कॅमचॅटका : रशियाचे पॅसिफिकमध्ये शिरलेले द्वीपकल्प. क्षेत्रफळ ४,५५,९५८ चौ. किमी. लोकसंख्या २,८७,००० (१९७०). ह्याच्या पश्चिमेला ओखोट्‍स्कचा समुद्र व पूर्वेला बेरिंगचा समुद्र आहे. द्वीपकल्पाची दक्षिणोत्तर लांबी १,२२४ किमी. असून पूर्व–पश्चिम रुंदी ४८३ किमी. आहे. एकमेकांशी समांतर असलेल्या दोन दक्षिणोत्तर पर्वतांच्या रांगा व त्यांमधील खचदरी असे कॅमचॅटकाचे भूस्वरूप असून खचदरीमधून ७६४ किमी. लांबीची कॅमचटका नदी वाहते. पर्वतरांगा ज्वालामुखी निर्मित असून एकूण १२७ ज्वालामुखींची मोजदाद आतापर्यंत झाली आहे. त्यांपैकी २२ जिवंत आहेत. पूर्वेकडील व्हस्टॉचन्यी रांगेतील सर्वोच्च शिखर सोपका क्रोनोत्स्काया हे समुद्रसपाटीपासून ३,५२८ मी. उंच आहे. पश्चिमेकडील स्विडीनी रांगेमधील सर्वोच्च शिखर सोपका इचिन्स्काया हे समुद्रसपाटीपासून ३,६२१ मी. उंच आहे. पश्चिम किनारपट्टी दलदलयुक्त असून पूर्व किनारपट्टी डोंगरकड्यांनी युक्त आहे. येथील हवामान फारच विषम आहे. वार्षिक पर्जन्यमान सरासरीने ९१ सेंमी. विशेषत: पूर्व भागात असते. किनाऱ्याजवळून थंड पाण्याचे प्रवाह वाहतात. वर्षभर वादळी वारे वाहतात. डोंगरांच्या उतारांवर मोठमोठी अरण्ये असून डोंगराच्या पायथ्याशी अगदी अल्प प्रमाणात अन्नधान्ये व फळफळावळ यांचे उत्पादन होते. लोकसंख्या तुरळक असून ८०% लोकांचा उपजीविकेचा मुख्य धंदा मच्छीमारी हा आहे. द्विपकल्पाच्या आग्‍नेय किनाऱ्यावरील पेत्रो पेव्हलाफ्स्क हे शहर व बंदर ह्या विभागाचे मुख्य ठिकाण आहे. कॅमचॅटकामध्ये कोळसा व खनिजतेलाचे साठे आहेत. दळणवळणाच्या साधनांअभावी जंगलसंपत्तीचा फारसा उपयोग केला जात नाही. ईशान्य आशियाचा वायव्य उत्तर अमेरिकेला जवळ असलेला हा भूभाग विमान व जलवाहतुकीचे दृष्टीने भावी काळात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

 

लिमये, दि. ह.