कडप्पा (कडाप्पा) संघ : भारतातल्या खडकांच्या एका गटाला कडप्पा संघ व त्या संघाचे खडक तयार झाले त्या कालावधीला कडप्पा कल्प असे म्हणतात. वालुकाश्म, शेल, पत्रित माती व स्लेटी (पाटीचे खडक) हे कडप्पा संघाचे मुख्य खडक होत. शेलांबरोबर कधीकधी चुनखडकही आढळतात. कडप्पा कल्पाच्या पूर्वार्धात भारताच्या द्वीपकल्पात प्रचंड ज्वालामुखी क्रिया घडली व बेसाल्टी लाव्हे बाहेर लोटले गेले.
धारवाड कल्पाच्या अखेरीस घडून आलेल्या पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींमुळे त्या कल्पात समुद्राच्या तळाशी साचलेल्या गाळांचे व लाव्ह्यांचे थर दाबले जाऊन व त्यांना घड्या पडून ते पाण्याबाहेर उचलले गेले व द्वीपकल्पात अनेक पर्वतरांगा निर्माण झाल्या. खडक उचलले जात असताना त्यांच्यात शीलारसाची, मुख्यतः ग्रॅनाइटी शिलारसाची, अंतर्वेशनेही (घुसण्याच्या प्रक्रियाही) झाली. नंतर दीर्घ काल जमिनीची झीज होत राहून पर्वतमय द्वीपकल्पाचे जवळजवळ सपाट मैदानी प्रदेशात रूपांतर झाल्यावर द्वीपकल्प हळूहळू व मधूनमधून खचत राहून त्याचा बराचसा भाग समुद्रात बुडाला. त्या बुडालेल्या भागात (द्रोणीत) गाळ व लाव्हे साचून कडप्पा संघाचे खडक तयार झाले. नंतर पुन्हा कवचाची हालचाल होऊन समुद्राच्या तळाशी साचलेले थर उचलले जाऊन द्वीपकल्पाचे पुन्हा जमिनीत रूपांतर झाले. अरवली प्रदेशाचा अपवाद वगळला, तर या वेळच्या हालचालींमुळे पडणारा दाब द्वीपकल्पाच्या बहुतेक सर्व भागांत दुर्बल होता व उचलल्या गेलेल्या खडकांत म्हणण्यासारखे विक्षोभ (वेडेवाकडे होणे, घड्या पडणे, तुटणे, फुटणे इ.) न होता ते जवळजवळ मूळच्या सारखे राहिले. अरवलीच्या क्षेत्रातील कडप्पा खडकांवर मात्र (त्या खडकांना दिल्ली संघ असे नाव देतात) तीव्र संपीडक (संकोच घडवून आणणारा) दाब पडला व ते बरेच विक्षोभित झाले. दिल्ली संघाचे खडक वगळले तर इतर बहुतेक सर्व क्षेत्रांतले कडप्पा खडकांचे थर सपाट आडवे किंवा किंचित कललेले आढळतात व त्यांचे घटक जवळजवळ मूळच्या स्वरूपात असलेले आढळतात. काही क्षेत्रांतील शेलांचे पाटीच्या खडकांत रूपांतरण झालेले आहे, पण त्यापेक्षा अधिक तीव्र असे रूपांतरण झालेले खडक आढळत नाहीत.
कडप्पा खडकांचे घटक जवळजवळ मूळच्या स्वरूपात टिकून राहिले असले तरी त्यांच्यात कोणतेही जीवाश्म (प्राणी व वनस्पती यांचे शिळारूप अवशेष) आढळत नाहीत. कडप्पा खडकांचे गाळ साचत होते त्या काळी कवचे किंवा इतर टिकाऊ भाग ज्यांच्या शरीरात आहेत असे जीव अस्तित्वात नसावेत असे दिसते. तसे जीव असते तर त्यांचे जीवाश्म कडप्पा खडकांत आढळले असते.
भौगोलिक वाटणी : कडप्पा काळी भारताच्या निरनिराळ्या भागांतील द्रोण्यांत (खोलगट भागांत) साचलेले थर समुद्राच्या बाहेर आणले गेल्यानंतर अतिशय दीर्घ काळ लोटलेला आहे. प्रारंभीच्या राशींचे बरेचसे भाग क्षरणाने (झिजून) नाहीसे झाले आहेत व कित्येत राशी सर्वस्वी नाहीशा झाल्या असण्याचा संभव आहे. आता आढळणारे कडप्पा खडक मूळच्या राशींचे केवळ अवशेष आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे आंध्रातील कडप्पा व कर्नूल जिल्ह्यांत व त्यांच्या लगतच्या भागात,ओरिसातील जयपूर व बस्तर व मध्य प्रदेशातील छत्तीसगढ यांच्या क्षेत्रांत आणि अरवलीच्या क्षेत्रात आढळणारे खडक, हे होत. भारताच्या बहिर्द्वीपकल्प (द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील) भागातही कडप्पा खडक असावेत. हिमालयात आढळणाऱ्या अटक स्लेटी, डोग्रा स्लेटी, सिमला स्लेटी इ. नावांच्या खडकांच्या गटांच्या तळाकडचे भाग व इतर काही गटांचे खडक कडप्पा कालीन असण्याचा संभव आहे. पण त्यांची वये निश्चित ठरविता आलेली नाहीत.
कडप्पाची द्रोणी : कडप्पा संघाचे नमुनेदार उदाहरण आंध्रातील कडप्पा व त्याच्या शेजारच्या क्षेत्रात आढळते व तेथल्या खडकांवरूनच कडप्पा संघ हे नाव दिले गेले. या संघाचे अध्ययन प्रथम डब्ल्यू. किंग यांनी केले. द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ व आंध्रामधील कडप्पा व कर्नूल या व त्यांच्या लगतच्या जिल्ह्यांत हे खडक आहेत व त्यांच्या दृश्यांशाचा (पृष्ठावर उघड्या पडलेल्या या खडकांचा) आकार चंद्रकोरीसारखा असून त्या चंद्रकोरीची अंतर्गोल कडा व तिची टोके पूर्वेकडे आहेत. चंद्रकोरीच्या पूर्वेकडील कडेचा आकार शेजारच्या पूर्व किनाऱ्याच्या आकारासारखा व त्याला जवळजवळ समांतर आहे. चंद्रकोरीच्या टोकांमधील अंतर सु. ३३६ किमी. व चंद्रकोरीचे क्षेत्र सु. ३४,५६० चौ. किमी. आहे. चंद्रकोरीचा पुष्कळसा भाग कडप्पा खडकांनी व्यापिलेला असून तिच्या वायव्य व उत्तर भागांत विंध्य संघाचे खडक आहेत. येथल्या खडकांचा अनुक्रम व वर्गीकरण खाली दिलेली आहेत :
कडप्पा संघाचा तळ आर्कीयन कालीन पट्टिताश्मांवर (नाइसांवर) व सुभाजांवर (शिस्टांवर) अत्यंत विसंगत रीतीने वसलेला आहे व त्या संघाच्या माथ्यावर पूर्व-विंध्य कालीन कर्नूल मालेचे खडक विसंगत रीतीने वसलेले आहेत.
(१) पापाग्नी माला : पेन्नारला मिळणाऱ्या पापाग्नी नदीवरून दिलेले नाव. हिचे खडक द्रोणीच्या फक्त पश्चिम भागात आढळतात. (२) चेय्येरू माला : चेय्येरू नदीवरून दिलेले नाव. हिचे खडक मुख्यत: वायव्येकडील पेन्नार नदीच्या खोऱ्यात आहेत. (३) नल्लमलाई माला : येथल्या एकूण मालांपैकी सर्वांत अधिक क्षेत्र व्यापणारी अशी ही आहे. नल्लमलाई टेकड्यांवरून हिचे नाव दिलेले आहे. (४) कृष्णा माला : द्रोणीच्या उत्तर भागातून कृष्णा नदी जाते. तेथल्या तिच्या लगतच्या भागात या मालेचे खडक आढळल्यावरून हे नाव दिले गेले.
कडप्पाच्या द्रोणीच्या पश्चिम अर्धातल्या खडकांचे थर जवळजवळ आडवे असून पूर्व अर्धातल्या काही थरांस घड्या पडलेल्या आहेत. अगदी पूर्वेकडील येल्लाकोंडा टेकड्यांतील थर मात्र बरेच विक्षोभित झालेले आहेत.
ज्वालामुखी क्रिया : कडप्पा पूर्वार्धात चेय्येरू मालेच्या काली द्वीपकल्पात प्रचंड ज्वालामुखी क्रिया घडून आली. त्या क्रियेत बाहेर लोटल्या गेलेल्या लाव्ह्यांचे (सामान्यत: बेसाल्टी लाव्ह्यांचे) थर व डोलेराइटांचे शिलापट्ट (सिले) व काही अग्निदलिक (ज्वालामुखीने उत्पन्न झालेले) पदार्थांचे थर चेय्येरू मालेच्या थरांत आढळतात. त्या ज्वालामुखी क्रियेने उत्पन्न झालेले शिलापट्ट व भित्ती चेय्येरू मालेच्या किंवा तिच्या खालच्या खडकांत आढळतात. तशाच ज्वालामुखी खडकांचे थर, शिलापट्ट व भित्ती बिजावर व ग्वाल्हेर मालांतील खडकांत व प्राणहिता नदीच्या खोऱ्यातील पेणगंगा नावाच्या थराच्या गटात आढळतात. कडप्पा द्रोणीतले काही शिलापट्ट वेम्पल्ली मालेच्या चुनखडकांत शिरलेले आहेत व त्यांच्या संस्पर्शामुळे (लगत असल्यामुळे) लगतच्या भागांचे रूपांतरण होऊन त्यांच्यात क्रिसोटाइल ॲस्बेस्टस तयार झालेले आहे. त्याचे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त असे साठे कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंडलाच्या शेजारी आढळतात.
वज्रकरूर येथील ज्वालामुखी नळ : कडप्पाच्या मुख्य द्रोणीच्या पश्चिम कडेच्या पश्चिमेस सु. ४० किमी. व गुंटकलच्या दक्षिणेस सु. १६ किमी. अंतरावर असलेल्या वज्रकरूर नावाच्या खेड्याजवळ एका जुन्या ज्वालामुखीचा नळ आहे. तो चेय्येरू कालीन असावा. त्याच्या भोवतालाच्या प्रदेशातील गाळात हिरे सापडलेले आहेत, पण त्या नळाच्या खडकात हिरे मिळालेले नाहीत.
कडप्पा खडकांचे सहसंबंध : वर वर्णन केलेल्या कडप्पा द्रोणीपासून दूर असलेल्या बिहार व ओरिसापर्यंतच्या भागांत, ग्वाल्हेरजवळ, अरवली प्रदेशात व कडप्पा द्रोणीच्या पश्चिमेस विजापूर, बेळगाव व रत्नागिरी जिल्ह्यांत कडप्पा कालीन खडक आढळतात. त्यांच्यात जीवाश्म नसल्यामुळे व ते एकमेकांपासून व कडप्पा द्रोणीपासून तुटक व दूर असल्यामुळे त्यांच्यातील सहसंबंध निश्चित ठरविता येणे शक्य झालेले नाही.
छत्तीसगढची द्रोणी : महानदीच्या खोऱ्याच्या वरच्या भागात व द्रुग, रायपूर, विलासपूर इ. जिल्ह्यांतले जवळजवळ कडप्पाच्या द्रोणीएवढे क्षेत्र कडप्पा कालीन खडकांनी, मुख्यत: वालुकाश्म, क्वॉर्टझाइट, शेल व चुनखडक यांनी व्यापिलेले आहे. ओरिसातील जयपूर, बस्तर इ. भागांत तसेच खडक आढळतात. ते खडक व छत्तीसगढातले खडक पूर्वी सलग असावेत व क्षरणाने वेगळे झाले असावेत.
कलादगी माला : विजापूर जिल्ह्यातील कलादगीपासून तो बेळगाव जिल्ह्यापर्यंतच्या पूर्व-पश्चिम पट्ट्यात या मालेच्या द्रोणीचा मुख्य भाग पसरला आहे. त्याच्या पलीकडच्या पश्चिम भागात कोल्हापुरातील आजऱ्याजवळ आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि कणकवली या तालुक्यांत या मालेचे खडक आढळतात. ही माला उत्तर कडप्पा कालातही आहे असे मानले जाते. वालुकाश्म, ⇨पिंडाश्म व शेल हे या मालेतीत मुख्य खडक होत. काही चुनखडकही तिच्यात आहेत. मालेच्या तळाचे पिंडाश्म गोकाकच्या धबधब्याच्या खालच्या दरीत पाहावयास मिळतात. मालेची एकूण जाडी सु.५,॰॰॰ मी. असून तिच्या खालचा विभाग सु. ४,५॰॰ मी. जाडीचा आणि वरचा विभाग सु. ४५॰ मी. जाडीचा आहे. वरच्या विभागाचे खडक कलादगी मालेच्या मुख्य द्रोणीच्या पूर्वेकडच्या अर्ध्या भागात मात्र आढळतात. या भागातल्या काही शेलांत विपुल हेमॅटाइट (एक प्रकारचे लोह खनिज) आहे.
बिजावर माला : पूर्वीच्या बुंदेलखंडातील बीजावर शहराजवळ आढळल्यावरून हे नाव दिले गेले. वालुकाश्म, क्वॉर्ट्झाइट, काही पिंडाश्म व सिलिकामय चुनखडक आणि समकालीन ज्वालामुखीचे विपुल अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असणारे) अग्निज खडक या मालेत आढळतात.
ग्वाल्हेर माला : ग्वाल्हेरजवळ आढळल्यावरून ग्वाल्हेर माला हे नाव दिले गेले. वालुकाश्म, कमीअधिक लोहमय शेल, अल्पसिकत लाव्हे ⇨टफ व शिलापट्टांचे व भित्तींचे डोलेराइट हे या मालेतले प्रमुख खडक होते. तप्त लाव्ह्यांचा संपर्क, ज्वालामुखींतून बाहेर पडणारे वायू व ज्याच्यात सिलिका विरघळलेली आहे असे पाणी यांचा शेलांवर परिणाम होऊन तयार झालेले पोर्सलीनाइट (चिनीमातीच्यासारखे खनिज), चर्ट व जॅस्पर इत्यादींचे पट्टे व शिरा येथल्या खडकांत आढळतात.
ग्वाल्हेर व बिजावर माला व चेय्येरु माला यांच्या खडकांत बरेच साम्य आहे म्हणून ग्वाल्हेर व बिजावर माला या कडप्पा कालीन असाव्या अशी कल्पना होती, पण त्या आर्कीयन कालीन आहेत असे अलीकडे दिसून आलेले आहे.
दिल्ली संघ : दिल्ली ते इंदूरपर्यंतच्या व अरवलीस अनुसरून असणाऱ्या पट्ट्यात कवचाच्या हालचालींनी विक्षोभित झालेले कडप्पा कालीन खडक आढळतात, त्यांना ⇨ दिल्ली संघ म्हणतात.
संघाचे वय : कडप्पा संघ हा धारवाड संघापेक्षा पुष्कळच नवा व विंध्य संघापेक्षा किंचित जुना आहे. कडप्पा संघाचे एकूण स्वरुप उत्तर अमेरिकेतील ⇨अल्गाकियन या कँब्रियन-पूर्व (६॰ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील संघासारखे आहे. भारताच्या शैलसमूहांच्या हॉलंड यांनी केलेल्या वर्गीकरणात कडप्पा व विंध्य मिळून होणाऱ्या गटास ⇨पुराण महाकल्प व गण असे नाव दिलेले आहे.
संदर्भ : Pascoe, E.H. A Manual of the Geology of India and Burma, Vol. I, Delhi, 1959.
केळकर, क. वा.
“