किनारा व किनारी प्रदेश : महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी त्याशेजारची कोरडी जमीन यामधील सीमारेषेला किनारा म्हणतात. नदीतीरालाही कित्येकदा नदीकिनारा म्हणतात. काही वेळेला किनाऱ्याला लागून असलेल्या कमीअधिक रुंदीच्या सखल प्रदेशालाही किनारा म्हणतात परंतु त्याला किनारी प्रदेश किंवा किनारी मैदान म्हणणे अधिक योग्य ठरेल. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी जेथवर जमीनीपासून दूर जाते, तेथपासून लाटांचे पाणी जमीनीवर जास्तीतजास्त जेथपर्यंत पोहोचते, त्या भागाला (समुद्राचा) किनारा म्हणजे अधिक सयुक्तिक होय.

किनाऱ्याचे स्वरूप, त्याचे घटक खडक, त्यांची संरचना, तेथील जमीनीवर विदारण, जलप्रवाह, गर्फ, वारा इ. क्षरणकारकाचे कार्य होऊन तिला आलेले स्वरूप, समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्याजवळून वाहणारे समुद्रप्रवाह यांचे कार्य आणि किनाऱ्याचे समुद्रात होणारे निमज्जन किंवा समुद्रातून त्याचे होणारे उन्मज्जन, यांवर मुख्यतः अवलंबून असते.

उन्मज्जन व निमज्जन या क्रिया दीर्घकालीन, अत्यंत सावकाश होणाऱ्या असतात क्वचित भूकंपासारख्या हालचालींमुळे त्या वेगाने घडून येतात. समुद्राचे पाणी कमी होऊन त्याची पातळी खाली गेल्यामुळे वा

रिया किनारा

किनाऱ्याजवळची पाण्याखालची जमीन अंतर्गत हालचालींमुळे वर उचलली गेल्याने किनाऱ्याचे उन्मज्जन होते तर समुद्राचे पाणी वाढून त्याची पातळी वर आल्यामुळे किंवा किनाऱ्याजवळची जमीन अंतर्गत हालचालींमुळे खचल्याने किनाऱ्याचे निमज्जन होते. हिमयुगांच्या जास्तीतजास्त वाढीच्या वेळी समुद्राची पातळी हल्लीपेक्षा निदान ३०० मी. कमी होती. शेवटच्या हिमयुगानंतर बर्फ वितळून समुद्रांची पातळी वाढून त्यांना हल्लीची पातळी प्राप्त झाली आहे. हल्लीच्या सर्व हिमनद्या व बर्फ वितळले, तर समुद्रांची पातळी आणखी ६० ते ७० मी. वाढेल असा अंदाज आहे.

उन्मज्जन पावलेल्या किनाऱ्याचा भाग त्याआधी पाण्याखाली बहुतांशी सपाट असल्यामुळे असा किनारा एकसारखा व सरळ असतो. भारताचा केरळ किनारा व पूर्व किनाऱ्याचा बराच भाग या प्रकारचा आहे. याउलट निमज्जन पावलेला किनारा बहुधा वेडावाकडा, विषम व दंतुर असतो. विशेषतः टेकड्या व दऱ्याखोरी यांनी भरलेला किनारी प्रदेश निमज्जन पावला, तर तो अगदी विषम व ठिकठिकाणी समुद्राचे लांब व खोल फाटे आत शिरलेले अशा स्वरूपाचा बनतो. निमज्जनामुळे नद्यांची मुखे पाण्याखाली जाऊन तेथे खाड्या आणि आखाते तयार होतात. खाड्या या पुष्कळदा सापेक्षतः

डाल्मेशियन किनारा

उथळही असतात. नदीखोऱ्याचा प्रदेश या प्रकारे पाण्याखाली गेला म्हणजे तेथे जवळच्या उपनद्यातूनही अंतर्भागात जाण्यास जलमार्ग मिळतो, सागरतळ बहुधा सावकाश उतरता होत गेलेला असतो, किनाऱ्याजवळचा भूभाग सापेक्षतः अधिक रूंद असून व्यापारी दृष्ट्या सोयीचा असतो. अशा किनाऱ्याला ‘रिया’ किनारा म्हणतात. त्याची उत्तम उदाहरणे म्हणजे स्पेनचा वायव्य किनारा आणि आयर्लंडचा नैर्ऋत्य किनारा ही होत. जावा, सुमात्रा, मलाया व बोर्निओ हे एकत्र जोडलेले होते, तेव्हाचा त्यांमधील प्रदेश निमज्जन पावल्यामुळे आज ते वेगवेगळे दिसतात. परंतु त्यांमधील सागरतळावर पूर्वीच्या नद्या व त्यांच्या उपनद्या यांच्या प्रवाहांच्या खुणा स्पष्टपणे आढळून येतात. एड्रिॲटिक समुद्रावरील युगोस्लाव्हियाच्या किनाऱ्याजवळ किनाऱ्याला समांतर डोंगराच्या तीन ओळी होत्या. त्यांपैकी एक जमीनीवर संपूर्णपणे कोरडी आहे तिच्यानंतरची दुसरी अंशतः निमज्जन पावल्यामुळे तिच्या किनाऱ्याला समांतर दऱ्यात अरुंद मार्गांनी पाणी

शिरले आहे आणि तिसरी रांग अधिक निमज्जन पावल्यामुळे तिची फक्त काही शिखरेच तेवढी बेटांच्या रांगेच्या रूपाने पाण्याबाहेर आहेत.

फ्योर्ड किनारा

हाफ-नेहरुंग किनारा

अशा किनाऱ्याला ‘डाल्मेशियन’ किनारा म्हणतात. हिमनद्यांनी कोरलेल्या दऱ्या पुष्कळदा समुद्रसपाटीपेक्षा खोल असतात. त्यांच्या बाजू उभ्या असून त्यांवर उंच डोंगर असतात. बर्फ वितळून किंवा जमीन खचून अशा दऱ्यात समुद्राचे पाणी शिरले म्हणजे पाण्याच्या त्या लांब चिंचोळ्या फाट्यास ‘फ्योर्ड’ म्हणतात. त्यांच्या मुखांजवळ लहान लहान बेटे असतात. फ्योर्डमधील पाणी खूप खोल असते आणि त्यांच्या काठी सपाट जमीनीची अगदी चिंचोळी पट्टी असते.

त्यामागे डोंगर असतात. त्यामुळे समुद्रातून अंतर्भागाशी दळणवळण ठेवण्यास फ्योर्ड उपयोगी पडत नाहीत. परंतु मासेमारींला आणि जहाजांना सुरक्षित आसरा म्हणून त्यांचा चांगला उपयोग होतो. असे फ्योर्ड नॉर्वे, स्कॉटलंड, चिलीचा दक्षिण भाग व न्यूझिलंडचे दक्षिण बेट येथे विशेषेकरून आढळतात.


समुद्रकाठची जमीन समुद्राकडे एकदम उतरती होत गेलेली असेल किंवा डोंगर व टेकड्या समुद्रापर्यंत येऊन पोहोचल्या असतील, तर त्यांच्या पायथ्याशी लाटांचा आणि समुद्रप्रवाहांचा जोरदार मारा होत राहतो. त्यामुळे क्षरण होऊन तेथे पोकळ जागा निर्माण होते. तिला समुद्रकाठची ‘गुहा’ म्हणतात. या गुहेत तेथील खडकांच्या फटीत लाटेचे पाणी जोरात शिरले म्हणजे त्यातील हवा आतच अडकून दाबली जाते. लाट ओसरली म्हणजे ही हवा जोराने प्रसरण पावते आणि त्याबरोबर खडकांचे सैल झालेले भाग कोसळतात. गुहा अधिक खोल होत जाते व तिच्या तोंडाजवळचा

फ्योर्ड : एक दृश्य

लोंबता खडकाचा भागही कालांतराने कोसळतो. याप्रमाणे आधीचा डोंगराळ किनारा मागे मागे हटत जातो आणि तेथे लाटांमुळे एका बाजूला उंच कडा व दुसऱ्या बाजूला लाटेचे कार्य सुरू होते ती समुद्रातली मर्यादा यांमधील `वीचिछिन्न मंचा’ (वेव्हकट प्लॅटफॉर्म) चा सपाट भाग पाण्याखाली तयार होतो. तो उथळ असतो. किनारा आत आत झिजत जातो तसतसे या मंचावर खडकांचे तुटून वेगळे उभे राहिलेले भाग, बेटे, किनाऱ्यावर सागरी गुहा, कडे, मऊ खडक फोडून आत शिरलेले समुद्राचे गोल आकाराचे ‘वंककोव्ह’ व आखाते आणि कठीण खडकाची समुद्रात शिरल्यासारखी दिसणारी लहान मोठी भूशिरे इ. विशेष स्वरूपे दिसू लागतात. लाटांनी किनाऱ्यावर आणून टाकलेल्या वाळू, खडे, गोटे इत्यादीकांमुळे पुळणी तयार होतात. समुद्रकाठची जमीन समुद्राकडे सावकाश उतरती होत गेलेली असेल, तर मोठ्या व रूंद पुळणी तयार होतात. वीचिछिन्न मंच अरुंद असेल, तर ओसरत्या लाटेने व किनारी प्रवाहाने वाळू, खडे वगैरे पदार्थ किनाऱ्यापासून दूर, खोल पाण्यात जाऊन साचतात व कालांतराने पुळण समुद्राकडे वाढत जाते. किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटेचा खालचा भाग उतरत्या समुद्रतळाला टेकून तिचा जोर नाहीसा झाला, म्हणजे तिच्याबरोबर आलेले पदार्थ तेथेच किनाऱ्यापासून काही अंतरावर साचू लागतात. परतणाऱ्या लाटेने व प्रवाहानी आणलेले पदार्थही असेच किनाऱ्यापासून दूर साचू लागतात. या साचणाऱ्या पदार्थांचा एक बांध किंवा दांडा तयार होतो. हा बांध व मुख्य किनारा यांदरम्यानच्या उथळ पाण्याच्या भागाला खारकच्छ (लॅगून) म्हणतात. गाळ व वाळू घेऊन येणारा किनारी प्रवाह वंकाच्या किंवा आखाताच्या तोंडाशी आला, म्हणजे तो त्यात न शिरता तसाच पुढे जातो व खोल पाण्यात ते पदार्थ टाकतो. यामुळेही अशा वंकांच्या किंवा आखातांच्या तोंडांशी बांध किंवा दांडा तयार होतो. असे वाळूचे दांडे व त्यांच्या आतील किनाऱ्यापर्यंतचा उथळ समुद्राचा भाग यांनी युक्त असलेल्या किनाऱ्यास ‘हाफ-नेहरूंग’ किनारा म्हणतात. तो जर्मनी व पोलंड यांच्या उत्तर किनाऱ्यावर आढळतो. हाफ हा तेथील पाण्याचा भाग व नेहरुंग हा दांडा होय. लाटांनी किनाऱ्यापासून दूर नेलेले पदार्थ वीचिच्छिन्न मंचापलीकडे एकसारखे पसरले जाऊन ‘वीचिस्थापित’ मंच, (वेव्हबिल्ट प्लॅटफॉर्म) तयार होतो. वीचिच्छिन्न व वीचिस्थापित मंचांपासून, तसेच किनारी प्रदेशाच्या निमज्जनामुळेही सागरमग्न खंडभूमी किंवा समुद्रबूड जमीन अस्तित्वात येते.

उन्मज्जनाने निर्माण झालेल्या किनाऱ्यावर आधीचा वीचिच्छिन्न मंच, त्यावरील तुटलेले उभे खडक, जमिनीच्या बाजूस सागरकाठच्या गुहा आणि उभे कडे हे आता कोरड्या जमिनीवर दिसतात. तसेच वीचिस्थापित मंच, समुद्रसपाटीच्यावर उचलल्या गेलेल्या व आता पायरीवर असल्याप्रमाणे दिसणाऱ्या पुळणी इ. वैशिष्ट्ये दिसून येतात. उन्मज्जनाने वर आलेला पाण्याखालचा भाग आधी सपाट असल्यामुळे असा किनारा बहुधा सरळ, वंक, आखाते वगैरे नसलेला दिसतो. समुद्रकाठचा सपाट, मैदानी प्रदेश निमज्जन पावला तरीही सरळ किनारा दिसून येतो.

त्रिभूज प्रदेश, प्रवाळपंक्ती, ज्वालामुखी, वालुकागिरी, प्रस्तरविभंग इत्यादींमुळे निर्माण झालेल्या किनाऱ्यांवर निमज्जन किंवा उन्मज्जन या कोणाचीच वैशिष्ट्ये दिसत नाहीत. असे किनारे ‘उदासीन’ किनारे होत. काही किनाऱ्यांवर आलटून पालटून निमज्जन उन्मज्जन झाल्यामुळे दोन्ही प्रकारची आणि उदासीन किनाऱ्यांचीही वैशिष्ट्ये दिसतात. ते संयुक्त किनारे होत.

किनाऱ्यापासून आता सु. २०० मी. उंचीपर्यंतचा भूप्रदेश तो किनारी प्रदेश होय. तो कमीअधिक रुंदीचा असतो. तो गाळाचा बनलेला, खडकाळ, डोंगराळ, वाळू आणि गोटे यांनी भरलेला किंवा दलदलींनी युक्त असा अनेक प्रकारचा असतो. हवामान, जमीन, मनुष्यवस्ती याप्रमाने तो शेतीखाली, जंगलयुक्त, उजाड किंवा केवळ मासेमारीला योग्य असतो.

भारताचा पश्चिम किनारा यूरोपच्या किनाऱ्यासारखा दंतुर नाही. त्यावर चांगली नैसर्गिक बंदरेही थोडीच आहेत. कच्छचे आखात व खंबायतचे आखात हेच काय ते महत्त्वाचे समुद्राचे फाटे जमिनीत घुसलेले आहेत. तेथील किनारी प्रदेश गाळाने बनलेले आहेत. १८१९ साली झालेल्या भूकंपाने कच्छच्या रणाचा भूप्रदेश खचून जलमय झाला. हल्ली तो नद्यांच्या पाण्यामुळे आणि समुद्राचे पाणी वाढते. तेव्हा मधूनमधून पाण्याखाली असतो. येथे किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्या, वाळूने भरलेला मैदानी भाग व खडकाळ प्रदेश दिसतो.

वाळूच्या टेकड्यांमागे सु. ५० किमी. रुंदीचा सुपीक प्रदेश आहे. खंबायतच्या आखाताच्या पूर्वेचा किनारा गाळामुळे भरून येऊन समुद्राकडे वाढत आहे. सुरत आणि भडोच ही पूर्वीची महत्त्वाची बंदरे गाळाने भरल्यामुळे आधुनिक आगबोटींना निरूपयोगी ठरली आहेत. काठेवाडच्या दक्षिण किनाऱ्यावर विंध्य-नर्मदेशी संबंधीत विभागांचाही परिणाम झालेला असावा. कच्छ व काठेवाड यांच्या पूर्वेस गुजरातचे मैदान पसरले आहे. त्याच्या किनाऱ्याजवळच्या भागावर वाऱ्याने आणलेल्या लोएसचे थर आहेत आणि पावसाच्या कमतरतेमुळे तो भाग काहीसा रुक्ष झाला आहे.

दमणपासून दक्षिणेकडे थेट कन्याकुमारीपर्यंतचा किनारी प्रदेश १० ते २५ किमी. रुंदीचा असून त्याच्या पूर्वेस सह्याद्री भिंतीसारखा उभा आहे. येथील किनारा जवळजवळ सरळच असून त्यावर अनेक लहानमोठ्या खाड्या आहेत. सह्याद्रीचे फाटे व त्यांचे खडक काही ठिकाणी थेट समुद्रापर्यंत येऊन पोहोचले आहेत. मुंबई बेटाचा पश्चिम किनारा उन्मज्जन पावलेला आहे, तर पूर्वेस काही अरण्यप्रदेश पाण्याखाली गेलेला दिसतो. यावरून सबंध बेटच पूर्वेकडे कलले असावे किंवा दक्षिणोत्तर विभंगरेषेवर दोन्ही बाजूंची भूमी खालीवर झाली असावी असे दिसते. मुंबईच्या दक्षिणेस किनाऱ्यावर अनेक ठिकाणी छोट्या छोट्या भूशिरांच्या दरम्यान लहान लहान वंक बनलेले असून तेथे शुभ्र रेतीच्या सुंदर पुळणी तयार झालेल्या आहेत. कर्नाटक किनाऱ्यावर अनेक ठिकाणी खडकाळ, उभे कडे आहेत. कोकणाप्रमाणे ही किनारपट्टीही अगदी चिंचोळी आहे. कारवारच्या दक्षिणेस किनारी प्रदेशाची रुंदी वाढू लागते. केरळ किनारा सापेक्षतः अधिक रुंद व कमी खडकाळ आहे. तेथील खारकच्छ व कायल (बॅकवॉटर्स-पश्चजल) यांमुळे हा किनारा उन्मज्जन पावलेला असावा असे दिसते. सामान्यतः गोव्याच्या उत्तरेचा किनारा निमज्जन पावलेला असावा. त्याचा संबंध सह्याद्रीच्या पश्चिमेकडील विभंगाशी असावा.

भारताचा पूर्व किनारी प्रदेश पश्चिम किनारी प्रदेशापेक्षा अधिक रुंद, सु. १२० किमी. आहे. कन्याकुमारीपासून उत्तरेस १,१०० किमी. कृष्णा गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशांपर्यंत असा तो रूंद आहे. त्यांच्या उत्तरेस खडकाळ टेकड्या अगदी समुद्राजवळ आल्या आहेत. त्यांच्या उत्तरेचा किनारी प्रदेश पुन्हा रुंद होऊन चिल्का सरोवर, महानदी त्रिभुज प्रदेश यांच्या पलीकडे बलसोर मैदानी प्रदेशातून पुढे गंगेच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत गेलेला आहे. चिल्का सरोवर मुखाजवळ वाळूचा दांडा साचून बनलेले आहे. पूर्व किनाऱ्याचे तमिळनाडू किनारा, आंध्र किनारा आणि उत्कल किनारा असे भाग मानतात. त्यावर अनुक्रमे कावेरी, कृष्णा, गोदावरी व महानदी यांचे त्रिभुज प्रदेश आहेत. कृष्णा-गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशांदरम्यान कोलेरू सरोवर आहे व मद्रासच्या उत्तरेस पुलिकत सरोवर आहे. पूर्व किनाऱ्यावरही खारकच्छ व दांडे बरेच असून, हा किनाराही बऱ्याच अंशी उन्मज्जन पावलेला असावा असे दिसते.

जगातील बरेचसे किनारे संयुक्त स्वरूपाचे असल्यामुळे त्यांचे वर्गिकरण करणे कठिण जाते.

कुमठेकर, ज. ब.