कारंदा : (कडू कारिंदा, मानकंद हिं. रातालू, पितालू गु. गोराडू क.हेग्गेनसू इं.पोटॅटो यॅम, एअर पोटॅटो लॅ. डायॉस्कोरिया बुल्बिफेरा, प्रकार–सॅटायव्हा कुल–डायॉस्कोरिएसी). या मोठ्या वेलीचे खोड उजवीकडून डावीकडे वेढे देत वर चढते [→महालता].

कारंदा : (१) पाने व फळे, (२) कंदिका

तिचा प्रसार भारतात सर्वत्र असून ग्रंथिल मुळांसाठी व कंदिकांसाठी (कंदांसाठी) तिची लागवड करतात. ही वेल मूळची उष्णकटिबंधातील असून तिचा प्रसार आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून पॅसिफिक महासागरातील दूरच्या बेटांतील वर्षावनांत आढळून येतो. हिमालयात ही वेल १,८६० मी. उंचीपर्यंत आढळते.

पाने साधी, एकाआड एक, रुंदट, अंडाकृती–हृदयाकृती फुले एकलिंगी फळे (बोंडे) चौधारी व बिया फक्त अंशतः सपक्ष. बगलेतील कंदिका विपुल व विविध असून लहानांवर बारीक फोड असतात जून कंदिका गुळगुळीत काही कंदिकांचा स्वाद बटाट्यासारखा असून त्यांची भाजी करतात. ग्रंथिल मुळे एकेकटी व विविध आकार प्रकारची असतात. जंगली अवस्थेतील प्रकारांची मुळे कठीण, कडू व तिखट असून राखेने घासून व थंड पाण्याने धुवून वापरतात. मुळे वाळवून व पीठ करून मूळव्याध, आमांश, उपदंश, जखमा इत्यादींवर वापरतात. जपानमध्ये मुळांपासून स्टार्च काढतात काश्मीरमध्ये मुळे लोकर धुवावयास व त्याचे तुकडे माशांच्या गळाला लावण्यासाठी वापरतात.  

पहा : गोराडू डायॉस्कोरिएसी.

   

जमदाडे, ज.वि.