कारंजा : अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव. लोकसंख्या ३१,१५० (१९७१). हे मोगलकालीन सधन व्यापारी ठिकाण असून मुर्तिजापूर–यवतमाळ अरुंदमापी रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. येथे सरकी काढून कापसाचे गठ्ठे बांधण्याचा प्रमुख उद्योगधंदा असून रविवारी गुरांचा बाजार भरतो. हे नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असून त्यांचे मंदिर व ऋषितलाव प्रेक्षणीय आहेत. कारंजा हे जैनांचे तीर्थही मानले जाते. येथील जैन मंदिरे व जैन ग्रंथांची समृद्ध भांडारे प्रसिद्ध आहेत.
कुलकर्णी, गो.श्री.