किरखोफ, गुस्टाफ रोबेर्ट : (१२ मार्च १८२४ — १७ ऑक्टोबर १८८७). जर्मन भौतिकविज्ञ. विद्युत शास्त्र व वर्णपट विज्ञानात महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म केनिग्झबर्ग येथे झाला. केनिग्झबर्ग विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर ते बर्लिन (१८४७—५०) आणि ब्रेस्लौ (१८५०—५४) येथील विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते. त्यानंतर १८५५ मध्ये हायड्लबर्ग विद्यापीठांत व १८७५ मध्ये परत बर्लिन विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली.
किरखोफ यांचे प्रायोगिक व गणितीय भौतिकीतील कार्य व्यापक व महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी व्हीट्स्टन यांच्या विद्युत् रोध मोजण्याच्या सेतूमध्ये सुधारणा केली. विद्यूत् मंडलांच्या जालातील विद्यूत् प्रवाहाच्या वितरणासंबंधीचे दोन महत्त्वाचे नियम त्यांनी मांडले. त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे नियम विद्यूत् जालांसंबंधीचे प्रश्न सोडविण्यास आणि त्यावर आधारीत असलेली विद्यूत् सामग्री तयार करण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात. रैखिक संवाहकासंबंधीच्या ओहम नियमाचा किरखोफ यांनी त्रिमिती संवाहकांसाठी विस्तार करून संवाहकातील विद्यूत् संवाहनासंबंधीच्या समीकरणांचे व्यापकीकरण केले.
बन्सन यांच्याबरोबर संशोधन करून त्यांनी वर्णपटीय विश्लेषण हे एक अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी तंत्र प्रस्थापित केले. १८५९ मध्ये या दोघांनी सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील फ्राउनहोफर यांनी शोधून काढलेल्या रेषांचा अभ्यास करण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला आणि यासंबंधी लिहिलेल्या निबंधाद्वारे वर्णपटविज्ञानाचा पाया घातला [→वर्णपटविज्ञान ]. याच तंत्राचा उपयोग करून बन्सन व किरखोफ यांनी १८६० मध्ये सिझियम आणि १८६१ मध्ये रूबिडियम या मूलद्रव्यांचा शोध लावला. किरखोफ यांनी ताऱ्यांच्या संघटनांच्या अभ्यासाकरिताही वर्णपटविज्ञानाचा उपयोग केला.
उत्सर्जनक्षमता व प्रारक (तरंगरूपी ऊर्जा बाहेर टाकणाऱ्या) पदार्थाचे शोषकत्व, निरपेक्ष तापमान व उत्सर्जित तरंगलांबी यांच्यातील संबंध दर्शविणारा प्रारणासंबंधीचा किरखोफ यांचा नियम प्रसिद्ध आहे. [→उष्णता प्रारण].
एखाद्या संवाहकातून वाहणाऱ्या विद्यूत् विक्षोभाचा वेग प्रकाशाच्या अवकाशातील वेगाइतकाच असतो, असे त्यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले, यांशिवाय स्फटिकातील प्रणमन (वक्रीभवन) व परावर्तन, बाष्पीभवन, विद्रावासंबंधीची ⇨ऊष्मागतिकी यांसंबंधीही त्यांनी संशोधन केले.
ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांचे संशोधनकार्य १८८२ मध्ये एकत्रित स्वरूपात (पुरवणी १८९१) प्रसिद्ध झाले. ते बर्लिन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.