कार, विश्वनाथ : (२४ डिसेंबर १८६४—१९ ऑक्टोंबर १९३४). ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. जन्म कटक जिल्ह्यातील विश्वनाथपूर येथे व शिक्षण कटकच्या एका इंग्रजी शाळेत झाले. काही काळ तो शिक्षक होता. ब्राह्मण असून तो पुरोगामी अशा ब्राह्मो समाजाचा अनुयायी बनला. त्याने आपले सर्व आयुष्य ज्ञानसाधनेत आणि साहित्यसेवेत वेचले. १८९६ मध्ये त्याने एक मुद्रणालय स्थापन करुन उत्कल साहित्य नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. त्याचा तो शेवटपर्यंत संपादक व प्रकाशक होता. ओडिया साहित्यिकांच्या तीन पिढ्यांचा तो प्रकाशक, समीक्षक, मित्र व मार्गदर्शक होता. त्याची गद्यशैली अत्यंत तर्कशुद्ध, सुबोध व स्वतंत्र होती. त्याच्या निवडक लेखांचा विविध प्रबंध हा संग्रह होय. एक कुशल संपादक व प्रभावी समीक्षक म्हणून ओडिया साहित्यात त्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
दास,कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द.स.(म.)