कापड छपाई : विणलेल्या कापडावर शोभादायक आकृतिबंधक (नक्षी) तयार करण्याच्या पद्धतीला कापड छपाई असे म्हणतात. छपाईत कापडाच्या मूळ रंगापेक्षा एक किंवा अधिक रंग वापरण्यात येतात.⇨रंजनक्रिया ही छपाईहून भिन्न आहे. रंजनक्रियेत कापडाचे मूळ धागेच एकसारखे रंगवून मग ते विणण्यात येतात किंवा विणलेले कापडही रंगवतात. तर कापड छपाईत तयार कापडावर निराळी नक्षी उठवतात. कापड छपाईसाठी ठसा, जाळी व रूळ या पद्धतीने मुख्यत: वापरण्यात येतात.
कापडाच्या लोकप्रिय प्रकारांपैकी बहुंताशी रंगीत असतात. पांढऱ्या कापडापेक्षा एकरंगी कापडाचे आकर्षण अधिक व बहुरंगीचे त्याहूनही अधिक असते. बहुरंगी कापड बनविण्याच्या मुख्य पद्धती पुढीलप्रमाणे आहेत : (१) बहुरंगी विणकाम, (२) कशिदा, (३) गाठी मारून केलेले गालिचे आणि (४) कापड छपाई. यांतील पहिल्या तीन प्रकारांत रंगीत सुताचा वापर होतो आणि चौथ्या म्हणजे कापड छपाई पद्धतीत कापड रंगीत दिसण्यासाठी निराळे रंगीत सूत वापरत नाहीत व या तीनही पद्धतींपेक्षा ही सोपी असते. या प्रकारात पांढऱ्या किंवा रंगीत कापडावर मर्यादित जागी रंग लावून किंवा असलेला रंग काढून नक्षी निर्माण करण्यात येते. यामुळे कापडाची मूळ वीण कशी आहे त्यावर नक्षी अवलंबून असत नाही व कित्येक वेळा हलक्या दर्जाच्या कापडावर आकर्षक छपाई केल्यास त्याला चांगली किंमत येते. कापड छपाई हे शास्त्रही आहे आणि कलाही आहे.
रंग मर्यादित जागेत लावायचा असल्यामुळे त्याच्या विद्रावात विशिष्ट प्रकारचे गोंद मिसळून दाटपणा वाढविला जातो. अशी लापशी (पेस्ट) कापडावर लावल्यानंतर ती न पसरता, लावली असेल तेथेच राहते. रंग व गोंद यांशिवाय लापशीमध्ये इतरही रसायने घातलेली असतात.
इतिहास : ऐतिहासिक कागदपत्रांवरून आणि पुराणवस्तू संशोधनावरून असे दिसते की, भारतामध्ये कापड छापण्याची कला फार पुरातन कालापासून चालू आहे, परंतु सोळाव्या शतकापूर्वीचे छापील कापड आता फारसे सापडत नाही. मोहें-जो-दडो येथील उत्खननावरून इ. स. पू. ३००० वर्षांपासून भारतामध्ये कापसापासून तयार केलेले साधे छापील कापड तयार होत होते असे दिसते. परंतु खडीच्या पद्धतीने कापड छापण्याची कला सतराव्या शतकात तुर्कस्तानातून भारतात आली असावी असे वाटते. सन १६०० ते १८०० या कालात भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत छापील कापड तयार करण्याचा धंदा फार मोठ्या प्रमाणावर चालू होता व तो माल डच, इंग्लिश व फ्रेंच व्यापाऱ्यांच्या मार्फत सुरत व कालिकत बंदरांतून इंग्लंड व इतर यूरोपीय देशांत जात असे. या कापडावरचे रंग पक्के व भडक तेजस्वी असत त्यामुळे ते कापड तिकडे फार लोकप्रिय झाले होते. यंत्रयुग सुरू झाल्यानंतर इंग्लंड व फ्रान्समध्ये कापडाच्या मोठ्या गिरण्या सुरू झाल्या व तेथे भारतातील कापडाप्रमाणेच उत्तम प्रतीचे छापील कापडही तयार होऊ लागले. त्यामुळे या लोकांनी भारतीय मालावर बहिष्कार घातला आणि तेव्हापासून भारतातील कापड छापण्याच्या उद्योगाला अनेक अडचणी येऊ लागल्या व तो धंदा खालावत गेला. १९४८ नंतर भारतातील अनेक उद्योगपतींनी पुन्हा दीर्घ प्रयत्न केल्यामुळे भारतातही कापड छापण्याच्या गिरण्या निघाल्या व त्यांमध्ये अतिशय उच्च दर्जाचे छापील कापड तयार होऊ लागले आणि ते पुन्हा परदेशांत खपू लागले. अहमदाबाद आणि मुंबई येथील काही गिरण्या छापील कापडाबद्दल प्रसिद्ध आहेत.
भारतामध्ये छापील कापड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नक्षीकामाचे वर्गीकरण त्या त्या प्रदेशानुसार करता येते. उत्तरेकडील प्रदेशांत सामान्यत: आढळणारे नक्षीकाम दक्षिणेकडील प्रदेशांत तयार करण्यात येणाऱ्या कापडावरील नक्षीकामापेक्षा अगदी भिन्न स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. परंतु सौंदर्य , रचना आणि रंग यांबाबतीत पुष्कळच विविधता सर्वत्र आढळते. उत्तर प्रदेश व राजस्थान येथील छापील साड्या व कापड प्रसिद्ध आहेत. फरूखाबाद आणि बुलंद शहर येथे बारीक व गुंतागुंतीचे सामान्यत: दोन रंगाचे नक्षी असलेले कापड तयार करतात. ही नक्षी ठशांच्या साहाय्याने छापण्यात येते. फत्तेपुरजवळील जाफरगंज येथे निराळ्याच प्रकाराचे विशेषत: फुलांसारखे नक्षीकाम असलेले कापड तयार करण्यात येते. या कापडावर प्रथम ठशांच्या साहाय्याने नक्षी उमटविण्यात येते व नंतर ब्रशाच्या साहाय्याने बारीक रंगकाम करण्यात येते. यात लाल व निळे रंग प्रामुख्याने दिसून येतात. राजस्थानात आणि मध्य भारतात अनेक प्रकारचे व शैलीचे छापील कापड तयार करण्यात येते. त्यात सामान्यत: लहानलहान ठिपक्यांच्या स्वरूपातील नक्षीकाम किंवा फुलांचे गुच्छ पांढऱ्या शुभ्र व फिकट गुलाबी रंगाच्या कापडावर छापलेले आढळतात. लहान छापील पट्टे असलेले `सणगर’ पद्धतीचे दोन्ही बाजूंनी रंगविलेले राजस्थानी कापड सुप्रसिद्ध आहे. जोधपूर व जयपूर येथे तयार करण्यात येणाऱ्या कापडावर लाल, शेवाळी किंवा फिकट निळ्या रंगांवर समांतर पट्ट्याच्या स्वरूपातील नक्षीकाम आढळते. यातील नक्षी बहुधा भूमितीय स्वरूपाची असते. राजस्थानातील जयपूर, कोटा आणि अलवर तसेच काठेवाडातील काही भागांत गाठी मारून व रंगवून तयार केलेले व `बांधणी’ या नावाने ओळखले जाणारे कापड व साड्या प्रसिद्ध आहेत.
दक्षिण भारतात तयार होणारे छापील कापड भारतातील इतर कोणत्याही भागातील कापडापेक्षा अधिक ठळक भडक रंगांचे आढळते. यांमध्ये मेण हे रोधद्रव्य वापरून ब्रशाच्या साहाय्याने रंग काम केलेले अधिक प्रमाणात आढळते. त्यामानाने ठशांची छपाई कमी प्रमाणात आढळते. हे कापड `कामदान’ या नावाने ओळखले जाते. या कापडाकरिता कांचीपुरम, तंजावर आणि कोचीन येथील देवळांतील भित्तिचित्रांचे अनुकरण केलेले बऱ्याच वेळा आढळते. मच्छलीपट्टम, पालकोल्लू, कालहस्ती, नागापट्टणम, मदुरा व तंजावर येथे तयार करण्यात येणारे `कलमकारी’ या नावाचे कापड नक्षीकाम, तजेला आणि रंगकाम यांबाबतीत अत्युकृष्ट समजले जाते. या कापडात निळा, मळकट तांबडा आणि पिवळा हे रंग प्रामुख्याने आढळतात. या कापडांवर रामायण, महाभारत व इतर पौराणिक कथांचे चित्रीकरण केलेले आढळते.
कापडावर रंगद्रव्याचा जाड थर देऊन नक्षीकाम करण्याच्या पद्धतीने दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि नाशिक येथे एक वेगळ्या प्रकारचे चांगले छापील कापड तयार करण्यात येते. हा पिवळा चूर्णरूप रंग एरंडेलबरोबर मिसळून नंतर हे मिश्रण तापवून तयार करण्यात येतो.
रशियातील कॉकेशस भागात इ. स. पू. २००० वर्षापासून कापड छापण्याची कला चालू आहे असे मानतात. क्रिमिया येथील थडग्यात सापडलेली ग्रीक पद्धतीची छापील वस्त्रे इ. स. पू. ४०० वर्षांची आहेत. ईजिप्तमध्ये प्रेतांच्या भोवती गुंडाळलेली छापील वस्त्रेही इ. स. च्या पूर्वीचीच आहेत. या सर्व वस्त्रांवरची चित्रे कुचल्याने काढलेली आहेत. ईजिप्तमध्ये कापड छापण्याचा उद्योग इ. स. च्या पहिल्या शतकापासून सुरू झाला. त्यासंबंधीची काही माहिती प्लिनी द एल्डर यांनी इ. स. ७९ मध्ये लिहून ठेवली आहे. परंतु त्यावेळचे छापलेले कापड आता प्रत्यक्ष सापडत नाही. ईजिप्तमधील अखमीमच्या थडग्यात सापडलेले छापील कापड इ. स. च्या नवव्या किंवा दहाव्या शतकातील असावे. बाराव्या शतकापर्यंत कापड छापण्याचा उद्योग यूरोपात सुरू झालेला नव्हता. यापूर्वी तिकडे सापडलेले छापील कापड पूर्वेकडील देशांतून गेलेले होते. डरॅम येथील सेंट कथबर्टच्या थडग्यात इ. स. ४७० च्या सुमारास सापडलेल्या केशरी रंगाच्या रेशमी कापडावर घोड्यावर बसलेल्या ससाणी शिकाऱ्याचे चित्र सोनरी वर्ख लावून छापलेले आहे, ते पूर्वेकडील देशातूनच आणलेले असावे.
बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात ऱ्हाइन नदीच्या खोऱ्यात छापील कापड तयार करण्याचा उद्योग सुरू झाला. त्यावेळी लिननच्या किंवा रेशमी कापडावर खोदकाम केलेल्या लाकडी ठोकळ्यांनी काळ्या, पांढऱ्या किंवा सोनेरी रंगाच्या आकृती छापीत असत. काही प्रकारांत एका नंतर एक असे दोन किंवा तीन रंगही छापीत असत. त्यावेळचे छापील कापड बायझॅंटीन किंवा जवळच्या पूर्वेकडील देशांत छापलेल्या कापडासारखेच होते. त्यावेळच्या कापडाचे बरेच अवशेष अजून सापडतात.
चौदाव्या शतकात व्हेनिस आणि लूका येथे विणलेल्या रेशमी कापडावरील चित्रांप्रमाणे कापडावर चित्रे छापण्यास सुरूवात झाली. जर्मनीमधील स्ट्रालसुंड येथील संग्रहालयात विणलेल्या रंगीत रेशमी कापडाचा एक मोठा झगा व विणलेल्या आकृतीप्रमाणेच छापलेल्या आकृती असलेला झगाही ठेवलेला आहे. या कालात छापलेल्या लिननच्या कापडावर शोभिवंत फुले, पक्षी व सिंहाच्या आकृती काढण्याची पद्धत विशेष प्रचलित होती. त्यावेळी छापलेल्या लिननच्या कापडाचे तुकडे लंडन येथील व्हिक्टोरिया आणि ॲल्बर्ट संग्रहालयात व बर्लिनच्या संग्रहालयात ठेवलेले आहेत. पंधराव्या शतकात इटालियन मखमलीवर काढलेल्या चित्राप्रमाणे कापडावर चित्रे छापण्याची पद्धत सुरू झाली. त्या चित्रांत उभट टोकदार कमानी काढून त्यांमध्ये फुलांचे सुंदर वेल व डाळिंबाच्या उघडलेल्या पाकळ्या काढण्याची पद्धत लोकप्रिय होती. इटलीमध्ये चौदाव्या शतकात छापलेल्या कापडाचे सुंदर नमुने सापडले आहेत. त्यांमध्ये सीआँ येथील पडदे फार सुंदर आहेत. हे पडदे स्वित्झर्लंडमधील बाझेल येथील ऐतिहासिक संग्रहालयात ठेवले आहेत. या पडद्यावर छापलेल्या रंगीत आकृत्यांमध्ये घोडेस्वार आणि नर्तकी यांची सुंदर चित्रे आहेत. त्यावरून त्यावेळी लाकडी ठोकळे खोदण्याची व रंगीत छापकामाची कला फार उच्च दर्जाची होती असे दिसते.
पेंटर- स्टेनर्स कंपनीच्या जुन्या कागदपत्रांवरून असे दिसते की, तेराव्या शतकापासून इंग्लंडमध्ये कापडावर चित्रे छापण्याचा धंदा चांगल्या रीतीने चालू होता. परंतु त्यावेळच्या कामाचे नमुने आता सापडत नाहीत. पंधराव्या शतकातील सुरूवातीला सफक येथे हेसेटच्या चर्चमध्ये मिळालेल्या छापील कापडाच्या पिशवीवरील चित्रात ख्रिस्ताचे डोके दाखविले असून त्याच्या चारही बाजूंस धर्मोपदेशकांची चिन्हे छापलेली आहेत. इंग्लंडमधील कापड छापकामाचा हा सर्वांत जुना नमुना आहे. सोळाव्या शतकात यूरोपातील बहुतेक सर्व देशांत कापडावरचे लाकडी ठोकळ्याचे साधे छापकाम होऊ लागले. इंग्लंडमध्ये पहिल्या एलिझाबेथच्या काळात लोकप्रिय, असलेल्या काळ्या कापडावरील कशिद्याप्रमाणेच छापून तयार केलेले कापड अजूनही सापडते. त्यावेळच्या काही कापडांवर, खोदकाम केलेल्या तांब्याच्या पत्र्याने काळ्या शाईने छापलेली चित्रे दिसतात. ही चित्रे बहुतेक कशिदा काढण्यासाठी लागणारी नमुना चित्रे असावीत.
सतराव्या शतकात कापड छापण्याच्या कलेत बरीच प्रगती झालेली दिसते. जर्मनीमध्ये छापलेल्या कापडावर विणलेल्या कापडाची नक्कल न करता लाकडी ठोकळ्यावर स्वतंत्र पद्धतीची फुलांची सुंदर चित्रे खोदून त्यांचे छापकाम करण्याची पद्धत सुरू झाली.
सतराव्या शतकात सुरूवातीपासून पक्क्या रंगाचे चित्रित केलेले भारतीय छापील कापड ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत यूरोपातील बाजारात येऊ लागले. त्या प्रकारचे कापड तयार करण्यासाठी तिकडील कापड छापणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले व त्यामुळेच यूरोपात कापड छापण्याच्या उद्योगाची खरी सुरूवात झाली. भारतातून छापील कापडाची निर्यात मुख्यत: कालिकत बंदरातून होत असे. त्यामुळे छापील कापडाला `कॅलिको’ हे विशेष नाव रूढ झाले. १६७० पर्यंत यूरोपातील व्यापाऱ्यांना मंजिष्ठ (मॅडर) मिसळून तयार केलेल्या रंगाने छापलेल्या भारतीय मालाप्रमाणे उत्तम प्रतीचा माल करता आला नाही. परंतु त्यानंतर फ्रान्स, हॉलंड व इंग्लंड येथे भारतीय मालासारखा चांगला माल तयार होऊ लागला व कापड छापणाऱ्या व्यापाऱ्यांना `कॅलिको प्रिंटर्स’ हे नाव पडले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्येही चांगल्या प्रतीचे छापील कापड तयार होऊ लागले.
इंग्लंडमध्ये १६७६ साली धातूवर खोदकाम करणाऱ्या विल्यम शेरवीन या तंत्रज्ञांनी मोठ्या रूंदीच्या (पन्ह्याच्या) कापडावर छापकाम करण्याची नवीन पद्धत सुरू केली आणि तिचा एकाधिकार मिळवून लंडनच्या पूर्वेस ली नदीच्या काठावरील वेस्टहॅम गावात कापड छापण्याचा कारखाना सुरू केला. त्यानंतर कापड छापण्याचे अनेक कारखाने सुरू झाले. १६९६ पर्यंत या धंद्याची इतकी प्रगती झाली की, त्यामुळे पूर्वीपासून चांगल्या रीतीने धंदा चालत असलेल्या रेशीम व लोकरी कापडाच्या व्यापाऱ्यांच्या खटपटीने १७०० मध्ये भारतातील चीट आणि छापलेले कापड इंग्लंडमध्ये आयात करण्यास कायद्याने मनाई करण्यात आली. १७१२ व १७१४ मध्ये इंग्लंडमध्ये छापलेल्या कापडावरही जबरदस्त जकातकर बसविण्यात आले आणि १७२० साली कापसाच्या कापडावर छपाई करण्यासही बंदी घालण्यात आली. या कायद्यातून सुटण्यासाठी व्यापाऱ्यांनी तागाचे उभे धागे व कापसाचे आडवे धागे वापरून बनविलेल्या मिश्रजातीच्या कापडावर छपाई करण्यास सुरूवात केली. ही स्थिती १७७४ पर्यंत चालू होती. १७७४ मध्ये कापसाच्या कापडावर छपाई करण्यास बसवलेली बंदी उठविण्यात आली आणि १८३१ साली छापील कापडावर बसवलेली जकातही काढून टाकण्यात आली. या अडचणी आल्या तरी इग्लंडचा कापड छापण्याचा धंदा वाढतच गेला व त्याची चांगली भरभराटही झाली.
फ्रान्समध्ये कापड छापण्याच्या धंद्याला इंग्लंडपेक्षाही कायद्याचे मोठे अडथळे आले. १६८६ च्या कायद्याने भारतातून आलेले छापील कापड वापरण्यास बंदी घलण्यात आली आणि यूरोपात छापलेल्या कापडावरही तशीच बंदी घातली होती. तरीही बहुतेक व्यापारी परदेशात छापलेले कापड चोरून आणीत व ते खपतही असे. परंतु बंदी असेपर्यंत स्थानिक उद्योगाची वाढ होऊ शकलेली नाही. कापड छापण्यावरची बंदी उठल्यानंतर अनेक कारखान्यात उत्तम प्रतीचे छापील कापड तयार होऊ लागले. या कालात एन्जर्स येथे १७५३ साली सुरू झालेला डान्टन बंधूंचा कारखाना व १७५८ साली ऑरेंज येथे सुरू झालेला जॉन रूडॉल्फ वेटर यांचा कारखाना फार प्रसिद्ध होता.
हॉलंडमध्ये १६७८ ते १७५० या कालात ॲमस्टरडॅमच्या आसपास कापड छापण्याचे अनेक कारखाने निघाले व तेथे तयार होणारा माल ईस्ट इंडीजमधील डच वसाहतीमध्ये खपत असे. १८३० पासून छपाई पद्धतीत अनेक सुधारणा झाल्या व कापड छापण्याचा धंदा चांगला उर्जितावस्थेत आला.
जर्मनीमध्ये सतराव्या शतकाच्या शेवटी आणि अठराव्या शतकात औक्सबुर्ख हे छापील कापडाच्या उद्योगाचे मुख्य केंद्र होते. खोदलेल्या लाकडी ठोकळ्याने काळ्या किंवा लाल रंगाने छापलेले लिननचे कापड तेथे तयार करीत असत. लिननच्या कापडाला संरक्षण देण्यासाठी १७५० पर्यंत कापसाच्या कापडावर छपाई करण्याची मनाई होती. यावेळी औक्सबुर्खचा न्यूहोफर बंधूंचा कारखाना व योहान हाइन्रिक शूल यांचा कारखाना हे प्रसिद्ध कारखाने होते. योहान शूल यांनीच तांब्याच्या पट्टीवर खोदकाम करून उत्तम प्रतीचे नाजूक रेघांचे छापकाम करण्याची पद्धत सुरू केली. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत स्वित्झर्लंड हे कापड छापण्याचे एक महत्वाचे केंद्र होते. तेथे लाकडी ठोकळे वापरून खडीच्या जातीचे छापकाम करीत असत, परंतु ते रंग उजेडाने विटू लागले व साबणाच्या पाण्याने धुतल्यास जाऊ लागले. त्यामुळे तेथील माल खपेनासा झाला आणि कापड छापण्याचा धंदा मोडकळीस आला.
इराण देशात छापील कापडाचा उद्योग १६०० च्याही पूर्वीपासून चालू होता. झां द थेवेनॉट (१६३३-७७) यांनी केलेल्या वर्णनावरून इराणात लाकडी ठोकळे खोदून त्यात रंग भरून त्यांच्या मदतीने रंगीत छापकाम करीत असत असे दिसते. फ्रेंच प्रवासी झां आर्डिन यांनी १६८६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतावरून त्यावेळी इराणमध्ये भारतातील छापील कापडाप्रमाणेच उच्च दर्जाचे छापील कापड तयार होत होते व त्यात सोनेरी व चांदीच्या वर्खाने अक्षरे, फुलझाडे व सुंदर देखावेही छापीत असत असे दिसते. हे कापड ईस्ट इंडिया कंपनीमार्फत यूरोपीय देशांत पाठवीत असत. या कापडाला `पर्सेस’ हे विशिष्ट नाव रूढ झाले होते. हे कापड चटया, पडदे व दुलयांच्या खोळी करण्यासाठी आणि प्रेतांवर झाकण्यासाठी वापरीत असत. या जातीचे कापड अजून पुष्कळ ठिकाणी पहावयास मिळते.
चीन देशात रेशमी कापडावर चित्रे छापण्याचा उद्योग फार पुरातन काळापासून चालू आहे. परंतु छापील कापडाची निर्यात अठराव्या शतकापासून सुरू झाली. हे कापड यूरोपीय देशांत पडदे करण्यासाठी व कपडे करण्यासाठीही वापरीत आत. चीनमध्ये धार्मिक कामासाठी वापरलेले व अठराव्या शतकात छापलेले रेशमी कापड अजून पुष्कळ ठिकाणी सापडते.
जपानमध्ये छापील कापड तयार करण्याचा उद्योग इ. स. आठव्या शतकात चालू झाला असे दिसते. त्या वेळच्या बुद्धाचे चक्र छापलेल्या रेशमी कापडाचा तुकडा सापडला आहे. जपानमधील कापडावरच्या छपाईसाठी पत्र्यामध्ये कातरून काढलेल्या मार्गदर्शक आकृत्या कोरीव फर्मे म्हणून वापरीत असत व ठोकळ्यांच्या छाप पद्धतीत खोदलेल्या भागांत रंगद्रव्ये भरून छापकाम करीत असत.
तारेच्या जाळीमध्ये आकृती विणून तयार केलेल्या पडद्यातून हवेच्या जोराने कापडावर रंग उडवून आकृत्या छापण्याच्या पद्धतीला जाळी पद्धत म्हणतात. ही पद्धत १९३० पासून विशेष प्रचारात आली. तांब्याच्या रूळावर खोदकाम करणे फार खर्चाचे असते. त्यापेक्षा जाळीपद्धतीने छपाई करणे फार सोयीचे होते. स्कॅंडिनेव्हियात १९४५ पासून या पद्धतीची विशेष प्रगती झाली. डॅनिश कारखाने मुख्यत: फुलझाडांची नैसर्गिक चित्रे छापत असत व स्वीडन आणि फिनलंडचे कारखाने आखीव भूमितीय चित्रे काढीत असत. जाळी पद्धतीमध्ये आता इतकी प्रगती झाली आहे की, त्या पद्धतीने आता कोणतेही चित्र उत्तम प्रकारे छापता येते.
इ. स. १८१० पर्यंत चांगल्या जातीच्या छपाईकरिता वनस्पतींपासून तयार केलेला निळा, लाल व पिवळा रंग वापरीत असत. पुढे फ्रेंच, जर्मन व इंग्लिश रासायनिक तंत्रज्ञांच्या चढाओढीमुळे वनस्पती रंगांच्या छपाईत पुष्कळ सुधारणा झाली. प्रशियन, ब्ल्यू, कोचिनिअल पिंक, कॅटेच्यू ब्राउन तसेच मॅंगॅनीज ब्राउन, क्रोम यलो, अँटिमनी ऑरेंज व सॉलीड ग्रीन हे नवीन रंग प्रचारात आले व त्यामुळे रंगीत छपाईच्या कामात मोठी क्रांती झाली. १८४० ते १८५० च्या दरम्यान इंग्लिश आणि फ्रेंच व्यापारी, विशेषत: अल्सेशियन व्यापारी, लाकडी ठोकळे वापरून गाद्यागिरद्यांना लागणारे कापसाचे व लोकरीचे उत्तम दर्जाचे व छापील कापड तयार करीत असत. १८५६ साली डब्ल्यू. एच्. पर्किन यांनी ॲनिलीन रंगद्रव्ये तयार करण्याची पद्धत शोधून काढली. या नवीन रंगद्रव्यामुळे आणि हलक्या दर्जाच्या खोदीव रूळामुळे छापील कापडाची फार मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे चित्रणही होऊ लागले, परंतु एकंदर कामाचा दर्जा खालावत गेला. पुढे १८७३ मध्ये विल्यम मॉरिस यांनी चित्रांच्या सजावटीमध्ये आमूलाग्र सुधारणा करून लाकडी ठोकळ्यांनी व वनस्पती रंगांनीच छपाई करण्यास सुरूवात केली व त्यात त्यांनी चांगलेच यश मिळविले. सर टॉमस वॉडर्ल यांनी लीक येथे छापलेले व मॉरिस यांनी मर्टन ॲबे येथील स्वत:च्या कारखान्यात छापलेल्या कापड फार उच्च दर्जाचे आहे.
इ. स. १८७० च्या सुमारास छापलेल्या कापडावर जपानी पद्धतीचा प्रभाव पडलेला दिसतो. १८८० च्या सुमारास गाद्यगिरद्यांसाठी लागणारे क्रेटोन आणि व्हेलव्हेटीन जाड कापडावर छपाई करून तयार करण्याची पद्धत प्रचारात आली आणि कपड्यासाठी लागणारे कापड रेशीम कापडावर छपाई करून बनविण्यात येऊ लागले. १८८० नंतर छपाईचे ठोकळे करण्याकरिता उत्तम रचनाकृती (डिझाइन) काढण्यासाठी नामांकित कलाकार नेमण्यात येऊ लागले. त्यामुळे रचनाकृतींचा दर्जा पुष्कळ सुधारत गेला. १९०० च्या सुमारास `आर्ट नूव्हो ‘ पद्धतीला फार मागणी होती व लंडनची लिबर्टी कंपनी या पद्धतीची छपाई करण्याबद्दल फार प्रसिद्ध होती. विसाव्या शतकातील आधुनिक चित्रकलेतील तंत्रांच्या प्रभावामुळे कापड छपाईतही भूमितीय व अप्रतिरूप रचनाकृती प्रचारात आल्या. त्यांत तीव्र भडक रंग वापरून आकृतीभोवती ठळक काळ्या रेघा काढून त्यांना उठाव देण्यात येऊ लागला.
इंग्लंडमध्ये १९१३ च्या सुमारास रॉजर फ्राय व इतर कलाकारांनी स्थापन केलेल्या ओमेगा संस्थेत अप्रतिरूप पद्धतीच्या रचनाकृती तयार करण्यात येऊ लागल्या व या रचनाकृतींची छपाई फ्रान्समधील रूआन येथील मारोमी कारखान्यात होऊ लागली. १९१७ मध्येविल्यम फॉक्टन यांनी चार्ल्स रेनी मॅकिंटाश आणि क्लॉड लोव्हट फ्रेझर याप्रसिद्ध कलाकारांकडून रचनाकृती काढवून कापड छापण्याची नवीन पद्धतीलोकप्रिय केली.
फ्रान्समध्ये फेरिअर यांनी राऊल द्यूफी व इतर प्रसिद्ध कलाकारांकडून रचनाकृती काढवून उत्तम प्रतीचे छापील कापड बनविण्यास सुरूवात केली. परंतु १९२० ते १९३० या कालात लोकांची आवड बदलत गेली व पुन्हा फिकट रंगाच्या व जुन्या पद्धतीच्या रचनाकृती लोकप्रिय होऊ लागल्या. या नवीन प्रकारात अनेक नवीन प्रकारची फुले व एकावर एक चढलेल्या पाकळ्यांची चित्रे पॅरिसच्या १९२५ च्या प्रदर्शनात दाखविण्यात आली व ती फार लोकप्रिय झाली.
कापड छापण्यासाठी सपाट लाकडी ठोकळे न वापरता खोदकाम केलेले लाकडी रूळ वापरण्याची पद्धत टॉमस बेल यांनी १७८३ मध्ये सुरू केली होती व त्या पद्धतीने छापलेले कापड १८१० पर्यंत तयारही होत असे, परंतु ती पद्धत फारशी लोकप्रिय झाली नाही. १८१५ मध्ये इंग्लंडमध्ये लाकडी रूळ पद्धतीने रूंद कापडावर मोठे भव्य देखावे छापण्यात येऊ लागले, परंतु ते काम खोदलेली तांब्याची पट्टी वापरून केलेल्या छपाई मानाने दुय्यम दर्जाचेच होते. १८२० नंतरचे तांब्याचे रूळ वापरून छपाई करण्यात येऊ लागली. त्यामुळे चांगल्या दर्जाची छपाई झपाट्याने होऊ लागली. तांब्याच्या रूळावरचे खोदकाम करण्यासाठी कारागीर नेमण्यात आले. यावेळी तांब्याचे खोदीव रूळ करणारी जोसेफ लॉकेट ही कंपनी फार प्रसिद्ध होती व तिचा माल यूरोपातही खपू लागला.
या काळात इंग्लंडमधील बॅनिस्टर हॉल येथील कारखान्यांत छापलेल्या कापडांच्या रचनाकृतींचे ३,८०० निरनिराळे नमुने आढळतात व ते अद्याप पहावयास मिळतात. त्यांवरून त्या वेळच्या लोकांच्या आवडीची चांगली कल्पना येते. १८२० नंतर काळसर पार्श्वभूमीवर रचनाकृती चित्रे छापण्याची पद्धत मागे पडली व त्याऐवजी पिवळ्या, ऑलिव्ह ब्राउन वा बफ अशा सौम्य मळकट रंगाच्या पार्श्वभूमीवर रचना कृती छापण्याची पद्धत सुरू झाली. नाजुक रेघांच्या रचनाकृतींऐवजी जाड रेघांच्या रचनाकृती छापण्यात येऊ लागल्या. तसेच जुन्या ईजिप्त पद्धतीच्या रचनाकृतींची चित्रेही छापण्यात आली. भडक लाल पार्श्व भूमीवर छापलेल्या भारतीय पद्धतीच्या रचनाकृतींही लोकप्रिय होत्या.
छपाईचे प्रकार : कापड छपाईचे तीन मुख्य प्रकार आहेत : (१) सरळ छपाई, (२) विसर्जन छपाई आणि (३) रोध छपाई.
सरळ छपाई : हा प्रकार सर्वांत साधा असून यात पांढऱ्या कापडावर नक्षी छापण्यात येते. नक्षी अगदी थोडी असू शकेल किंवा कापडभरही असू शकेल. रंग इच्छेप्रमाणे एक किंवा अनेक छापता येतात.
कापड पांढरे नसून रंगीत असेल, तर त्यावरच्या सरळ छपाईला वरची छपाई म्हणतात. फिक्या रंगाच्या कापडावर गडद रंगाची व कमी विस्ताराची नक्षी या प्रकारात विशेष प्रचलित आहे. नक्षीखालचा कापडाचा मूळ रंग कायम रहात असल्यामुळे गडद रंगावर फिक्या किंवा विरोधी रंगाची छपाई (जसे तांबड्या रंगावर हिरवा रंग) या पद्धतीत शक्य होत नाही. याला एक अपवाद म्हणजे खडी काढणे. खडीसाठी वापरलेले द्रव्य पांढरे व अपारदर्शक असल्यामुळे त्याखालील रंग गडद असला तरी तो दिसत नाही. [→ खडीकाम].
विसर्जन छपाई : वरच्या छपाईमध्ये गडद रंगाच्या कापडावर पांढरी, फिक्सा रंगाची किंवा विरोधी रंगाची नक्षी छापता येत नाही. अशी छपाई विसर्जन प्रकाराने करता येते. मात्र प्रथम कापड रंगविण्यासाठी जे रासायनिक रीत्या नाहीसे करता येतील असे रंग वापरले पाहिजेत. सोडियम सल्फॉक्झिलेट फॉर्माल्डिहाइड असलेली लापशी रंगीत कापडावर छापून ते वाफवल्यावर छपाईच्या जागीचा रंग नाश पावून तेथे कापडाचा मूळ पांढरा रंग दिसतो व रंगीत कापडावर पांढरी नक्षी उमटते. या कृतीला शुभ्र विसर्जन म्हणतात. शिवाय लापशीमधील रयायनांनी ज्याचा नाश होणार नाही, असा रंग तिच्यात घातल्यास नाश पावलेल्या मूळ रंगाच्या जागी तो कापडावर बसतो व रंगीत कापडावर रंगीत नक्षी उमटते. यासाठी मुख्यत्वेकरून व्हॅट रंग (रंजक) वापरले जातात. या क्रियेला रंगीत विसर्जन म्हणतात.
रोध छपाई : विसर्जन छपाई नेहमी शक्य होतेच असे नाही. विशेषत: मूळचे रंग पक्के असले, तर त्यांतील अनेकांचा विसर्जन लापशीतील रसायनांनी पूर्ण नाश होत नाही. अशा वेळी शुभ्र नक्षी पाहिजे असल्यास रोध छपाईचा अवलंब केला जातो. या प्रकारात नक्षीच्या जागी मूळच्या रंगाचा शिरकावच होऊ देत नाहीत किंवा शिरकाव झाल्यास त्या रंगाला पक्का होऊ देत नाहीत. मग नंतरच्या धुण्यात तो निघूनही जातो. पहिल्या तऱ्हेला प्रत्यक्ष रोध म्हणतात व त्यात शाडू माती, झिंक ऑक्साइड, टिटॅनियम डाय-ऑक्साइड वगैरेंचा दाट गोंदाबरोबर वापर करतात. दुसऱ्या तऱ्हेला रासायनिक रोध म्हणतात. यात मूळचा रंग पक्का बसण्याकरिता वापरलेल्या रसायनांच्या उलट जातीची रसायने वापरतात. उदा., विक्रियक (विक्रिया करणारे) रंग पक्के बसण्याकरिता क्षारांची (अल्कलींची) जरूर असते. तेव्हा रोध लापशीत आमेनियम सल्फेटासारखे क्षार अक्रिय करणारे रसायन वापरल्यास छपाईच्या जागी मूळच्या रंगाचा कापडाशी झालेला संयोग लूळा होतो आणि नंतरच्या धुण्यात तो रंग निघून जातो. रोध छपाई करावयाचे कापड नेहमीच्या पद्धतीने न रंगविता साधारणपणे निप्-पॅडिंगच्या (रंजनक्रिया) पद्धतीने रंगविले जाते. कारण रंगविण्याच्या नेहमीच्या पद्धतीत छपाई कापडापासून सुटून अलग होण्याची शक्यता असते. रोध करणाऱ्या द्रव्याचा परिणाम होत नाही असे रंग रोध लापशीमध्ये वापरल्यास ते नक्षीच्या जागी उमटतात व पांढऱ्याऐवजी रंगीत नक्षी छापली जाते.
रोध छपाईची भारतात फार पूर्वीपासून चालत आलेली दोन उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे बांधणी साड्यांची रंगाई व बाटिक छपाई. हे दोन्ही प्रत्यक्ष रोधाचे प्रकार आहेत. बांधणी साड्यांचे काम विशेषकरून सौराष्ट्रात व राजस्थानात होते. जेथे रंग चढावयास नको असेल ती जागा विशिष्ट प्रकारच्या दोऱ्याने घट्ट बांधतात. एका रंगाने रंगवून झाल्यावर काही ठिकाणचे दोरे सोडून नव्या ठिकाणी बांधणी करतात व दुसऱ्या रंगाने रंगवतात. साधारणपणे दोन किंवा तीन रंग वापरले जातात. दर वेळी बांधणी कोठे करायची त्याची आखणी सुरूवातीपासून अशा कुशलतेने केली जाते की, काम संपल्यानंतर सुरेख नक्षीची साडी तयार होते. [→ बांधणी].
बाटिक छपाईचे माहेरघर इंडोनेशिया हा देश समजला जात असला, तरी ती अनेक पौर्वात्य देशांत प्रचलित आहे. या छपाईत प्रत्यक्ष रोधासाठी मेणाचा उपयोग केला जोतो. मेण सहजासहजी निघून येत नसल्याने रंगविण्यासाठी निप्-पॅडिंगची जरूर नसते, पण तपमान वाढवले असता मेण वितळत असल्याने नेहमीच्या तपमानात जे रंग कापडावर पक्के बसतात तेच या प्रकारात वापरता येतात. बांधणी प्रमाणेच बाटिक पद्धतीतही अनेक रंगी नमुने बनवता येतात. प्रथम काही जागी मेण लावून कापड रंगविल्यावर ते गरम पाण्यात घातले की मेण वितळून वर तंरगते. उरलेले मेण साबणाच्या साहाय्याने काढून टाकल्यावर कापड वाळवून नवीन जागी मेण लावून मते दुसऱ्या रंगाने रंगवले जाते. अशाच तऱ्हेने पाहिले तर तिसरा रंग चढविता येतो. प्रत्येक वेळी मेणाने झाकलेल्या भागानुसार शेवटी अनेक रंगी नक्षी (काही भाग पांढराही ठेवता येतो) निर्माण होते. मेण लावलेला भाग विस्ताराने मोठा असल्यास मेणाला बारीक भेगा पाडल्यास त्यातून रंग आत जातो व कापडावर सूक्ष्म रेघांचे जाळे उमटते. हा बाटिक छपाईचा विशेष प्रकार म्हटला पाहिजे कारण तशा तऱ्हेचा परिणाम इतर पद्धतींनी निर्माण करता येत नाही. बांधणी व बाटिक पद्धतींमध्ये मजुरी पुष्कळ लागते, परंतु त्यात वैयक्तिक कौशल्यालाही भरपूर वाव असतो. सध्याच्या यंत्रयुगातही हे प्रकार अजून टिकून आहेत यावरून त्यांचे महत्त्व लक्षात येईल. [→ बाटिककाम].
कापडाची पूर्वतयारी : छपाई करायचे कापड स्वच्छ व सफाईदार असले पाहिजे. त्यातून डोकावणारे धागे किंवा तंतू काढण्यासाठी कापड ज्वालांमधून वेगाने नेतात. विणण्यापूर्वी सुताला लावलेली खळ कापड धुवून काढून टाकतात. त्यानंतर कापडाचे विरंजन केले म्हणजे ते अगदी स्वच्छ व शुभ्र होते. कापड वाळल्यावर त्याच्या पृष्ठभागावरचे राहिलेले तंतू यांत्रिक कात्रीने कापतात व त्या यंत्रात ते ब्रशाने चांगले साफ केले जाते. कापडातील उभे व आडवे धागे एकमेकांशी काटकोनात असले पाहिजेत. धुण्यात कापडाची वीण वेडीवाकडी होते आणि त्यावर तशीच छपाई केली, तर वीण सरळ झाल्यावर नक्षी वेडीवाकडी दिसेल. यासाठी छपाईपूर्वी कापड ताण यंत्रावर (टेंटर यंत्रावर) घालून वीण सारखी करून घेतात.
रेयॉन नायलॉन वगैरे कृत्रिम धागे मुळात स्वच्छ व सफाईदार असतात. फक्त त्यातली खळ काढून टाकण्यासाठी कापड धुतले म्हणजे पुरते. परंतु सुती धाग्यात नैसर्गिक मेणचटपणा व इतर दोष असतात. त्यामुळे सुती कापडावर प्रामुख्याने वरील सर्व क्रिया करून ते छपाईसाठी वरीलप्रमाणे सिद्ध करावे लागते. छपाईसाठी कापडाच्या धाग्यात शोषकता चांगली असावी लागते. कापसाच्या सुतात ती चांगली असते, तर कृत्रिम धाग्यात ती अगदी कमी असते.
छपाईच्यापद्धती : छपाईच्यावेळीकापडालापुढीलमहत्त्वाच्यातीन भिन्न पद्धतींनी रंग लावला जातो : (१)ठशाची छपाई, (२)जाळीची छपाई व (३)रूळाची छपाई.
ठशाची छपाई : ही सर्वांत जुनी पद्धत होय. आपण कागदावर रबरीशिक्का उठवतो त्याच तत्त्वावर ठशाची छपाई होते. ठसा लाकडाचा असून (आ.१)त्यावरछापायची नक्षी कोरलेली असते. नक्षीतील ज्या भागाला रंग लावायचा नसतो तोभाग खोदलेला असतो आणि ज्याला लावायचा असतो तो उठावाचा असून त्याचा कापडालास्पर्श होतो. बारीक ठिपके किंवा अरूंद रेषा उठावात कोरणे कठीण असल्यानेत्या ठिकाणी पितळेचे खिळे किंवा पट्टी बसवितात. रबरी शिक्क्यासाठी शाईचीउशी वापरतात. त्याच पद्धतीचे रंग ठेवायचे भांडे असते.त्यात नमद्यावर (फेल्टवर) रंगाची घट्टशी लापशी पसरलेली असते. छपाई करायचे कापड सुरकुत्या पडू न देता टेबलावर लावतात. टेबलाचा पृष्ठभाग मऊ व लवचिकराहण्याकरिता त्यावर नमद्याचे थर ठेवतात व त्यावर काढून धुता येईल असेसाधे जाड कापड बसवलेले असते. या जाड कापडामुळे तलम छापलेल्या कापडातूनआरपार जाणाऱ्या रंगाने नमदा खराब होत नाही.
रंगाच्या उशीवर ठसा टेकवून उचलला की उठावाच्या भागाबरोबर रंग येतो. मग ठसा कपडावर ठेवला की, रंग कापडाला चिकटून नक्षी उमटते. दाब सगळीकडे सारखा पडावा म्हणून एका हाताने ठसा कापडावर ठेवून दुसऱ्या हाताच्या मुठीने किंवा लाकडी हातोडीने त्यावर ठोका मारतात. थोड्याशा सरावानंतर कामगार चांगल्या तऱ्हेने अशा प्रकारची छपाई करू शकतो.
ठसा एका हाताने वापरावयाचाअसल्याने तो जास्त जड बनविता येत नाही. त्यामुळे त्याचा आकारही मर्यादितराहतो. सर्व कापडभर नक्षी असल्यास ठशाच्या पद्धतीने छपाई करणे गैरसोयीचेअसते. कारण तिला वेळ जास्त लागतो आणि तिच्यात नक्षीच्या पुनरावृत्तीचीजुळणी योग्य ठिकाणी होणे जरा कठीण पडते.विशेषत:नक्षीत एकाहून अधिक रंग असल्यास एक रंग छापल्यावर दुसऱ्याचा ठसा योग्य ठिकाणी उमटविणे तितकेसे सोपे नसते. यामुळे धोतराची किनार, साडीचे काठ, अंगात बुट्टे किंवा अशीच थोड्या प्रमाणावर असलेली नक्षी वगैरे कामांकरिताच ठशाची छपाई मुख्यत्वेकरून उपयोगात येते. पाश्चात्त्य देशांतआता ही पद्धत वापरतात. पण थोड्या भांडवलावर हा धंदा सुरू करता येतअसल्यामुळे व मजुरीचे दर कमी असल्याने भारतात अजून ठशाची छपाई बऱ्याचठिकाणी चालते.
या पद्धतीतील क्रिया हाताऐवजी यांत्रिक तऱ्हेने होऊ शकतील असे एक यंत्र पॅरट यांनी१८३४साली बनवले. त्यांच्या नावावरून यांत्रिक ठशाच्या छपाईला पॅरटीन पद्धती असे नाव पडले.
जाळीची छपाई : ही पद्धती मुख्यत्वेकरून विसाव्या शतकात प्रचारात आली. परंतु थोड्या काळात तिचा जगभर झालेला प्रसार निश्चित आश्चर्यजनक आहे. जाळीचा काही भाग झाकून ती कापडावर ठेवली व वरून रंग लावला, तर झाकलेल्या भागातून तो खाली जात नाही. पण जेथे ती मोकळी आहे तेथे तो कापडावर उतरतो. जाळीच्याछिद्रांचा आकार, जाळीच्या तारांची जाडी व रंगाचा दाटपणा यांची योजना अशा तऱ्हेने करण्यात येते की, जाळीतून खाली गेलेल्या रंगांचे ठिपके वेगळे न राहता ते एकमेकांत मिसळतात व त्यांना सलगता येऊन जाळीच्या न झाकलेल्या भागाप्रमाणे तंतोतंत रंगाकृती कापडावर उमटते.
या पद्धतीमध्येही कापड टेबलावर पसरावे लागते व सबंध तागाच पसरण्याची वहिवाट आहे. कामाचे टेबल ३०-६० मी. लांब असते व त्यावर नमद्याचे आणि इतर विशिष्ट तऱ्हेच्या कापडाचे थर बसविलेले असतात. कडांनी लोखंडी पट्ट्या असून त्यावर जाळीची चौकट ठेवण्याकरिता खिळे ठेवलेले असतात. ते चौकटीच्या रूंदीप्रमाणे मागेपुढे सरकवता येतात. काही ठिकाणी टेबले वाफेच्या किंवा विजेच्या साहाय्याने गरम करण्याची व्यवस्था असते. यामुळे छापलेले कापड चटकन सुकते. विशेषत: मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणी अशा व्यवस्थेची जरूर पडते. टेबलावर कापड खळीने चिकटवून किंवा टाचण्यांनी बसवितात.
जाळीच्या चौकटीची लांबी कापडाच्या पन्ह्यापेक्षा २०-२५सेंमी. अधिक असते आणि रूंदी ५० ते ७०सेंमी. असते. लाकडी चौकटीऐवजी आता धातूच्या चौकटी जास्त प्रचारात आल्या आहेत. चौकटीमध्ये जाळी सर्व दिशांनी सारखी ताणून बसवलेली असते. कासे किंवा पोलाद यांच्या तारांपासून केलेल्या जाळ्या टिकाऊ असतात, परंतु धक्का लागून पोचा आल्यास त्या निरूपयोगी होतात. यामुळे त्यांच्याऐवजी खरे रेशीम नायलॉन किंवा पॉलिएस्टर (उदा., टेरिलीन) यांच्या धाग्यांच्या जाळ्या अधिक पसंत झाल्या आहेत. पूर्वी जाळ्या करण्यासाठी खरे रेशीम हा एकच योग्य धागा असे. जाळ्या करण्यासाठी खास प्रतीचे रेशीम कापड स्वित्झर्लंडहून आयात करण्यात येई. भारतात बनारसला काही कोष्टी तशा तऱ्हेचे कापड विणीत. पण आता नायलॉन व पॉलिएस्टर धाग्यांच्या जाळ्या अधिक प्रचारात आहेत. नायलॉनचा धागा साधारणपणे एकपदरी असतो, तर रेशमाचे आणि पॉलिएस्टरचे धागे अनेकपदरी असतात. एका सेंमी. मधील धाग्यांची संख्या आणि छिद्रांचे लांबी व रूंदी प्रत्येकी ०.२मिमी. असते, तर सोळाक्रमांकाच्या जाळीत दर सेंमी.ला ६२धागे आणि छिद्राची लांबी व रूंदी ०.१मिमी. असते. जाळीची वीण सगळीकडे सारखी पाहिजे हे उघडच आहे.
नक्षीतील प्रत्येक रंगासाठी वेगळी जाळी घ्यावी लागते. ती बनविण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. नीट ताणून बसविलेल्या जाळीदार कापडावर पॉलिव्हिनिल अल्कोहॉल व अमोनियम बायक्रोमेट या किंवा जिलेटीन-बायक्रोमेट या मिश्रणाचा थर देऊन तो अंधारात वाळवतात नंतर काळ्या शाईने नक्षी काढलेला पारदर्शक कागद त्यावर लावून प्रखर प्रकाशात ठेवतात. जेथे काळी शाई आहे तेथे प्रकाश आत न पोहोचल्याने काही क्रिया होत नाही. जेथे प्रकाश पारदर्शक कागदातून आत जातो तेथे रासायनिक विक्रिया होऊन तेथील थर अविद्राव्य होतो. नंतर जाळी कोमट पाण्याने धुतली की, नक्षीच्या भागावरील थर निघून जाऊन छिद्रे मोकळी होतात व बाकीच्या भागावरील थर अविद्राव्य झाल्याने तेथील छिद्रे बंद राहतात. टिकाऊपणासाठी जाळीवर लॅकर लावतात.
जाळी कापडावर ठेवली की, टेबलाच्या कडेच्या लोखंडी पट्ट्या व त्यावरील खिळ्यांमुळे ती हालत नाही. जाळीच्या एका कडेला रंगाचा घट्ट विद्राव (लापशीसारखा) ठेवूनतो एका रबर लावलेल्या पट्टीने जाळीवरून दुसऱ्या कडेला नेतात. पट्टीचीलांबी चौकटीच्या रूंदीपेक्षा जरा कमी असते. रंगाचे दोन हात द्यावयाचेअसल्यास पट्टीनेरंग पुन्हा जाळीवरून पहिल्या कडेला आणतात. जाळीच्याछिद्रांचे आकारमान, रंगाचा दाटपणा, रबराचा टणकपणा व त्याचा आकार, पट्टीचा जाळीशी होणारा कोन आणि ती ओढण्यात वापरलेला जोर या सर्वांवरून कापडावर किती रंग उतरतो ते ठरते. एक चौकोन झाला की, जाळी उचलून पुढच्यावर ठेवतात आणि अशा तऱ्हेने टेबलाच्या शेवटापर्यंत छपाई करतात. साधारणपणे लागोपाठचे चौकोन न भरता एक सोडून एक अशी छपाई करतात व शेवटपर्यंत गेल्यावर पुन्हा पहिल्यापासून सुरुवातकरून राहिलेले चौकोन भरतात. असे केल्याने प्रथम भरलेले चौकोन वाळण्यास मदतहोते आणि रंग पसरून डाग पडण्याचा धोका रहात नाही. एक रंग झाला की दुसरीजाळी घेऊन दुसऱ्या रंगाची छपाई केली जाते. टेबलाच्या कडेच्या लोखंडीपट्ट्या व त्यांवरीलखिळे यांमुळे दुसरी जाळी योग्य स्थळीच बसते आणि नक्षीतील रंगाच्या जागाचुकत नाहीत. जाळीच्या छपाईमध्ये जरूरीप्रमाणे कितीही रंग वापरता येतात.
स्वयंचलितजाळीची छपाई : जाळीची छपाई लोकप्रिय झाल्यावर त्यातील क्रिया यांत्रिकपद्धतीने कशा करता येतील याचा विचार होणे स्वाभाविक होय. पहिली पायरीम्हणजे जाळी हाताने उचलूनपुढे नेण्याऐवजी ते काम यंत्राने करणे. त्यानंतरची पायरी म्हणजे जाळीकापडावर ठेवल्यावर रबरी पट्टी हाताने फिरवण्याऐवजी यंत्राने फिरविणे. परंतुकापड स्थिर ठेवायचे व जाळी सरकवायची हे मूळ तत्त्वच बदलून जाळी स्थिर ठेवूनकापडच सरकविण्याची कल्पना सोपी वाटल्याने ती ग्राह्य झाली. यामुळेचस्वयंचलित जाळीची छपाई विशेष यशस्वी झाली. सध्याच्या यंत्रांमध्ये जाळ्यास्थिर राहतात आणि रबरी पट्ट्यांवर बसवलेले कापड त्यांच्या खाली सरकत जाते.यापद्धतीत एकापुढे एक अशा कितीही जाळ्या ठेवणे शक्य असते, पणप्रत्यक्षात सहा ते बारा जाळ्या असलेली यंत्रे जास्त लोकप्रिय आहेत.रबराची पट्टी अर्थातच यंत्राने फिरते व सर्व जाळ्यांची छपाई एकदम होते.एकदा छाप मारल्यावर जाळ्या वर उचलल्या जातात, मागच्या जाळीखालचे कापड नेमके पुढच्या जाळीखाली येईल इतका पट्टा पुढे सरकतो, जाळ्या खाली होऊन पुन्हा एकदा छपाई होते, जाळ्या उचलून पट्टा पुन्हा सरकतो आणि अशा तऱ्हेने कापड यंत्रातून बाहेर पडेपर्यंत त्यावर सर्वरंगांची पूर्ण छपाई झालेली असते.अशा यंत्राचा सुरुवातीचा खर्च जास्त असला,तरी त्याच्यावर उत्पादनही जास्त येईल हे उघड आहे. यापद्धतीने ताशी४००ते६००मी. कापड छापणेसहज शक्य होते.
फिरत्या जाळीची छपाई : वरील यंत्रात कापडाला खंडितगतीअसते व जाळ्या बसविलेल्या चौकटीही वरखाली व्हाव्या लागतात. या व्यवस्थेतथोडासा तरी वेळ फुकट जातोच. कापडाला अखंडित गती देता आल्यास हा वेळ वाचूशकतो. फिरत्या जाळीच्या पद्धतीच्या शोधाने ही अडचण दूर झाली. यापद्धतीत जाळीला दंडगोलाचा आकार असतो व ती एका रुळावरून जाणाऱ्या कापडाला चिकटूनफिरते. जाळीच्या आतील भागात छपाईचे रंगमिश्रण असते व ते सारखे रबरीपट्टीने जाळीवर दाबले जात असते. अशा तऱ्हेने कापड अविरत पुढे जात असताछपाईही सारखी चालू असते.
या यंत्राचा उपयोग पाश्चात्त्य देशांत अलीकडेच चालूझाला आहे. ही यंत्रे दर मिनीटास८०ते९०मी. वेगाने छापण्याचे काम करू शकतात. हे यंत्र म्हणजे मोठ्या आकृतीचीहीउठावदार छपाई करणारे चौकटीचे यंत्र व मोठी उत्पादनक्षमता असणारे रूळ यंत्रया दोहोंचा संगमच होय. या यंत्राने कापड छपाईच्या धंद्याला एक नवीन चांगलामार्ग दाखविला असून त्याचा लवकरच मोठ्या प्रमाणात प्रसार होईल असे दिसते.
रूळाची छपाई : ही संपूर्णपणे यांत्रिकपद्धती असून हीत कोरलेल्या रूळांच्या साहाय्याने छपाई होते. छापायची नक्षी ठशांमध्ये उठावातअसते तर त्याउलट रूळावर ती खोदलेली असते व खोदलेल्या भागातील रंग कापडावर उमटतो. एका मोठ्या मध्यवर्ती रूळाभोवती छपाईचे रूळ बसविलेले असतात व त्या दोन्हीतून कापड जाताना त्यावर छपाई होते. प्रत्यक्ष यंत्र अर्थात मोठे व गुंतागुंतीचे असते. रंगाचा सतत पुरवठा करण्यासाठी प्रत्येक रूळाबरोबर रंगपेटी असते व तिच्यातील रंगवाहक रूळाच्या किंवा गोल फिरणाऱ्या ब्रशच्या साहाय्याने रंग छपाईच्या रूळाला लागतो. फक्त खोदलेल्या भागात रंग राहणे आवश्यक असल्यामुळे रूळाच्या पृष्ठभागावरील रंग निपटून काढण्यासाठी एक सुरी लावलेली असते. पृष्ठभागावर रंग राहिल्यास त्याचे कापडावर डाग पडतात. सुरी नीट घासून तिचा छपाईच्या रूळाला योग्य त्या दाबाने व योग्य त्या कोनात स्पर्श होईल हे पाहणे महत्वाचे असते. रूळाच्या एका फेऱ्यात पुढील तीन क्रिया होतात. : (१)पेटीतील रंग लागतो. (२)जास्तीचा रंग व पृष्ठावरील रंग सुरीने निपटला जातो व (३)खोदलेल्या भागातील रंग कापडावरच छापला जातो.
रूळांतील रंग नीटपणे कापडावर जावा म्हणून रूळांवर दाब द्यावा लागतो. ठशाच्या व जाळीच्या छपाईप्रमाणे या पद्धतीतही कापडाला मऊ व लवचिक गादी असावी लागते, त्यासाठी ब्लॅंकेट व मांजरपाट वापरण्यात येतात. मात्र इतर पद्धतींप्रमाणे ती स्थिर नसून मध्यवर्ती व छपाईच्या रूळांमधून तीही कापडाबरोबर जातात. छपाई झाल्यावर ती कापडापासून वेगळी होतात व मांजरपाट धुवून पुन्हा वापरले जाते. छापलेले कापड सुकविण्याची सोय छपाईच्या यंत्राला जोडूनच असते.
अलीकडच्या यंत्रांत ८ ते १२ छपाईचे रूळ बसविण्याची सोय असते, परंतु प्रत्यक्षात नेहमीच इतकी रूळे वापरण्याची जरूर पडत नाही. या पद्धतीत पहिला रंग सुकविण्याच्या आत त्यावर दुसरा रंग छापला जात असल्यामुळे छापलेला रंग पुढच्या रुळांतून जाताना थोडा थोडा कमी होत जातो. कारण नवीन रंग छापताना आधीचा रंग अल्प प्रमाणात पुढील रूळांकडून उचलला जातो व तो नवीन रंगाच्या पेटीत मिसळला जातो. यासाठी रंगाचा क्रम फिक्याकडून गडदाकडे लावतात. बाह्य रेषांसाठी काळा रंग प्रथम छापल्यास त्यानंतर एक रंगविरहित रूळ ठेवतात. त्यामुळे काळा रंग पुढच्या रंगपेटीत मिसळत नाही.
छपाईचे रूळ तांब्याचे बनविलेले असतात. त्यांची लांबी कापडाच्या पन्ह्यापेक्षा जास्त म्हणजे ९० ते १६० सेंमी. असते व परीघ ४० ते ७२ सेंमी. असतो.रूळावर नक्षी खोदण्याच्या तीन पद्धती आहेत.
(१) मिल पद्धत : या पद्धतीत नक्षी प्रथम एका पोलादी रूळावर खोदण्यात येते. नंतर तो उष्णतेच्या साहाय्याने कठीण करून दुसऱ्या पोलादी नरम रूळाबरोबर फिरवला की, ती त्यावर उलटी म्हणजे उठावात असलेल्या भागाच्या जागी खोलगट आणि खोदलेल्या भागाच्या जागी उठाव याप्रमाणे उमटते. यानंतर तो दुसरा रूळ उष्णतेने कठीण करून छपाईच्या तांब्याच्या रूळाबरोबर फिरवला म्हणजे नक्षीची पुन्हा उलटपालट होऊन मूळ खोदकामानुसार तांब्याच्या रूळावर नक्षी उमटते. ही पद्धत आता विशेष प्रचारात नाही.
(२) पंजा (पॅंटोग्राफ) पद्धत : पंजा यंत्रात तरफांच्या साहाय्याने अशी सोय केलेली असते की, एका बाजूला सपाट पृष्ठभागावर नक्षीच्या आकृतीच्या बाह्य रेषेवर एका सूचीचे टोक फिरवले म्हणजे त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला रूळाच्या वक्र पृष्ठभागावर तशीच नक्षी उमटते. नक्षी कोरण्यापूर्वी रूळाला अम्लरोधक व्हार्निश लावलेले असते. जो भाग खोदावयाचा असेल त्यावरचे व्हार्निश पंजा यंत्रात काढले जाऊन खालचे तांबे उघडे पडते. नंतर रूळ आम्लात टाकल्यावर जेथे व्हार्निश असेल तो भाग तसाच राहतो आणि जेथे निघाले असेल तेथील तांबे विरघळून नक्षी रूळावर खोदली जाते. खोदण्याची खोली ही रूळ अम्लात ठेवण्याच्या अवधीवर अवलंबून असते.
(३) प्रकाशखोदन (फोटोग्रॅव्ह्यूर) पद्धत : ही सर्वांत नवी पद्धत असून हिच्या साहाय्याने नाजुक व रंगाच्या विविध छटांची नक्षी खोदता येते. नक्षीतील प्रत्येक मूलभूत रंगाची काळीपांढरी प्रत बनवून ती प्रकाशचित्रणाच्या साहाय्याने रूळाच्या आकाराच्या पारदर्शक कागदावर (समचित्र-पॉझिटिव्ह-प्रत) काढली जाते. जाळीच्या छपाईत वर्णन केले आहे, तशी प्रकाशाची क्रिया होणारा विद्राव रूळावर लावून त्यावर वरील कागद बसवून प्रकाशाच्या साहाय्याने नक्षी उमटवली जाते. म्हणजे जेथे कागदाचा पारदर्शक भाग असेल तेथील विद्राव प्रकाशाच्या क्रियेने अविद्राव्य होतो आणि जेथे काळा भाग असेल तेथील तसाच राहून धुण्यात निघून जातो. नंतर रूळावर अम्लाची क्रिया केल्यावर निघून गेलेल्या विद्रावाच्या जागेवरचे तांबे अम्लात विरघळवून नक्षी रूळावर खोदली जाते.
छपाईच्या रूळावर बारीकसा ओरखडा निघाला, तरी त्याचा खोदकामासारखा परिणाम होऊन छपाईमध्ये डाग पडतात. यासाठी कधीकधी रूळावर क्रोमियम धातूचा मुलामा देतात. क्रोमियम धातू कठिण असल्याने तीवर सहजासहजी ओरखडा पडत नाही. याउलट एकदा मुलामा दिला की, नक्षीत बारीकबारीक फेरफार किंवा दुरूस्ती करणे शक्य होत नाही हा एक तोटा म्हटला पाहिजे.
रूळ छपाईचा मुख्य फायदा म्हणजे तिचा वेग आणि त्यामुळे मिळणारे शीघ्र व मोठे उत्पादन. या पद्धतीत ताशी ५,००० मी. पर्यंत कापड छापणे शक्य असते. अशा यंत्राचा एक नमुना आ. २ मध्ये दाखविला आहे. रूळ बदलायला मात्र बराच वेळ लागतो पण एकदा जुळणी केल्यावर त्याच नमुन्याचे हजारो मीटर कापड छापायचे असेल, तर ही पद्धत उपयोगाची आहे. मात्र छपाई चालू असताना काळजीपूर्वक देखरेख ठेवणे जरूर असते. कारण काही बिघाड झाल्यास तो लक्षात येऊन यंत्र थांबवीपर्यंत बरेच कापड सदोष छापले जाण्याचा संभव असतो.
छुहेरी छपाई : हा रूळाच्या छपाईचा एक निराळा प्रकार असून ह्यात कापडाच्या दोन्ही बाजूंना छपाई होते. असे कापड पडद्यांना विशेष उपयोगी पडते. भारतात ही पद्धत फारशी प्रचारात नाही.
इतर काही पद्धती : वरील तीन मुख्य तीन पद्धतींखेरीज इतर काही पद्धतीही प्रचलित आहेत.
(अ) फवाऱ्याची छपाई : हीत फवाऱ्याच्या रूपाने कापडावर रंग उडविण्यात येतो आणि रंग उडविणाऱ्या पिस्तुलाशिवाय इतर काहीच यंत्रसामग्रीची जरूर पडत नाही. नक्षी कापलेले कागद किंवा पत्रे कापडावर ठेवून त्यावर ही छपाई होते. हीत उत्पादन कमी होत असल्याने केवळ विशेष परिणाम मिळविण्याकरिता ही पद्धत उपयोगाची असते.
(आ) फ्लॉकची छपाई : या पद्धतीत रंग छापण्याऐवजी बारीक कापलेले रेशमी तंतू चिकटवले जातात. फ्लॉक पांढरा किंवा रंगीत वापरता येतो. कापडावर प्रथम बंधक छापून त्यावर स्थिर विद्युत् भाराच्या साहाय्याने फ्लॉकचा थर देतात व नंतर उष्णतेने तो बंधकाशी कापडावर पक्का जोडतात. जेथे बंधक नसेल तेथे फ्लॉक चिकटत नाही. छापलेली जागा दिसण्यात व स्पर्शाला मखमलीप्रमाणे असते. नक्षी छापण्याऐवजी कधीकधी सबंध कापडावर फ्लॉकची छपाई करून त्याला मखमलीचे रूप देतात.
कापडावर छपाई केल्यानंतर लगेच कापड सुकवितात. त्यामुळ रंग मिसळत नाहीत अथवा रंगाचे डाग पडत नाहीत. त्यानंतर जरूरीप्रमाणे छापलेल्या कापडाचे बद्धीकरण (पक्के चिकटविणे) आणि धुलाई करतात.
छपाईच्या काही प्रक्रिया
रंगाचा प्रकार |
घटकांचे प्रमाण |
छपाईचा प्रकार |
कापडाचा प्रकार |
प्रक्रिया |
सरळ रंग |
२५ ग्रॅ. रंग, १५० ग्रॅ. यूरिया, ४६० ग्रॅ. पाणी, ३५० ग्रॅ. इंडाल्का गोंद (६% विद्राव), १५ ग्रॅ. डाय सोडियम फॉस्फेट सर्व मिळून १ किग्रॅ. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापल्यावर कापड सुकविणे, पाऊण ते एक तास वाफवणे, वाहत्या थंड पाण्यात धुणे. |
व्हॅट रंग |
१०० ग्रॅ. रंग (लापशीला योग्य), १५० ग्रॅ. पाणी, ६५० ग्रॅ. पोटॅश स्टॉक थिकनिंग [स्टॉर्चपाणी, ग्लिसरीन, ब्रिटिश आणि ट्रॅगकांथ गोंद (६% विद्राव), पोटॅशियम कार्बोनेट-सर्व मिळून १ किग्रॅ.], १०० ग्रॅ. सोडियम सल्फॉक्सिलेट फॉर्माल्डिहाइड सर्व मिळून १ किग्रॅ. यातील सोडियम सल्फॉक्सिलेट फॉर्माल्डिहाइडाचे प्रमाण वाढविल्यास हा रंगप्रकार विसर्जन पद्धतीसाठीही वापरता येतो. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापणे, कोरड्या हवेत काळजीपूर्वक सुकविणे, ५-१० मिनिटे हवारहित पक्वकात वाफवणे, गार पाण्यात धुणे, हायड्रोजन पेरॉक्साइड व ॲसिटिक अम्लामधून काढणे आणि नंतर उकळत्या पाण्यात धुणे. |
इंडिगोसोल रंग |
१०० ग्रॅ. रंग, ५०-१०० ग्रॅ. यूरिया, २७५-३५० ग्रॅ. पाणी, ५०० ग्रॅ. स्टार्च- ट्रॅगकांथ थिकनिंग ५०-१०० ग्रॅ. अमोनियम क्लोरेट (२३० ट्रॅडल घनतेचा विद्राव), २५-५० ग्रॅ. अमोनियम व्हॅनॅडेट (१% विद्राव) सर्व मिळून १ किग्रॅ. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापणे, सुकविणे, ३-५ मिनिटे वाफवणे, प्रथम पाण्यात व नंतर उकळत्या साबणाच्या पाण्यात धुणे (या रंगासाठी इतर प्रकारची छपाईही वापरतात). |
रॅपिडोजेन रंग |
६० ग्रॅ. रंग, ३३ ग्रॅ. टर्की रेड तेल, ३३० ग्रॅ. कोमट पाणी, ३० ग्रॅ. दाहक सोडा (६६० ट्रॅडल घनतेचा विद्राव), ५५० ग्रॅ. स्टॉर्च-ट्रॅगकांथ थिकनिंग सर्व मिळून १ किग्रॅ. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापणे, सुकविणे, ॲसिटिक अम्लाच्या वाफेत ५ मिनिटे वाफवणे, प्रथम गरम पाण्यात आणि नंतर उकळत्या साबणाच्या पाण्यात धुणे. |
रॅपिड फास्ट रंग |
७० ग्रॅ. रंग, २० ग्रॅ. स्पिरिट, ४० ग्रॅ. टर्की रेड तेल, २५० ग्रॅ. पाणी, २० ग्रॅ. दाहक सोडा (६६० ट्रॅडल घनतेचा विद्राव), ६०० ग्रॅ. स्टार्च-ट्रॅगकांथ थिकनिंग सर्व मिळून १ किग्रॅ. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापणे, २४-२८ तास टांगून ठेवणे, ॲसिटिक अम्लाच्या विरल विद्रावात धुणे, नंतर उकळत्या साबणाच्या पाण्यात धुणे. |
विक्रियाशील रंग |
५० ग्रॅ. रंग, १०० ग्रॅ. यूरिया, २७० ग्रॅ. पाणी, ५५० ग्रॅ. सोडियम अल्जिनेट (५% विद्राव), ३० ग्रॅ. सोडियम बायकार्बोनेट सर्व मिळून १ किग्रॅ. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापणे, सुकविणे, ८-१० मिनिटे वाफवणे, प्रथम थंड पाण्यात, नंतर गरम पाण्यात व शेवटी साबणाच्या उकळत्या पाण्यात धुणे. कोरड्या उष्णतेने बद्धीकरण करावयाचे असल्यास यूरियाचे प्रमाण वाढवावे, वाफवण्याऐवजी १४० – १५०० से.तपमानात ५ मिनिटे ठेवणे, धुण्याची क्रिया वरीलप्रमाणे करावी. |
रंगद्रव्ययुक्त रंग |
७० ग्रॅ. रंग (लापशी प्रकारचा), ८५० ग्रॅ. बंधक स्टॉक थिकनिंग (१०० ग्रॅ. बंधक, १०० ग्रॅ. पाणी, ७५० ग्रॅ. केरोसीन, ५० ग्रॅ. गोंदाचा विद्राव-सर्व मिळून १ किग्रॅ.), ४० ग्रॅ. पाणी, ४० ग्रॅ. अमोनियम नायट्रेट (२५% विद्राव) सर्व मिळून १ किग्रॅ. |
सरळ छपाई |
सुती कापड |
छापणे, सुकविणे, १४० – १५०० से. तपमानात ५ मिनिटे तापविणे, धुण्याची जरूरी नाही. |
बद्धीकरण : कापडावर लावलेला रंग बद्ध करण्याच्या क्रियेला बद्धीकरण म्हणतात. नॅप्था लावलेल्या कापडावर लवणाची छपाई होते, तिला वेगळे बद्धीकरण लागत नाही. रॅपिड फास्ट व इंडिगोसोल या जातीच्या रंगांना उष्ण्तेची गरज नसते. छपाई केलेले कापड दिवसभर सुती कापडावरील छपाईच्या वरील प्रक्रियांमध्ये आवश्यक तो थोडाफार फरक करून त्या प्रक्रिया व्हिस्कोज रेयॉनवरील छपाईवरील छपाईसाठी वापरतात.
ठेवून अनुक्रमे सौम्य अम्ल आणि सोडियम नायट्राइट व सौम्य अम्ल यांत बुडवून काढले की रंग पक्के बसतात. विशेष प्रकारचे बंधक वापरून केलेल्या रंगद्रव्याची छपाईही नेहमीच्या तपमानावर किंवा फार तर इस्त्री फिरवून बद्ध करता येते. परंतु बव्हंशी छपाई बद्ध करण्यासाठी उष्णतेची गरज पडते.
रंगद्रव्यांच्या (रंगातील मुख्य घटकांच्या, पिगमेंटच्या) छपाईत मुख्यत्वेकरून कोरडी उष्णता वापरतात. यासाठी उपयोगात येणाऱ्या भट्टीमध्ये गरम हवेच्या किंवा विजेच्या साहाय्याने १५०० से. च्या आसपास तपमान ठेवण्यात येते. छपाई केलेले कापड एका बाजूने आत शिरते व काही मिनिटांनी दुसऱ्या बाजूने बाहेर पडते. यंत्राचा वेग कमीजास्त करून कापडावरील उष्णतेच्या क्रियेचा वेळ कमीजास्त करता येतो. जितके उष्णतामान जास्त तितका क्रियेचा वेळ कमी पुरतो. विक्रियाशील रंगांचे बद्धीकरणही कोरड्या उष्णतेच्या साहाय्याने करणे शक्य असते. टेरिलीनसारख्या पॉलिएस्टर कापडावरची छपाई पण कोरड्या उष्णतेने बद्ध करण्यात येते. यासाठी २००-२१०० से. इतक्या अधिक तपमानाची जरूरी असते.
विसर्जन रंग |
५० ग्रॅ. रंग, ३५० ग्रॅ. पाणी, ३०० ग्रॅ. अरेबिक गोंद (५% विद्राव), ३०० ग्रॅ. क्रिस्टल गोंद (३३% विद्राव) सर्व मिळून १ किग्रॅ. |
विसर्जन छपाई |
ॲसिटेट रेयॉन नायलॉन |
छापणे, सुकविणे, ४५ – ६० मिनिटे वाफविणे, प्रथम थंड पाण्यात व नंतर साबणाच्या कोमट पाण्यात धुणे. |
अम्ल रंग |
३० ग्रॅ. रंग, ७० ग्रॅ. थायोयूरिया, ४० ग्रॅ. फिनॉल, २०० ग्रॅ. पाणी, ५०० ग्रॅ. क्रिस्टल गोंद (३३% विद्राव), १६० ग्रॅ. अमोनियम सल्फेट (२५% विद्राव) सर्व मिळून १ किग्रॅ. |
विसर्जन छपाई |
नायलॉन |
छापणे, उष्णता देऊन लवकर सुकविणे, १० – १५ मिनिटे वाफविणे. प्रथम थंड पाण्यात आणि नंतर साबणाच्या कोमट पाण्यात धुणे. |
५० ग्रॅ. रंग, ३५० ग्रॅ. पाणी, ३०० ग्रॅ. अरेबिक गोंद (५०% विद्राव), ३०० ग्रॅ. क्रिस्टल गोंद (३३% विद्राव) सर्व मिळून १ किग्रॅ. |
विसर्जन छपाई |
पॉलिएस्टर |
छापणे, सुकविणे, २०५ – २१०० से. तपमानात४५ – ६० सेकंद ठेवणे, प्रथम थंड पाण्यात आणि नंतर साबणाच्या गरम पाण्यात धुणे. |
|
इंडिगोसोल रंग |
रोध लापशी तयार करण्यासाठी २०० ग्रॅ. सोडियम थायोसल्फेट (स्फटिक), २७५ ग्रॅ. पाणी, ५०० ग्रॅ. अरेबिक गोंद (५०% विद्राव), २५ ग्रॅ. झिंक ऑक्साइड सर्व मिळून १ किग्रॅ. |
रोध छपाई |
सुती कापड |
पश्चात रोध पद्धत : रंगाचा विद्राव पॅडिंग मँगलने कापडावर लावणे, सुकविणे, रोध लापशी छापणे, विरल सल्फ्यूरिक अम्लाच्या विद्रावातून नेणे, पाण्याने धुणे, साबणाच्या उकळत्या पाण्यात धुणे. |
इंडिगोसोल रंग |
रंगाच्या विद्रावासाठी १० ग्रॅ. रंग, ९०० ग्रॅ. पाणी, १० ग्रॅ.सोडा ॲश (१०% विद्राव), ६० ग्रॅ. ट्रॅगकांथ गोंद (६% विद्राव), २० ग्रॅ. सोडियम नायट्राइट सर्व मिळून १ किग्रॅ. |
रोध छपाई |
सुती कापड |
पूर्वरोध पद्धत : रोध लापशी छपाई प्रथम, सुकल्यावर रंगाचा विद्राव निप्-पॅडिंगने लावणे, अम्ल क्रिया व धुणे वरीलप्रमाणे (ट्रॅगकांथ गोंदाचे प्रमाण २५० पर्यंत वाढवावे.) रोध लापशी छपाईच्या जागचा भाग पांढरा होतो. |
विक्रियाशील रंग |
रोध लापशीसाठी ५० ग्रॅ. अमोनियम क्लोराइड, २५० ग्रॅ. पाणी, ७०० ग्रॅ. अरेबिक गोंद (५०% विद्राव): सर्व मिळून १ किग्रॅ. रंगाच्या विद्रावासाठी ३० ग्रॅ. रंग, ५० ग्रॅ. यूरिया, ८०० ग्रॅ. पाणी, १०० ग्रॅ. सोडियम अल्जिनेट (५% विद्राव), २० ग्रॅ. सोडियम बायकार्बोनेट सर्व मिळून १ किग्रॅ. |
रोध छपाई |
सुती कापड |
रोध लापशी, छापणे, सुकविणे, रंगाचा विद्राव निप्-पॅडिंगने लावणे, सुकविणे, ८ – १० मिनिटे वाफवणे, थंड पाण्यात, गरम पाण्यात व साबणाच्या उकळत्या पाण्यात धुणे. रोध लापशी छपाईच्या जागचा भाग पांढरा होतो. |
वरील प्रकार वगळता बहुसंख्य रंगांच्या बद्धीकरणासाठी उष्णतेबरोबर पाण्याचा अंश लागतो आणि त्याकरिता वाफेचा उपयोग केला जातो. उत्पादन थोडे असेल किंवा वाफवण्याचा वेळ जास्त असेल, तर अशा खंडित पद्धतीची सामग्री सोईची असते. या पद्धतीत पुरेसे वाफवून झाल्यावर वाफ थांबवून बाष्पित्र (बॉयलर) उघडतात व आतील कापड काढून दुसरे ठेवून पुन्हा वाफ सुरू करतात. याउलट वाफवण्याचा वेळ ८-१० मिनिटांपेक्षा जास्त नसेल, तर अखंड चालणारी सामग्री जास्त सोयीची असते. यात कापड एका बाजूने आत शिरते व वाफवून झाल्यावर दुसऱ्या बाजूने बाहेर पडते. यंत्राचा वेग कमीजास्त करून वाफवण्याचा वेळ कमीजास्त करता येतो. रॅपिडोजेन रंगाच्या बद्धकरणाकरिता वाफेबरोबर ॲसिटिक अम्लाची वाफ सोडण्यात येते. सतत वाफवण्याकरिता इतरही अनेक प्रकारची सामग्री उपलब्ध आहे. साध्या पक्ककात तपमान १०१-१०२० से. असते, परंतु नवीन पद्धतीच्या फ्लॅश पक्ककामध्ये १२५-१३०० से. पर्यंत तपमान जाऊ शकत असल्याने बद्धीकरणाचा वेळ पुष्कळच कमी करता येतो आणि उत्पादन त्या प्रमाणात वाढते.
धुलाई : रंगद्रव्याशिवाय इतर सर्व रंगांच्या छपाईत बद्धीकरणानंतर कापड धुवावे लागते. छपाईच्या लापशीमध्ये रंगाव्यतिरिक्त इतर रसायने व दाटपणासाठी गोंद वापरलेला असतो. ते पदार्थ व बद्ध न झालेला रंग हे कापडातून सर्व धुवून काढणे आवश्यक असते. व्हॅट, नॅप्था आणि तत्सम म्हणजे इंडिगोसोल, रॅपिडोजेन वगैरे प्रकारच्या रंगांची छटा दिसण्यासाठी कापड उकळत्या साबणाच्या पाण्यातून काढावे लागते. या उलट कच्च्या रंगाची धुलाई गार किंवा कोमट पाण्यात करतात. यासाठी सिमेंटच्या उथळ टाक्या सोयीच्या असतात. गरम किंवा उकळत्या पाण्याने धुलाई करावयाची असल्यास रंगाईसाठी वापरण्यात येणारी जिगर, विंच (रहाट) वगैरे यंत्रे उपयोगी पडतात. अखंड धुलाई करावयाची असल्यास खुले साबणयुक्त यंत्र वारण्यात येते. याला आठ किंवा दहा कप्पे असतात आणि त्यात जरूरीप्रमाणे थंड पाणी, गरम पाणी, साबणाचे पाणी वगैरे खेळते ठेवण्याची व्यवस्था असते. थोड्या वेळात उत्तम धुलाई अखंडपणे व्हावी यासाठी इतरही अनेक प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध आहे.
दाटपणा आणणारे पदार्थ : छपाईच्या लापशीला दाटपणा आणण्यासाठी तिच्यात गोंद किंवा तत्सम पदार्थ वापरावे लागतात. त्यांच्यावर लापशीतील अम्ल, क्षार (अल्कली) किंव इतर रसायनांचा परिणाम होऊ नये अशा प्रकारे या पदार्थांची निवड करतात. अम्ल नसलेल्या लापशीत स्टार्चचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नुसत्या स्टार्चची लापशी चिकट होते व ती नीट पसरत नाही म्हणून तिच्यात ट्रॅगकांथ डिंक पूर्वी घालीत. याची आयात कमी झाल्याने सध्या त्याऐवजी गवारीच्या बियांपासून काढलेला गोंद प्रचारात आहे. विक्रियाशील रंगांच्या छपाईत सोडियम अल्जिनेट वापरतात कारण त्याचा अशा रंगांशी संयोग होत नाही. बाभळीपासून निघाणरा अरेबिक डिंक कृत्रिम तंतूंच्या कापडावर छपाई करण्यास उपयोगी पडतो.
स्टार्चवर विक्रिया करून त्याचे गुणधर्म थोडे बदलता येतात. स्टार्च भाजून बनविलेला ब्रिटिश गम किंवा डेक्स्ट्रीन पूर्वीपासून प्रचारात आहे, परंतु रासायनिक विक्रिया करून बनविलेले स्टार्च-ईथरसारखे पदार्थही छपाईसाठी आता वापरले जातात. त्याचप्रमाणे सेल्युलोजवर रासायनिक विक्रिया करून बनविलेला कार्बॉक्सिमिथिल सेल्युलोज व त्यासारख्या इतर पदार्थांचा वापर छपाईमध्ये होऊ लागला आहे. काही ठिकाणी तेथील स्थानिक वनस्पतिजन्य गोंदाचा वापर करण्यात येतो, पण ते कमी महत्त्वाचे होय.
छपाईमध्ये वापरावयाच्या रंगप्रकारानुसार छपाईच्या प्रक्रियांची माहिती मागील कोष्टकात दिली आहे.
संदर्भ :- 1. Biegeleisen, J. I. Silk Screen Printing Production, New York, 1963.
2. Biegeleisen, J. I. Cohn, M.A. Silk Screen Techniques, New York, 1958.
3. Diserens, L. The Chemical Technology of Dyeing and Printing, 2.Vols., New York, 1958.
4. Hall, A. J. A Handbook of Textile Dyeing and Printing, London, 1955.
5. Knecht, E. Fothergill, J. B. The Principles and Practice of Textile Printing, London, 1952.
6. Lauterburg, L. Fabric Printing, New York, London, 1963.
चितळे अ. ग. ओक, वा. रा.
“