कर्णभूषणे :  कानांत घालावयाचे अलंकार. सुमेरियन संस्कृतीचे केंद्र असलेल्या अर येथील उत्खननात सापडलेली कर्णभूषणे सर्वांत जुनी मानतात (इ. स. पू. सु. २५००). कर्णाभरणांसाठी कान टोचण्याची प्रथा हिंदुधर्मीयांत दिसते. इतर पुष्कळशा समाजांत कर्णभूषणे चापाने किंवा अन्य साधनाने कानात अडकवितात.

काही पारंपरिक कर्णभूषणे

भारतामध्ये रामायण-महाभारत-काळापासून कर्णभूषणे प्रचलित होती. त्या काळच्या कर्णभूषणांचे दोन प्रकार होते : (१) कानाच्या वरच्या भागात घालावयाचे कर्णभूषण; यास कर्णिका म्हणत. (२) कानाच्या खालच्या पाळीत घालावयाचे कर्णभूषण; यास कुंडल म्हणत. त्याकाळी स्त्रियांची व पुरुषांची वेगवेगळी कर्णभूषणे असून त्यांना विविध नावे असत. गोलाकार व नक्षीदार कुंडलांना मकरकुंडले म्हणत. हल्ली या प्रकारची कुंडले मुंबईकडील कोळणी घालताना दिसतात. वर्तुळाकारात प्रफुल्ल कमळाप्रमाणे असलेल्या कर्णभूषणास कनक कमल म्हणत. सामान्यतः दोन्ही कानांत एकसारख्या आकाराची कर्णभूषणे वापरीत. परंतु दोन कानांत दोन भिन्न प्रकारचे कर्णालंकार घालण्याची,तसेच फक्त एकाच कानात कर्णभूषणे घालण्याचीही प्रथा असल्याचे दिसते. बाणभट्टाच्या कादंबरीत व भासाच्या स्वप्नवासवदत्त नाटकात एका कानात ताटक व दुसऱ्‍यात कुंडल अशी भिन्न कर्णभूषणे वापरल्याचे वर्णन आढळते.

खजुराहो येथील शिल्पाकृतींत आढळणारी काही कर्णभूषणे

पहिल्या शतकात तक्षशिला येथे प्रचारात असलेली साखळ्या लावलेली कर्णभूषणे दक्षिण भारतातील स्त्रिया आजही वापरताना दिसतात. चंद्रकोरीप्रमाणे असलेली पृष्ठकुंडल कर्णभूषणे अमरावतीच्या शिल्पात विशेष प्रमाणात आढळतात. अजिंठा येथील लेण्यांत गोलाकार कर्णभूषणे दिसतात. लंकेतील स्त्रिया कुंडले वापरीत व त्यांत हिरे बसविलेले असत, असा उल्लेख रामायणात आहे. कुंतीपुत्र कर्ण याला सूर्यापासून कवच-कुंडले मिळाली होती, असा उल्लेख महाभारतात आढळतो. त्याकाळात ऋषी, मुनी आदी रुद्राक्षांची कर्णभूषणे घालीत. आजही साधू, बैरागी रुद्राक्षांची व शिंगांची कर्णवलये वापरताना दिसतात. मोहें-जो-दडो उत्खननात चांदीच्या तारेची कर्णभूषणे आढळली आहेत.

प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स. पू. १५०० नंतर कर्णभूषणे प्रथम प्रचारात आली असावीत. ती सोन्याच्या कोंदणात रत्ने, पाचू इ. बसवून तयार केलेली असत. इ. स. पू. पहिल्या सहस्रकातील ग्रीसमधील कर्णभूषणे आढळली असून ती लोंबणारी व तीन कळ्यांच्या आकाराची कुडीवजा आहेत. याच काळातील काही कर्णभूषणांना पक्ष्याच्या आकाराचे लोंबते लोलक बसविलेले आढळले. यानंतरच्या रोमन काळात( इ. स. पू. सु. १०० ते इ. स. ४५०) मुख्यत: स्त्रियाच कर्णभूषणे वापरीत. त्यांच्या कर्णभूषणांत पाचू, इंद्रनीलमणी इ. रत्ने बसविलेली असत. चौथ्या शतकातील कर्णभूषणे अत्यंत कौशल्यपूर्ण बनावटीची व सुंदर होती. पुढे पुरुषवर्गात कर्णभूषणे वापरण्याची प्रथा फार बोकाळली म्हणून तिसर्‍या शतकातील अलेक्झांडर सर्व्हेलस या सरदाराने त्यांवर बंदी घातली. बायझंटिन काळातही कर्णभूषणे वापरण्याची प्रथा कमी होत गेली. मध्ययुगात स्त्रियांच्या डोक्यावर झिरमिरीत पडदा वा घुंगट वापरात येऊ लागल्यामुळे कर्णभूषणे हळूहळू लुप्त झाली.

यूरोपीय प्रबोधनकाळात अनेक गोष्टींचे पुनरुज्जीवन झाले, तसे अलंकारांचेही झाले व पुन्हा कर्णभूषणे प्रचारात येऊ लागली. सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत स्त्रियांप्रमाणे पुरुषही कर्णभूषणे वापरीत. पुढे हे अलंकार फक्त स्त्रियांचे आहेत, असे मानण्यात आले.

पंधराव्या शतकानंतर अमेरिका व आफ्रिका यांच्या शोधामुळे तेथील लोकांच्या अलंकारांची माहिती मिळाली. त्यात दक्षिण अमेरिकेतील चिली देशात चांदीची ४ ते ५ इंच (सु. १० ते १२⋅५ सेंमी.) लांबीची कर्णभूषणे आढळली. त्यात मणी, पाने, फुले कोरलेली होती. आफ्रिकेतील रानटी जमातींतही त्यांच्या सौंदर्यकल्पनेप्रमाणे मोठ्या आकाराचे कर्णालंकार आढळतात. मसाई जमातीत ४ इंच (१० सेंमी.) व्यासाची, वजनदार दगडी खुंटी कानात घालतात. बोर्निओमधील जमातीत ३ ते ४ इंच (सु. ७⋅५ ते १० सेंमी.) व्यासाची लाकडी वा दगडी खुंटी (चोंदा) कानाच्या पाळीत बसवितात त्यामुळे कानाच्या पाळ्या खाली लोंबत राहतात.

इतिहासकाळातील मराठी सरदारात सोन्याचा बाळा वापरण्याची प्रथा होती. पेशवाईत पेशवे कुटुंबातील पुरुष रत्नांचा चौकडा वापरीत. सरदार वर्गातील पुरुषांनी एका कानात भिकबाळी घालण्याची पद्धतही पूर्वी रूढ होती. त्याकाळातील स्त्रिया कानात बाळ्या, बुगड्या, कुड्या, लवंगा, कुरूडू इं. कर्णभूषणे वापरीत त्यांतील काही वरच्या भागात असत. त्यांना सुंदर सोनेरी वा रुपेरी साखळ्या व घागऱ्‍या असत. त्या कानामागे केसात अडकवीत. त्याकाळच्या मुसलमानी अमदानीत मुस्लिम स्त्रिया कानाच्या वरच्या भागापासून पाळ्यांपर्यंत सुंदर फुलांची व बारीक साखळ्यांची, तशीच लोंबती कर्णभूषणे वापरीत. हल्लीच्या मुस्लिम स्त्रियांतही कानाच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत दहा–बारा अंगठीसारख्या चांदीच्या वा तांब्याच्या कड्या घालण्याची प्रथा दिसते. त्यांच्यात पात बालिया, झुमका, बिजली-की-बाळी ही कर्णभूषणे विशेष आढळतात. कानडी स्त्रियांत बुगड्या, झामक्या, कर्णफुले इ. कर्णभूषणे विशेष लोकप्रिय दिसतात. त्रावणकोर–कोचीन भागात पूर्वी पाच-सहा पदरी मण्यांची लोंबती कर्णभूषणे असत, तर राजस्थानमधील जयपूर भागात मोती, हिरे लावलेली किंवा जडावाचे काम असलेली कर्णभूषणे असत व ती कानाबरोबर सपाट बसत. त्यांना ‘बाले-झाब्बेदार’ म्हणत. त्यांतील मोत्यांचे लोलक असलेल्या सोनेरी कर्णभूषणांना ‘लाटकात’ म्हणत. ओरिसातील कटक भागात फुलांचे आकार असलेली चांदीची कर्णभूषणे आढळतात. काश्मीरमध्ये कर्णभूषणांना कान-बाळ किंवा झुमका म्हणतात व तो अलंकार महत्त्वाचा मानतात. भारतीय आदिवासीयांत स्त्रिया शंख, शिंपले यांची लोंबती कुंडले घालतात.

महाराष्ट्रात पूर्वी स्त्रिया बाळ्या, बुगड्या, वेलभोकरे, लवंगा किंवा अनेक प्रकारच्या कुड्या घालीत. पण अलीकडे ती प्रथा मागे पडत चालली आहे. कानावर केसांचे फुगे काढण्यामुळे वरच्या पाळीवरील कर्णभूषणे गेली. आता हस्तभूषणे, कंठभूषणे यांना साजून दिसतील अशी कर्णभूषणे प्रचारात आहेत. मोत्याच्या वा हिऱ्‍याच्या कुड्या, लोंबती कर्णभूषणे प्रचलित आहेत. हल्ली कर्णभूषणांचे प्रकार सतत बदलत आहेत.

गोखले, कमल; शहाणे, शा. वि.

चित्रपत्र : काही पाश्चिमात्य कर्णभूषणे रशियन कर्णभूषण – ११ वे – १३ वे शतक.

 

पाश्चिमात्य कर्णभूषण – ८ वे – ९ वे शतक.
पाश्चिमात्य कर्णभूषण – ८ वे – ९ वे शतक.
पाश्चिमात्य कर्णभूषण – ८ वे – ९ वे शतक.
पाश्चिमात्य कर्णभूषण – ८ वे – ९ वे शतक.
रशियन कर्णभूषण – ११ वे – १३ वे शतक.
रशियन कर्णभूषण – ११ वे – १३ वे शतक.