कप्पी : फिरणाऱ्या पोलादी दंडातील यांत्रिक शक्ती पट्टा किंवा दोर वापरून दुसऱ्या दंडावर नेण्यासाठी दोन्ही दंडांवर जी विशेष प्रकारची चाके बसवतात त्यांना कप्प्या म्हणतात.
यांत्रिक लाभ(उचललेले वजन भागिले लावलेली प्रेरणा)मिळविण्यासाठीही कप्प्यांच्या विविध रचना करण्यात येतात पण त्या कप्प्या निराळ्या प्रकारच्या असतात [→ साधी यंत्रे]. कप्पींच्या मध्यवर्ती भागाला तुंबा म्हणतात.या तुंब्यामध्ये पोलादी दंड बसविण्याचे भोक पाडलेले असते. कप्पीच्या परिघावर एक प्रधी (कडे) असते. कप्पीचा तुंबा व प्रधी जोडण्यासाठी काही अरे बसवतात किंवा एकच भरीव तबकडी असते.लहान कप्प्या व काही वेळा मोठ्याही साधारणतः बिडापासून ओतीव पद्धतीने बनवतात.प्रचक्रा सारख्या बिडाच्या मोठ्या कप्प्या दोन किंवा अधिक भागात बनवतात. मोठ्या पण कमी शक्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या कप्प्या काही वेळा दोन भाग जोडून संयुक्त पद्धतीने बनविलेल्या असतात.संयुक्त कप्प्यां तील तुंब्यांचे भाग बिडाचे बनवतात. आऱ्यांकरिता लोखंडी गज किंवा नळाचे तुकडे वापरतात.प्रधीसाठी पोलादी पत्रा वापरतात.संयुक्त जातीच्या कप्प्या ओतीव कप्प्यांपेक्षा हलक्या व स्वस्त असतात.
भरीव ओतीव कप्पी दंडावर घट्ट बसविण्यासाठी पोलादी चावीचा उपयोग करतात.संयुक्त जातीची कप्पी दंडावर घट्ट बसविण्यासाठी बोल्ट आणि नटांचा उपयोग करतात.लहान कप्प्या लाकडाच्याही करतात व त्या ओतीव कप्प्यांपेक्षा हलक्या असून शक्तिप्रेषणाचेही काम चांगले करतात.पण दमट व उष्ण हवेत त्या फुगतात व फाटतात.तसेच लाकडावर तेल पडले, तर पट्टा घसरू लागतो.साधा सपाट पट्टा बसविण्याची कप्पी आ.१ मध्ये दाखविली आहे.अशा कप्प्यांच्या प्रधीचे बाहेरील पृष्ठ किंचित बहिर्गोल केलेले असते.त्यामुळे पट्टा किंचित सैल झाला, तरी अपमध्य(मध्यापासून दूर ढकलणाऱ्या)प्रेरणेने चाकाच्या मध्यभागावरच राहतो व कप्पीवरून बाजूकडे सरकून बाहेर पडत नाही.
पायरीच्या कप्प्या : यांवर फक्त सपाट पट्टाच वापरतात.तीन किंवा चार पायऱ्यांत वाढत गेलेल्या व्यासांच्या कप्प्या एकसंघ ओतून या बनविलेल्या असतात.चालक व चलित दंडावर सारख्याच कप्प्या उलट सुलट बसवून साध्या सपाट पट्ट्याने जोडतात.त्यामुळे चलित दंडाला पायऱ्यांच्या संख्येइतके निरनिराळे वेग देता येतात.
पायरीच्या कप्प्यांच्या एका विशेष प्रकारात कप्पी अखंड जातीची न करता दोन चाकासारख्या भागांत बनवलेली असते.दोन्हीकडील भाग अगदी जवळ आणून ठेवले म्हणजे त्यांच्यामध्ये पाचरीसारखी खाच राहते व यावेळी खाचेत ठेवण्याचा पोलादी व्ही-पट्टा कप्पीच्या प्रधीजवळ बसतो व कप्पीच्या मोठ्यात मोठ्या व्यासावर ठेवल्याप्रमाणे फिरतो.कप्पीचे दोन्हीकडील भाग एकमेकांपासून दूर सरकवत गेले म्हणजे त्यांच्यामधील खाच रुंदावत जाते व खाचेतील पोलादी व्ही-पट्टा कप्पीच्या मध्यभागाकडे उतरत जातो.यामुळे कप्पीचा कार्यकारी व्यास कमी होतो व त्याप्रमाणे पट्ट्याच्या गतीमध्ये फरक पडतो.चालक कप्पीचा व्यास कमी होत असताना चलित कप्पीचा व्यास त्याच प्रमाणात वाढवला म्हणजे पट्टा सैल पडत नाही.अशा कप्प्यांना वेग-बदली कप्प्या म्हणतात.अशा कप्प्या काही प्रकारच्या दंतचक्र (गिअर) पेट्यांमध्ये वापरतात.
दोराच्या कप्प्या : शक्तिप्रेषणासाठी सुताचे दोर वापरावयाचे असतील, तर कप्पीच्या प्रधीवर पाचरीसारख्या खाचा ठेवाव्या लागतात.या खाचांचा समाविष्ट कोन ४५० ठेवतात.त्यामुळे खाचांमध्ये ठेवलेले सुताचे दोर खाचेच्या तळापर्यंत न उतरता खाचेच्या दोन्ही बाजूंमध्ये घट्ट पकडले जातात.शक्तीच्या प्रेषणासाठी पोलादी तारांचे दोर वापरावयाचे असतील तर खाचा रुंद करतात.त्यामुळे तारदोर मुख्यतः खाचेच्या तळावरच बसतो.शक्तिप्रेषणासाठी जरूरी असलेले
दोर व तळ यांमधील घर्षण वाढावे म्हणून खाचेच्या तळावर लाकडाचे किंवा रबराचे तुकडे बसवतात.या दोन प्रकारच्या कप्प्या आ.२ मध्ये दाखविल्या आहेत.
पक्की व सैल कप्पी : जेव्हा काम करताना चलित दंड मधून मधून बंद करावा लागतो तेव्हा पक्क्या व सैल कप्प्यांची योजना करतात.या व्यवस्थेमुळे चालक घटक वारंवार बंद-चालू करावा लागत नाही. आ. ३. आरोहक कप्पी : (१) चालक कप्पी, (२) चलित कप्पी, (३) आरोहक कप्पी, (४) पट्ट्यावरील भार कमीजास्त करणारे वजन.आ. ३. आरोहक कप्पी : (१) चालक कप्पी, (२) चलित कप्पी, (३) आरोहक कप्पी, (४) पट्ट्यावरील भार कमीजास्त करणारे वजन.एकाच चालक दंडावरून जेव्हा पुष्कळ यंत्रे चालवावयाची असतात तेव्हाही ही व्यवस्था आवश्यक असते.या व्यवस्थेत चलित दंडावर एकाच व्यासाच्या दोन कप्प्या, एक पक्की व दुसरी सैल, एकमेकींना लागून बसवतात. चालक दंडावर या दोन कप्प्यांच्या रुंदीची एकच पक्की कप्पी असते.पक्क्या किंवा सैल कप्पीवर पट्टा जसा ठेवावा तसा चलित दंड चालू किंवा बंद राहतो.पट्टा सरकविण्यासाठी योग्य प्रकारची यंत्रणा अर्थातच योजावी लागते.
रबरी व्ही-पट्ट्याची कप्पी : या कप्पीच्या खाचा पाचरीच्या जातीच्या परंतु जास्त रुंद असतात.यामध्ये बसणारा रबराचा व्ही-पट्टा सुताच्या दोराप्रमाणे खाचेच्या बाजूतच घट्ट पकडला जातो.(आ.४).
वैद्य, ज. शि.
“