जिब्राल्टरची सामुद्रधुनी : (गॅडटॅन सामुद्रधुनी अरबी – बॅबॲझकाक). स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावरील जिब्राल्टर व आफ्रिकेतील मोरोक्कोचा उत्तर किनारा यांच्या दरम्यानचा समुद्राचा अगदी चिंचोळा भाग. भूमध्य समुद्र हा सर्वांत मोठा भूवेष्टित समुद्र जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने पश्चिमेकडील अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. मोरोक्कोच्या किनाऱ्यावरील स्पार्टेल भूशिरापासून पूर्वेकडील स्यूता भूशिरापर्यंत व स्पेनच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील ट्रफॅल्गर भूशिरापासून पूर्वेकडील जिब्राल्टर बंदरापर्यंत ही सामुद्रधुनी ५६ किमी. पश्चिम-पूर्व पसरलेली आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील जिब्राल्टर हे ठिकाण उंच अशा सागरकड्यावर वसले असून अतिप्राचीन काळापासून मोक्याचे म्हणून ओळखले जाते. जिब्राल्टरच्या अगदी विरुद्ध बाजूला सु. २६ किमी. अंतरावर मोरोक्कोच्या उत्तर किनाऱ्यावर स्यूता हे बंदर आहे. प्राचीन काळी जिब्राल्टरचा खडक आणि स्यूता येथील जेबेल मूसा यांस ‘हर्क्यूलीझचे स्तंभ’ असे नाव होते. पूर्व भागात सामुद्रधुनी अरुंद असून अगदी पश्चिम भागात तिची रुंदी ३८ किमी. आहे. तिची किमान रुंदी सु. १२·७ किमी. आहे.
या सामुद्रधुनीच्या मध्य भागात किनाऱ्यापासून सु. ८ किमी. अंतरापर्यंतच्या समुद्रभागात समुद्राची खोली ३०८ मी. इतकी आहे. या सामुद्रधुनीत ३,००० मी. खोलीवर तळभागावरील जलमग्न उंचवटा आहे. या उंचवट्यामुळे अटलांटिक महासागरातील गार पाण्याचे भूमध्य समुद्रातील उबदार पाण्याची नीटसे मिश्रण होऊ शकत नाही.
या सामुद्रधुनीतूनच आंतरराष्ट्रीय व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा असा सुएझ सागरी मार्ग जातो. या मार्गाने विविध प्रकारच्या कच्च्या व पक्क्या मालाची फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या मार्गावरील जिब्राल्टर हे व्यापारी दृष्ट्या आणि त्याहीपेक्षा सैनिकी दृष्टीने मोक्याचे ठिकाण म्हणून महत्त्वाचे आहे.
जगातील भिन्न संस्कृतींच्या भागांना जोडणारे एक प्रमुख ‘प्रवेशद्वार’ असा या सामुद्रधुनीचा उल्लेख केला जातो.
दाते, सु. प्र.