किंबर्ली : दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या केप प्रांतातील हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकसंख्या १,०७,१०४ (१९७०). हे समुद्रसपाटीपासून १,२२६ मी. उंचीवर असून केपटाउनच्या ९७० किमी. ईशान्येस आहे. ह्या शहराच्या आसमंतातील हिऱ्यांच्या खाणींचा प्रथम १८७० मध्ये शोध लागला. १८८५ साली किंबर्ली ते केपटाउन हा लोहमार्ग सुरू झाला व ह्या शहराचे महत्त्व वाढले. अलीकडे ग्रंथालये, पदार्थ संग्रहालये, नाट्य व चित्रपट गृहे, बांटू लोकांविषयीचे एक खास संग्रहालय वगैरेंचा अंतर्भाव करून अत्याधुनिक पद्धतीवर ह्या शहराची उभारणी करण्यात आली आहे. मॅंगॅनीज, ॲस्बेस्टस, जिप्सम यांच्या खाणी, धातुकाम, विटा, सिमेंट, फर्निचर, कापड हे येथील इतर प्रमुख उद्योग आहेत. येथील लोकांपैकी २९,५७३गोरे ५०,५६८ बांटू, ९३८ आशियाई आणि २६,०२५ इतर कृष्णवर्णीय आहेत (१९७०).
लिमये, दि. ह.