कमांडो : प्रसंगानुसार व लष्करी हेतूने विशिष्ट सैनिकी कारवाई करणारा संरक्षण सेनेचा विभाग किंवा दल. ‘कमांडो ’ हा शब्द पोर्तुगीज भाषेतील असून त्याचा अर्थ ‘आज्ञा ’ किंवा ‘आज्ञापित’ (दल) असा आहे. या संज्ञेपूर्वी ‘विशिष्ट सेवा ’ दल, ‘तुफानी दल’ अशा संज्ञा रूढ होत्या. ‘पेंढारी रेंजर्स ’ हा कमांडोचाच एक प्रकार म्हणता येईल. कमांडोचे मूळ चांचेगिरीत दिसून येते. उदा., ब्रिटिश नौसेना कप्तान ड्रेक याने (१५४० – ९६) अमेरिकेतील स्पेनच्या वसाहतींवर आणि जहाजांवर घातलेल्या धाडी. अमेरिकी यादवी युद्धात (१८६२ – ६५) ‘रेंजर पलटणी ’ अशा स्वरूपाच्या कारवाया करीत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शायिस्तेखानावरील धाड कमांडो कारवाईचा उत्तम नमुना होय. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत दक्षिण आफ्रिकेतील बोअर राजवटीने तद्देशीय काळ्या जनतेविरुद्ध कारवायांसाठी कमांडो नावाची गोऱ्यांची पथके उभारली होती. बोअर युद्धात (१८९९ – १९०२) असल्या पथकांनी ब्रिटिश सैन्याला बेजार केले होते. दुसऱ्या महायुद्धात (१९३९ – ४५) प्रथम नाझी-जर्मन सैन्यात ‘ब्रँडेंनबर्गर’ व ‘तुफानी सेना’ या नावांची कमांडो दले उभारण्यात आली. पुढे जून १९४० मध्ये सरविन्स्टन चर्चिल व ले. कर्नल डडली क्लार्क यांच्या प्रेरणेने ब्रिटिश लष्करात जलभूचर गनिमी दले उभारण्यात आली. यास ‘क्रमांक – ११ कमांडो’ नाव देण्यातआले. याच्यातूनच लॉर्ड लूइस माउंटबॅटन यांच्या आधिपत्याखाली संमिलित संग्राम विभाग सुरू झाला. अमेरिका, फ्रान्स या राष्ट्रांनीही कमांडो दले उभारली. भारतीय सेनेत जरी वेगळी कमांडो दले नसली, तरी योग्य ते प्रशिक्षण देऊन सैनिक व अधिकारी यांना कमांडो युद्धतंत्रात तयार केले जाते. कमांडो कारवायांचा गाभा म्हणजे, झटपट व योजनेच्या वेळापत्रकाप्रमाणे तंतोतंत कारवाई पार पाडणे. ही कारवाई उघड लढाई नसून शत्रूवर पूर्ण विजय मिळविणे हे तिचे उद्दिष्टही नाही. शत्रूवर आकस्मिकपणे हल्ला करून नंतर आपल्या जागी परतणे हे कमांडोचे कार्य होय. यापूर्वी झालेल्या कारवायांवरून कमांडो कारवायांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते : शत्रूच्या ताब्यातील आपल्या लोकांचे मनोधैर्य वाढविणे आक्रमक सेनेविरुद्ध नागरी प्रतिरोध वाढविणे तिच्यात संभ्रम निर्माण करून तिचे मनोधैर्य खच्ची करणे, टेहळणी करून शत्रूच्या लष्करी सिद्धतेविषयी तांत्रिक माहिती मिळविणे लष्करी, नाविक व युद्धोपयोगी केंद्रे, कारखाने, तेलाचे साठे,गोद्या, रडार, विमानतळ, समुद्रकिनाऱ्यावरील तोफा, बंदरे, धरणे, प्रक्षेपणास्त्र-केंद्रे, पूल, रेल्वे वगैरे उद्ध्वस्त किंवा नादुरुस्त करणे सामुद्रिक चढाईचा सराव करणे शत्रूला सैन्य पांगविण्यास भाग पाडणे त्याच्या सैन्याची हालचाल अवघड करणे वेगवेगळ्या मोर्च्यांवर घाला घालणे व शत्रूच्या मनात आपल्या योजनेविषयी विकल्प निर्माण करणे शत्रूच्या आघाडीत अंतःप्रवेश करून त्याच्या पिछाडीस गोंधळ उडविणे बगलेवर हल्ले करून मुख्य हल्ल्यास पुष्टी देणे महत्त्वाचे रस्ते ताब्यात घेऊन शत्रूच्या आघाडीत व पिछाडीत पाचर मारून त्यास कुमक मिळू न देणे चढाई व संरक्षणाच्या दृष्टीने उपयोगी जागा, टेकड्या, पूल, नदीचे उतार, पूल बांधण्यास सोयीस्कर जागा इ. ताब्यात घेणे किंवा शत्रूला त्या दुष्प्राप्य करणे घातपात करणे इत्यादी. वरील कारवाया साधारण सैन्यही करू शकेल, परंतु फरक एवढाच, की विशिष्ट प्रशिक्षणामुळे आणि अनुभवामुळे कमांडो त्या नियोजित कालावधीतच करू शकतात. जो सैनिक चलाख, निधड्या छातीचा, प्रसंगावधानी, सहनशील व उत्तम प्रकृतीचा असेल, त्याचीच निवड कमांडोकरिता करतात. अचूक नेमबाजी, वेगवेगळी हत्यारे कौशल्याने हाताळण्याची कला, स्फोटक द्रव्यांचा उपयोग करण्याचे कसब, उत्तम पोहणे, डोंगरदऱ्या चढण्या-उतरण्याची कला, बोटी चालविणे,लांबलांब मजला मारणे, जे मिळेल त्यावर निर्वाह करणे, छत्रीसैनिकी-तंत्र इ. बाबतींत त्याला प्रशिक्षण दिले जाते. तसेच सांघिक अथवा स्वतंत्रपणे तो शत्रुप्रदेशात राहू शकला पाहिजे. फील्ड मार्शल वेव्हेल, ॲलनब्रुक, सर विल्यम स्लिम हे अनुभवी सेनाधिकारी, ‘कमांडो’ म्हणून वेगळा विभाग असावा, या मताविरुद्ध होते.कोठलाही सैनिक, त्याला प्रशिक्षण दिल्यास, त्याच्या मूळ दलाचा एक अविभाज्य भाग राहून ‘कमांडो ’ कारवाया करू शकेल, असे त्यांचे मत आहे. लॉर्ड लूइस माउंटबॅटन, कर्नल क्लार्क, ब्रिगेडिअर पीटर यंग, विंगेट, रँडॉल्फ चर्चिल (सर्व ब्रिटिश) ब्रिगेडियर मेरिल व कॉकरन (अमेरिका) ओटो स्कॉर्झनी (जर्मनी), हे कमांडो सेनापति-अधिकारी प्रसिद्ध आहेत. तसेच अरब मुक्तिफळीचे पॅलेस्टाइन कमांडो, इझ्राएलच्या हगाना, पालमाक (१९४८ पूर्वी) या कमांडो संघटना प्रसिद्ध आहेत. बांगला देशच्या मुक्तिवाहिनी गनिमांना शिक्षण देण्यात भारतीय कमांडोंनी भाग घेतला होता. ‘गनिमी कावा’ व ‘कमांडो’ यांच्या कारवायांत बरेच साम्य आढळते. फरक एवढाच, की गनीम हे बहुतांशी बिगरलष्करी असतात व पकडले गेले, तर त्यांना युद्धकैदी म्हणून मानले जात नाही आणि कमांडो ही सैनिकी पथके असतात.
पहा : गनिमी युद्धतंत्र.
दीक्षित, हे. वि.