कळी : फूल उमलण्यापूर्वी त्यातील सर्व भाग (देठ, अक्ष, दले इ.) अविकसित असून त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर ते फूल या संज्ञेस पात्र होते तत्पूर्वीच्या (अविकसित) अवस्थेस कळी (कलिका) म्हणतात. तसेच खोडाच्या किंवा फांदीच्या टोकावरच्या अविकसित प्ररोहास (कोंबास, अक्ष व पाने) कळी (कोरक) म्हणतात. कळी हा गर्भावस्थेतील प्ररोह (शाकीय किंवा प्रजोत्पादक) होय. अनेकदा या कळी भोवती विशेष प्रकारची एक किंवा अनेक संरक्षक आच्छादने (छदे, खवले, उपपर्णे) आढळतात. ⇨ओषधी व काही काष्ठयुक्त वनस्पतींच्या कळ्यांवर कोवळ्या पानांशिवाय दुसरे आच्छादन नसते, त्यांना अनाच्छादित किंवा नग्न कळ्या म्हणतात. बहुतेक काष्ठयुक्त वनस्पतींच्या कळ्यांवर खवल्यासारखी संरक्षक रूपांतरित पाने असून भिन्न वनस्पतींत त्यांचे स्वरूप भिन्न असते कित्येकदा त्यांवर केस किंवा राळ, गोंद व मेणासारखे अपार्य पदार्थ असतात (उदा., कानोर).
खोडाच्या किंवा फांदीच्या टोकास अग्रस्थ व बाजूस पार्श्विक कळी असते. पानांच्या बगलेत कक्षास्थ कळी असून तिची वाढ अग्रस्थ कळीच्या प्रभावामुळे नियंत्रित असते. अशा नियंतित्र कळ्यांना प्रसुप्त म्हणतात. कधीकधी यांच्या शेजारी संख्येने कमीजास्त अशा इतर कळ्या असतात, त्यांना अतिरिक्त व त्यांपैकी वरच्यांना उपरिस्थित व बाजूच्यांना संलग्न म्हणतात. अग्रस्थ किंवा कक्षास्थ कळ्या तोडल्यास खोडांवर, मुळांवर किंवा पानांवर नवीन कळ्या येतात [→ आकारजनन पुनर्जनन], त्यांना आगंतुक म्हणतात. कळीमध्ये पानांची (किंवा पुष्पदलांची) वैशिष्ट्यपूर्ण मांडणी असते. [→ पर्णवलन] आणि वनस्पतींच्या वर्गीकरणात ह्याला महत्त्व असते. कलिका उमलल्यावर खवले किंवा पाने पडून जातात व त्यांचे वण मागे राहतात, त्यांना अनुक्रमे शल्ककिण व पर्णकिण म्हणतात [→ कानोर पपई]. कोबीचा गड्डा ही कळी आहे.
एका झाडावरची पर्णकळी काढून ती दुसऱ्या झाडावर बसवून वाढू देणे व अशा रीतीने तिला अधिक जोमाने वाढण्यास व तिचा प्रसार करण्यास मदत करणे हा उपक्रम जुना असून विशेषत: फलोत्पादनात (उदा., आंबा, चिकू) व पुष्पोत्पादनात (उदा., गुलाब) त्याचा वापर करतात, त्यास मुकुलन (डोळा भरणे) म्हणतात. [→ कलमे].
राँकियर या वनस्पतिशास्त्रज्ञांनी उच्च वनस्पतींच्या जीवरूपांचे (जीवनातील शरीराकृतींचे) पाच प्रकार केले असून त्यांमध्ये त्यांनी त्यांच्या जमिनीवरील प्ररोहांची जीवनमर्यादा, त्यांवरील प्रसुप्त कळ्यांचे स्थान व त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीतील संरक्षणाचे मार्ग ध्यानात घेतले आहेत. एखाद्या प्रदेशातील वनश्रीमध्ये आढळणाऱ्या भिन्न जीवरूपाची टक्केवारी त्या प्रदेशाचे स्थान आणि हवामान यांवर अवलंबून असते [→ परिस्थितिविज्ञान].
पहा : खोड.
परांडेकर, शं. आ.
“