कारखाना पद्धति : अनेक कामगार ज्या एका जागी एकत्र येऊन मालकाच्या देखरेखीखाली लहान-मोठ्या प्रमाणावर मालाचे उत्पादन, प्रक्रिया इ. करतात, त्या जागेस कारखाना म्हणता येईल. देशातील एकूण उत्पादन बव्हंशी कारखान्यांतून निर्माण होते, तेव्हा कारखाना पद्धती त्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य होऊन बसते. उत्पादनाचे यांत्रिकीकरण, अतिसूक्ष्म श्रमविभागणी आणि विशेषीकरण, विविध उद्योगांचे केंद्रीकरण, औद्योगिक नगरांचा उदय आणि उत्पादन साधनांचे मालक म्हणजे भांडवलदार व त्यांनी रोजगारीवर नेमलेले कामगार असा वर्गभेद, ही कारखाना पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये होत.
कारखाना पद्धत औद्योगिक क्रांतीचा परिपाक आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वी गृहोत्पादन पद्धत प्रचलित होती. तीत मानवी कौशल्यावर अधिक भर असून उत्पादनासाठी लागणारी हत्यारे व अवजारे साधी व सुटसुटीत असत त्यांची मालकी कारागिराकडे असे. घर हेच उत्पादनाचे केंद्र असून उत्पादनाला आवश्यक असलेले श्रम कारागीर व त्याचे कुटुंबीय करीत. ग्राहकाच्या मागणीनुसार उत्पादन केले जाई व साहजिकच ते लहान प्रमाणात असे. हळूहळू कारागिरांना कच्चा माल पुरविणारे व पक्का माल त्यांच्याकडून घेऊन जाणारे ठेकेदार उदयाला आले. तरीही उत्पादनाचे केंद्र कारागिराचे घर हेच राहिले.
औद्योगिक क्रांतीबरोबरच यंत्राचा व वाफेसारख्या प्रेरक शक्तीचा शोध लागला. उत्पादनकेंद्र कारागिराच्या घराकडून कारखान्याकडे, उत्पादन साधनांची मालकी कारागिराकडून कारखानदाराकडे आणि अवजारांची प्रेरणाशक्ती कारागिराच्या स्नायूकडून वाफेकडे, हे बदल म्हणजे कारखाना पद्धतीच्या विकासाचे प्रमुख टप्पे होत. परिणामी उत्पादनपद्धतीत आमूलाग्र बदल होऊन उत्पादनक्षमता वाढली. उत्पादनक्षेत्रात भांडवलगुंतवणुकीस महत्त्व प्राप्त झाले. मालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर होऊ लागल्याने हजारो वस्तू स्वस्त झाल्या आणि सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या.
कारखाना पद्धतीचा प्रसार जगाच्या सर्व भागांत एकाच वेळी झाला, असे नाही. या प्रक्रियेचा प्रारंभ अठराव्या शतकात झाला असला, तरी विसाव्या शतकातसुध्दा ती संक्रमणावस्थेत असल्याचे दिसते. सुरुवातीस तिची वाटचाल संथ होती. इंग्लंडमध्ये नव्या यंत्राचा पहिला शोध कितीतरी वर्षे आधी लागला असला, तरी त्या देशात कारखाना पद्धतीने खऱ्या अर्थाने १८७० मध्ये मूळ धरले. फ्रान्समध्ये कारखानदारी पहिल्या महायुध्दाच्या काळापर्यंत रुळल्याचे दिसत नाही. जर्मनीतील उद्योगधंदे १८०० च्या सुमारास प्राथमिक स्वरूपाचे होते. तरी पन्नास वर्षांच्या काळात कारखाना पद्धतीचा झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकेत यादवी युध्दानंतर उद्योगधंदे कारखाना पद्धतीच्या आधाराने भरभराटीस येऊ लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या पद्धतीचा आशिया खंडातही चंचुप्रवेश झाला.
कारखानदारीमुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण होऊन तीपासून अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. सामाजिक आरोग्याला धोकादायक अशा गलिच्छ वस्त्या उभ्या राहिल्या. या वस्त्या समाजविघातक गुन्हेगारीच्या आगर बनल्या. कारागिराचे वैयक्तिक कौशल्य संपुष्टात आले. वाढलेले कामाचे तास, अपुरे वेतन, कारखान्यांतील गैरसोयी आणि उत्पादनयंत्रणेत मिळणारे दुय्यम स्थान, यांमुळे कामगारांची पिळवणूक होऊ लागली आणि आर्थिक विषमतेची समस्या निर्माण झाली. कामगार संघटनांच्या उदयामुळे व शासनाने केलेल्या कायद्यांमुळे या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे दिसते.
कारखाना पद्धतीमुळे स्त्रियांना रोजगारी मिळू लागली व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले. कामगार चळवळीत पुरुषांबरोबर स्त्रिया हिरिरीने कार्य करू लागल्या. परंतु पिता आणि माता असे दोघेही कारखान्यात कामावर गेल्याने मुलांकडे दुर्लक्ष होते आणि परिणामी कुटुंबपद्धतीचा जणू पायाच उखडून निघाला आहे, असाही एक विचारप्रवाह आढळतो.
पहा : कामगार कायदे गृहनिवसन भांडवलशाही.
रायरीकर, बा.रं.