाइने नसल्याचे लक्षात येताच फक्त ‘व्हिटॅमिन्स’ हा शब्द रूढ करण्यात आला.
येल आणि विस्कॉन्सीन या विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे १९१३ मध्ये प्राण्यांच्या वाढीकरिता जरूर असणारा मेदविद्राव्य (मेदात विरघळणारा) घटक शोधला, तोच अ जीवनसत्त्व होय. त्यानंतर जीवनसत्त्वांबद्दलच्या ज्ञानात सतत भरच पडत गेली.
जीवनसत्त्वांविषयी बहुतेक माहिती विसाव्या शतकातच मिळालेली आहे. ही माहिती मिळविण्याकरिता दोन प्रकारचे प्रयोग केले गेले : (१) पोषणासंबंधीच्या रोगांचा अभ्यास, (२) शुद्ध केलेले आहार बनवून त्यांचा प्राण्यांच्या शरीरांवरील परिणामांचा अभ्यास.
नवीन जीवनसत्त्वे शोधण्याकरिता १९४० पासून सूक्ष्मजीवांचा अधिक उपयोग केला जात आहे. सूक्ष्मजीवांच्या वाढीस आवश्यक अशा अनेक संवर्धक द्रव्यांची माहिती मिळाली आहे. ही संवर्धक द्रव्ये मानवी वाढीकरिता आवश्यक आहेत असे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जीवनसत्त्वांच्या गटात समावेश केलेला नाही. अधिक संशोधनानंतर कदाचित ती जीवनसत्त्वे आहेत असे दिसून येणे असंभवनीय नाही.
इ. स. १९४८ नंतर प्रत्येक जीवनसत्त्वाची जीवरासायनिक कार्यपद्धती, त्याचे इतर जीवनसत्त्वे, ⇨ ॲमिनो अम्ले, ⇨हॉर्मोने, खनिजे इत्यादींशी असणारे अन्योन्यसंबंध यांवरील संशोधनास प्रारंभ झाली आहे.
जीवनसत्त्वांची नावे व वर्गीकरण : माकॉलम व डेव्हिस या अमेरिकेन शास्त्रज्ञांनी १९१५ मध्ये उंदरांवरील प्रयोगानंतर दूध व इतर नैसर्गिक अन्नांमध्ये कमीत कमी दोन प्रकारचे जीवनसत्त्वासारखे पदार्थ असावेत, असा निष्कर्ष काढला. त्यांनी या पदार्थांना ‘मेदविद्राव्य अ’ आणि ‘जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) ब’ अशी नावे दिली. कालांतराने या पदार्थांविषयी रासायनिक माहिती मिळत गेली. प्रयोगशाळेतील प्रयोगांमुळे त्यांचे विशिष्ट रासायनिक पृथक्करण करणे शक्य झाले तसेच ते संश्लेषणाने (कृत्रिम रीत्या) तयार करता येऊ लागले. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वास योग्य ते रासायनिक नाव देण्यात येऊन इंग्रजी मूळाक्षरांची नावे देण्याची प्रथा पडली. काही जीवनसत्त्वांचा उल्लेख त्यांच्या गुणधर्मांवरूनही करण्यात येऊ लागला उदा., ‘ड जीवनसत्त्व’ किंवा ‘मुडदूसरोधी जीवनसत्त्व’ आणि ‘ॲस्कॉर्बिक अम्ल’ किंवा ‘स्कर्व्हीरोधी जीवनसत्त्व’.
वर्णनाच्या सुलभतेकरिता जीवनसत्त्वांचे विद्राव्यतेप्रमाणे वर्गीकरण सर्वसामान्य झालेले आहे. परंतु ते अगदी काटेकोर आहे असे नव्हे. कारण काहींची विद्राव्यता मेद व जल या दोन्हींतही आढळली आहे. ‘जलविद्राव्य ब’ हा एकच पदार्थ नसून आणखी काही विशिष्ट पदार्थांचा मिळून बनल्याचे समजल्यानंतर त्याला ‘जीवनसत्त्व ब समूह’ असे नाव मिळाले. या समूहास थायामीन (ब१ जीवनसत्त्व किंवा ॲन्युरीन), रिबोफ्लाविन (ब२ जीवनसत्त्व ), निॲसीन (निॲसीनामाइड किंवा निकोटिनिक अम्ल), ब६ जीवनसत्त्व, पँटोथेनिक अम्ल, बायोटीन, फॉलिक अम्ल, ब१२ जीवनसत्त्व, इनॉसिटॉल, कोलीन इ. पदार्थांचा समावेश होतो. या लेखात फक्त प्रचलित नावांचाच उल्लेख करण्यात आला आहे.
जीवनसत्त्वे : सर्वसाधारण माहिती: प्रत्येक सजीवाची वाढ व जोपासना जीवनसत्त्वांवर अवलंबून असते. हिरव्या वनस्पती त्यांना लागणारी जीवनसत्त्वे स्वतः निर्माण करतात. सूक्ष्मजंतू व यीस्टची वाढ व जोपासना मानवाला आवश्यक अशा जीवनसत्त्वांवरच अवलंबून असते, हे समजल्यानंतर निरनिराळ्या जीवनसत्त्वांबद्दल माहिती मिळविणे सोपे झाले. प्राण्यांना आवश्यक अशा कित्येक जीवनसत्त्वांची सूक्ष्मजंतूंच्या वाढीकरिता गरज असते. काही जीवनसत्त्वे ‘जातिविशिष्ट’ असतात. उदा., ॲस्कॉर्बिल अम्ल मानव, गिनीपिग व माकड यांना आवश्यक आहे परंतु कुत्रा व उंदीर यांच्या खाद्यपदार्थांत ते नसल्यास दुष्परिणाम होत नाहीत.
जीवनसत्त्वांचा उपयोग औषधे, मानवी अन्न व पाळीव प्राण्यांचे खाद्य यांकरिता फार महत्त्वाचा आहे. जीवनसत्त्वे भरपूर असलेल्या नैसर्गिक पदार्थांपासून ती शुद्ध स्वरूपात मिळविता येऊ लागली. त्यांच्या रासायनिक पृथक्करणानंतर समान जैव क्रियाशीलता असणारे पदार्थ संश्लेषणाने बनविता येऊ लागले. आवश्यक असणारी सर्व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात नैसर्गिक खाद्यपदार्थांत उपलब्ध असूनही त्यांचे व्यापारी उत्पादन करण्याची गरज सतत भासते. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर वाढू लागलेला जीवनसत्त्वांच्या उत्पादनाचा धंदा दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक वाढला पण त्याबरोबरच अधिक व्यापारी स्पर्धा उत्पन्न होऊन किंमती भराभर कमी झाल्या.
गव्हाच्या पिठापासून पाव बनविताना जीवनसत्त्वांची घट होते. बालकांना द्यावयाच्या दुधात जीवनसत्त्वांचे प्रमाण जरूरीपेक्षा कमी असते. तथापि हे खाद्यपदार्थ जीवनसत्त्वसंपन्न बनविता येतात. भारतात वनस्पति-तेलातील जीवनसत्त्वांची उणीव भरून काढण्याच्या हेतूने त्यांमध्ये अ व ड जीवनसत्त्वे विशिष्ट प्रमाणात मिसळलीच पाहिजेत, असा दंडक घालण्यात आला आहे.
बाजारात निरनिराळी जीवनसत्त्वे औषधे म्हणून विकली जातात. केवळ शक्तिदायक म्हणून त्यांचा उपयोग करणे अयोग्य आहे. जलविद्राव्य जीवनसत्त्वे मूत्रातून उर्त्सजित होत असल्यामुळे शरीरात साचून राहत नाहीत व म्हणून विषारी ठरत नाहीत. याउलट अ आणि ड जीवनसत्त्वे अतिसेवनामुळे विषारी ठरू शकतात. ध्रुव-संशोधन मोहिमेस गेलेल्या प्रौढ माणसांच्या आहारात प्रत्येकी ३०० ते ५०० ग्रॅ. अस्वलाचे यकृत खाण्यात आल्यामुळे जोराचा आजार उत्पन्न होई (त्या प्राण्यांच्या यकृतात अ जीवनसत्त्व फार मोठ्या प्रमाणात असते). डोकेदुखी, उलट्या, अतिसार, चक्कर येणे ही लक्षणे ताबडतोब सुरू होत. काही दिवसांनंतर मात्र केस गळून पडणे व कातडीवर परिणाम होणे ही लक्षणे दिसू लागत. ड जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने उलटी व अतिसार ही लक्षणे प्रथम दिसू लागतात भूक मंदावणे, वजनात फार मोठ्या प्रमाणात घट होणे व वृक्क (मूत्रपिंड) अकार्यक्षम बनणे यांमुळे मृत्यूही ओढवतो.
निरोगी माणूस जीवनसत्त्वे असलेली औषधे वापरून ताकद आल्याचे सांगतो तेव्हा तो एक प्रकारचा तोषक (औषधी गुणधर्म नसलेल्या पण रोग्याच्या समाधानासाठी देण्यात आलेल्या पदार्थांचा) परिणाम समजावा. बहुगुणी जीवनसत्त्वांचा उपयोग करताना पुढील तत्त्वे अंमलात आणावीत : (१) दैनंदिन गरजेपेक्षा निम्मे प्रमाण असल्यास अन्नपूरक म्हणून वापरावीत. (२) दैनंदिन गरजेएवढी किंवा दीडपटीने अधिक असल्यास इतर औषधांच्या सेवनामुळे होणारी त्रुटी (उणीव) भरून काढण्याकरिता वापरावीत. (३) दैनंदिन गरजेपेक्षा पाचपटीने अधिक असल्यास फक्त त्रुटिजन्य रोगांतच वापरावी.
जीवनसत्त्वांच्या त्रुटीमुळे होणारे रोग : जीवनसत्त्वांचा पुरवठा कमी झाल्यामुळे उद्भवणाऱ्या रोगांमुळेच मानवाला त्यांचा शोध लागला. प्राण्यांमध्ये कृत्रिम रीत्या त्रुटिजन्य रोग उत्पन्न करून जीवनसत्त्वांच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. मानवामध्ये जलविद्राव्य जीवनसत्त्वांच्या त्रुटीमुळे उद्भवणारे रोग दिसू लागण्यास चार ते सहा महिन्यांचा अवधी लागतो. याउलट, मेदाविद्राव्य जीवनसत्त्वांच्या त्रुटीमुळे होणारे दुष्पपरिणाम दिसू लागण्यास एक वर्षापेक्षा अधिक काळ लागण्याचा संभव असतो. त्रुटिजन्य रोग बहुधा तीव्र स्वरूपाचे नसतात व ते चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारात मोडतात. रोजच्या आहारात जरूर तेवढी जीवनसत्त्वे असूनही त्रुटिजन्य रोगांची लक्षणे उद्भवतात. त्रुटिजन्य रोग पुढील कारणांमुळे उद्भवू शकतात.
(१) आहारातील न्यूनता : उदा., अपुरा आहार, पाकक्रिया दोष.
(२) अवशोषण दोष : उदा., जठरांत्र (जठर व आतडे यांच्या मार्गातील) विकृती.
(३) अकार्यक्षम उपयोग : उदा., यकृत विकृती.
(४) अपसामान्य उत्सर्जन (वाजवीपेक्षा अधिक निचरा) : उदा., दुग्धस्त्रवण काळ.
(५) आंत्रीय विनाश (इतर रसायनांच्या सेवनामुळे होणारा) : उदा., क्षार (अल्कली), सल्फा औषधे, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) द्रव्ये इत्यादी.
(६) दैनंदिन गरजेपेक्षा बऱ्याच जादा पुरवठ्याची गरज : उदा., गर्भारणपण, आजार वगैरे.
मानवातील त्रुटिजन्य रोग बहुधा एकापेक्षा अधिक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे उद्भवतात. उदा., ⇨ वल्कचर्म. ड. जीवनसत्त्व आणि ॲस्कॉर्बिक अम्ल कमी पडल्याने उद्भवणारे मुडदूस व स्कर्व्ही हे रोग एकाच विशिष्ट जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे उद्भवतात हे त्रुटिजन्य रोग बळावल्यानंतरच लक्षात येतात. ते लवकर ओळखता येण्याकरिता फारच थोड्या चाचणी परीक्षा सध्या उपलब्ध आहेत. आर्थिक परिस्थिती, आहारविषयक सवयी किंवा युद्धजन्य परिस्थिती यांमुळे अपूर्ण आहार घ्यावा लागल्यास त्रुटिजन्य रोगांचे प्रमाण वाढते (कोष्टक पहा).
जीवनसत्त्वे :कार्य, आमापन व मानक : इतर अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे जठरांत्र मार्गात अवशोषण होते व ती जरूर त्या शरीर भागात रक्तप्रवाहातून नेली जातात. काही जीवनसत्त्वांच्या, विशेषेकरून मेदविद्राव्य जीवनसत्त्वांच्या, अवशोषणाकरिता पित्तरसाची जरूरी असते. अन्नमार्ग निरोगी असल्यास जलविद्राव्य जीवनसत्त्वांचे अवशोषण सहज होते. शरीरातील काही भागांत काही जीवनसत्त्वे साठविली जातात. अ आणि ड जीवनसत्त्वे यकृतात साठविली जातात. १,५०० ग्रॅम वजनाच्या यकृतात अ जीवनसत्त्व ५,००,००० आंतरराष्ट्रीय एकक एवढे साठविलेले असते. दैनंदिन गरज २,५०० एकक मानल्यास हा साठा २०० दिवस पुरतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे मूत्रातून उत्सर्जित होत असल्यामुळे त्यांचा शरीरात साठा होत नाही.
जीवनसत्त्वे को-एंझाइमांप्रमाणे कार्य करतात. ती एंझाइम संस्थांचा क्रियाशील भाग आहेत. जीवमात्रांचा आवश्यक अशी ऊर्जा उत्पन्न होण्याकरिता ज्या शारीरिक घडामोडी (चयापचयात्मक क्रिया) होतात त्यांमधील उत्प्रेरकांचे (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थांचे) कार्य जीवनसत्त्वे करतात. उदा., कार्बोहायड्रेट चयापचयात ⇨थायामीन हे जीवनसत्त्व को-एंझाइमाप्रमाणे कार्य करते. त्याचा अभाव असल्यास कार्बोहायड्रेट चयापचयातील मध्यस्थ पदार्थ लॅक्टिक अम्ल आणि पायरूव्हिक अम्ल शरीरात सांद्रित होतात (साठतात) सर्व तंत्रिका (मज्जा) ऊतकांच्या पोषणाकरिता कार्बोहायड्रेट चयापचय फार जरूरीचा असतो, मात्र तो सदोष असल्यास तंत्रिकांचा ऱ्हास होतो.
जीवनसत्त्वांचे आमापन (क्रियाशीलता ठरविण्यासाठी करण्यात येणारे पृथक्करण) करण्याच्या साधारण तीन पद्धती आहेत : (१) रासायनिक अगर भौतिक-रासायनिक, (२) जैव व (३) सूक्ष्मजैव.
अन्नपदार्थांतील जीवनसत्त्वांचे प्रमाण तसेच मानवाची दैनंदिन गरज निरनिराळ्या प्रकारांनी उल्लेखितात. आंतरराष्ट्रीय एकक जैव आमापनाने ठरविले आहे. अमेरिकेन औषधिकोशात या एककाशी जुळणारे परंतु स्वतंत्र एकक वापरले आहे. जीवनसत्त्वांचे मापन मिलिग्रॅममध्येही करतात. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेली जीवनसत्त्व मानके जगभर उपयोगात आहेत [→ आमापन, जैव].
प्रतिजीवनसत्त्वे : जीवनसत्त्वांच्या विशिष्ट सक्रियतेस प्रतिरोध करणाऱ्या पदार्थांना प्रतिजीवनसत्त्वे म्हणतात. हे पदार्थ जीवनसत्त्वांचे (१) निष्क्रियीकरण किंवा रासायनिक नाश (२) चयापचयापासून मिळणारे पदार्थ तयार होण्यास विरोध अगर (३) स्पर्धाजन्य विरोध यांपैकी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणतात. निसर्गामध्ये असे पदार्थ पुष्कळ आहेत त्यांपैकी काहींचे संश्लेषण करण्यात आले आहे. मानवांत किंवा जनावरांत फारच थोडी प्रतिजीवनसत्त्वे प्रभावकारी ठरली आहेत. प्रतिजीवनसत्त्वे वापरून प्रायोगिक त्रुटिजन्य रोग निर्माण करता येतात. ⇨पँटोथिनिक अम्ल व ⇨जीवनसत्त्व ब६ यांच्या त्रुटीमुळे होणाऱ्या रोगांचा अभ्यास प्रतिजीवनसत्त्वे वापरून करण्यात आला. प्रतिजीवनसत्त्वांची प्रमुख उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
(१) अंड्याच्या पांढऱ्या बलकात असणारे अव्हिडीन हे प्रथिन ⇨बायोटीन या जीवनसत्त्वास अशोषणीय बनविते. (२) मिरिथायामीन व ऑक्सीथायामीन ही ⇨थायामीन या जीवनसत्त्वाची प्रतिजीवनसत्त्वे आहेत. (३) डिक्युमारॉल हे ⇨जीवनसत्त्व के चे प्रतिजीवनसत्त्व आहे. (४) माशांमध्ये थायामिनेज हे थायामिनाचे प्रतिजीवनसत्त्व असते शिजवण्याने ते नाश पावते. (५) ॲमिनोप्टेरीन व मिथोट्रेलेट ही ⇨फॉलिक अम्ल या जीवनसत्त्वाची प्रतिजीवनसत्त्वे आहेत. (६) पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्ल हा पदार्थ जीवनसत्त्व असल्याचे अजून अनिश्चित आहे. हा पदार्थ वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतो. या पदार्थाचे प्रतिजीवनसत्त्व असल्याचा गुण सल्फोनामाइड औषधांत आढळून आला आणि ती औषधे काही सूक्ष्मजंतूंमुळे उद्भवणाऱ्या रोगांवर गुणकारी ठरली आहेत.
इ. स. १९४० नंतर अनेक प्रतिजीवनसत्त्व रासायनिक चिकित्सेत फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
हेगिष्टे, म. द. भालेराव, य. त्र्यं.
पशूंतील जीवनसत्त्वन्यूनता : वर उल्लेख केलेली सर्व जीवनसत्त्वे पशूंच्या आणि कोंबड्यांच्या शरीरपोषणाकरिता व तसेच त्यांच्या शरीरक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अल्पप्रमाणात आवश्यक आहेत. जीवनसत्त्वांचे कार्य मानवात होणाऱ्या कार्याप्रमाणेच आहे. नैसर्गिक आहारावर पोसलेल्या जनावरांमध्ये जीवनसत्त्वन्यूनता (आहारातील जीवनसत्त्वांची उणीव) सहसा संभवत नाही. पशूंच्या निरनिराळ्या जातींची त्या त्या जीवनसत्त्वाची गरज कमीजास्त असते. काही जीवनसत्त्वांचे संश्लेषण पशू आपल्या शरीरात करू शकतात. घोडे आतड्यात व गाई-गुरे रोमंथिकेत (पोटातील पहिल्या कप्यात) ब जीवनसत्त्वांचे, त्याचप्रमाणे सर्व पशू सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कातडीमध्ये ड जीवनसत्त्वाचे संश्लेषण करतात. क जीवनसत्त्वाचे (ॲस्कॉर्बिक अम्लाचे) संश्लेषण पशूंच्या आतड्याचे होते. जीवनसत्त्वांची अल्प गरज सुद्धा ज्या वेळी पशूंच्या खाद्यातून भागत नाही किंवा त्यांच्या पचन तंत्रात बिघाड होतो, धातुजन्य विषबाधा होते अथवा जीवनसत्त्वांचा जास्त प्रमाणात वापर ज्यांत होतो असे संक्रामक (संपर्काने होणारे) रोग होतात त्या वेळी पशूंमध्ये जीवनसत्त्वन्यूनतेमुळे होणाऱ्या विकारांची लक्षणे दिसतात.
अ जीवनसत्त्वन्यूनता : यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांचे विकार होणे व त्याचप्रमाणे पशूंच्या वाढीवर विपरीत परिणाम होणे, ही लक्षणे दिसतात. घोड्यांमध्ये रातांधळेपणा, डोळ्यांतून पाणी गळणे, खूर वेडेवाकडे वाढणे, श्वसन तंत्राचे विकार व प्रजननक्षमतेत बिघाड उत्पन्न होणे ही लक्षणे दिसतात. गाई-म्हशीत दुधातून अ जीवनसत्त्व शरीराबाहेर पडत असते व त्यांना ते हिरव्या चाऱ्यातून मिळत असते. ते न मिळाल्यास गर्भपात होतो किंवा अशक्त, आंधळी, अतिसाराचा विकार जडलेली अशी रोगट वासरे जन्मतात व क्वचित झटके येऊन ती मृत्युमुखी पडतात. मोठ्या जनावरांत डोळ्यांचे विकार म्हणजे क्वचित अंधत्व संभवते. शेळ्यामेंढ्यांत हा विकार संभवत नाही पण जेव्हा उद्भवतो तेव्हा गायीसारखीच लक्षणे दिसतात. कोंबड्यांच्या पिलांमध्ये अशक्तता, अपूर्ण वाढ, रोगट प्रवृत्ती, डोळ्यांवाटे पाणी येणे, तर वयस्क कोंबड्यांमध्ये अशक्तपणा, नाकाडोळ्यांतून चिकट पांढरा घट्ट स्त्राव येणे व घशामध्ये पिवळट पापुद्रे इ. लक्षणे आढळतात. डुकरांमध्ये पिलांची वाढ खुरटते व मोठ्या डुकरांत वांझपणा दिसून येतो. मांजरांच्या पिलांना अतिसार, तर कुत्र्यामांजरांत स्वच्छमंडलाचे विकार उद्भवून क्वचित अंधत्व येते.
{श्लेष्मकला- श्वासनाल, आतडी इ. नलिकाकार पोकळ्यांच्या आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत ऊतकाचे अस्तर अस्थिमार्दव-हाडे मृदू होणे प्रोथ्राँबीन- रक्त गोठण्यात उपयुक्त असणाऱ्या थ्राँबीन या पदार्थाचापूर्वगामी पदार्थ अरिबोफ्लाविनोसीस-मुखाच्या कोनात, ओठांवर, नाकाच्या व डोळ्यांच्या आसपास जखमा होणे आणि तेलकट खपल्या पडणारी त्वचा ही लक्षणे असणारा रोग स्वच्छमंडल-बुबुळाच्या पुढचा पारदर्शक भाग अधिवृक्क ग्रंथी- प्रत्येक वृक्काच्या वरच्या बाजूला असणारी वाहिनीविहीन ग्रंथी [→ अधिवृक्क ग्रंथि] प्लीहा-पानथरी मेरुरज्जू-मेंदूच्या मागील भागातून निघणारा व पाठीच्या कण्यातून जाणारा तंत्रिकांचा दोरीसारखा जुडगा अग्निपिंड-जठराच्या मागील बाजूस असणारी मोठी, लांबट व द्राक्षाच्या घडासारखी ग्रंथी [→ अग्निपिंड] }.
ब जीवनसत्त्वन्यूनता : घोडे व गाई-गुरे व समूहातील जीवनसत्त्वांचे शरीरात संश्लेषण करू शकतात, त्यामुळे ब जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे विकार त्यांच्यात सहसा उद्भवत नाहीत. कोंबड्या स्वतःचीच विष्ठा खाऊन हे जीवनसत्त्व मिळवितात. कोंबड्यांच्या आतड्याच्या शेवटच्या भागात हे जीवनसत्त्व संश्लेषित केले जाते पण ते त्यांच्या शरीराला उपयोगी पडत नाही. पायांतील अधूपणा, नखे आतल्या बाजूस वळलेली दिसणे, अंडी कमी देणे त्याचप्रमाणे उबविण्याकरिता ठेवलेल्या अंड्यांमध्ये १९ ते २१ दिवसांच्या दरम्यान पिले आतल्याआत मरणे व त्यामुळे साहाजिकत बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रमाण कमी होणे इ. लक्षणे दिसतात. डुकरांमध्ये आतड्याचा शोथ (दाहयुक्त सूज) व खुरटलेली वाढ ही लक्षणे दिसतात. कुत्र्यामांजरांत थकवा, वल्कचर्म (मुख्यत्वे कातडीचा विकार व त्याबरोबर तंत्रिका तंत्राची अकार्यक्षमता) व डोळ्यांचे विकार उद्भवतात.
क जीवनसत्त्वन्यूनता : घोड्यामध्ये व गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व संभवते.
ड जीवनसत्त्वन्यूनता : घोड्यांच्या स्प्लिंटस (पुढील पायाच्या विशिष्ट हाडाचा विकार), स्पॅव्हिन (मागील पायाच्या विशिष्ट हाडाचा विकार) व रिंगबोन (खुरामधील सर्वांत वरच्या हाडाचा विकार) ह्या विकारांचा [→ घोडा] ड जीवनसत्त्व कमी पडत असण्याशी संबंध असावा, असे मानतात. कोंबड्यांच्या पिलांमध्ये पायाची हाडे व चोच ठिसूळ होणे व मुडदूस ही लक्षणे दिसतात. पातळ कवचाची किंवा कवचहीन अंडी देणे, अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या पिलांचे प्रमाण कमी होणे व अंडी दिल्यानंतर दिसणारा तात्पुरता पक्षाघात ही लक्षणे कोंबड्यांत दिसतात तसेच मोठ्या जातीच्या कुत्र्यांना मुडदूस होतो.
ई जीवनसत्त्वन्यूनता : गाई-गुरांत स्नायूंच्या पोषणात बिघाड होऊन कुपोषण होते. उबविण्याकरिता ठेवलेल्या अंड्यांतून पिले बाहेर येण्याचे विवक्षित प्रमाण असते हे प्रमाण ई जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमध्ये पुष्कळच कमी होते.
के जीवनसत्त्वन्यूनता : यामुळे कोंबड्यांमध्ये रक्तक्षय होतो. सर्व पशूंमध्ये प्रोथ्राँबिनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त गोठण्यास विलंब लागतो. यकृताच्या विकारांत के जीवनसत्त्वन्यूनता उद्भवण्याचा संभव असतो.
जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे होणारे विकार त्या त्या जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला सुरू केल्यावर बहुतांशी बरे होतात.मात्र रोगाच्या प्रथमावस्थेत उपचार सुरू केले, तर जास्त गुणकारी ठरतात. पशूंच्या शरीराची जीवनसत्त्वांची गरज अत्यल्प असते. उपचाराच्या वेळी ही गोष्ट लक्षात घेतली गेली नाही व मात्रा जास्त प्रमाणात दिली गेल्यास विपरित परिणाम होतात उदा., ब जीवनसत्त्व (यीस्टच्या स्वरूपात) डुकरांना जास्त दिल्यास मुडदूस होतो.
दीक्षित, श्री. गं.
वनस्पतींतील जीवनसत्त्वे : अलीकडील काळात वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषणविषयक झालेल्या सखोल अभ्यासामुळे जीवनसत्त्वांचे महत्त्व व कार्य पटू लागले असून व नवनवीन जीवनसत्त्वांचा शोध लागून त्यांच्या संख्येत भर पडत गेली आहे. तुलनात्मक दृष्ट्या प्राण्यांना आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांपैकी काही थोडीच वनस्पतींवर परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. वनस्पतींमध्ये जीवनसत्त्वांचे आवश्यक तितके रासायनिक संश्लेषण होऊन ती ऊतकांमध्ये साठविली जातात व जरूर पडेल त्या त्या प्रमाणात त्यांचा उपयोग करण्यात येतो. यामुळेच वनस्पतींच्या प्रौढावस्थेत त्यांना जीवनसत्त्वे न मिळाली, तरी त्यांची उणीव न भासता नियमित वाढ सुरू राहते.
सुरुवातीला सूक्ष्मजंतू व कवक यांची प्रयोगशाळेत कृत्रिम वाढ करताना त्यांच्या पोषणविद्रावात साखर व लवणे यांव्यतिरिक्त बटाटे, पेप्टोन, ओट किंवा मक्याचे पीठ, यीस्टचा अर्क वगैरे कार्बनी संयुगांचा उपयोग केल्यासच त्यांची वाढ होत असल्याचे दिसून आले, कारण कवक व सूक्ष्मजंतू यांना त्यांपासून स्वतःच्या वाढीस आवश्यक ती जीवनसत्त्वे मिळतात. कवक व सूक्ष्मजंतू हे परोपजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे) असल्याने स्वतःच्या वाढीस आवश्यक ती जीवनसत्त्वे स्वतः तयार करू शकत नाहीत किंवा जरी थोड्याफार प्रमाणात तयार करीत असली, तरी त्यांच्या वाढीस ती पुरेशी नसतात.
डब्ल्यू. जे. रॉबिन्सन व एम्. ए. बार्टली यांनी १९३७ मध्ये टोमॅटोच्या मूलग्रांचे (मुळांच्या टोकांचे) लवणे, साखर व थायामीन यांचा पोषणविद्राव वापरून कृत्रिम संवर्धन केले व पोषणविद्रावात हे जीवनसत्त्व असल्यामुळेच मूलग्रांची अमर्याद वाढ करणे शक्य झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान जे. बॉनर (१९३७) यांनीही मुळांची भरपूर व अमर्याद वाढ होण्यास जीवनसत्त्वांची आवश्यकता असते असे निरनिराळ्या प्रयोगांद्वारे दाखवून या विधानाला पुष्टी दिली. मूलाग्रे वाढताना त्यांच्या कार्बोहायड्रेटचयनाशी (कार्बोहायड्रेटांचा शरीरात उपयोग करून घेण्याच्या क्रियेशी) थायामीन या जीवनसत्त्वाचा दाट संबंध असल्याचेही नंतर दिसून आले. एफ्. टी. ॲडिकॉट या शास्त्रज्ञांना १९४१ मध्ये असे आढळून आले की, उच्छेदित (कापून वेगळे केलेल्या) मूलग्रांचे संवर्धन करताना थायामीन पोषणविद्रावात नसेल, तर विभज्येतील [सतत वाढणाऱ्या कोशिकांच्या समूहातील → विभज्या] कोशिकांच्या विभाजनाचा वेग मंदावून त्यांची वाढही खुंटते. सर्वसाधारणपणे मुळे जीवनसत्त्व स्वतः तयार करू शकत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवरील भागांकडूनच त्यांना ते मिळवावे लागते.
सर्व उच्च व काही क्षुद्र वनस्पतींना थायामिनाची आवश्यकता असते व त्या त्याचे संश्लेषणही करू शकतात परंतु सूक्ष्मजंतू, यीस्ट व तंतुयुक्त कवक यांच्या बऱ्याचशा जाती त्याचे संश्लेषण करू शकत नाहीत. यामुळे त्यांना आपल्या वाढीसाठी थायामीन किंवा पिरिमिडीन व थियाझोल यासारख्या माध्यामिक संयुगांसाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. रॉबिन्सन यांनी १९३८ मध्ये पोषणविद्रावात फक्त पिरिमिडीन, फक्त थियाझोल, पिरिमिडीन व थायाझोल हे दोन्ही आणि थायामीन असे विद्राव वापरून निरनिराळ्या कवकांच्या वाढीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. ई. एल्. टेटम व टी.टी. बेल यांना १९४६ मध्ये न्यूरोस्पोरा या कवकामध्ये थायामीनाचे संश्लेषण वृद्धीस आवश्यक असलेल्या इतर संयुगांप्रमाणेच आनुवंशिक नियंत्रणाशी निगडित असते, असे दिसून आले.
उच्छेदित मूलग्रांची कृत्रिम वाढ करण्यास पोषणविद्रावात थायामीन हा अत्यंत अवश्यक घटक असल्याचे कळल्यावरून संपूर्ण वनस्पतीच पोषणविद्रावात किंवा स्वच्छ, निर्जंतुक वाळूत वाढवून जीवनसत्त्वांशिवाय व ती पुरविली असता तीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. ठराविक संहतीत त्यांचा मुळांजवळ पुरवठा केल्यास वनस्पतींच्या वाढीस चांगलीच मदत होत असल्याचे यावरून दिसून आले.
थायामिनाप्रमाणेच जे. बॉनर व पी. एस्. डेव्हिरिअन यांनी १९३९ मध्ये निकोटिनिक अम्ल हेही उच्छेदित मूलाग्रांची कृत्रिम वाढ करताना आवश्यक असल्याचे दाखविले. निकोटिनिक अम्लाशी पोषणविद्रावात उणीव असल्यास वाटण्याच्या मूलाग्रांच्या विभज्यांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांची वाढ पूर्णतः थांबते, असे ॲडिकॉट यांनी १९४१ मध्ये दाखविले. टोमॅटोच्या मूलग्रांची कृत्रिम वाढ करताना पी. आर्. व्हाइट यांना मात्र निकोटिनिक अम्लाची जरूरी भासली नाही. रॉबिन्सन व एम्. बी. श्मीट यांनी १९३९ मध्ये पिरिडॉक्सीन (ब६ जीवनसत्त्व) हे ब गटांपैकी एक जीवनसत्त्व टोमॅटोच्या उच्छेदित मूलाग्रांच्या संवर्धनास उपयुक्त असल्याचे दाखवून दिले आणि व्ही. टी. स्टाऊटमेअर यांनी १९४० मध्ये याचा उपयोग काही वनस्पतींच्या छाट कलमांना मुळे फुटण्यास होऊ शकतो, असे निर्दशनास आणले.
ॲस्कॉर्बिल अम्ल या जीवनसत्त्वाचे उच्छेदित मूलाग्रांचे संवर्धन करण्यात काही वनस्पतींच्या बाबतीत महत्त्व पटले असले, तरी काही इतर वनस्पतींमध्ये त्याची मुळीच गरज भासत नसल्याचीही उदाहरणे आहेत. एम्. ई. रीड शास्त्रज्ञांनी १९४१ मध्ये ॲस्कॉर्बिल अम्लाचे कार्य कोशिकांच्या पृष्ठभागाशी संबंधित असल्याचे सुचविले असून त्यामुळे कोशिकांना विद्राव धरून ठेवण्यास व तो शोषण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले आहे.
टी हेमबर्ग यांनी १९५३ मध्ये के जीवनसत्त्वाचा प्रत्यक्षात जरी मुळांची वाढ होण्यास उपयोग होत नसला, तरी त्याच्या उपस्थितीत वनस्पतींची मुळे मिळालेल्या हॉर्मोनांचा चांगला उपयोग करून घेऊ शकतात, असे प्रतिपादन केले आहे.
उच्छेदित मूलाग्रांचे कृत्रिम संवर्धन करताना पोषणविद्रावात सर्वसाधारणतः थायामीन, निकोटिनिक अम्ल व पिरिडॉक्सीन या जीवनसत्त्वांची गरज लागते. परंतु बऱ्याचशा वनस्पतींच्या मूलाग्रांना निदान थायामीन या एका जीवनसत्त्वाची तरी गरज असतेच. व्हाइट क्लोव्हरची [→ क्लोव्हर] मूलाग्रे मात्र थायामिनाशिवाय वाढू शकतात पण त्यांना निकोटिनिक अम्लाची आवश्यकता असते, तर ⇨फ्लॅक्सची मूलाग्रे पोषणविद्रावात या तिन्ही जीवनसत्त्वांच्या अभावी वाढू शकतात, मात्र त्यामुळे त्यांची वाढ अतिशय हळू होते. मुळांची वाढ ही जीवनसत्त्वांच्या प्रमाणावर अवलंबून असते व निरनिराळ्या वनस्पतींच्या मुळांची जीवनसत्त्वांच्या संश्लेषणाची पात्रताही कमीजास्त असते. साधारणतः मुळांमध्ये जीवनसत्त्वे तयार करण्याची पात्रता कमी असते किंवा नसतेही व त्यामुळेच त्यांना वनस्पतींच्या वरच्या भागावर अवलंबून रहावे लागते.
वनस्पतींमध्ये जीवनसत्त्वांचे संश्लेषण त्यांच्या मोठ्या पानांमध्ये होऊन तेथून ती मुळांकडे नेली जातात. थायामीन, पँटोथिनिक अम्ल व पिरिडॉक्सीन यांचे मुळाकडील वहनाचे प्रात्याक्षिक टोमॅटोच्या झाडात दाखविण्यात आले आहे. टोमॅटोच्या झाडात जीवनसत्त्वे पानात तयार झाल्यावर तेथून ती ⇨वल्काच्या (सालीच्या) ऊतकांमधून खाली वाहून येतात. पाने व मूळ यांच्यामधील वल्क-ऊतकाचा वाफेच्या साहाय्याने नाश केला असता असे दिसून आले की, यामुळे जीवनसत्त्वांचा प्रवाह खंडित होऊन नाश पावलेल्या वल्क-ऊतकाच्या वर ती साचून राहतात. पानांतून मुळांकडे जशी जीवनसत्त्वे जाताना आढळतात, त्याचप्रमाणे मोठ्या पानांतून कोवळ्या पालवीकडे अशी खालून वरही ती नेली जातात.
काही वनस्पतींची मुळे त्यांना आवश्यक ती जीवनसत्त्वे ठराविक प्रमाणात तयार करून स्वावलंबी असलेली दिसून आली आहेत, तर बऱ्याचशा वनस्पतींमध्ये त्यांचे पानांतून मुळांकडे वाहणे आवश्यक असते. काही वनस्पतींतील वाढते गर्भ व पुष्क (बीजातील गर्भाबाहेरचे अन्न) यांना त्यांच्या वाढीसाठी लागणारी जीवनसत्त्वे वनस्पतींच्या दुसऱ्या भागांपासून पुरविली जातात. गव्हाच्या कणसात जेव्हा दाणा भरू लागतो तेव्हा वनस्पतीच्या इतर भागांतील थायामिनाचे प्रमाण घटल्याचे व दाण्यात ते वाढल्याचे दिसून आले आहे.
काही विशिष्ट वनस्पतींच्या विशेषतः एकदलिकित (गहू, ज्वारी, मका इत्यादींसारख्या) वनस्पतींच्या उच्छेदित मूलाग्रांचे कृत्रिम संवर्धन आज कित्येक वर्षांच्या सतत प्रयत्नानेही शक्य झालेले नाही. मक्याची मूलाग्रे त्यांच्या वाढीस आवश्यक व ज्ञात अशा सर्वतोपरी परिपूर्ण घटकांच्या विद्रावातही फार हळू वाढतात व पुढे त्यांची वाढ मंदावून ती मरतात. कदाचित पोषणद्रव्यात त्यांच्या वाढीस आवश्यक असलेले परंतु ज्ञात नसलेले जीवनसत्त्व किंवा कार्बनी संयुगांच्या उणीवेमुळे वाढ होत नसावी असाच निष्कर्ष त्यातून काढता येतो. ई. एच्. रॉबर्ट्स व एच्. ई. स्ट्रीट (१९५५) यांनी राय ह्या वनस्पतीची मूलाग्रे पोषणविद्रावात ट्रिप्टोफेन हे ॲमिनो अम्ल मिसळून काही काळ सतत वाढविली आहेत. ट्रिप्टोफेन हे ॲमिनो अम्लाचे निकोटिनिक अम्लात रूपांतर होऊन ही वाढ होते.
हॉर्मोने व जीवनसत्त्वे यांत भेद करणे जरा कठिणच आहे. कारण हे दोन्हीही पदार्थ विशिष्ट प्रकारची कार्बनी संयुगे असून अत्यंत अल्प प्रमाणावर वनस्पतींच्या वाढीस जबाबदार असतात. इतकेच नव्हे तर एका जीवातील जीवनसत्त्व दुसऱ्यात हॉर्मोन होऊ शकते [→ हॉर्मोने].
पहा : अन्न ॲस्कॉर्बिक अम्ल इनॉसिटॉले कोलीन जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व ई जीवनसत्त्व के जीवनसत्त्व ड जीवनसत्त्व ब६ जीवनसत्त्व ब१२ थायामीन निॲसीन पँटोथिनिक अम्ल फॉलिक अम्ल बायोटीन रिबोफ्लाविन.
सप्रे, अ. ब.
संदर्भ : 1. Antia F. P. Clinical Dietetics and Nutrition, London, 1966.
2. Audus, L. J. Plant Growth Substances, New York, 1965.
3. Beaton, G. H. McHenry, E. W. Nutrition, Vol. ll, New York, 1964.
4. Bell, G. H. Davidson, J. N. Scarborough, H. H. Textbook, Physiology and Biochemistry, London, 1965.
5. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.
6. Curtis, O. F. Clark D. G. Introduction to Plant Physiology, New York, 1950
7. Mayer, B. S. Anderson, D. B. Bohning, R. H. Introduction to Plant Physiology, Princeton, 1960
8. Sebrell, W. H.(Jr.) Harris, R. S., Gyorgyl, P. Pearson, W. N. The Vitamins, 7 Vol., New York and London, 1967.
“