कापसी : (कुरळ हिं. संसागूरू इं. वाइल्ड ऱ्हीया लॅ. डेब्रेगेसिया व्हेल्यूटिना कुल-अर्टिकेसी). हा ४.५ – ७.५ मी. उंच व ०.६ मी. घेराचा सदापर्णी, सरळ वृक्ष कोकण, कारवारचे जंगल, कुमाऊँ ते सिक्कीम, आसाम, खासी टेकड्या, निलगिरी, जावा, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. ठिकाणी आढळतो. पाने सोपपर्ण (उपपर्णांसह), साधी, एकाआड एक, ५-१८ x २.५ सेंमी., भाल्यासारखी, तीन प्रमुख शिरांची, पातळ, वरून खरबरीत, खालून लवदार, अंतर्वृंती (देठामधील) उपपर्ण एकलिंगी फुले एकाच झाडावर (एकत्रलिंगी), कक्षास्थ (बगलेत), स्तबकावर किंवा गुच्छावर, क्वचित एकेकटी किंवा जोडीने [→ फूल] नोव्हेंबर-जानेवारीत येतात. फळे नारिंगी पिवळी, खाद्य व लहान असून डिसेंबर-फेब्रुवारीत वापरतात. अंतर्सालीपासून बळकट धागे काढून त्यांपासून धनुष्याच्या दोऱ्या, सुतळी, दोर व कोळ्यांची जाळी बनवितात.

पहा : अर्टिकेसी.

ज्ञानसागर, वि. रा.