कज्जे दलाल : वकिलास खटले मिळवून देऊन पैसे मिळविणारा. वकिलास मिळणाऱ्या पैशाचा विशिष्ट हिस्सा तो वकिलाकडून किंवा वकिलाशी संबंधित असलेल्या इसमाकडून वसूल करतो. वकील व्यवसायासंबंधीच्या कायद्यान्वये कज्जेदलाली गुन्हा असून त्यास शिक्षा ठेवण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे ज्या इसमांची कज्जेदलाल म्हणून ख्याती आहे, अशांची सूची न्यायालय तयार करते व न्यायालयात ती सूची लावण्यात येते. जिल्हा न्यायालय, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी व लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश यांना अशी सूची करण्याचा अधिकार आहे. सूची तयार करण्यापूर्वी कज्जेदलाली संबंधीचा पुरावा घेण्यात येतो. ज्याच्यावर कज्जेदलालीचा आरोप आहे, त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते. वरिष्ठ न्यायालयास खालच्या न्यायालयांमार्फत अशी चौकशी करून अहवाल मागविण्याचा अधिकार आहे. वकिलांच्या संघाने अमुक एक इसम कज्जेदलाल आहे, म्हणून ठराव केला, तर न्यायालयास तो पुरावा म्हणून गृहीत धरता येतो. ज्या कज्जेदलालांची नावे सूचीत घातलेली असतात, त्यांना न्यायालयाच्या आवारात येण्यास मज्जाव असतो. कायद्याप्रमाणे वकिलांना कज्जेदलालाशी संबंध ठेवता येत नाही. तसे केल्यास गैरवर्तणूक या सदराखाली वकिलाची सनद न्यायालयामार्फत रद्द अथवा स्थगित होऊ शकते.
कवळेकर, सुशील