जिरॅनियम :(इं. क्रेन्स बिल्स कुल-जिरॅनिएसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज) द्विदलिकित वनस्पतींचा हा एक वंश असून त्यात सु. चारशे जातींचा अंतर्भाव केला जातो त्या सर्व वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधीय [→ ओषधि] किंवा क्षुपीय (झुडपासारख्या) असून त्यांचा प्रसार सर्वत्र असला, तरी समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशांत अधिक आहे. पादपगृहात विशेषकरून वाढविल्या जाणाऱ्या तथाकथित जिरॅनियमच्या जाती वास्तविकपेलार्‌गॉनियम   वंशातील आहेत. भारतात जिरॅनियमच्या सु. एकवीस जाती

जिरॅनियम ऑसेलॅटम : (१) फुलाफळांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) तडकलेले फळ.

 आहेत. बऱ्याच बहुवर्षायू जाती बागेत वाफ्यांच्या कडेने अथवा खडकाळ जागी लावलेल्या आढळतात. काही जाती किरकोळ औषधी उपयोगाच्या असून अनेक स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणाऱ्या) आहेत काहींच्या मुळांत भरपूर टॅनीन असते. त्यांचा उपयोग कातडी कमाविण्यास व रंगविण्यास करतात. जिरॅनियम तेल हा व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ पेलार्‌गॉनियमशी संबंधित आहे. जिरॅनियमच्या संयुक्त फुलोऱ्यातील [वल्लरी, → पुष्पबंध] प्रत्येक भागात एक किंवा दोन फुले असतात फुलांतील मधुरस स्त्रवणाऱ्या संरचना (मधुप्रपिंड) केसरदलांच्या तळाशी असतात. केसरदले आरंभी अपक्व किंजलाभोवती उभी असून परागकोश तडकल्यावर बाजूस वळतात त्यानंतर किंजल्के उघडतात [→ फूल]. शुष्कफळ (पालिभेदी) तडकते त्याच वेळी फलांश (फळाचे सुटे झालेले भाग) फुटतात व प्रत्येकातून ते बाहेर फेकले जातात [→ विकिरण, फळांचे व बीजांचे] परंतु तत्पूर्वी किंजदले बाहेरून किंजल्काकडे वर स्वतंत्रपणे गुंडाळत जातात [→ फळ]. इतर शारीरिक लक्षणे जिरॅनिएसी अथवा भांड  कुलात [→ जिरॅनिएलीझ] वर्णिल्याप्रमाणे असतात.

भांड : (भांढ). ह्या हिंदी नावाने (लॅ. जिरॅनियम नेपालेन्स इं. नेपाल जिरॅनियम) ओळखली जाणारी ही सु. १५–४५ सेंमी. उंच बहुवर्षायू ओषधी हिमालयाचा समशीतोष्ण (सु. १,५००–२,७०० मी.उंचीचा) भाग, काश्मीर आणि खासी, पळणी व निलगिरी टेकड्या येथे आढळते. हिला हस्ताकृती व तीन ते पाच खंडांत विभागलेली दातेरी पाने असून फुले लाल किंवा जांभळी असतात. हिच्या मुळांतील लाल रंगाचा उपयोग औषधी तेलांना रंग येण्यास करतात कातडी कमाविण्यासही ही मुळे (रोएल) वापरतात. गॅलिक व सक्सिनिक अम्‍ले आणि क्वेर्सिटीन ही द्रव्ये या वनस्पतीत आढळतात. हिच्या खेरीज जिरॅनियमच्या सु. नऊ जाती हिमालयाच्या परिसरात आढळतात आणि त्यांपैकी काहींत लघवी साफ करण्याचे व जखमा बऱ्या करण्याचे गुणधर्म आहेत यांशिवाय दंतविकार, नेत्रविकार, अतिसार, रक्तस्त्राव इत्यादींवर गुणकारी असणाऱ्या काही जाती आहेत. भांड हे नाव जि. ऑसेलॅटम  या जातीलाही दिलेले आढळते. भांड हे पंजाबी व रोएल हे काश्मीरी नाव आहे. मुळांतील लाल रंगाला अनुलक्षून ‘कषायमूल’ असे अर्थपूर्ण नाव जिरॅनियम  वंशाला व ‘कषायमूल कुल’ जिरॅनिएसी या कुलाला डॉ. रघुवीर यांनी सुचविलेले आढळते. ‘कओअशुद’ हे काश्मीरी नाव जिरॅनियमच्या (जि. वॉलिचिएनम ) दुसऱ्या एका भारतीय जातीच्या मुळांस लावतात ते ⇨मायफळासारखे संग्राहक असून अतिसार, रक्तस्त्राव, परमा, आर्तवदोष (मासिक पाळीचे दोष), दातदुखी इत्यादींवर गुणकारी आहे. मुळांचा लेप सुजलेल्या पापण्यांवर लावल्यास सूज उतरते.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, New Delhi, 1956.

           २. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९२७.

परांडेकर, शं. आ.  

जिरॅनियम