कँब्रियन : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. कालाच्या विभागाला कँब्रियन कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला कँब्रियन संघ म्हणतात. कँब्रियन कल्प हा पन्नास कोटी वर्षांपूर्वीचा किंवा सु. साठ कोटी वर्षांपासून ते पन्नास कोटी वर्षे पूर्वीपर्यंतचा काल होय. कँब्रियन खडक हे विपुल जीवाश्म (जीवांचे अवशेष) असणाऱ्या खडकांपैकी सर्वांत जुने होत. या संघाचे अध्ययन प्रथम ॲडॅम सेज्विक या ब्रिटिश भूवैज्ञानिकांनी वेल्समध्ये केले आणि वेल्सच्या कँब्रिया या जुन्या रोमन नावावरून कँब्रियन हे नाव दिले (१८३५). या संघाचे बहुतेक खडक समुद्रात तयार झालेले ⇨पिंडाश्म, वालुकाश्म किंवा शेल आहेत. काही क्षेत्रांत अंत:स्तरित (या थरांमध्ये अधूनमधून) लाव्हेही आढळतात.
प्राण्यांपैकी केवळ अपृष्ठवंशींचे (पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचे) जीवाश्म या संघातआढळतात. कायटिनाची, कॅल्शियम कार्बोनेटाची किंवा कॅल्शियम कार्बोनेट व फॉस्फेट यांच्या मिश्रणाने बनलेली कवचे किंवा सांगाडे असणाऱ्या अपृष्ठवंशी सागरी प्राण्यांचे पुष्कळ जीवाश्म याखडकांत सापडतात व त्यांपैकी बहुतेक ⇨ ट्रायलोबाइटांचे असतात. ट्रायलोबाइटांची कमीअधीक विकसित अशी पुष्कळ गोत्रे त्या काळी होती. त्यांच्यापैकी कित्येक अल्पावधीतच निर्वंश झाली. केवळ कँब्रियन कल्पात राहणाऱ्या ट्रायलोबाइटांचा वक्ष मोठा व पुष्कळ खंडांचा असे व अवसानक(शेपटीकडील भाग) लहान असे. ट्रायलोबाइटांचा उपयोग करुन कँब्रियन संघाचे आनुक्रमिक विभाग केले जातात. ट्रायलोबाइटांच्या खालोखाल पण संख्येने त्यांच्या एकतृतीयांशा- हूनही कमीजीवाश्म ⇨ ब्रॅकिओपोडांचे असतात. ते बहुतेक इनार्टिक्युलाटा गटाचे असतात. आर्टिक्युलाटा गटाचे, मुख्यत: ऑर्थॉइडियांचे थोडे जीवाश्मही आढळतात. इतर प्राण्यांच्या जीवाश्मांची संख्या अत्यल्प असते. काही सागरांत ⇨ आर्किओसायाथिडांची दाट वस्ती असे व त्यांच्या अवशेषांपासून तयार झालेल्या चुनखडकांच्या जाड राशी कित्येक क्षेत्रांत आढळतात. कँब्रियन कल्पाच्या अधिक पुढच्या भागात काही आदिम सेफॅलोपोडा व ग्रॅस्ट्रोपोडा अवतरले होते. सागरी चूर्णीय (कॅल्शियमी) शैवलां शिवाय इतर वनस्पतींचे जीवाश्म आढळलेले नाहीत. पण चूर्णीय शैवलांच्या सांगाड्यांपासून तयार झालेले चुनखडक कित्येक क्षेत्रांत आढळतात.
सायबीरिया, उत्तर चीन व ऑस्ट्रेलिया यांतील विस्तीर्ण क्षेत्रात व उत्तर अमेरिका आणि पश्चिम यूरोपातील अनेक जागी कँब्रियन खडक आढळतात. भारताच्या द्वीपकल्पात ते नाहीत. पण हिमाचल प्रदेशातील (कांग्रा जिल्ह्यातील) स्पिटी नदीच्या खोऱ्यात, तसेच काश्मिरात व पाकिस्तानातील मिठाच्या डोंगरात ते आहेत. ब्रह्मदेशात जीवाश्ममय कँब्रियन खडक आढळलेले नाहीत. पण उत्तर शान संस्थानातील पानग्युन येथील जीवाश्महीन खडक त्या कालातले असावेत. बॉडविनच्या ज्वालामुखी क्रियेचा प्रारंभ याच कल्पात झाला असावा.
यूरोपातील बाल्टिक भोवतालच्या व उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील कँब्रियन खडकातले जीवाश्म सारखेच आहेत. पण उत्तर अमेरिकेच्या मध्य आणि पश्चिम भागांत वेगळ्याच गोत्रांचे जीवाश्म आढळतात. इतर खंडांतही वेगळ्याच व निरनिराळ्या गोत्रांचे ट्रायलोबाइट आढळतात. म्हणजे त्या काळीही निरनिराळ्या सागरांत निरनिराळे गोत्र समुदाय असत. परंतु जीवाश्मांच्या एकूण स्वरूपावरून कँब्रियन खडक ओळखून काढता येतात.
वायव्य यूरोपातील कँब्रियन खडकांचे पूर्व (खालचा), मध्य व उत्तर (वरचा) असे विभाग केले जातात. खालच्यात ओलेनेलस, मधल्यात पॅरॅडॉक्साइड्स व वरच्यात ओलेनस या गोत्रांच्या ट्रायलोबाइटांचे जीवाश्म आढळतात. उत्तर कँब्रियन थरांवर ट्रेमॅडॉक नावाच्या थरांचा पातळसा गट आढळतो. त्याच्यात ग्रॅप्टोलाइटांच्या पूर्वज आप्त वर्गीयांपैकी डिक्टिओनेमाचे जीवाश्म आढळतात. ब्रिटिश भूवैज्ञानिक ट्रेमॅडॉक थरांचा समावेश कँब्रियन संघात करतात, पण इतर यूरोपीय देशांतील भूवैज्ञानिक त्यांचा समावेश पुढील म्हणजे ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) संघात करतात.
केळकर, क. वा.