किड, टॉमस : (? नोव्हेंबर १५५८ – १५९४). इंग्रज नाटककार. जन्म आणि शिक्षण लंडनमध्ये. १५८७ – ८८ च्या सुमारास लिहिलेल्या द स्पॅनिश ट्रॅजेडी ह्या शोकात्मिकेवर त्याची कीर्ती मुख्यत: अधिष्ठित आहे. सेनीका ह्या रोमन नाटककाराच्या शोकात्मिकांच्या धर्तीवर लिहिलेल्या ह्या नाट्यकृतीत खून, सूड, पिशाचदर्शन, अनैतिक संबंध, अत्याचार ह्यांचे मुक्तचित्रण आढळते. ह्या नाटकाने इंग्रजी नाटकांत सूडनाट्याचा अवतार घडवून आणला. याशिवाय रॉबेअर गार्न्ये ह्या फ्रेंच नाटककाराच्या  Cornelie (१५७४) ह्या नाटकाच्या इंग्रजी अनुवाद केला (१५९३). किडच्या एका नाटकावरून (हे नाटक अनुपलब्ध) शेक्सपिअरने हॅम्लेट लिहिले असावे, असा एक तर्क आहे.

भागवत, अ. के.