कर्नाटक विद्यापीठ : कर्नाटक राज्यातील एक विद्यापीठ. धारवाड येथे १९४९ साली त्याची स्थापना झाली. ह्याचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. त्याच्या अधिकारक्षेत्रात बेळगाव, बेल्लारी, बीदर, विजापूर, धारवाड, गुलबर्गा, उत्तर कॅनरा व रायचूर हे जिल्हे येतात. विद्यापीठात विविध विषयांच्या २८ शाखोपशाखा असून १०६ महाविद्यालये त्यास संलग्न केलेली आहेत. शिवायचार घटक महाविद्यालये विद्यापीठात आहेत. मानव्यविद्या आणि तंत्र व विज्ञान कक्षेतील अनेक विषयांच्या अध्यापनाची व संशोधनाची सोय विद्यापीठात आहे आणि त्या दृष्टीने ‘कन्नड रिसर्च इन्स्टिट्यूट’ सध्या काम करीत आहे. तीत सु.३,१३६ हस्तलिखिते आहेत. त्या संस्थेतर्फे प्राचीन इतिहास व संस्कृती, पुरातत्त्वविद्या, पुराभिलेखविद्या व भाषा-साहित्य ह्या विषयांत संशोधन करण्यात येते. ह्यां शिवाय विद्यापीठ बहिःशाल अभ्यास मंडळे, व्याख्याने आणि चर्चाशिबिरे भरविते. अलीकडे विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी परीक्षा अभ्यासक्रम अवलंबिला असून षण्मास परीक्षा पद्धती रूढ केली आहे. तथापि परीक्षांचे माध्यम इंग्रजीच आहे. विद्यार्थ्यांची संख्या १९७१-७२ मध्ये ४८,७९९ होती. विद्यापीठाचा वार्षिक अर्थसंकल्प १,९७,४०,४३९ रु. होता (१९७१–७२).
मराठे, रा.म.