जीभ : चर्वण, गिळणे, रुची आणि वाचा या क्रियांना जरूर असणारा तोंडातील एक स्नायुमय अवयव. जिभेचा काही भाग मुखात व काही ग्रसनीमध्ये (घशामध्ये) असतो. स्नायूंनी बनलेल्या या अवयवावर श्लेष्मकलेचे (पातळ ओलसर पटलाचे) आवरण असते. मुखगुहेतील (तोडांच्या पोकळीतील) दात आणि हिरड्यांपासून जीभ मोकळी असल्यामुळे जिव्हाग्र (जिभेचे टोक) सहज रीतीने हालचाल करू शकते. जिभेची मांसल काया तिच्या मुळाशी स्नायूंनी अधोहन्वास्थीशी (खालच्या जबड्याच्या हाडाशी) व कंठिकास्थीशी (जिभेच्या बुंध्याशी असलेल्या इंग्रजी U आकाराच्या हाडाशी) जोडलेली असून श्लेष्मकलेने मुखतळ आणि हिरड्यांशी जोडलेली असते.
जिभेचा पृष्ठभाग V अशा कोणात्मक सीमान्त परिखेने (दोन भाग दाखविणाऱ्या भेगेने) विभागल्यासारखा दिसतो. पुढचा मोठा तालुभाग व मागचा लहान ग्रसनी भाग असे तिचे दोन भाग दिसतात. कोणाच्या टोकावर एक अंधरंध्र (बुजलेले भोक) असून तेथून भ्रूणावस्थेत अवटू ग्रंथी [गळ्याच्या मध्यावर पुढील भागी असणारी वाहिनीविहीन ग्रंथी, → अवटु ग्रंथि] अंकुररूपाने सुरू होते आणि पुढे या ग्रंथीचा जिभेशी असलेला संबंध संपतो.
रचना : जिव्हामूलाचा भाग वगळता इतर भागांची श्लेष्मकला जिभेच्या स्नायूंना घट्ट चिकटलेली असते. जिभेच्या पुढील भागावर लहानलहान उंचवटे म्हणजे पिंडिका असल्यामुळे तो भाग मखमलीसारखा दिसतो. मागील भाग गुळगुळीत असून त्याच्यावर लसीका ग्रंथी (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील लसीका पेशींचे आवरणयुक्त समूह) आणि श्लेष्मल ग्रंथींमुळे (बुळबुळीत पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथींमुळे) लहानलहान उंचवटे दिसतात. श्लेष्मकलेवर स्तरीय कोशिकांचा (पेशींचा) थर असून त्या थराच्या वरच्या कोशिकांचे सतत विमोचन (पडून जाण्याची क्रिया) होत असते व त्यांची जागा त्या अधिस्तरातील (एकमेकांना बिलगून रचलेल्या कोशिकांच्या समूहांतील म्हणजे ऊतकांच्या एका प्रकारातील) खालच्या कोशिका भरून काढीत असतात.
जिभेच्या पृष्ठभागावरील पिंडिकांच्या पाच जाती दिसतात : (१) परिवृत्त-तटी (सर्व बाजूंनी खोलगट भाग असलेल्या) पिंडिका, (२) कवकाभ [भूकंदुक नावाच्या कवकाच्या आकाराच्या, → कवक] पिंडिका, (३) तंतुरूप पिंडिका, (४) शंक्वाकार पिंडिका आणि (५) पर्णिल (पानाच्या आकाराच्या) पिंडिका. या पिंडिकांच्या मध्यभागी संयोजी ऊतक (आधारभूत होणारा आणि समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समूह) असून त्यावर पट्टकीय कोशिकास्तर असतो.
सीमान्त परिखेच्या पुढच्या बाजूस व तिच्याशी समांतर अशी ७ ते १२ परिवृत्त-तटी पिंडिकांची एक रांग असून त्यांच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्याभोवती चर असतो. या चरामध्ये अनेक लस्य ग्रंथींच्या (पाण्यासारखा पातळ द्रव स्रवणाऱ्या ग्रंथींच्या) नलिका उघडतात. उंचवट्यांच्या भित्तीवर अनेक रुचिकलिकांची (कळीच्या आकाराच्या संरचनेमध्ये रुची समजणाऱ्या खास तंत्रिकांची) रंध्रे असतात. त्यांची संख्या चराच्या भित्तीवर उघडणाऱ्या रुचिकलिकांपेक्षा अधिक असते.
जिव्हापृष्ठभागावर रांगेने लागल्यासारख्या सूक्ष्म तंतुरूप पिंडिका असतात. त्यांच्या मध्यभागापासून दोन-तीन उपशाखा फुटतात.
कवकाभ आणि शंक्वाकार पिंडिका तंतुरूप पिंडिकांच्या रांगांच्या मधून दिसतात. कवकाभ पिंडिका लहान व गोलाकार असून त्या जिव्हाग्राजवळ अधिक प्रमाणात असतात. त्यांना रक्ताचा भरपूर पुरवठा असल्यामुळे त्या लाल दिसतात.
जिभेच्या दोन्ही कडांच्या मागील भागांवर समांतर अशा पर्णिल पिंडिका असतात.
रुचिकलिका : पृष्ठभागावरील मघ्यभाग सोडल्यास इतरत्र रुचिकलिका आढळतात. अधिस्वरद्वार (जिभेच्या मुळाशी असलेला तंतू व कुर्चाचा बनलेला पट्टीसीरखा भाग) आणि तालू यांवरही त्या असतात. मुख्यतः त्या परिवृत्त-तटी आणि पर्णिल पिंडिकांवर असतात. त्यामानाने कवकाभ पिंडिकांवर त्यांची संख्या कमी असते.
गोलाकार रुचिकलिकांमध्ये दोन प्रकारांच्या कोशिका असतात : (१) आधारभूत आणि (२)संवेदनाक्षम. त्यांची मांडणी संत्र्याच्या फोडीसारखी असते. रुचिकलिकेची पोकळी तिच्या ग्रीवेमार्गे (चिंचोळ्या मार्गाने) पिंडिकेवर उघडते. तिला रुचिरंध्र असे म्हणतात. त्या रुचिकोशिकेपासून निघणारा सुक्ष्म ‘केस’ ग्रीवेमध्ये डोकावत असतो. रुचिकोशिकेच्या आतील टोकाभोवती रुचितंत्रिकेच्या शाखोपशाखांचे जाळे असते. रुचिरंध्रातून द्रवरूपाने आत आलेल्या पदार्थामुळे रुचिकोशिकेच्या केसाचे उत्तेजन होऊन संवेदना उत्पन्न होते. ती संवेदना तंत्रिका शाखांमार्फत मस्तिष्काकडे (मेंदूकडे) जाऊन तेथे रुचीची जाणीव होते.
जिव्हाग्राच्या खाली मध्यरेषेपासून मुखतळाशी एक पातळ पडदा असतो. त्याला जिव्हाबंध असे नाव असून त्या पडद्यामुळे जीभ मागे ग्रसनीमध्ये पडू शकत नाही. हा पडदा फार लहान असल्यास जीभ मुखतळाशी जखडली गेल्यामुळे नीट बोलता येत नाही. जिव्हेच्या मागच्या भागामध्ये दोन घड्या पडल्यासारख्या दिसतात. त्यांना अनुक्रमे जिव्हा अधिस्वरद्वार घडी आणि ग्रसनी अधिस्वरद्वार घडी असे म्हणतात.
ग्रंथी : सीमान्त परिखेच्या मागील भागावर आणि जिव्हाग्राच्या खालच्या बाजूस लस्य आणि श्लेष्म ग्रंथी जिव्हा-स्नायूंत रुतल्यासारख्या असतात. त्यांचा स्त्राव सतत चालू असल्यामुळे मुख नेहमी आर्द्र राहते.
स्नायू : जिव्हेच्या दोन्ही बाजूंना इच्छानुवर्ती रेखित (इच्छेप्रमाणे हालचाल करता येणाऱ्या आणि बारीक व लांब तंतूच्या बनलेल्या) स्नायूंच्या जोड्या असून त्यांनीच जीभ तयार होते. हे स्नायू दोन प्रकारांचे असतात : (१) बहिःस्थ (२) अंतस्थ. बहिस्थ स्नायूंची सुरुवात जिभेबाहेर इतरत्र होऊन ते जिभेवर शिरतात. तोंडातून जीभ बाहेर काढणे, बाजूला हलविणे, खाली व मागे ओढणे आणि गिळणे या क्रिया बहिःस्थ स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे होतात. प्रत्येक बाजूला अधोहनुजिव्ही (जीभ बाहेर काढण्याची क्रिया करणारा मुख्य स्नायू), कंठजिव्ही (जीभ खाली दाबण्याच्या क्रियेस मदत करणारा स्नायू) व सूचिकाजिव्ही (जिभेच्या बाजूला खालच्या भागातील स्नायू) अशी नावे असलेल्या बहिःस्थ स्नायूंच्या तीन जोड्या असतात.
अंतस्थ स्नायू चार प्रकारांचे असून ते जिव्हेच्या कायेमध्ये असतात. त्यांना अनुक्रमे ऊर्ध्व (वरचे) आणि निम्न अनुदैर्घ्य (लांबीला समांतर असलेले), अनुप्रस्थ (आडवे) आणि लंब स्नायू म्हणतात. या स्नायूंच्या जुडग्यामुळेच जीभ बनलेली असते. जिभेचा आकार या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे बदलता येतो.
रक्तवाहिन्या, लसीका वाहिन्या व तंत्रिका : जिभेला रक्ताचा पुरवठा जिव्हा रोहिणीमार्फत होतो. अंतरग्रीवानीलेमध्ये (मानेतील आतील बाजूच्या नीलेमध्ये) जिभेतील रक्त परत जाते.
जिव्हालसीका वाहिन्या अंतस्थ ग्रीवा लसीका वाहिन्यांना मिळतात.
अधोजिव्ह तंत्रिका (मेंदूपासून निघणारी बारावी तंत्रिका) ही जिव्हास्नायूंची प्रेरक तंत्रिका आहे. जिभेच्या पुढील २/३ भागातील सर्वसाधारण (स्पर्श इ.) संवेदना त्रिमूल (मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या) तंत्रिकेमार्फत आणि मागील १/३ भागातील संवेदना जिव्हाग्रसनी तंत्रिकेमार्फत मस्तिष्काकडे जातात.
पुढील भागातील रुचिसंवेदना कर्णपटल (कानाच्या पडद्याच्या) तंत्रिकेमार्फत आणि मागील भागातील रुचिसंवेदना जिव्हाग्रसनी व प्राणेशा (मेंदूपासून निघणाऱ्या दहाव्या) तंत्रिकेच्या स्वरयंत्रशाखेमार्फत (कंठाच्या शाखेमार्फत) मेंदूकडे जाते.
रोगनिदानातील महत्त्व : शरीरातील संतुलनाचे प्रतिबिंब तोंडात दिसते त्यामुळे रोगनिदानास मुखपरीक्षा बरीच मदत करते. सर्व साधारणपणे जिभेचा रंग फिक्कट गुलाबी असतो. त्यावर होणारा रंगद्रव्य बदल, जमणारा थर, ओलसरपणातील बदल, व्रण किंवा श्लेष्मकलेतील बदल हे विवक्षित रोगांचे निदर्शक असतात. उदा., विषमज्वर, उपदंश (गरमी), पोषणत्रुटी (आहारातील पोषक घटकांची कमतरता), विषबाधा वगैरे.
विकार : व्रण : जिभेवर अनेक वेळा व्रण होतात. तुटक्या दातांच्या घर्षणामुळे व क्षय, उपदंश यांसारख्या रोगांत व्रण उद्भवतात. व्रणाचे कारण कर्करोगही असू शकते.
शोथ : जिव्हाशोथ (जिभेच्या दाहयुक्त सूज) दोन प्रकारचा आढळतो : तीव्र व चिरकारी (दीर्घ काळ टिकणारा). पहिल्या प्रकारच्या शोथामुळे सूज स्वरद्वारापर्यंत जाऊन श्वासोच्छ्वासात अडथळा उत्पन्न होऊन गुदमरण्याची शक्यता असते. चिरकारी शोथ बहुतकरून पांडुरोगाचे (ॲनिमियाचे) अथवा उपदंशाचे लक्षण असते.
अर्बुदे : जिभेत अनेक वेळा सौम्य अर्बुदे (गाठी) होतात. कधीकधी जिभेच्या खाली श्लेष्म ग्रंथींची भरमसाठ वाढ होऊन गाठ तयार होते, तिला अधःजिव्हा पुटी म्हणतात.
कर्करोग : जिभेच्या कर्करोग स्त्रियांपेक्षा पुरुषांत अधिक आढळतो. कर्करोगाची सुरुवात अगदी नकळत होते. त्याची सुरुवात व्रण किंवा लहानसा उंचवटा किंवा चर वा काही भागावरील कठिनीकरणाने होते. पुढे त्या ठिकाणी व्रण होतो. हनुवटीखालील लसीका ग्रंथी, तसेच जबड्याच्या कोपराखालील लसिका ग्रंथीपर्यंत हा रोग जलद फैलावतो. हा फैलाव होण्यापूर्वी निदान झाल्यास जिभेचा कर्करोग बरा होऊ शकतो.
इतर पृष्ठवंशी प्राण्यांतील जीभ : बहुतेक पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये जीभ हा अवयव मुखातील तळभागाशी जोडलेला असतो. माशांमध्ये जीभ प्रारंभिक स्वरूपाची व हालचाल विरहित असते. काही माशांचे दात जिभेतच असतात. सपुच्छ उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या) प्राण्यांची जीभ माशांच्या जिभेसारखीच असते. बेडूक व इतर अपुच्छ उभयचर प्राण्यांची जीभ मांसल असून तिची हालचाल मोकळी असते. बेडूक आपली जीभ वेगाने बाहेर फेकून कीटक पकडतो.
सरपटणाऱ्या प्राण्यांत जिभेची हालचाल बरीच मोकळी असते. मगर, सुसर आणि कासव हे प्राणी खास अपवाद आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांत जिभेचे अनेक प्रकार आढळतात. सापाची जीभ चिमट्यासारखी दुभंगलेली असते व तो आपली जीभ तोंड न उघडता खालच्या जबड्यात असलेल्या खाचेतून बाहेर काढू शकतो.
पक्ष्यांमध्ये जिभेला अंगभूत स्नायू नसल्यामुळे तिची हालचाल निरनिराळ्या जातींत कमीजास्त होते. ज्या पक्ष्यांमध्ये ती बाहेर काढता येते, त्यांच्यात ती स्नायू नसल्यामुळे कंटास्थीच्या पुढे सरकण्यामुळे बाहेर ढकलली जाते. पोपटाच्या जिभेवर असणाऱ्या तैल ग्रंथींमुळे (तैलयुक्त पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथींमुळे) ती मऊ राहते.
सस्तन प्राण्यांमध्ये जिभेचा पुढील भाग तोंडाच्या सांगाड्यापासून बराच सुटा असल्यामुळे ती विविध कार्ये करू शकते. चर्वणाच्या वेळी दातांखाली अन्न सारण्यासाठी, तसेच गाईसारख्या प्राण्यांत चरताना गवताची जुडी दातांवर घासून तोडण्यासाठी जिभेत घट्ट धरता येते. घोड्यासारखे प्राणी जिभेच्या हालचालीमुळे तोंडात कमी दाब उत्पन्न करून पाणी आत ओढून घेऊ शकतात. असे प्राणी डोके न उंचावता एक मी. उंचीपर्यंत पाणी ओढू शकतात. काही प्राण्यांत दात साफ करण्याकरिता जिभेचा उपयोग होतो, तर केसाळ व फर असलेल्या प्राण्यांत तिचा ब्रशासारखा उपयोग होतो. कुत्रा व मांजर यांना पातळ पदार्थ पिण्यासाठी जिभेचा चमच्यासारखा उपयोग होतो. मुंगीखाऊ (अँट इटर) ह्या प्राण्याची जीभ लांबपर्यंत बाहेर काढता येणारी व चिकट श्लेष्मल पदार्थांचा पातळ थर असलेली असते. अशा जिभेमुळे हा प्राणी वारुळातील मुंग्या जिभेच्या मदतीने सहज खाऊ शकतो. स्पर्श व रुची समजण्याची ज्ञानेंद्रिये जिभेच्या पृष्ठभागावर असल्यामुळे अन्न पुढे घश्यात उतरू देणे वा न देणे हेही ती ठरवू शकते. काही प्राण्यांत जिभेची श्लेष्मकलाही अन्न पकडून ठेवण्यास, चर्वण करण्यास, तसेच पातळ पदार्थ पिण्यास मदत करते. काही सस्तन प्राण्यांत अन्नाचे चर्वण केले जात नाही व म्हणून जीभ शरीराच्या आकारमानाने फार लहान असते. उदा., देवमासा.
संदर्भ : 1. Davies, D. Davies, F. Eds. Gray’s Anatomy, London, 1962.
2. Hamilton, W. J., Ed. Textbook of Human Anatomy, London, 1958.
3. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology. Vol. II. London, 1963.
सलगर, द. चि. भालेराव, य. त्र्यं. दीक्षित, श्री. गं.
“