कबूतर : सगळ्या कबूतरांचा समावेश कोलंबिडी या पक्षिकुलात केलेला आहे. कबूतरांच्या अनेक जंगली आणि पाळीव जाती असून त्या सर्व ⇨ पारव्यापासून उत्पन्न झालेल्या आहेत, असे चार्ल्स डार्विन यांनी प्रथम सगळ्यांच्या नजरेस आणले. ⇨ भाटतितर हा कबूतरांचा जवळचा नातेवाईक आहे. उत्तर व दक्षिण ध्रुव आणि त्यांच्या लगतचा प्रदेश सोडून कबूतरे जगाच्या जवळजवळ सगळ्या भागांत आढळतात. उष्ण प्रदेशात ती विपुल असतात, पण ऑस्ट्रेलेशियात यांचे जितके विविध प्रकार आढळतात तितके दुसरीकडे कोठेही आढळत नाहीत. कबूतरे विविध आकारमानांची असतात. अगदी लहान चंडोलाएवढी तर मोठ्यात मोठी टर्कीपक्षाच्या मादीएवढी असतात.
शरीरावरील पिसे दाट व मऊ असून अंग गुबगुबीत व आटोपशीर असते. शरीराच्या मानाने डोके लहान असते. पंख आखूड किंवा लांब असतात शेपटी टोकदार, गोलसर अथवा बोथट असून तिची लांबी कमी जास्त असते. चोच प्रायः काहीशी लहान, टोकाशी कठीण पण बुडाशी कमजोर किंवा मऊ असते. चोचीच्या बुडाशी मेदूर (चोचीच्या बुडाशी वरच्या बाजूला असणारी मांसल मऊ जागा) असते. पाय बहुधा आखूड असतात पण काही भूचर जातींत ते काहीसे लांब असतात. काही जातींत मादी नरापेक्षा थोडी मळकट रंगाची असते. बऱ्याच जातींचे नर आणि माद्या दिसायला सारख्याच असतात, पण इतर काही जातींत नराचा रंग मादीच्या रंगापेक्षा स्पष्टपणे निराळा असतो.
बहुतेक जाती, निदान अंशतः, वृक्षवासी असतात पण थोड्या भूचर किंवा खडप्यांवर राहणाऱ्या असतात. बहुतेक जाती जोरदार उडणाऱ्या असतात. काही स्थलांतर करतात. ज्या जातींच्या सांघिक वर्तनाविषयी माहिती मिळालेली आहे, त्यांपैकी बहुतेक प्रजोत्पादनाचा हंगाम सोडून इतर काळात कमीअधिक प्रमाणात संघचारी (गट करून राहणाऱ्या) असतात आणि काहींचे तर फार मोठे थवे असतात. काही जाती प्रजोत्पादनाच्या काळात वसाहती स्थापन करतात आणि तेथेच त्यांची वीण होते.
कबूतरांचे मुख्य भक्ष्य म्हणजे धान्य, बी, फळे, कळ्या आणि इतर शाकपदार्थ होत पण पुष्कळ जाती लहान गोगलगाई अथवा इतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी खातात. यांच्या अन्नपुटांत (अन्न साठविण्याकरिता असलेल्या अन्नमार्गाच्या पिशवीसारख्या भागांत) दोन पिशव्या असल्यामुळे त्यांत पुष्कळ अन्न साठविता येते. बहुतेक कबूतरांच्या आहारनालात (तोंड ते गुद अशा अन्नमार्गात) अन्न दळण्याकरिता एक मजबूत स्नायुमय भाग असतो. त्याला ‘पेषणी’ म्हणतात आंत्र (आतडे) लांब व अरुंद असते. काही फलाहारी पक्ष्यांचा आमाशय (जठर) मऊ असतो आणि आंत्र आखूड व रुंद असते. अशा पक्ष्यांच्या आहारनालात फळांच्या फक्त मगजाचेच (गराचेच) पचन होते आणि बिया विष्ठेबरोबर जशाच्या तशाच बाहेर पडतात. पाणी पिण्याकरिता कबूतरे पाण्यात चोच बुडवून पाणी ओढून घेतात. या बाबतीत भाट तितर आणि लावा या पक्ष्यांशी त्यांचे साम्य दिसून येते.
बहुतेक सर्व कबूतरे शिरकुट्या, मुळ्या वगैरे घट्ट विणून बेताबाताचेच घरटे बांधतात. एकटी मादीच घरटे बांधते पण त्याकरिता साहित्याचा पुरवठा नर करतो. मादी एक किंवा दोन पांढरी अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम दोघेही करतात. अंड्यांतून बाहेर पडलेली पिल्ले पिच्छहीन (पिसे नसलेली), आंधळी आणि असहाय असतात. त्यांच्या अंगावर तुरळक पिवळी मऊ पिसे असतात. नर आणि मादी दोघेही पिल्लांची काळजी घेऊन त्यांना भरवितात. भरविण्याची रीत मोठी मजेदार असते. पिल्ले आईबापांच्या तोंडात आपली चोच खुपसतात आणि ते पचन झालेले अन्न तोंडात आणून त्यांना खाऊ घालतात. नर आणि मादी या दोघांच्याही अन्नपुटांत कपोत- क्षीर उत्पन्न होते. पिल्लांच्या जन्मानंतर काही दिवस तरी कपोत-क्षीर हेच त्यांचे एकमेव खाद्य असते. ही क्षीर दह्यासारखा पौष्टिक पदार्थ असून अन्नपुटाच्या उपकला-अस्तरापासून तयार होते. उपकलेच्या कोशिकांच्या (पेशींच्या) संख्येत झपाट्याने वाढ होते आणि नवीन तयार झालेल्या कोशिका मूळ उपकलेपासून अलग होऊन त्यांचा दह्यासारखा लगदा बनतो. हीच कपोत-क्षीर होय. पिल्लांची वाढ फार झपाट्याने होते आणि काही जातींची पिल्ले तर दोन आठवड्यांची होतात न होतात तोच उडू शकतात.
कबूतरे घूं घूं असा आवाज काढतात आणि तो काढताना मान फुगवितात पण काही कबूतरे घुमण्याऐवजी शीळ घातल्यासारखा कर्कश आवाज काढतात.
उपयोग : माणसाने कबूतरांचा अनेक कामांसाठी उपयोग करून घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर विशिष्ट कामांसाठी त्याने त्यांच्या विशिष्ट जाती निर्माण केल्या आहेत. कबूतरांचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे त्यांचा खाण्यासाठी उपयोग करतात. पाश्चात्त्य देशांत तर हल्ली त्यांच्या मांसाचा पुरवठा करण्याकरिता कबूतर-संवर्धन हा एक मोठा उद्योग झालेला आहे. कबूतरांचे पिल्लू चार आठवड्यांचे झाले म्हणजे ते मारून त्यांचे मांस विक्रीकरिता ठेवतात. भारतात कबूतरांचे मांस खातात पण धंदा म्हणून कबूतर-संवर्धनाला सुरुवात देखील झालेली नाही.
कबूतरांचा संदेशवहनाच्या कामी फार पूर्वीपासून उपयोग करून घेण्यात आलेला आहे. महंमद पैगंबराला ईश्वराचा संदेश कबूतराच्या द्वारेच येई असे म्हणतात. ख्रिस्ती लोकांच्या धर्मयुद्धात कबूतरांच्या द्वारेच संदेश पाठविले जात असत. भारत आणि इराण या देशांत कबूतरांचा उपयोग संदेशवाहक म्हणून करीत असत. अकबराजवळ वीस हजार संदेशवाहक कबूतरे होती असे म्हणतात. फ्रान्समधील क्रांतीच्या वेळी संदेशवहनाकरिता कबूतरांचा उपयोग करण्यात आला. हल्लीच्या विज्ञानयुगातदेखील या दृष्टीने त्यांची उपयुक्तता कमी झालेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत त्यांचा संदेशवाहक म्हणून उपयोग करण्यात आला. बारीक नळीमध्ये पत्र किंवा संदेशाचा कागद घालून तो कबूतराच्या पायाला किंवा पाठीवर बांधून ते कबूतर इच्छित स्थळी पाठवितात. या कामाकरिता शिकवून तयार केलेल्या कबूतरांना ‘संदेशवाहक कबूतरे’ म्हणतात.
पुष्कळ देशांत कबूतरांच्या वेगाने उडण्याच्या शर्यती लावतात. वेगवेगळ्या देशांत घोड्यांच्या शर्यतीवर जसे पैसे लावतात त्याचप्रमाणे या शर्यतींवरदेखील लावतात. कबूतरांच्या उडण्याच्या शर्यतींना हॉलंडमध्ये सुरुवात झाली. सगळ्या जगात बेल्जियमइतका कबूतरांचा शोकीन देश असेल असे वाटत नाही. तेथे कबूतरांच्या शर्यती होतात व लोक त्यांवर पैसे लावतात. त्याचप्रमाणे बेल्जियममधील जवळजवळ सगळ्या गावांत कबूतरांचे क्लब आहेत.
प्रकार : पुष्कळ लोकांना कबूतरे बाळगण्याचा किंवा पाळण्याचा शोक असतो. भारतातदेखील पुष्कळ लोकांना हा नाद आहे. या लोकांनी कृत्रिम निवडीच्या (आनुवंशिकरीत्या एखादा विशिष्ट गुणधर्म पिल्लांमध्ये यावा या दृष्टीने मातापितरांच्या मुद्दाम केलेल्या निवडीच्या) तत्त्वावर अनेक प्रकारच्या कबूतरांची निपज केलेली आहे यांपैकी काही प्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : गिर्रेबाज (हवेत उडताना कोलांट्या घेणारी) लक्का (शेपटीची पिसे पंख्याप्रमाणे पसरून वर उभी केलेली) जॅकोबिन (मानेभोवतालची पिसे उभारल्यामुळे चक्रीफणी तयार झालेली)कागदी (कागदासारखी पांढरी सफेद) शिराजी (पोटाकडचा रंग पांढरा, पाठीचा काळा) खैरी, बांडी, लाल,लोटन (जमिनीवर लोटण घेणारी) पायमोजी (पायांवर बारीक पिसे असणारी) चुडेल (डोक्यावर तुरा असणारी)चीना (चीनमधील) बुदबुदा (अन्नपुटक खूप फुगविणारी) तुरमची (ज्यांच्या गळ्याखालची पिसे पुढच्या बाजूला वळलेली असतात) इत्यादी.
कबूतरांच्या अनेक जाती आहेत. त्यांपैकी हिरवे कबूतर हे दिसायला फारच गोजिरवाणे असते. याला संस्कृत भाषेत हरितालक आणि हिंदी भाषेत हरियल म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फीनिकॉप्टेरा असे आहे. इतर कबूतरांइतकेच हे मोठे असून गुबगुबीत असते शरीराचे मुख्य रंग हिरवट-पिवळा आणि राखी-करडा हे असतातडोके, मान आणि छातीचा वरचा भाग हिरवट-पिवळा मानेच्या बुडाभोवती राखी-करड्या रंगाचे कडे खांद्यावर निळसर चकंदळ (वर्तुळकार खवला) पंख काळसर आणि त्यांवर पिवळा पट्टा पाय पिवळे. यांचे झाडीमध्ये थवे असतात.
हे पक्षी पूर्णपणे वृक्षवासी असून संघचारी आहेत. रस्त्याच्या बाजूच्या झाडांवर ते बहुधा आढळतात. गावांच्या आणि खेड्यांच्या आसपासच्या बागा आणि झाडी यांतही ते आढळतात. पिंपळ, वड आणि उंबर यांची फळे हे खातात. पिंपळाची आणि वडाची फळे खाण्याकरिता यांचे मोठाले थवे त्या झाडांवर जमतात त्यांच्या शरीराचा रंग या झाडांच्या पानांच्या रंगाशी मिळताजुळता असल्यामुळे ते मुळीच दिसून येत नाहीत. यांचा आवाज मंजूळ शीळ घातल्यासारखा असतो. यांची वीण मार्चपासून जूनपर्यंत होते. घरटे इतर कबूतरांच्या घरट्याप्रमाणेच असून झाडावर सु. सहा मी. उंचीवर असते. ते पानांमध्ये दडविलेले असते. मादी दोन पांढरी अंडी घालते.
न्यू गिनीमध्ये कबूतरांची एक फार मोठी जात आढळते. तिला मुकुटधारी कबूतर म्हणतात. या कबूतरांच्या डोक्यावर पिसांचा मोठा तुरा असतो. उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात एके काळी लांब शेपटीचे प्रवासी कबूतर फार मोठ्या प्रमाणात आढळत असे. त्याचे शास्त्रीय नाव एक्टोपिस्टीस मायग्रेटोरियस होते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते संघचारी होते. यांच्या घरट्यांच्या मोठाल्या वसाहती असत आणि यांचे प्रचंड थवे स्थानांतर करीत, पण प्रवासी कबूतरांची ही सबंध जात माणसाच्या लुटारूपणाला बळी पडली आणि १९१४ सालाच्या सुमारास नष्ट झाली.
कबूतराचा (कपोताचा) उल्लेख ऋग्वेद कालापासून आढळतो. त्याकाळी कबूतराला अशुभ मानीत असत. पुराणांनीही या पक्ष्याला अशुभ मानले आहे. जुन्या पौराणिक (वेगवेगळ्या धर्मांच्या) कथांत कबूतरांविषयींच्या कथा आढळतात. ग्रीक कथांमध्ये कबूतर सौंदर्यदेवतेचा आवडता पक्षी आहे असे मानलेले आहे. शिबी राजाने कपोताच्या वजनाइतके आपल्या शरीराचे मांस ससाण्याला देऊन त्याचे (कबूतराचे) प्राण वाचविल्याची कथा महाभारतात दिलेली आहे. एकनाथी भागवतात अवधूतांनी कपोत-कपोतीची कथा सांगून या पक्ष्याला त्यांनी आपला गुरू मानला आहे. पाश्चिमात्य लोकांनी कबूतराला शांतीचे प्रतीक मानले आहे. एखाद्या विशिष्ट अथवा उत्सव प्रसंगी सुविख्यात व्यक्तीच्या हातून पांढरे कबूतर उडवितात.
कर्वे, ज. नी.
“