काली–२: हिदू पुराणकथांतील शिवपत्नी आदिशक्ती पार्वतीचा एक उग्र अवतार वा रूप. ‘काली’ ह्या नावाबाबात तसेच तिने शुंभ–निशुंभ, शंखचूड, दारुकासुर, महिषासुर इ. दैत्यांना मारल्याबाबतच्या विविध कथा पुराणांतून आहेत. काल म्हणजे शंकर, त्याची पत्नी म्हणून काली;
जन्मत: तिचा वर्ण काळा होता म्हणून काली; शंकराच्या कंठातील विषातून तिची उत्पत्ती झाली म्हणून काली; पार्वतीने स्वत:च्या शरीरापासून कोश टाकला, तो कोश म्हणजेच काली; तिलाच कौशिकी असेही म्हणतात इ. तिच्या नावाबाबतच्या कथा आहेत. कालीतंत्रात शवारूढ, चतुर्भुज, नरमुंडमालाधारी, स्मशानवासिनी असे तिचे रूप वर्णिले आहे. इतर ठिकाणी तिचा कटिभाग तुटलेल्या हातांच्या मालेने आवृत असल्याचे म्हटले आहे. तिला नरबली व पशुबली देण्याची प्रथा होती. तिला बोकड आणि रेड्याच्या रक्तमांसाचा नैवेद्य दिला जातो. बंगालमध्ये ⇨ दुर्गा पूजेच्या वेळी तिला हजारो बकऱ्यांचा बली दिला जातो. कलकत्ता येथील कालीघाटावरील कालीचे मंदिर हे एक ⇨ शक्तिपीठ म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. जादूटोणा व मंत्र–तंत्र करणारे तसेच तंत्रशाक्तादी वाममार्गी पंथांच्या लोकांचेही काली हेच प्रमुख दैवत आहे. बंगालची या विद्यांसाठी विशेष ख्याती असून तेथे कालीचे माहात्म्यही विशेष आहे.
वाटमारी करणाऱ्या ठग लोकांचेही काली हेच दैवत होते व तिच्या नावाने ते प्रवाशांची हत्या करीत. काली व दुर्गा ह्यांच्यात साम्य असून त्या सर्वसाधारणपणे एकच मानल्या जातात. त्या आर्यपूर्वांच्या देवता असाव्यात, असे काही विद्वान मानतात. शबर, बर्बर, पुलिंदादी रानटी टोळ्या दुर्गेची उपासना करून तिला मद्य–मांसाचा नैवेद्य अर्पण करतात, असे महाभारतात म्हटले आहे.
तमिळमध्ये कालीला ‘कोवराई’ म्हणतात. तिला नरबली दिला जाई. ‘कालीअम्म’ म्हणून दक्षिण भारतात उपासनेत असलेली देवता कालीचेच नामांतर म्हणावयास हरकत नाही. तेथे ती पटकीपासून रक्षण करणारी एक देवता मानली जाते. तिला पशुबली देतात. आसाममधील वन्य जमाती कालीला ‘कालीबारी’ म्हणतात. तिची अनेक मंदिरे तेथे आहेत. महाराष्ट्रात ‘काळुबाई’ म्हणून जी देवी अनेक ठिकाणी आढळते तीही कालीच असावी.
संदर्भ : 1. Nivedita, Sister, Kali The Mother, Calcutta, 1953.
२. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप (देवीकोश), भाग २, पुणे, १९६८.
सुर्वे, भा. ग.