कथाकाव्य : मुख्यतः कथाकथनाच्या उद्देशाने लिहिण्यात येणारे काव्य. सामान्यतः काव्याचे ⇨भावगीत किंवा भावकविता, ⇨नाट्यगीत किंवा नाट्यकाव्य व कथाकाव्य असे प्रकार केले जातात. या तीनही काव्यप्रकारांचे प्रयोजन, प्रकृती व परिणाम ही सामान्यतः भिन्नभिन्न असतात. प्रतिभाशक्ती किंवा कवीची नवनिर्माणक्षमता या तीनही काव्यप्रकारांच्या मुळाशी असतेच तथापि भावकवितेत कवीच्या भावनात्मक अनुभूती प्राधान्याने प्रकट होतात, नाट्यकाव्यात कवीला अभिप्रेत असलेल्या व्यक्तींचे अनुभव व्यक्त केले जातात आणि कथाकाव्यात एखाद्या पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथेचे काव्यात्मक निरूपण करण्यात येते.
आर्ष व विदग्ध महाकाव्ये, इंग्रजीतील ⇨ बॅलड, मराठीतील आख्यानकाव्य, ⇨ पोवाडा व खंडकाव्य हे कथाकाव्याचेच वेगवेगळे प्रकार आहेत. कथेचे स्वरूप आणि व्याप्ती यांच्या आधारावर हे प्रकार रूढ झालेले दिसतात. अर्थात कथाकवीचा हेतूही असे प्रकार विचारात घेताना लक्षात यावा लागतो. महाकवीची भूमिका अतिशय व्यापक असते, तर आख्यानकवी किंवा पोवाडे रचणारा शाहीर किंवा खंडकाव्य लिहिणारा कवी यांच्या कथाकाव्यविषयक भूमिका त्या मानाने मर्यादित असतात. मुख्य कथा आणि उपकथा, मुख्य पात्रे आणि उपपात्रे आणि यांच्या अनुषंगाने येणारी पात्रप्रसंगांची वर्णने व त्यांवरील वैचारिक भाष्ये इत्यादींना महाकाव्यासारख्या काव्यप्रकारात खूपच वाव असतो. याउलट संस्कृतमधील विदग्ध महाकाव्ये आणि मराठीतील आख्यानकाव्ये व खंडकाव्ये यांतील वरील घटक अल्पविस्तर असतात.
कथाकाव्यातील मुख्य घटक म्हणजे त्यातील कथा होय. कथांचे विषय पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक किंवा सामाजिक असू शकतात. हे कथाविषय कथाकवी स्वतःच्या स्वतंत्र अभिज्ञतेनुसार रूपास आणत असतो. एखाद्या समाजाचा समग्र वांशिक इतिहास किंवा एखाद्या धार्मिक दृष्टिकोनाची अभिव्यक्ती किंवा एखाद्या सामाजिक समस्येचे उद्बोधन किंवा परिचित कथेचा नवा अर्थ आणि अर्थवत्ता इ. व्यक्त करण्यासाठी कथाकवी आपल्या कथांना योग्य तो कथात्मक घाट देत असतो. म्हणजे कथाकाव्यातील कथेचा घाट कवीच्या कथाविषयक अभिज्ञतेने तसेच त्याच्या प्रतिभागुणांनी निश्चित केलेला असतो आणि या घाटाच्या अनुरोधाने कथाकाव्यातील पात्रे, त्यांच्या कृती आणि उक्ती, भावनाप्रधान किंवा विचारप्रधान स्थळे, काल्पनिक वर्णने, त्याचप्रमाणे कथेतील मध्यवर्ती नाट्य किंवा संघर्ष आणि तिचे आदी, मध्य, अंत वगैरे घटक निश्चित होत असतात. कथाकाव्यासाठी कवी जे छंद किंवा वृत्ते योजीत असतो, तेही त्या त्या आशयाशी अनुरूप ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
कथाकाव्य हा एक प्रकारे संकीर्ण काव्यप्रकार ठरतो. कथेच्या मुख्य सूत्राने काव्याची अनेक अंगे गुंफलेली असतात. भावकवितेप्रमाणे त्यात कवीचा आणि कथेतील पात्रांचा उत्कट भावनाविष्कार अधूनमधून आढळतो. उत्कृष्ट कथालेखकाचे किंवा कादंबरीकाराचे कथाकथनाचे कौशल्य, त्यातील चित्तवेधकता व नाट्यपूर्णता हेही विशेष त्यात संभवतात. नाट्यकाव्यातील विविध पात्रांची मनोगतेही त्यातून परिणामकारकपणे व्यक्त होतात. केवळ वर्णनसौंदर्य, केवळ कल्पनासौंदर्य किंवा अलंकारसौंदर्य, केवळ सुंदर शब्दकळा, केवळ निसर्गवर्णन यांसारख्या घटकांनाही त्यात वाव असतो आणि हे विशेष पद्याच्या माध्यमातून प्रकट होत असल्याने त्यांना एक प्रकारचे काव्यानुकूल सौंदर्य प्राप्त होते.
आधुनिक काळात कथाकाव्याचा प्रसार कविप्रियही नाही आणि रसिकप्रियही नाही, असे आढळून येते. भावकविता हीच काव्याचे खरेखुरे स्वरूप आहे, असे मानले जाते. तरीही आधुनिक काळातही अधूनमधून कथाकाव्यांची निर्मिती होत राहिली आहे.
पहा : आख्यानकाव्य, मराठी खंडकाव्य, मराठी महाकाव्य.
जाधव, रा. ग.