काशीराज पंडित : (सु.१७१०—१७८०). एक महाराष्ट्रीय बखरकार. हा मूळचा निजामी प्रदेशातील असावा. त्याचे संपूर्ण नाव काशीराज शिवदेव वेदांती असून तो देशस्थ ब्राह्मण होता. पेशव्यांकडे फारसा वाव न मिळाल्याने तो नोकरीनिमित्त १७३९ च्या सुमारास उत्तरेत गेला. त्यास फार्सी भाषा अवगत असल्यामुळे दिल्लीचा काही काळ वजीर असलेल्या सफदरजंग ह्याच्या दरबारी मुत्सद्दी म्हणून तो राहिला. पुढे सफदरजंगाचा मुलगा शुजाउद्दौला ह्याच्याकडे तो त्याच हुद्यावर होता. पेशवे व इतर सरदारांशी तो प्रसंगानुसार पत्रव्यवहार करी. १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युध्दाच्या वेळी तो प्रत्यक्ष रणभूमीवर होता. सदाशिवरावभाऊ व विश्वासराव ह्यांच्या मृत देहांस काशीराज व त्याचा पुतण्या गणेश वेदांती यांनी हिंदुधर्मानुसार अग्निसंस्कार केला. त्याने वरील युध्दाची हकीगत १७८० मध्ये फार्सी भाषेत लिहिली. अहवाले-जंगे भाऊ व अहमदशाह दुर्रानी (सोनपत-पानपत येथील मराठे दुर्रानी युद्ध), असे त्याच्या बखरीचे नाव आहे. या बखरींचा मूळ फार्सी पाठ (१९६१—?), इंग्रजी (१७९९ व १९२३) व मराठी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. काशीराज जरी पानिपतवर प्रत्यक्ष होता, तरी मुलकी सेवक असल्यामुळे त्यास तत्कालीन लष्करी मोहिमांची व डावपेचांची इत्थंभूत माहिती असणे अशक्य आहे. आपले वृत्तांतलेखन त्याने प्रत्यक्ष घटनेनंतर एकोणीस वर्षांनी केले आहे. म्हणून ते सर्वस्वी ग्राह्य मानता येणार नाही. तथापि अहमदशाह दुर्रानीसंबंधीची त्याची माहिती अधिक विश्वसनीय आहे, असे तत्कालीन इतिहास-साधने पाहिली असता दिसते. याचे वंशज सध्या वाराणसीमध्ये राहतात.

संदर्भ : Shejwalkar, T.S. Panipat : 1761, Poona, 1946.

खोडवे, अच्युत