कार्नालाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी परंतु विरळच आढळतात. सामान्यपणे संपुंजित किंवा कणमय राशी आढळतात. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता २·५ वि.गु. १·६ पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक चरबीसारखी. खनिजात बहुधा हेमॅटाइट असते त्यामुळे रंग लालसर असतो. प्रस्फुरण पावणारे [वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील म्हणजे जंबुपार किरणांत व तांबड्या रंगाच्या अलीकडील म्हणजे अवरक्त किरणांत तसेच या किरणांत ठेवून बाहेर काढल्यानंतर काही काळ चकाकणारे, →स्फटिकविज्ञान]. प्रस्वेद्य (सहज चिघळणारे). चव कडू. रा.सं. KMgCl3.6H₂O. बंद नळीत तापविले असता बरेच पाणी बाहेर पडते. काही लवण निक्षेपांत (साठ्यांत) हॅलाइट, सिल्व्हाइट, कीसेराइट, डग्लसाइट इत्यादींच्या जोडीने आढळते. श्टासफुर्ट (जर्मनी) येथील लवण निक्षेपात याचे मोठे साठे आहेत. अमेरिकेतील प.टेक्सस आणि पू.न्यू. मेक्सिकोमध्ये थोडे सापडते. मॅग्नेशियम व खतांसाठी लागणारी पोटॅशियमाची संयुगे मिळविण्यासाठी कार्नालाइटाचा उपयोग होतो. रूडोल्फ फोन कार्नाल या प्रशियन खाणकाम अभियंत्यांच्या नावावरुन कार्नालाइट नाव पडले आहे.
ठाकूर, अ.ना.