कानफाटे : शैव मतानुयायी बैराग्यांचा एक पंथ. त्यांना गोरख पंथी, गोरखनाथी व दर्शनी अशीही नावे आहेत. या पंथाचा उगम केव्हा व कसा झाला पंथ स्थापक कोण व पंथाचे तत्वज्ञान काय आहे, ह्याबाबत निश्चित माहिती मिळत नाही. गोरखनाथाचा आजेगुरू आदिनाथ याने हा पंथ स्थापिला असे कानफाटे सांगतात. कानफाटे कानाची पाळी चिरून त्यांत मोठ्या कड्या घालतात, म्हणून त्यांना `कानफाटे’ म्हटले जाते. ह्या कड्या घालण्याच्या विधीला `मुद्राविधी’ म्हणतात. लाकूड, धातू किंवा हरणाच्या शिंगापासून ह्या कड्या तयार करतात. गोपीचंदाची व भर्तृहरीची गाणी म्हणत व कुका नावाचे एकतारी वाद्य वाजवीत ते भिक्षा मागतात. जोगी किंवा नाथ ह्या नावांनीही ते ओळखले जातात. ते मेखला, कौपीन, व्याघ्रांबर, खडावा व विभूति वापतात. भिक्षा मागताना `आलख’ व `आदेश’ असा ते उद्घोष करतात.
कानफाटे सर्व भारतभर पसरलेले दिसतात. गुजरात मधील कच्छच्या रणात तसेच कर्नाटकात व महाराष्ट्रात त्यांची विशेष वस्ती आहे. ते जातपात मानीत नाहीत. मद्य-मांसादी ते सेवन करतात. काही मठातही राहतात. कर्नाटकातील व महाराष्ट्रातील कानफाटे भिक्षा मागताना हातात त्रिशूळ धारण करतात. काही कानफाटे डमरूही बाळगतात. म्हणून त्यांना डौरी (डमरू) गोसावी म्हणतात. कालभैरव, भैरवनाथ, बालासुंदरी ही त्यांची स्थानपरत्वे उपास्य दैवते आहेत.
संदर्भ: Briggs, G.W. Gorakhnath and the Kanphata Yogis, Calcutta, 1938.
सुर्वे, भा.ग.