जीवदीप्ति : प्राणी अथवा वनस्पती या सजीवांनी निर्माण केलेल्या प्रकाशाला जीवदीप्ति हे नाव दिलेले आहे. सजीवांच्या विशिष्ट कोशिकांतील (पेशींतील) रासायनिक प्रक्रिया [ऑक्सिडीकरण प्रक्रिया, → ऑक्सिडीभवन] प्रकाशनिर्मितीला कारणीभूत होतात.
फक्त दोन प्रकारच्या वनस्पती प्रकाश निर्माण करू शकतात, तर प्राण्यांच्या निरनिराळ्या ४०–५० जाती प्रकाश उत्पन्न करतात. हा प्रकाश अर्थातच नेहमीच्या सूर्यप्रकाशापेक्षा किंवा दिव्यांच्या प्रकाशापेक्षा वेगळा असतो. जीवप्रकाश थंड असतो, त्यात उष्णता निर्माण होत नाही. सजीवांच्या निरनिराळ्या जातींमध्ये दीप्तीचा रंग मात्र वेगवेगळा असू शकतो. हा रंग पिवळ्या रंगातून निळ्या रंगात किंवा हिरव्यातून लाल रंगापर्यंत बदलत असतो. शिवाय फक्त जिवंत प्राण्यातच हा प्रकाश उत्पन्न होऊ शकतो असे नाही. दीप्तिमान प्राण्यांची शरीरे सुकवून ठेवून काही काळानंतर जर पाण्यात भिजविली, तर दीप्ती निर्माण होते, असे आढळून आले आहे.
वनस्पतिजन्य दीप्ती : वनस्पतींच्या सूक्ष्मजंतू व कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) या दोनच गटांमध्ये दीप्तिमान जाती आढळतात. यांपैकी सूक्ष्मजंतू अत्यंत साधे असतात. दीप्तिमान सूक्ष्मजंतू इतके लहान असतात की, स्वतःच्या प्रकाशानेसुद्धा एकेकटा जीवाणू दिसत नाही त्यांचे निवह किंवा संघ दृग्गोचर असतात. सामान्य मृतजीवी (मेलेल्या जीवांवर उपजीविका करणारे) दीप्तिमान सूक्ष्मजंतू समुद्रात इतस्ततः पसरलेले असतात. प्रयोगशाळेत जीवदीप्तीच्या अभ्यासाकरिता सूक्ष्मजंतूंच्या अनेक जातींच्या फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. दीप्तिमान जाती आढळणारा वनस्पतींचा दुसरा गट ⇨ कवक हा होय. पुष्कळ कवकांचे कवक-तंतू व फलन-काय (बीजाणू धारण करणारी संरचना) सतत प्रकाश बाहेर सोडीत असतात. काही प्रकारची अळंबी याचे उदाहरण होय. उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत दीप्तिमान कवक पुष्कळ असतात. सूक्ष्मजंतू आणि कवक प्रकाश एकसारखा बाहेर सोडीत असतात. प्रकाश उत्पन्न करण्याकरिता यांना उद्दीपनाची आवश्यकता नसते. योग्य उष्णतामान, दाब व लवणांच्या प्रमाणात होणारे फेरबदल अथवा माध्यमाच्या pH मूल्यात [एखाद्या जवळजवळ उदासीन द्रवाची अम्लता अथवा क्षारता व्यक्त करणाऱ्या मापात, → पीएच मूल्य] होणारे बदल यांच्यावर स्थिर दीप्ती अवलंबून असते.
प्राणिजन्य दीप्ती : अनेक प्रकारच्या प्राण्यांमध्ये जीवदीप्ती आढळते. काही अपवाद सोडल्यास प्राण्यांना त्यांच्या विशिष्ट कोशिका उद्दीपित केल्याशिवाय प्रकाश उत्पन्न करता येत नाही. समुद्रात आढळणाऱ्या प्रोटोझोआंपैकी (आदिजीवांपैकी) काही रेडिओलॅरिया, डायनोफ्लॅजेलेटा आणि सिस्टोफ्लॅजेलेटा हे प्राणी दीप्तिमान असतात. समुद्राच्या पृष्ठभागावर रात्री पुष्कळ वेळा जो उजेड दिसतो तो नॉक्टिल्युका आणि गोनिऑलॅक्स या दीप्तिमान एककोशिका (ज्यांचे शरीर एकाच पेशीचे बनलेले असते अशा) प्राण्यांमुळे असतो. बहुकोशिक प्राण्यांमध्ये प्रकाशमान होण्यासाठी कोशिकांना उद्दीपित करण्याचे कार्य तंत्रिका (मज्जा) करतात, उदा., काजव्याचा लुकलुकणारा प्रकाश. बहुतेक दीप्तिमान प्राणी खाऱ्या पाण्यातच असतात, गोड्या पाण्यात ते दुर्मिळ आहेत. न्यूझीलंडमधला लटिया नावाचा एक शंख गोड्या पाण्यातला दीप्तिमान प्राण्याचे उदाहरण होय. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपैकी गांडुळे, गोमा आणि कीटक यांच्या काही जाती दीप्तिमान आहेत. काजवा आणि सोनकिडा हे दीप्तिमान कीटक आहेत.
माशांच्या पुष्कळ प्रकारांत सामान्यतः दीप्ति आढळते, परंतु बऱ्याच प्रकारांत ती सहजीवी (दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर किंवा शरीरात फायदेशीर भागीदारीने राहणाऱ्या) दीप्तिमान सूक्ष्मजंतूंमुळे उत्पन्न झालेली असते. काही स्क्विडांमध्येही दीप्तिमान सहजीवी सूक्ष्मजंतू असतात. पोषकामुळे सूक्ष्मजंतूंचे पोषण होते व त्यांच्या दीप्तीचा पोषकाला उपयोग होतो. उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे), सरीसृप (सरपटणारे), पक्षी व स्तनी या प्राणिवर्गांत दीप्तिमान प्राणी अद्याप तरी आढळलेले नाहीत.
अतिशय खोल समुद्रात राहणारे मासे, स्क्विड, झिंगे इ. प्राण्यांत प्रदीपी (प्रकाश उत्पन्न करणारी) अंगे असतात आणि प्रकाशाच्या केंद्रीकरणासाठी परावर्तक व विचलनाकरिता भिंग किंवा रंगपटल इ. साहाय्यक रचनाही विकास पावलेल्या असतात.
मूलतः जीवदीप्ती ही रासायनिक दीप्तीच आहे, परंतु रासायनिक दीप्तीमध्ये ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया सामान्यतः मंद असते जीवदीप्तीमध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनाचे अणू या क्रियेत उपयोगात आणले जातात. ल्युसिफेरीन या प्रकाशजनक द्रव्याचे ल्युसिफेरेज या प्रकाशवर्धक एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाच्या) आणि विरघळलेल्या ऑक्सिजनाच्या सान्निध्यात ऑक्सिडीकरण होऊन त्याचे ऑक्साइड तयार होते व या प्रक्रियेमध्ये जी ऊर्जा उत्पन्न होते तिचे दृश्यमान प्रकाशात रूपांतर करण्याचे काम प्रकाशवर्धक करीत असतो. या प्रकाशजनक रासायनिक प्रक्रियेकरिता आर्द्रता आणि ऑक्सिजन या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ही दीप्ती दिव्याच्या प्रकाशापेक्षा वेगळी असते. या प्रकाशात उष्णता उत्पन्न होत नसल्याने तो पूर्णपणे शीतप्रकाश असतो. प्रकाश बहुधा कोशिकांच्या आतच उत्पन्न होतो. पण हे प्रकाशजनक पदार्थ शरीराबाहेर टाकले जाऊन तेथे या दोहोंत विक्रिया घडून येते (उदा., सायप्रिडिना हा समुद्री प्राणी). ही दीप्ती सूक्ष्मजंतूतल्याप्रमाणे अखंड असते अथवा काजव्याच्या चमकेप्रमाणे क्षणिक असते. एककोशिक प्रोटोझोआंमध्ये जीवद्रव्यात सर्वत्र विखुरलेल्या पृथक् कणांपासून दीप्ती उत्पन्न होत असावी असे दिसते. बहुकोशिक प्राण्यांमध्ये दीप्ती बहुधा प्रकाश बाहेर सोडणाऱ्या काही विशेष कोशिकांपुरतीच मर्यादित असते व शरीरावर कोशिकांची मांडणी वैशिष्ट्यपूर्ण असते. बहुकोशिक प्राण्यांमध्ये दीप्ती तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) नियंत्रणाखाली असते.
प्राण्याला दीप्तीचे महत्त्व काय असते, हे जरी पुष्कळ प्राण्यांमध्ये उघड दिसून येत नसले, तरी इतर कित्येकांत ती महत्त्वाचे कार्य पार पाडते. एकाच जातीच्या व्यक्ती या दीप्तीमुळे एकमेकींना ओळखू शकतात आणि एकमेकींकडे आकर्षित होतात. काही जातींच्या काजव्यांमध्ये नराच्या स्वाभाविक लुकलुकण्याला जवळपास असणाऱ्या माद्या आपल्या चमकेने उत्तर देतात. खोल पाण्यातले मासे आपली प्रदीपी अंगे भक्ष्याला भुरळ पाडून त्याला आकर्षित करण्याकरिता उपयोगात आणतात किंवा या प्रदीपी अंगांनी भोवतालचा प्रदेश प्रकाशित झाल्यामुळे त्यांना अन्न शोधणे सुलभ होते. समुद्राच्या खोल पाण्यात राहणारे काही स्क्विड शत्रूपासून आपले रक्षण करण्याकरिता दीप्तिमान स्रावांचा उपयोग करतात, असे म्हणतात.
संदर्भ : 1. Harvey, E. N. Bioluminescence, New York, 1952.
2. Prosser, C. L. Brown, F. A. Comparative Animal Physiology, Philadelphia, 1962,
जोशी, अ. कृ.
“