कल्पना व कल्पनप्रक्रिया : कल्पना ही मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानात वापरली जाणारी एक अतिशय संदिग्ध अशी संज्ञा आहे. व्यवहारात अनेक अर्थाने ही संज्ञा वापरली जाते. तिचा मानसशास्त्रतील आणि तत्त्वज्ञानातील अर्थ फार संदिग्ध असला, तरी व्यावहारिक पातळीवर तिचा अर्थ त्या त्या संदर्भात भिन्न, पण स्पष्टपणे अभिव्यक्त केला जातो. वेदनप्रक्रियेत प्रत्यक्षपणे त्या विशिष्ट वेळी उपस्थित नसलेल्या वस्तूच्या विचारास किंवा तिच्यासंबंधीच्या जाणीवयुक्त मानसिक प्रक्रियेस सर्वसाधारणपणे ‘कल्पना’ म्हटले जाते आणि ह्या कल्पना ज्या मानसिक प्रक्रियेने निर्माण होतात, तिला कल्पनप्रक्रिया म्हटले जाते. कल्पनांचा मानसशास्त्रीय दृष्ट्या तसेच तत्त्वज्ञान अथवा ज्ञानमीमांसा दृष्ट्या अभ्यास करता येईल. मानसशास्त्रीय दृष्ट्या कल्पना म्हणजे एक प्रकारची स्वतःचे वैशिष्ट्य असलेली मानसिक प्रक्रिया किंवा घटना होय. ज्ञानमीमांसेच्या दृष्टीने कल्पना म्हणजे ज्ञानसाधनेचे एक साधन असून तिचा अभ्यास, ती ज्या वस्तूंद्वारे आपणास जाणवते त्यांद्वारे होऊ शकेल.

मानसशास्त्रीय दृष्ट्या कल्पना : मानसशास्त्रात कल्पनांच्या बाबत परस्परविरोधी असे अनेक सिद्धांत आणि उपपत्ती मांडल्या गेलेल्या आहेत. असे असले तरी त्यांतील एक मुद्याबाबत सर्वांचेच एकमत आहे. प्रस्तुत मुद्दा म्हणजे व्यक्तीच्या मानसिक विकासात वेदन व संवेदन यांच्यानंतरच कल्पनांचा उद्‌भव होतो, आधी नाही. वेदनामध्ये वस्तूचा कठीणपणा, रंग, आकार इ. गुणांची आपणास प्रत्यक्ष जाणीव होते. संवेदनात आपणास हे गुण किंवा वेदने धारण करणाऱ्‍या अधिष्ठानरूप वस्तूची साकल्याने प्रत्यक्ष जाणीव किंवा ज्ञान होते. उदा., हे टेबल किंवा हे पुस्तक आहे. टेबलाचा व व पुस्तकाचा रंग, स्पर्श, आकार इ. धारण करणारे अधिष्ठान. संवेदन आणि कल्पना यांतील फरक म्हणजे कल्पना ही संवेदनापेक्षा कमी तपशीलवार, कमी तीव्र आणि तत्कालीन इंद्रियवेदनांवर कमी प्रमाणात अवलंबून असते. दुसरे म्हणजे संवेदन आपल्या आधीन नसते, परंतु कल्पनेवर मात्र आपले अधिक नियंत्रण असते. असे असले, तरी संवेदनांतही कल्पनांचा व्यापार असतोच. काटेकोरपणे बोलावयाचे झाल्यास आपण टेबल किंवा पुस्तक पाहत नसतो, तर आपण त्यांचा स्पर्श, आकार, रंग अनुभवीत असतो आणि त्यांवरून आपणास ते टेबल अथवा पुस्तक असल्याचे सूचित होते. ही सूचना आपणास पूर्वानुभवातून मिळते. प्राणी कल्पनांचा वापर करतात, तेव्हा ते कदाचित ह्या अशा पातळीवरील कल्पनांचा वापर करीत असावेत. म्हणजे केवळ वेदनांशी संबंधित अशाच कल्पनांचा ते वापर करीत असावेत. माणूस मात्र त्या त्या वेळच्या वेदनांशी संबंधित नसलेल्या कल्पनांचा वापर करू शकतो. माणूस भूत आणि भविष्य तसेच जे अस्तित्वात नाही त्याचीही कल्पना करू शकतो. ह्या ‘मुक्त’ कल्पना करण्याच्या सामर्थ्यामुळेच माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये प्रमुख भेद आढळतो. मुक्त कल्पनासामर्थ्यांमुळेच माणसास भाषेचे प्रभावी साधन प्राप्त करून घेता आले. त्यामुळे भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची योजना तो करू शकतो. इतिहास, विज्ञान, धर्म, कला इत्यादींची उभारणीही त्याला कल्पनांमुळेच करणे शक्य झाले.

कल्पनांचा अभ्यास अंतर्निरीक्षण पद्धतीने म्हणजे स्वतःच्या मानसिक प्रक्रियांच्या सरळ तपासणीने करण्यात येतो. तथापि ह्या पद्धतीमुळे कल्पनांच्या स्वरूपाबाबत विद्वानांकडून वेगवेगळी मते प्रतिपादिली गेली. ⇨डेव्हिडह्यूम (१७११-१७७६) याच्या मतासारखेच मत अलीकडे ⇨ई.बी.टिचनरने (१८६७-१९२७) प्रतिपादिले. त्याच्या मते कल्पना म्हणजे प्रतिमा किंवा वेदनांच्याच पुसट अशा प्रतिकृती होत. अर्थात ह्या दृष्टिकोनातून पाहू जाता, अमूर्त कल्पनांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळू शकत नाही. कारण संख्या, न्याय, पाप-पुण्य ह्या अमूर्त कल्पनांच्या पुसट प्रतिकृती किंवा प्रतिमा कशा असू शकतील, असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला जातो. तथापि टॉमस हक्सली (१८२५-१८९५) सारख्या विद्वानांच्या मते ‘मानव’ ह्या अमूर्त कल्पनेत ‘संयुक्त छायाचित्र’ अंतभूत असते. ह्या संयुक्त छायाचित्रात भिन्न भिन्न व्यक्तींतील वेगळेपणा परस्परांना छेद देऊन नाहीसा होतो आणि भिन्न भिन्न व्यक्तींत असलेला सारखेपणा अथवा साम्य हे परस्परांस पुष्टी देऊन तेथे ठसले जाते. ⇨जॉर्जबर्क्लीने (१६८५-१७५३) अशा अमूर्त कल्पना असू शकत नाहीत, अशी भूमिका घेतलेली आहे.

ह्या उलटसुलट चर्चेतून दोन भिन्न विचारधारा निर्माण झाल्या. रॉबर्ट वुडवर्थ आणि इतर काही मानसशास्त्रज्ञांनी ‘प्रतिमारहित विचारांची’ कल्पना पुढे मांडली. त्यांच्या मते समोर उपस्थित नसलेल्या प्रत्येक बाह्यवस्तूंचे शब्दांच्या किंवा प्रतिमांच्या शिवायही प्रत्यावहन करता येते. दुसरी विचारधारा म्हणजेच ⇨जे.बी.वॉटसनप्रणीत वर्तनवादाची. वॉटसन याने प्रथम कल्पनांच्या अस्तित्वाबाबतच शंका प्रदर्शित केली व नंतर त्या सर्वस्वी त्याज्यही ठरविल्या. त्याच्या मते कल्पना म्हणजे केवळ मोठ्याने उच्चारलेले किंवा आतल्या आत उच्चारलेले शब्द होत. वॉटसन याची ही उपपत्ती अर्थातच अनेक मानसशास्त्रज्ञांना मान्य झाली नाही. [→ वर्तनवाद]. अलीकडे ⇨गिल्बर्टराईल यांनी मात्र तिचे सुधारलेल्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. त्यांनी आपल्या कन्सेप्टऑफमाइंड (१९४९) ह्या ग्रंथात कल्पना म्हणजे ‘चित्तप्रवृत्ती’ असून, बोलण्याद्वारे विशिष्ट प्रकारे दिलेला तो प्रतिसादच होय, असे प्रतिपादिले.

मानव आणि काही मर्यादेपर्यंत उच्चतर मानवेतर प्राण्यांत कल्पनप्रक्रियात्मक कृती आढळून येते. कल्पनप्रक्रियेचा संबंध प्रत्यक्ष परिस्थितीशी म्हणजे अस्तित्वात असलेल्या प्रत्यक्ष वस्तूशी असत नाही. कल्पनप्रक्रिया अथवा कल्पना करणे ही सर्वस्वी मानसिक स्वरूपाची प्रक्रिया आहे ती प्रत्यक्ष वेदनात्मक किंवा कारकक्रिया नाही.

स्वप्ने आणि दिवास्वप्ने किंवा कल्पनाजाल यांत कल्पनप्रक्रिया अनियंत्रितपणे चाललेली असते तथापि कल्पनांचे सातत्य आणि प्रतिमांची निर्मिती ही त्या व्यक्तीच्या गतानुभवांतून, त्याचप्रमाणे, पूर्वसाहचर्यातून होत असते. व्यक्तींच्या प्रेरणा आणि इच्छा यांच्याशी स्वप्नांचा, दिवास्वप्नांचा वा कल्पनाजालाचा संबंध असतो आणि त्यानुसार त्या प्रक्रिया घडून येते असतात [→ स्वप्न]. हेतूपूर्वक विचारक्रिया ही कल्पनप्रक्रियात्मक कृती असते. परंतु ती साध्यानुवर्ती होण्यासाठी सुनियंत्रित केलेली आणि ते साध्य प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गस्थ केलेली असते [→ विचारप्रक्रिया].

संकल्पना ह्या कल्पनप्रक्रियेतील उपकरण किंवा साधन म्हणून उपयोगी पडतात. संकल्पनांसाठी प्रतीकांचा वापर केला जातो. ही प्रतीके म्हणजे वस्तू किंवा कृतींचेच अभिव्यक्तीकरण होय. यांतच भाषिक प्रतीकांचा अथवा चिन्हांचा म्हणजे शब्दांचाही अंतर्भाव होतो. व्यवहारसौकर्यासाठी वापरली जाणारी वाचिक किंवा लिखित प्रतीके अथवा चिन्हे म्हणजे भाषा होय. कल्पनप्रक्रियेत ह्या भाषिक प्रतीकांचा वापर केला जातो. लहान मुले खेळताना व समस्या सोडविताना त्यांचे विचार मोठ्याने बोलून दाखवितात वस्तुत: त्यांना विचार करताना सुचणाऱ्‍या त्या कल्पनाच असतात. आराखडे, नकाशे, संगीतलेखन इ. प्रतीकांचा उपयोग गुंतागुंतीच्या व मोठ्या व्यूहात्मक घटना आणि त्यांतील परस्परसंबंध स्पष्ट करण्यासाठी केला जातो.

संकल्पना म्हणजे तशा कल्पनाच. संकल्पनांमुळे वस्तू, घटना, गुण इत्यादींचा निर्देश होतो. वस्तुवस्तूंमधील किंवा घटनांमधील साम्यभेदांवरून आणि प्रत्येक कल्पनेसाठी वापरण्यात आलेल्या शब्दांच्या अथवा अन्य प्रतीकांच्यामुळे संकल्पना तयार होतात. एकूण संकल्पना म्हणजे त्या शब्दप्रतीकांतून त्याला चिकटलेला अर्थ अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य होय [→ संकल्पना]. सामान्यीकरण, अमूर्तीकरण किंवा सैद्धांतीकरण या प्रक्रियांतही कल्पनांचा सक्रिय भाग असतो आणि त्यांच्या मदतीनेच आपण वस्तुवस्तूंतील अथवा घटनांतील साम्यभेदांवरून प्रत्यक्ष त्या वस्तू अथवा घटनांशिवायही वैचारिक प्रवास करीत असतो. समस्या सोडविताना प्रथम आपण मनाशी एक कल्पना बाळगून चालत असतो. यासच ⇨गृहीतक अथवा अभ्युपगम म्हणता येईल. नंतर पुराव्याने ही कल्पना आपण पडताळून पाहतो. हे गृहीतक अथवा कल्पना जर फलद्रुप झाली, तर तिला सिद्धांताचे अथवा नियमाचे स्वरूप प्राप्त होते आणि निष्फळ ठरली, तर ती त्याज्य ठरवून दुसऱ्‍या कल्पनेच्या अनुरोधाने ह्या दुसऱ्‍या कल्पनेचा पडताळा पाहण्याचा प्रयत्न केला जातो.

नवनिर्माणक्षम अथवा सर्जनात्मक विचारातही कल्पनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्य, कला, शास्त्रीय शोध व विज्ञाने, तत्त्वज्ञान यांत जेथे नवीन निर्मितीशी संबंध असतो, ते नवनिर्माणाचे कार्य पूर्वानुभवाधिष्ठित असले, तरी प्रत्यक्ष नवनिर्मिती होताना कल्पनेचे कार्य अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.


तत्त्वज्ञानदृष्ट्या कल्पना :कल्पनांच्या नेमक्या अर्थाबाबत आणि त्यांच्या प्रकारांबाबत तत्त्ववेत्त्यांत तीव्र मतभेद असल्याचे आढळून येते. अर्थात हे मतभेद कल्पनांबाबतच्या मूलभूत अडचणींतून निर्माण झालेले आहेत ह्या मूलभूत अडचणींमुळेच कल्पनांची व्याख्या करणे, त्यांचे वर्णन करणे. त्यांचे वर्गीकरण करून कल्पनाकल्पनांत भेद करणे. त्यांचे ज्ञानसाधनेतील नेमके कार्य निश्चित करणे इ. बाबी कठीण होऊन बसल्या आहेत. तथापि कल्पनांचा या दृष्टीने विचार करण्याचा प्रयत्न तर्कशास्त्र व ज्ञानमीमांसेच्या क्षेत्रात मोडतो. तर्कशास्त्रात कल्पनांचे दोन प्रकार मानले जातात : (१) मूर्त कल्पना व (२) अमूर्त कल्पना. प्रत्यक्ष वस्तू वा व्यक्ती यांचा निर्देश करणाऱ्‍या कल्पना ह्या पहिल्या प्रकारात, तर गुण, संबंध इत्यादींचा निर्देश करणाऱ्‍या कल्पना दुसऱ्‍या प्रकारात मोडतात. मूर्त कल्पनांची परत (अ) व्यक्तिवाचक (सिंग्युलर), (आ) समूहवाचक आणि (इ) सामान्य अशा तीन उपप्रकारांत विभागणी केली जाते.

कल्पनेबाबतची मीमांसा कमीअधिक प्रमाणात आपापली ज्ञानमीमांसा व तत्त्वमीमांसा मांडताना सर्वच तत्त्ववेत्त्यांनी केलेली आढळते. तथापि त्यांतील प्लेटो, लॉक आणि हेगेल ह्या तत्त्ववेत्त्यांची मीमांसा वैशिष्ट्यपूर्ण आहे [→ प्लेटो लॉक, जॉन हेगेल, जॉजै व्हिल्हेम्स फ्रीड्रिख अनुभववाद चिद्‌वाद].

कल्पनांबाबतच्या उपपत्तींमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीस पुढे आलेली तार्किक प्रत्यक्षार्थवादाची उपपत्ती लक्षणीय आणि विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. तार्किक प्रत्यक्षार्थवादाने आधीच्या सर्वच तत्त्ववेत्त्यांवर टीका करून असे प्रतिपादन केले, की ह्या तत्त्ववेत्त्यांनी मांडलेल्या कल्पना ह्या खऱ्‍या कल्पनाच नाहीत, तर त्या कृतक-कल्पना होत. शब्दांचा केवळ भावनिक उपयोग करणे म्हणजे विचार करणे नव्हे, वा तत्त्वप्रतिपादन करणेही नव्हे, असा उपयोग आत्मवंचनाच होय. कल्पना कृतक-कल्पना आहेत, की खऱ्‍याखुऱ्‍या अर्थपूर्ण कल्पना आहेत, हे ठरविण्याचा निकष म्हणून त्यांनी ‘पडताळा सिद्धांत’ अथवा ‘निकषण सिद्धांत’ प्रतिपादिला. ह्या सिद्धांतानुसार एखादी कल्पना तेव्हाच अर्थपूर्ण ठरेल, की जेव्हा तिने निर्दिष्ट होणारी वस्तू ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपूर्ण इंद्रियानुभवावरून पडताळून पाहता येईल. तशी ती पडताळून पाहता आली, तरच ती कल्पना अर्थपूर्ण होय, अन्यथा नाही, ह्या निकषावर पारंपारिक तत्त्वमीमांसेतील ईश्वर, आत्मा, हेगेलप्रणीत ‘केवल’ इ. कल्पना कृतक व अर्थशून्य ठरल्या. कारण इंद्रियानुभवावरून पडताळून पाहता येईल, अशा कुठल्याही वस्तूचा त्या निर्देश करीत नाहीत. तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या ह्या निष्कर्षावर टीकेची प्रचंड झोड उठली. त्यांनी ह्या टीकेच्या अनुरोधाने आपल्या उपपत्तीत वारंवार दुरुस्त्याही केल्या तथापि अजून तरी सर्वच प्रत्यक्षार्थवाद्यांना व तत्त्ववेत्त्यांना मान्य होईल अशी एकमेव उपपत्ती तयार होऊ शकली नाही [→ तार्किक प्रत्यक्षार्थवाद].

पहा : ज्ञानमीमांसा. साहचर्यवाद

सुर्वे, भा. ग.