कार्बन कागद : मेणासारखा पदार्थ व रंगद्रव्य यांच्या मिश्रणाचा पातळ लेप दिलेला व एकाच वेळी एक किंवा अधिक प्रती (नकला) काढण्यासाठी वापरण्यात येणारा कागद. दोन कोऱ्या कागदांमध्ये कार्बन कागद योग्य रीतीने ठेवून वरील कोऱ्या कागदावर दाब देऊन जे लिहिले किंवा काढले जाते त्याची यथातथ्य नक्कल खालील कोऱ्या कागदावर मिळते. कारण कार्बन कागदावरील रंगद्रव्य कागदापासून सुटे होऊ शकणारे असते व त्यामुळे दाब दिलेल्या भागावरचे काही रंगद्रव्य खालील कोऱ्या कागदावर गेल्याने नक्कल निघते. अशा कागदावरील रंगद्रव्य सामान्यपणे (काजळी) असल्यामुळे ‘कार्बन कागद’ हे नाव पडले आहे.

यासाठी लागणारा कागद चिंध्या, लाकूड, मॅनिला वाख व ताग यांच्यापासून तयार करतात. तो पातळ, चिवट व टिकाऊ असावा लागतो. साधे मेण व माँटन, जपान, पॅरो‌फीन, कार्नुबा यांसारखी मेणे व ओलीन, रोझीन यांच्यासारखे पदार्थ लेपासाठी वापरतात. काळ्या कागदासाठी नेहमी काजळी तर इतर रंगांसाठी ब्राँझ निळा, व्हिक्टोरिया निळा, मिलोरी निळा, अल्ट्रामरीन, इंडिगो, कॅरमीन इ. रंगद्रव्ये किंवा त्यांची मिश्रणे व ॲनिलीन रंजकद्रव्ये किंवा वसाम्लात (फॅटी ॲसिडमध्ये) विद्राव्य अशी रंजकद्रव्ये वापरतात.

पूर्वी कागदावर कापडी बोळ्याने ग्रॅफाइट चोळून लावीत किंवा ब्रशाने लेप देत असत. आधुनिक पद्धतीमध्ये लेपाचे मिश्रण तयार करणे व कागदावर लेप देणे या दोन प्रमुख प्रक्रिया असतात. मेणे व इतर पदार्थ एका भांड्यात घालून ती भांड्याभोवतालच्या पोकळीत वाफ सोडून सु. १५०से. तापमानाला वितळवितात. नंतर भांड्यात रंगद्रव्य टाकून मिश्रण एकजीव करतात. हे गरम मिश्रण नंतर पोलादी चाकाच्या घाणीमध्ये घोटून मुलायम केल्यावर लेपन यंत्रामध्ये भरतात. लेपन यंत्रामध्ये एका रीळावर कोरा कागद गुंडाळलेला असतो. तो प्रथम लेपन रूळांवर नेला जातो. हे रूळ लेपाचे मिश्रण असलेल्या व वाफेने गरम केलेल्या कुंडामध्ये फिरत असतात. त्यामुळे रुळांना लागलेला लेप कागदाच्या पृष्ठाला लावला जातो. नंतर कागद तारेच्या मळसूत्रावर पुसणीवरून जातो. पुसणीने लेपाची जाडी नियंत्रित केली जाते. पुसणीवरून कागद पाण्याने थंड केलेल्या रुळांवरून नेण्यात येतो. त्यामुळे लेप थंड होऊन घट्ट होतो. शेवटी कागद दुसऱ्या ‌रीळावर गुंडाळला जातो. नंतर कागदाने हव्या त्या आकाराचे तुकडे करतात. कधीकधी कागद चुरगळू नये, टंकलेखन यंत्रांमध्ये सटकू नये व चांगला दिसावा म्हणून त्याच्या दुसऱ्या (मागील) बाजूवर न चिकटणारा व जलशोषक नसलेला असा मेणाचा थर देतात. काही वेळेस विशिष्ट प्रकारच्या कागदांवर दोन्ही बाजूंनी रंगद्रव्याचा लेप देतात.

विविध रंगांचे कार्बन कागद उपलब्ध असले तरी काळा, निळा, जांभळा आणि तांबडा हे रंग अधिक वापरले जातात. कार्बन कागद मुख्यत: टंकलेखनासाठी वापरले जातात. आकृत्या, चित्रे इत्यादींवरून नकला काढण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. शिसपेन्सिलीच्या किंवा पेनच्या साहाय्याने नकला करण्यासाठी वेगळे पेन्सिल किंवा पेन कार्बन कागद असतात. त्यांच्यावरील लेप टंकलेखनाच्या कार्बन कागदावरील लेपाच्या मानाने अधिक सैल असतात.

छायाचित्रीय नकला काढण्यासाठी कार्बन प्रक्रियेमध्ये अशाच प्रकारचे कागद वापरतात. मात्र त्यांच्यावरील लेप रंगद्रव्य व जिलेटीन यांचा असतो, त्यामुळे त्यांच्यावर प्रकाशाचा चटकन परिणाम होऊ शकतो. तेही पांढरे व निरनिराळ्या रंगांचे असतात.

ठाकूर, अ. ना.