जॉर्ज, हेन्‍री : (२ सप्टेंबर १८३९–२९ ऑक्टोबर १८९७). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, भूसुधारणांचा खंदा पुरस्कर्ता व ‘एककर सिद्धांता’चा प्रवर्तक. फिलाडेल्फिया येथे जन्म. घरची गरिबी असल्याने वयाच्या चौदाव्या वर्षीच शालेय शिक्षण थांबले. दोन वर्षे एका व्यापारी पेढीवर कारकून. १८५६ मध्ये फिलाडेल्फियास पुनरागमन. तेथे तो छपाईकाम शिकला. १८५७ मध्ये एका जहाजावर खलाशी म्हणून राहिला. लवकरच ती नोकरी सोडून सोन्याच्या शोधासाठी तो कॅनडास गेला परंतु तो अपयशी ठरून १८५८ मध्ये कॅलिफोर्नियास परतला. तेथे वृत्तपत्रांसाठी काम व १८८० पर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या राजकारणात भाग. १८७१ साली दोन भागीदारांसह सॅन फ्रॅन्सिस्को डेली ईव्हनिंग पोस्ट  हे वृत्तपत्र काढले परंतु चारच वर्षांत आर्थिक अडचणींमुळे ते बंद पडले. गॅस मीटर-तपासनीस अधिकारी म्हणून नोकरी मिळाल्यानेच त्याला प्रोग्रेस अँड पॉव्हर्टी  या त्याच्या सर्वांत महत्त्वाच्या ग्रंथाचे लेखन करणे शक्य झाले. १८८० पासून न्यूयॉर्कमध्येच वास्तव्य. १८६८ ची महापौरपदाची निवडणूक फारच थोड्या मतांनी हरला.

अवर लँड अँड लँड पॉलिसी  या १८७१ मध्ये लिहिलेल्या पुस्तिकेमधील कल्पनांचा व सिद्धांतांचा जॉर्जने प्रोग्रेस अँड पॉव्हर्टी  ह्या ग्रंथात विस्तार केला (१८७९). या ग्रंथामुळे १८७३–७८ मधील मंदीने पसरलेल्या असंतोषाच्या उद्रेकात अधिकच भर पडली. या ग्रंथाची विक्री मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक भाषांत भाषांतरे झाली. जॉर्जने लिहिलेल्या पुस्तिका, मासिकांतील लेखन आणि अमेरिकेत व इंग्‍लंडमध्ये दिलेली व्याख्याने ह्या सर्वांमुळे जॉर्जच्या उपर्युक्त ग्रंथांचा व्यापक प्रसार झाला. 

रिकार्डोच्या खंडसिद्धांताला त्याने नवा अर्थ दिला. केवळ जमिनीच्या संदर्भातच ‘उतरत्या प्रतिलाभाचा नियम’ व ‘सीमांत उत्पादनक्षमता सिद्धांत’ लागू करून जॉर्जने असे प्रतिपादिले की, आर्थिक विकास होऊ लागला म्हणजे जमिनीची वाढत्या प्रमाणावर चणचण भासून तिची दुर्मिळता वाढत जाते याचा फायदा मात्र भांडवल व श्रम ह्या दोन उप्तादनघटकांच्या तुलनेने जमीनदार मोठ्या प्रमाणावर स्वतः घेतो. जॉर्जच्या मते जमिनीवरील खंड सर्व सामाजिक दुःखांचे मूळ आहे. यावरील उपाय म्हणजे या खंडरूपी अनर्जित उत्पन्नावर शासनाने कर बसवावा आणि अन्य कर रद्द करावेत. या एका करावाटे मिळणारे उत्पन्न एवढे प्रचंड असेल की, त्याचा विनियोग सरकारी बांधकामांकरिता–रस्त्यांपासून विद्यापीठांपर्यंत–करता येईल. जॉर्जने प्रतिपादिलेल्या आर्थिक विवेचनावर मानवतावादी आणि धार्मिक विचारांचा प्रभाव होता.

जॉर्जने पुरस्कारिलेल्या एक-कर उपायाचा व्यावहारिक परिणाम फारसा दिसून आला नाही, तसेच त्यास फारच थोड्या अर्थशास्त्रज्ञांनी मान्यता दिली. तथापि १८८० पासून एक-कर हा सुधारणा चळवळीचा केंद्रबिंदू ठरला. असे असूनही, त्याने ‘विशेषाधिकारा’वर दिलेला जोर, संधिसमानतेची त्याची मागणी आणि त्याने केलेले पद्धतशीर आर्थिक विश्लेषण ह्या सर्वांचा परिणाम सुव्यवस्थित सुधारणा घडून येण्यात झाला. जॉर्जची मते बव्हंशी समाजवादी शासनाला विरोधी असली, तरी त्याने साधे विचार अतिशय प्रभावीपणे मांडल्याने मवाळ समाजवादाला एक नवीनच धार आली.

आयरिश लँड क्वेश्चन (१८८१), सोशल प्रॉब्‍लेम (१८८३), प्रॉपर्टी इन लँड, द कंडिशन ऑफ लेबर, प्रोटेक्शन ऑर फ्री ट्रेड, ए परप्‍लेक्स्ड फिलॉसॉफर, द सायन्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी  हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ. १९०६–१९ च्या दरम्यान हेन्‍री जॉर्जचे सर्व लेखन दहा खंडांत प्रसिद्ध करण्यात आले. त्यांपैकी नवव्या व दहाव्या खंडांमध्ये त्याचे जीवनचरित्र आहे.

गद्रे, वि. रा.