कळसूत्री बाहुल्यांचा खेळ : बाहुल्यांच्या हालचालींतून एखादा नाट्य-प्रसंग प्रेक्षकांसमोर  उभा करण्याचा एक प्राचीन काळापासून चालत आलेला खेळ. या खेळात सूत्राच्या आधारे बाहुल्यांच्या हालचालींचे नियमन करणारा सूत्रधार स्वत: अदृश्य राहून या बाहुल्याच जणू स्वयंप्रेरणेने हालचाल करीत आहेत, असे भासवितो. कळसूत्री बाहुल्यांचे हे नाट्य सूत्रधाराच्या कल्पनेवर अवलंबून असते.

 

आ. १

हे बाहुली-नाट्य असल्याने यातील प्रसंग कोठेही म्हणजे  घरात, आकाशात, झाडावर अगर पाण्याखाली घडलेले  दाखविता येतात. तद्वतच पशूंचे बोलणे, झाडांचे चालणे, व्यंगचित्रांतील आकारवैचित्र्य, अघटित घटना यांसारख्या  क्‍लृप्त्यांचा वापर यात विसंगत वाटत नाही. लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक उपयोग अशा वैशिष्ट्यांमुळे या  खेळाचा अनेक दृष्टींनी उपयोग केला जातो. आज पाश्चात्त्य  देशांत आणि विशेषत: अमेरिकेत कळसूत्री बाहुली-नाट्य अतिशयच प्रगतावस्थेला पोहोचले आहे. या बाहुली-नाट्याचा  उपयोग मनोरंजनाबरोबरच शिक्षण आणि प्रसाराचे साधन म्हणून  सर्वत्र होऊ लागला आहे.

रचनेच्या दृष्टीने कळसूत्री बाहुल्यांचे चार मुख्य प्रकार आहेत :

(१) छाया-बाहुली : ही रंगीत कागद, कचकडे, पातळ कातडे अशा मितपारदर्शक पदार्थांपासून  तयार करतात. दक्षिण भारत, जावा, चीन, जपान येथे कातड्याच्या बाहुल्यांचे छाया-नाट्य प्रचारात  आहे. यासाठी प्रथम कातडे दोन्ही बाजूंनी घासून स्वच्छ करतात. त्याचे पातळ थर एकमेकांपासून अलग करून धड, डोळे, अवयव  असे सुटे भाग कापतात. रंग व छिद्रे यांच्या साहाय्याने कपडे, दागिने इ. दाखवितात. पांढरा पडदा व प्रखर दिवा यांच्यामध्ये व  पडद्याला लावून काड्यांच्या साहाय्याने बाहुलीची हालचाल  करतात. पडद्यांवर हालते-चालते रंगीत चित्र दिसते. याला  संगीत व संभाषणांची जोड देऊन कळसूत्री-नाट्य तयार होते. मद्रासच्या ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्सिस्ट्यूट’मध्ये या तंत्राचे  संशोधन चालू आहे.

आ. ३

(२) हात-बाहुली : हातमोज्याप्रमाणे हाताच्या पंजावर बसवून  रंगमंचाच्या मागे उभे राहून हिची हालचाल करता येते. कागदाचा  रांधा, कापड अशा हलक्या पदार्थांपासून बाहुलीचे डोळे व पंजे तयार करून मऊ कापडाच्या  तीन तोंडी पिशवीला ते घट्ट बसविण्यात येतात. या पिशवीवरून  बाहुलीला योग्य असे कपडे व दागिने घालता येतात (आ. १, २,३, ४).

आ. २


(३) काठी-बाहुली : या प्रकारात बाहुलीचे डोके एका पातळ काडीवर बसवलेले असते. दोन्ही पंजांना तशाच पातळ काड्या  लावलेल्या असतात. एका हाताने डोक्याची काडी आणि दुसऱ्याने बाहुलीच्या हातांच्या दोन काड्या यांची हालचाल करून बाहुली चालविता येते. चालविणारा रंगमंचाच्या मागे व खाली उभा  असतो. अधिक काड्या वापरून पाय, तोंड यांची हालचाल करता येते. माणसाच्या आकाराच्या  बाहुल्या करून चार माणसांनी  त्या चालविण्याचा प्रकार  जपानमध्ये आहे (आ. ५).

आ. ४

  (४) सूत्र-बाहुली : ही खरी  कळसूत्री बाहूली. रंगमंचाच्या  मागे व वर उभे राहून ही  चालवावी लागते. छाती, पोट, कंबर, डोके, हात, पाय असे  सुटे भाग तयार करून हालत्या सांध्यांनी ते जोडतात. योग्य ठिकाणी दोरे बांधून बाहुलीची हवी तशी  हालचाल करता येते. या हालचाली खऱ्या प्राण्यांच्या हालचालींशी स्पर्धा करू शकतात. इतकेच  नव्हे, तर सत्यसृष्टीत न घडणाऱ्याही हालचाली यांच्याकडून करून  घेता येतात. एका दोऱ्यापासून अनेक दोरे लावलेल्या बाहुल्या  वापरात आहेत. भारतातील परंपरागत पद्धतींत या दोऱ्यांच्या टोकांना  आंगठ्या बसवून कलाकार त्या आपल्या बोटांत घालतो. बोटांच्या  हालचालीने बाहुली चालविता येते. आधुनिक तंत्रामध्ये हे दोरे एका ‘चलन-पट्टीला’ बांधतात. उभी व आडवी असे चलन-पट्टीचे मुख्य  दोन प्रकार आहेत. बाहुलीपासून येणारे दोरे चलन-पट्टीला बांधून पट्टीच्या विविध हालचालींप्रमाणे बाहुली रंगमंचावर काम करते.  नेहमीच्या सर्व हालचालींशिवाय नृत्य, सर्कस यांतील हालचाली हिला  सफाईने करता येतात. या प्रकारात प्राण्यांच्या बाहुल्याही वापरतात (आ. ६, ७, ८, ९, १०, ११).

आ. ५

म्हैसूरकडे सूत्र-बाहुली व काठ-बाहुली यांच्या संयोगाने होणारा  एक प्रकार प्रचारात आहे. त्यात कलाकाराच्या डोक्याला एक पट्टा बांधतात. बाहुलीच्या खांद्यापासून अगर डोक्यापासून निघणारे दोन दोरे या पट्ट्याच्या दोन बाजूंस लावतात. बाहुलीच्या हाताला पातळ काड्या लावून कलाकार त्या हालवतो. प्रेक्षकांना या काड्या अगर दोरे दिसत नाहीत. कलाकार व बाहुली यांच्यामध्ये पडदा असतो (आ. १२).

आ. ६


अवयवांच्या नेहमीच्या सर्व हालचाली सूत्र-बाहुल्या सफाईने  करतातच परंतु बोलताना बाहुलीच्या तोंडाची, बुब्बुळांची, पापण्यांची आणि भुवयांच्याही हालचाली करता येतात (आ १३). बाहुली नाट्याच्या मर्यादा केवळ कलाकाराच्या कल्पनाशक्तीच्या  मर्यादेवर अवलंबून असतात.

आ. ७

इतिहास : मोहें-जो-दडो, हडप्पा, ग्रीस व ईजिप्त येथील उत्खननांत हालते सांधे असणाऱ्या मूर्तींचे अवशेष सापडले आहेत यावरून कळसूत्री बाहुल्यांची कला फार पुरातन काळापासून प्रचलित असावी, असे दिसते. इ. स. पू. ३०० मध्ये ग्रीस व इटली येथील साहित्यात आढळलेल्या उल्लेखांवरून कळसूत्री बाहुल्यांची  सुरुवात प्रथमत: यूरोपात झाली व नंतर त्यांचा प्रसार पूर्वेकडील चीन  व तेथून अमेरिका आदी देशांमध्ये झाला, असे अनुमान काही  पाश्चिमात्य पंडितांकडून करण्यात येते परंतु कळसुत्री बाहुल्यांची आद्य जन्मभूमी भारत असून भारतीय नाट्याचे मूळ कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात आहे, असे प्रतिपादन डॉ. पिशेल यांनी केले आहे. कळसूत्री बाहुल्यांतील सूत्रधार जे कार्य करतो, तेच कार्य भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सूत्रधार करतो. यावरून कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातील सूत्रधारच नाट्यसृष्टीमध्ये अवतीर्ण झाला, असे अनुमान वेदार्थयत्‍नकर्ते  कै. शं. पां. पंडित यांनी केले आहे. भारतामध्ये या कलेचा प्रसार अतिशय प्राचीन काळापासून  होता, हे पंचतंत्रांतील ‘काष्ठचित्रक्रीडन’ व अवदानकल्पलतेतील ‘यंत्रपुत्रकलीला’ या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांना उद्देशून वापरलेल्या शब्दांवरून दिसते. महाभारतामध्ये चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणून कळसूत्री बाहुल्यांचा उल्लेख आलेला आहे. तसेच अन्य संस्कृत वाङ्‌मयातूनही ‘पुत्रिका’, ‘दुहित्रिका’, ‘पुत्तली’, ‘पुत्तलिका’ व ‘काष्ठपांचालिका’ इ. संज्ञांचा वापर कळसूत्री बाहुल्यांना उद्देशूनच केलेला आहे. त्या काळी बाहुल्या बनविण्याच्या कामी लाकूड, लोकर, रेड्याचे कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करण्यात येई. भारतामध्ये आजही उत्तर,  प्रदेश, माळवा, राजस्थान, महाराष्ट्र व केरळ इ. भागांतून कळसूत्री बाहुल्यांची परंपरा  टिकून असलेली दिसून येते. या बाहुल्या तयार करण्याच्या व त्यांच्या खेळांच्या दोन पद्धती आहेत. एक राजस्थानी व दुसरी दाक्षिणात्य. उत्तर प्रदेश किंवा राजस्थानी पद्धतीच्या बाहुलीला ‘कठपुतली’ असे नाव आहे. ती प्रामुख्याने लाकडाची बनविलेली असून त्याच्या जोडीला कापड व कातडे यांचाही  वापर करतात. ‘कठपुतली’ आकाराने उंच, मोठी आणि भरघोस असते. तिचा चेहरा गोल, डोळे  मासळीच्या आकाराचे, भुवया रेखीव व ओठ आकर्षक असतात. तिचा आकार कथानकातील  पात्रानुसार लहानमोठा असू शकतो. वेशभूषा व केशभूषा प्रादेशिक ढंगाची असते. या खेळासाठी  निवडलेले कथानक ऐतिहासिक प्रसंगावर किंवा शूर पुरुषाच्या चरित्रावर आधारलेले असते. याउलट दाक्षिणात्य पद्धतीची बाहुली आकाराने मोठी असून तिच्या केशवेशभूषेवर दाक्षिणात्य रीतीची छाप पडलेली असते. कथानक पौराणिक प्रसंगांवर आधारलेले असून या बाहुल्यांचे संचालन पडद्याआडून केले जाते. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्ष बाहुल्या न दिसता त्यांच्या छायाच तेवढ्या दिसतात. मलबारमध्ये या ⇨ छायानाट्याला  ‘पवाकुत्तू’ व ते दाखविणाऱ्याला ‘कुत्तूकर’ असे म्हणतात. अठराव्या शतकापर्यंत या कलेला राजदरबारीही मानाचे स्थान होते. त्याकाळी इतिहासातील घटना, पुराणातील गोष्टी, लोककथा इ. कळसूत्री बाहुल्यांच्या साह्याने दाखविण्यात येत असत. उत्तर प्रदेेश,महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल, आंध्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत हा व्यवसाय वंशपरंपरा करणारी कुटुंबे आहेत. आंध्र प्रदेशातील ‘बोमळाटपल्ली’ या गावाच्या नावावरून हे बाहुलीवाल्यांचे गाव होते, असे दिसते.

ही कला ब्रह्मदेश, चीन, जपान, जावा, बाली तसेच तुर्कस्तान, ग्रीस, ईजिप्त, इटली इ. देशांतही प्रचलित होती. प्राचीन काळी सर्वच देशांतून कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात पौराणिक व धार्मिक कथा-प्रसंगच दाखविण्यात येत असत. यूरोपमध्ये तर मध्ययुगीन काळात धार्मिक दृश्यांमधील खेळांत मेरीची भूमिका करणारी एक कळसूत्री बाहुली असे,त्यावरून त्या कळसूत्री बाहुली-नाट्याला फ्रेंचमध्ये ‘मेरिओनेत’ असे म्हणत असत.

आ. ८ आ. ९ आ.११ आ.१०
आ.१२ आ. १३

१. थायलंडमधील काठी-बाहुलीचा नमुना. २. आंध्रातील ‘पवाकुत्तू ’: रामायणातील कांचनमृगाचा देखावा. ३. ईजिप्तमधील छाया-बाहुली. ४. चीनमधील कळसूत्री बाहुल्यांचा एक नमुना. ५. अमेरिकन ‘पंच व ज्युडी’ (१८५०). ६) जावामधील कळसूत्री बाहुलीचा एक नमुना. ७. राजस्थानी ‘कठपुतली’ चा रंगमंचावरील खेळ.

त्याचा अर्थ ‘छोटी मेरी’ असा होतो. इंग्‍लंडमध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ मध्ययुगात अतिशयच  लोकप्रिय झाला होता. त्याला इटलीमध्ये ‘पंचिनेलो’ व फ्रान्समध्ये ‘पोलिचिनेल्ल’ अशा संज्ञा मिळाल्या होत्या. १६६० मध्ये त्याचा प्रसार इंग्‍लंडमध्ये होऊन त्या नावाचा ‘पंच’ असा संक्षेप करण्यात आला. तेथे हा खेळ इतका लोकप्रिय झाला, की १८२८ मध्ये रंगमंचावर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पंच-ज्युडी’ या बाहुली-नाट्याचे पहिले पुस्तकही प्रकाशित झाले. ‘पंच’ या नावावरूनच इंग्रजीतील जगप्रसिद्ध व्यंगचित्रपत्राला पंच हे नाव देण्यात आले. इंग्‍लंडप्रमाणेच जर्मनीमध्येही या खेळाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. सुप्रसिद्ध जर्मन कवी गटे याने आपल्या बाराव्या वाढदिवशी बाहुली-नाट्यासाठी एक नाटक लिहून तयार केले होते, तर लूइस कॅरॉल, हॅन्स क्रिश्चन अँडरसन व टेड लिंकन यांनीही स्वतंत्रपणे कळसूत्री बाहुल्यांचे खेळ तयार केले होते.

कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांचे या शतकात पुनरुज्‍जीवन झाले. १९२१ मध्ये द टोनी सर्ग मेरिओनेर बुक या एफ्‌. जे. मॅक्‌आयझाकच्या पुस्तकाने या संदर्भात उपयुक्त कार्य केले. कळसूत्री बाहुल्यांवरील हे पहिलेच पुस्तक होते. पुढे १९३० मध्ये पॉल मॅक्‌फर्लिनने एक सांवत्सरिक सुरू केले व त्याच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत त्यात जगातील कळसूत्री बाहुल्यांसंबंधी महत्त्वाची माहिती संकलित करून ठेवली. १९३० मध्येच प्राग येथे कळसूत्री बाहुल्यांची एक जागतिक स्वरूपाची संस्था स्थापन करण्यात आली. तिच्या वतीने जागतिक अधिवेशनेही भरविण्यात आली. तसेच या खेळासंबंधीची  स्वतंत्र अशी नियतकालिके सुरू करण्यात आली. उदा., द मेरिओनेट (१९१८). बूकारेस्ट येथील मे  १९५८ मध्ये भरलेल्या कळसूत्री बाहुल्यांच्या जागतिक उत्सवात २७ देशांचे ३०० सभासद उपस्थित  असून, ३० हौशी मंडळ्यांनी प्रत्यक्ष खेळ करून दाखविले होते.

संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Ed. Marg – Vol. XXI, No. 3, Bombay, June, 1968.

2. Binyon, Helen, Pupperty Today, London, 1966.

3. Bramall, Eric Somerville, C. C. Expert Puppet Technique, London, 1963.

4. McPharlin, P. Puppet Theatre in America, New York, 1949.

5. Stockwell, alan, Puppetry, London, 1966.

६. देशपांडे, ल.ग., कळसूत्री बाहुल्या, पुणे, १९६२.

७. जोशी, वि.कृ., लोकनाट्याची परंपरा, पुणे,१९६१.

देशपांडे, ल. ग. जोशी, चंद्रहास


राजस्थानी कठपुतलीचा खेल.