कलावस्तुविक्रय : कलांच्या सामाजिक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कलावस्तूंची खरेदी-विक्री. कलावस्तूची किंमत मुख्यत: दोन घटकांवर अवलंबून असते : तिचा कलात्मक दर्जा वा तिचे अनन्यसाधारणत्व आणि तिला असणारी मागणी. कलावस्तूचे निर्मितिमूल्य, तिच्या माध्यमाची गुणवत्ता, तिची चांगली-वाईट अवस्था व तिचा अस्सलपणा यांवरही तिची किंमत अवलंवून असते, कलावस्तुविषयक ग्राहकांची मागणी ही त्या वस्तूची त्यांना जाणवणारी सौदर्यात्मकता, उपयुक्तता, संग्राह्यता यांवर अवलंबून असते. सामाजिक दर्जाचे, धार्मिकतेचे किंवा सांस्कृतिक पंरपरेचे प्रतीक म्हणूनही कलावस्तूंची मागणी केली जाते. 

प्रागैतिहासिक काळात विविध प्रकारच्या कच्च्या मालांची तसेच उत्पादित वस्तूंचीही देवघेव केली जाई. धातूंचा शोध लागला, त्यांचा कलावस्तुनिर्मितीत व त्यांच्या संरक्षणार्थही वापर होऊ लागला व कलावस्तूंना अधिक टिकाऊपणा आला त्यामुळे त्यांच्या आयात-निर्यातीची व्यवस्था जास्त सुलभ झाली. कलावस्तूंच्या व्यापाराची प्रथा निश्चितपणे केव्हा सुरु झाली, हे सांगणे अशक्य आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच व्यक्तिगत आणि सामुदायिक कलाभिरुची वाढत गेली आणि कलावस्तूंचा व्यक्तिश: व समूहश: किंवा संस्थांद्वारे संग्रह करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. या प्रवृत्तीमुळे कलावस्तूंच्या खरेदी-विक्रिस चालना मिळाली.

ख्रि. पू. २००० च्या सुमारास भूमध्य समुद्राच्या परिसरात धातू, कातडी, वस्त्रप्रावरणे यांची देवघेव चालू होती. समृद्ध सजावटीच्या इट्रुस्कन थडग्यांमध्ये आशिया मायनर येथील ब्राँझच्या वस्तू, ईजिप्त व मेसोपोटेमिया (सध्याचा इराक) येथील अलंकृत चांदीची तबके व काचपात्रे सापडली आहेत. इटलीमध्ये थडगी सजविण्यासठी मायसिनियन पात्रांची आयात केली जाई. पूर्वेकडील भूमध्य समुद्राच्या भागात अशा वस्तूंची निर्मिती केवळ निर्यातीसाठीच होत असल्याने हा कलावस्तूंचा खराखुरा व्यापार म्हणता येईल. रोमन सेनाधिकारी ममिअस याने कॉरिंथचा पाडाव करुन (इ. स. पू. १४६) तेथील ग्रीक पुतळे स्वदेशी आणले. त्यामुळे तशा तर्‍हेच्या पुतळ्यांनी आपापले प्रासाद सजविण्याची इच्छा उच्चवर्गीय रोमनांत निर्माण झाली. ग्रीक कलाकृतींच्या निकडीच्या मागणीमुळे ग्रीसमध्ये सर्वत्र त्यांच्या प्रतिकृती निर्माण होऊ लागल्या. ह्या सर्व व्यवहारातून कलातज्ञ, दलाल, प्रचारक, निर्यातकार असे वर्ग निर्माण झाले व कलावस्तूंच्या किंमतीही निश्चित होऊ लागल्या.

मध्ययुगानंतर समाजाची कलाविषयक आस्था पुन्हा वाढीस लागली. कलासमीक्षकाचे महत्त्व वाढले. प्रसिद्ध इटालियन कलासमीक्षक व्हाझारी याने ऐतिहासिक, समीक्षणात्मक व सौदर्यनिष्ठ निकषांवर अधिष्ठित अशी नवी कलाभिरुची इटलीमध्ये निर्माण केली. त्या काळात रॅफेएलच्या कलाकृती विकत घेणे, ही भांडवलाची चांगली गुंतवणूक मानली जात असे. पूर्वेकडील चीन, जपान, तिबेट, सयाम इ. देशांत भारतामधून बौद्ध धर्माचा प्रसार पूर्वीच झाला होता. बौद्ध भिक्षूंनी आपापल्या देशांतील कलेचा वापर धर्मप्रासारार्थ केला. यातून कलावस्तूंच्या विक्रिस चालना मिळाली. कलावस्तू भेट देण्याच्या वकिलातींच्या प्रथेमुळे कलावस्तुविक्रयास हातभार लागला. या प्रथेमुळेच नाजुक व कांतिमान इराणी मृत्पात्रे चीनमध्ये आयात करण्यात आली. यूरोपला चिनी मातीच्या भांड्यांची ओळख प्रथम मुस्लिम देशांनी करुन दिली. मेसोपोटेमिया, ईजिप्त आणि इराण या देशांत चिनी मातीच्या भांड्याची निर्यात थांग घराण्याच्या अमदानीत (इ.स. ६१८-९०७) झाली. चिनी लाखेची भांडी व वस्तू सोळाव्या शतकापर्यत यूरोपात माहीत नसाव्यात, असे दिसते. 

सोळाव्या शतकाच्या अखेरीपासून कलावस्तूची किंमत ही कलावंतास दिला जाणारा मोबदला, कलाकृतीचा आकार, ती पूर्ण करावयास लागणार्‍या मदतनिसांची संख्या व वापरलेल्या साधनांची किंमत या सर्वांचा विचार करुन आकारली जाते. कलावंताच्या वाढत्या लोकप्रियतेनुसार त्याच्या कलाकृतींची किंमत वाढत जाते.

यूरोपीय प्रबोधनकाळापासून प्राचीन अभिजात  कलाकृतीना  व्यापारमूल्य  लाभल्याने त्यांच्या बनावट प्रतिकृती तयार होऊ लागल्या. पुरातन कलावस्तूंना रोममध्ये विशेष मोल होते. पुढे कलावस्तूंना राजाश्रयाबरोबरच रसिकाश्रयही लाभत गेला. त्याचा परिणाम म्हणून कलाकृतींचे व्यापारमूल्य वाढले. श्रेष्ठ कलावंताच्या कलाकृती मिळविण्यासाठी ग्राहकांमध्ये स्पर्धा होऊ लागल्या. लोकप्रियतेच्या लाटेनुसार कलावस्तूंच्या किंमती कमीअधिक होत राहिल्या. सोळाव्या-सतराच्या शतकांत फ्रान्स, इंग्लड या देशांत कलावस्तूंचा लिलाव केला जाई. लिलावाच्या पद्धतीमुळे कलाकृतींचे भाव वधारले. तत्संबंधीच्या मुद्रित सूचीही प्रसिद्ध होऊ लागल्या. व्हेनिस, रोम येथे नियमितपणे कलाप्रदर्शने भरविली जाऊ लागली. सारांश, सतराव्या शतकात कलेच्या व्यापारपेठेस एक आधुनिक वळण लागले. या काळात कलावस्तुसंग्रहाची प्रवृत्ती मध्यमवर्गीयांत निर्माण झाली. इटली व हॉलंड हे चित्रनिर्मितीबाबत, तसेच कमीत कमी किंमती व जास्तीत जास्त विक्री यांत आघाडीवर होते. या काळात विक्रेते, दलाल इत्यादींनी तयार केलेल्या सूचिपत्रिका अधिक पद्धतशीर, अचूक व विपुल होत्या.

एकोणिसाव्या शतकात कलावस्तूंच्या व्यापाराचे स्वरुप अत्यंत समृद्ध व विकसित झाले. यूरोप-अमेरिकेत विक्रेत्यांच्या कलावीथींमध्ये फार मोठी वाढ झाली. झॉर्झ पटी, व्हिल्डेनश्टाइन, सेलिग्मन, ऍग्न्यू इत्यादींच्या कलावीथीही लोकप्रिय ठरल्या. कलाकृतिविक्रेता हा अशा रीतीने लोकांच्या कलाभिरुचीस वळण देणारा आणि तिचा विकास घडवणारा प्रभावी घटक ठरला.  

गेल्या शतकापासूनच चिनी मातीची भांडी, लाखेच्या वस्तू, हस्तिदंत, रेशमी कापड, फर्निचर इ. वस्तूंची आयात यूरोपात चालू झाली. भारतातील कलावस्तुविक्रयही वाढला. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांच्या प्रतिकृती, राजपूत लघुचित्रे, पुतळे यांसारख्या कलाकृती भारताबाहेर जाऊ लागल्या. विविध मंदिरांतील मूर्तिशिल्पे पळवून त्यांची चोरटी निर्यात होतानाही आज दिसते.  

विसाव्या शतकात कलावीथी, कलासंग्रहालये, कलाप्रदर्शने इत्यादींमुळे कलाविषयक जाण समाजात एकसारखी वाढत आहे व त्याचा फार मोठा परिणाम कलावस्तूंच्या व्यापारपेठेवर होत आहे. कलाकृतींना असणारी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भांडवलदार व उद्योगपती हे आजच्या काळातील कलांचे आश्रयदाते होत. आजच्या कलावंतास आपले स्थान टिकविण्यासाठी लोकाभिरुची, विपुल निर्मिती व प्रसिद्धीयंत्रणा यांची कास धरावी लागते.  

आरवाडे, शांतिनाथ