काराकास : व्हेनेझुएलाची राजधानी व महत्त्वाचे शहर. लोकसंख्या बृहत् काराकास सु.२१,७५,४३८ (१९७० अंदाज). १५६७ साली स्थापन झालेल्या या शहरास स्थानिक इंडियन जमातीवरून हे नाव मिळाले. स्पेनविरुद्धच्या युध्दात १५९५ आणि १७६६ मध्ये अनुक्रमे ब्रिटिश व फ्रेंचांनी या स्पॅनिश वसाहतीतील शहराची लूट केली होती. स्पेनपासून दक्षिण अमेरिकेची सुटका करणारा सायमन बोलिव्हार आणि स्वातंत्र्ययुध्दातील वीर फ्रॅन्सिस्को मीरांडा यांचे हे जन्मस्थळ. स्वातंत्र्ययुध्दाची पहिली घोषणा येथेच झाली (एप्रिल १८१०) आणि दक्षिण अमेरिकेतील स्पेनच्या गुलामीतून सुटलेले हे पहिले शहर आहे (जून १८२१). स्वातंत्र्ययुध्दातील यादवीत तसेच १८११ व १९०० सालच्या भूकंपांत या शहराची बरीच नासधूस व प्राणहानी झाली.
कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावरील ला ग्वायरा बंदारापासून सु.१२ किमी. आत, ९४० मी. उंचीवरील एका दरीत हे वसले असून येथील हवा आल्हाददायी व निरोगी आहे म्हणूनच हे व्हेनेझुएलाचे आर्थिक व राजकीय केंद्र झाले. आसमंतात ऊस, कॉफी, मका इ. समृद्ध शेतमाल आणि गुरे असल्याने, त्याचप्रमाणे तेलाचे प्रचंड साठे सापडल्याने या शहराची मोठी भरभराट झाली. गलिच्छ वस्त्यांचा नाश, आकर्षक नगररचना, विविध समाजकल्याण व शिक्षणसंस्था, वेधशाळा, पाणीयोजना, आरोग्यधामे, दळणवळणाच्या आधुनिक सोयी, उत्कृष्ट वास्तुशिल्पाचा नमुना असलेले विद्यापीठ, प्रचंड उलाढाल असलेली बाजारपेठ, जुन्या आकर्षक वास्तू तसेच बोलिव्हार सेंटर व इतर अत्याधुनिक इमारती, कलासंग्रहालय, रेसकोर्स, बैलांच्या झुंजीचा आखाडा इत्यादींकरिता काराकास प्रसिद्ध आहे. शहरात तेलशुध्दी व साखरशुध्दी कारखाने असून सुती व रेशमी कापड, कपडे, पादत्राणे, कागद, सिगारेट, काच, साबण, आगकाड्या, सुगंधी द्रव्ये, रसायने, अन्न व दुग्ध पदार्थ, मांससंवेष्टन, मद्य, लाकूडकाम, धातुकाम वगैरे उद्योग आहेत.
शहाणे, मो.ज्ञा.