करपरिणाम:बरेचसेसमदिक् (सर्व दिशांना सारखेच गुणधर्म असलेले) पदार्थ तीव्र विद्युत् क्षेत्रात ठेवले असता त्यांना एकाक्षीय स्फटिकांप्रमाणे द्विप्रणमनाचे (स्फटिकातून प्रकाश जाताना त्याचे दोनदा प्रणमन झाल्यामुळे म्हणजे दिशाबदल झाल्यामुळे एका किरणाचे दोन किरण होण्याचे यांपैकी एकास साधारण किरण आणि दुसर्यास असाधारण किरण म्हणतात) प्रकाशीय गुणधर्म प्राप्त होतात याला कर परिणाम म्हणतात. घनरूप किंवा वायुरूप पदार्थापेक्षा द्रवात हा परिणाम प्रकर्षाने दिसतो. या परिणामाबाबत साधारण व असाधारण प्रकाशाच्या प्रणमनांकांतील (प्रणमन क्रियेच्या व्याख्येनुसार आलेल्या गुणोत्तरांतील) फरक विद्युत् क्षेत्रबलाच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. या परिणामाचा शोध जॉन कर यांनी १८७५ साली लावला. या परिणामाचा विद्युत्प्रकाशकीमध्ये (विद्युत् आणि प्रकाश यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणार्या शास्त्रामध्ये) उपयोग करण्यात येतो.
पहा : प्रकाशकी.
शिरोडकर, सु.स.