कपुरथळासंस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्व पंजाबमधील एक संस्थान. त्याची लोकसंख्या ३,७८,३८० (१९५१) होती आणि त्याचे क्षेत्रफळ १,६८४ चौ. किमी. असून ब्रिटिश अंमलात हा प्रदेश जालंदर विभागाच्या आयुक्ताच्या देखरेखीखाली होता. त्यात चार शहरे व सहाशे तीस खेडी होती आणि त्याचे वार्षिक उत्पन्न ४०,५०,००० रु. होते. जालंदरच्या वायव्येस १९ किमी. वर ते वसले आहे. संस्थानची मुख्य पिके ऊस, कापूस, गहू, मका व तंबाखू होती व त्यांतील बरेच धान्य निर्यात होई. या संस्थानचे पूर्वज सतलज नदीच्या दोन्ही तीरांवरील आणि बाडी दुआबमधील प्रदेश यांवर सत्ता चालवीत होते. त्यांचे मूळ गाव बाडी दुआबातील अहलू हे असल्यामुळे यांना अहलूवालिया असे म्हणतात. कपुरथळा हे गाव राजपूत राजा-राणी कपूर (जैसलमीर) ह्याने अकराव्या शतकात स्थापिले. या वंशातील सरदार जस्सासिंग याने पुन्हा १७८० मध्ये येथे आपली सत्ता पक्की स्थापन केली. हाच ह्या घराण्याचा संस्थापक होय. सतलजच्या अलीकडील प्रदेश याने स्वतः जिंकला व बाकीचा प्रदेश १८०८ पूर्वी रणजितसिंगाने यास दिला. १८०९ मध्ये याने इंग्रजांस मदत करण्याचे मान्य केले. याचा वंशज फत्तेसिंग हा १८२६ मध्ये रणजितसिंगाच्या आक्रमणामुळे सतलजच्या पैलतीरावर इंग्रजांच्या आश्रयास आला. परंतु पहिल्या इंग्रज-शीख युद्धात अलीवाल येथे याच्या सैन्याने इंग्रजांविरुद्ध सामना दिला. त्यावेळी फत्तेसिंगाचा मुलगा निहालसिंग काही करू न शकल्यामुळे त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. मात्र १८४६पर्यंत सतलजच्या पैलतीरावर असलेला प्रदेश त्याच्याच ताब्यात राहिला. मात्र त्यास इंग्रजांना सालोसाल खंडणी देणे आवश्यक झाले. १८४९ मध्ये निहालसिंगाला राजा ही पदवी देण्यात आली. १८५२ मध्ये त्याचा मुलगा रणधीरसिंग गादीवर आला. १८५७ च्या उठावात याने इंग्रजांस उचित असे साहाय्य केले. याचे पारितोषिक म्हणून यास बवंडी, बिठवली, अकोणा या ठिकाणची जहागीर मिळाली. १८७० मध्ये रणधीरसिंगाचा मुलगा खडकसिंग हा गादीवर आला व नंतर १८७७ मध्ये खडकसिंगाचा मुलगा पाच वर्षांचा जगज्जितसिंग गादीवर आला. त्याच्याकारकीर्दीत १९४८ मध्ये संस्थान विलीन झाले व ते पेप्सू संघात सामील करण्यात आले. तत्पूर्वी ह्या संस्थानात राजाने व ब्रिटिशांनी अनेक सुधारणा केल्या. राजाने शेतकऱ्यांसाठी पतपेढ्या निर्माण केल्या. पशुधनाची सुधारणा करण्याचेही प्रयत्न करण्यात आले. १९२१ साली स्टेट कौन्सिलची (मंत्रिमंडळाची) स्थापना करण्यात आली. राजपुत्र अध्यक्ष व मुख्यप्रधान उपाध्यक्ष झाले. ह्यात सरकारी व बिनसरकारी सभासद घेण्यात आले. ह्या संस्थानात बहुतेक ब्रिटिशांचेच कायदे जारी होते. खुनाच्या खटल्यात राजा निकाल देत असे. येथे एक रणधीर महाविद्यालय व दोन माध्यमिक शाळा संस्थान काळात सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शैक्षणिक बाबतीत हे संस्थान बरेच पुढारलेले होते.
खरे, ग. ह.