कादंबरी – १: एक दीर्घ कथात्मक गद्य साहित्यप्रकार. इंग्रजी `नॉव्हल’ या संज्ञेचा `कादंबरी’ हा मराठी पर्याय असून तो बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत कथात्मक ग्रंथनामावरुन मराठीत रुढ झाला. महाराष्ट्र भाषेचा कोश (१८२९) यात `कादंबरी’ या संज्ञेचे अर्थ, (१) `निर्मूल कथा रचून कवीने एक काव्य केले’ (२) (लाक्षणिक) `कल्पित कादंबरी’, असे दिले आहेत. `नॉव्हल’ ही संज्ञा मूळ लॅटिन `नॉव्हस’ (Novus ) म्हणजे `नावीन्यपूर्ण’ आणि त्याच्या `नॉव्हेला’ (Novella) या इटालियन रुपावरुन इंग्रजीत आली. इंग्रजी साहित्यात कादंबरीचा उगम अठराव्या शतकाच्या मध्यास झाला व भारतीय साहित्यात तो इंग्रजी कादंबऱ्यांच्या नमुन्यावर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झाला.

वर दिलेल्या वर्णनाव्यतिरिक्त या साहित्यप्रकाराची काटेकोर व्याख्या, वर्गीकरण, वर्णन वगैरे करणे कठीण आहे कारण मानवी अनुभवसृष्टी, कल्पनाविश्व आणि त्यांचा बाह्य परिसर यांतील हरतऱ्हेची विविधता, वैचिष्य, बहुजिनसीपणा, विपुलता आणि अनेकार्थकता ही या प्रकारात आजवर व्यक्त होत आली आहेत. या अनेकविध आशयांनुरुप कादंबरीची रचनाही बदलत राहिल्याने महाकाव्यादी इतर साहित्यप्रकारांप्रमाणे कादंबरीचे एकच एक तंत्र किंवा नियम निश्चित होऊ शकले नाहीत.

तथापि कादंबरीची काही लक्षणे स्लमानाने सांगता येणे शक्य आहे : गद्याचे माध्यम आणि विस्तारपरता ही तिची उघड लक्षणे. कादंबरीत जीवनाचे चित्रण असते, त्याचा आवाका मोठा असतो व ते जीवनाचा सत्याभास निर्माण करण्याइतपत वास्तवपूर्ण ठरण्यासाठी विशिष्ट प्रकारे संघिअत केले जाते. कादंबरीसकट सगळयाच साहित्यप्रकारांत जीवनविषयक आशयाची अशा जी संघटना आढळते, ती प्रतिभाशक्तीचे कार्य होय. कादंबरीचे स्वरुप कथात्मक असते याचा अर्थ, तिच्यात कथानकालाच प्राधान्य असते असा नसून, तिच्यात व्यक्तिजीवनाच्या संदर्भातील कृतिप्रसंग अपरिहार्य असतात आणि त्यांमागील काही एक कार्यकारणभाव, सुसंगती किंवा प्रेरक सू़त्र तीत महत्वाचे असते, असा आहे. वास्तव जीवनाचा आशय कमीअधिक गुंतागुतीच्या कथानकाव्दारे जसा कादंबरीत व्यक्त होऊ शकतो, तसाच तो लेखकाचा द्दष्टिकोन, विचार, तत्व किंवा कल्पना यांना सूचित वा सुस्पष्ट करण्यासाठीही प्रकट होऊ शकतो. कादंबरीतील कथानक हेदेखील कृतिप्रंसगांना प्राधान्य देऊन अथवा कृतिप्रसंगांशी संबध्द असलेल्या पात्रांच्या चित्रणाला महत्व देऊन घडविले जाते. कथानक, व्यक्तिचित्रण, लेखकाचा दृष्टिकोन व यांना अनुरुप अशी निवेदनतंत्रे, वर्णने, वातावरणनिर्मिती,शैली, इ. घटकांनी गद्यात विस्तृतपणे संघटित केलेले वास्तव जीवनाचो चित्रण म्हणजे कादंबरी होय.

कादंबरीचे हे सर्वसामान्य स्वरुप हळूहळू उत्क्रांत झाले आहे : वास्तवतेचा पुरस्कार केल्याने मानवी व्यवहाराची जी स्वाभाविक अशी गद्य भाषा असते, तिचा कादंबरीने स्वीकार केला. प्राचीन साहित्य प्रकारांना संरक्षण, संवर्धन व प्रसार यांसारख्या अनेक व्यावहारिक दृष्टींनीही पद्याचे माध्यम इष्ट ठरले उलट मुद्रणकलेच्या, वृत्तपत्रसृष्टीच्या व वाचकवर्गाच्या वाढीमुळे, तसेच कादंबरी ही मुख्यतःखाजगीपणे वाचनासाठीच निर्माण झाल्याने, तिला गद्य माध्यम परिपोषक ठरले.

खाजगी वाचनासाठीच निर्माण झालेल्या या प्रकाराचा विस्तार किती असावा, हे ठरविणेही बरेचसे अवघड आणि अनावश्यक आहे : नाटकासारख्या प्रकाराला प्रायोगिक दृष्टीने असतात, तशा कोणत्याच मर्यादा कादंबरीच्या विस्ताराला नसतात. तिचा आशयच तिच्या विस्ताराची मर्यादा निश्चित कतो. मार्सेल प्रूस्त या फ्रेंच कादंबरीकाराच्या कादंबरीमालेची (इ.भा. रिमेंबरन्स ऑफ थिंग्ज पास्ट, १९२२ ते ३२) शब्दसंख्या २०,००,००० आहे. एकाहून अधिक खंडांत प्रसिध्द झालेल्या कादंबऱ्याही आढळून येतात. सामान्यतः कादंबरीची शब्दसंख्या ५०,००० च्या आसपास असली, तरी त्याहूनही कमी विस्ताराच्या कादंबरिकाही आढळून येतात. नियतकालिकांतून क्रमशः प्रसिध्द होण्यानेदेखील कांदबरीचा विस्तार कमीअधिक होऊ शकतो.

गद्यात्मकता आणि विस्तारक्षमता यांप्रमाणेच कादंबरीत व्यक्तिजीवनाभिमुखता व वास्तवता हे घटक आढळतात त्यांची पार्श्वभूमीही पश्चिमी साहित्याच्या संदर्भात लक्षात घेणे उद्बोधक ठरते : पश्चिमी साहित्यात बाराव्या शतकापासून फ्रेंच व नंतर इंग्रजी व अन्य यूरोपीय भाषांत गद्यपद्य⇨रोमान्स निर्माण झाले. चौदाव्या शतकापासून इटलीत आणि फ्रान्समध्ये नॉव्हेला हा कथाप्रकार उदयास आला. बोकाचीओने हया काळात लिहिलेल्या व देकॉमेरॉन मध्ये संगृहीत केलेल्या कथांना नॉव्हेलाच म्हणतात. सोळाव्या शतकापासून विशेषतः स्पॅनिश नमुन्यावर सर्व यूरोपीय साहित्यांत पिकेस्क हा कादंबरीप्रकार उदयास आला. मध्ययुगीन फ्रान्समध्ये फॅब्लो हा पद्यकथांचा प्रकारही लोकप्रिय होता. या पूर्वकालीन कथासाहित्यात कादंबरीची कच्ची सामग्री होती परंतु त्या सामग्रीचे संघटन कादंबरीहून वेगळया प्रकारे केले जाई. रोमान्समध्ये शिलेदारी युगाचा आणि कल्पनारम्य प्रेमाचा आदर्शवाद महत्वाचा होता. पिकरेस्क कादंबरीत सर्वसामान्य वर्गातील नायकाच्या उपद्व्यापांचे आणि साहसांचे वर्णन असले, तरी त्यात कल्पिताच्या तत्वाला वास्तवाच्या तपशीलाहून अधिक महत्व होते. तसेच हे कथासाहित्य मुख्यतः गोष्टीरुप होते व त्यात व्यक्तिचित्रणाला गौण स्थान होते. गोष्टी, प्रसंग किंवा घटना आणि वास्तवाचा तपशील यांना एका व्यापक पातळीवर संघटित करण्याचे तत्व या कथाप्रकारांना सापडले नव्हते. कादंबरीला असे तत्व व्यक्तिचित्रणात किंवा स्वभावदर्शनात सापडले. व्यक्तिजीवनाचा त्याच्या सर्व प्रकाराच्या अंतर्बाहय परिसराच्या पार्श्वभूमीवर शोधबोध घेण्याचा प्रयत्न कांदबरी करु लागली व त्यामुळे उपर्युक्त पूर्वकालीन कथासाहित्याचे सर्व प्रकारचे तपशील कादंबरी नावाच्या संघटनेत नव्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरु लागले. उदा., डॅन्यल डीफोची रॉमिन्सन क्रूसोसारखी (१७१९) कल्पनारम्य कादंबरी तिच्यातील आत्मपरता व प्रतीकतेमुळे किंवा हरिभाऊ आपटे यांची वज्राघात(१९१५) ही दंतकथाधिष्ठित ऐतिहासिक कादंबरी तिच्यातील व्यक्तिचित्रणामुळे व एकात्म संघटनेमुळे कादंबरी या संशेस पात्र ठरतात. लॉरेन्स स्टर्नची द लाइफ ॲड ओपिनियन ऑफ ट्रिस्ट्रम शॅंडीसारखी(१७६०-६७) पिकरेस्क प्रकारवजा कादंबरीही जुन्या कथासामग्रीचे नवे संघटन दिग्दर्शित करते.

सर्व्हॅंटीझच्या डॉन क्किक्झोट (दॉन किहोते दोन भाग -१६१५) कादंबरीत पूर्वकालीन कथाप्रकाराचे विडंबन केलेले आहे त्यातून आधुनिक कादंबरीच्या स्वरुपाची काही अंगे सूचित होतात. वास्तवता आणि आदर्श यांतील कलह, व्यक्तिसंबंधांचा शोधबोध व त्यासाठी मानवी स्वभावाचे केलेले विश्लेषण ही त्यापैकी काही ठळक अंगे होत.

व्यक्तिचित्रण आणि वास्तवता यांचे अधिष्ठान लाभून कादंबरीला जी पृथगात्मता प्राप्त होऊ लागली होती, त्याची कारणे अठराव्या शतकाचया वैचारिक वातावरणातही दडलेली होती. तो काळ विवेकवादाचा किंवा ज्ञानयुगाचा होता. वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती वेगाने होत होती. त्यामुळे त्या काळज्ञत वास्तव आणि कल्पित, प्रत्यक्ष आणि आदर्श, व्यक्ती आणि समाज यांच्यातील भेद अधिक स्पष्ट झाला. रोमान्ससारख्या पूर्वप्रकारातील कल्पनारम्यता, आदर्शवाद,व्यक्तिचित्रणाची पुसटता यांसारख्या विशेषांना पुरस्कृत करणे कांदबरीला अवघडच होते. कारण हा व्यक्तिवादाचया उदयाचा काळज्ञ होतो. त्यामुळे आत्मचरित्र व अन्य व्यक्तिचे चरित्र कल्पनाशक्तीने संघटित करुन मांडण्याकडे कादंबरीचा कल असणे स्वाभाविक होते. डॅन्यल डीफो, रिचर्डसन, फील्डिंग, स्मॉलिट, स्टर्न, गोल्डस्मिथ्ज्ञ यांसारख्या सुरुवातीच्या इंग्रजी कांदबरीकारांच्या बहुसंख्या कांदबऱ्याची नावेही व्यक्तिवाचक आहेत, हे लक्षणीय आहे. उदा., रॉबिन्सन कूसो, प्लॅरिसा(१७४७-४८), टॉम जोन्स(१७४९), रॉडरिफ रॅंडम (१७४८), ट्रिस्ट्रम शॅंडी व द व्हिकार ऑफ वेकफील्ड(१७६६). प्रत्यक्ष जीवनात खाजगी पत्रे, आठवणी, रोजनिश्या, आत्मनिवेदने यांसारख्या ज्या प्रकारांनी व्यक्ति आपले मनोगत व्यक्त करते, त्या प्रकांराचा कादंबरीत सहेतुकपणे उपयोग करण्यात आला. इंग्रजी कादंबरीकार रिचडर्‌संन याची पामेला(१७४०) ही कादंबरी पत्रात्मक आहे आणि हरिभाऊ आपटयांची पण लक्ष्यांत कोण घेतो? (१८९३) ही मराठीतील पहिली महत्वाची सामाजिक कादंबरी आत्मनिवेदनात्मक आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धत पश्चिमी जगात सरंजामशाहीचे वर्चस्व नष्ट झाले व व्यापारी वर्गाबरोबरच नागरी मध्यमवर्ग राजकीय व सामाजिक क्षेत्रांत प्रभावी ठरु लागला. या मध्यमवर्गाने कादंबरीची अंतर्बाहय जडणघडण घडवून आणली. कादंबरीचा लेखकवर्ग आणि वाचकवर्गही त्याच वर्गातून निर्माण होऊ लागला. साहजिकच सर्वसामान्य जीवनाच्या चित्रणाला कादंबरीत महत्व प्राप्त झाले.


कादंबरीच्या उत्क्रांतीत आणखी एक टप्पा महत्वाचा आहेः विस्तृत जीवनपटाचे अर्थपूर्ण दर्शन घडविणाऱ्या सुरुवातीच्या कादंबरीकारांसमोर प्राचीन महाकाव्यांचा नमुना होता. प्रसिध्द इंग्रजी कादंबरीकार फील्डिंग याने आपल्या जोसेफ ॲड्रज(१७४२) या कादंबरीचे वर्णन `ए कॉमिक एपिक इन प्रोज’ असे केले आहे. विस्तारक्षम आणि सर्वविषयक्षम अश नवोदित कादंबरीप्रकाराची तुलना महाकाव्यासारख्या प्रकाराशी केली जाणे, त्या सुरुवातीच्या काळात तरी स्वाभाविक होते. या दोन प्रकारांतील भिन्नता उघड आहे. तथापि कादंबरीकाराची महाकवीची महत्वाकांक्षा किंवा कादंबरीची महाकाव्यास अनुसरण्याची महत्वाकांक्षा यांस कादंबरीच्या पृथगात्मक स्वरूपाची जी जडणघडण होऊ पाहात होती त्या दृष्टीने महत्व आहे. महाकाव्यातील आदर्शवाद सामाजिक वास्तवाच्या अधिष्ठानावरच उभा असतो. त्याच्यातील अनेकपदरी कथानक आणि अनेक परींचे व्यक्तिचित्रण यांत मानवी स्वभावाच्या शोधाबोधाची प्रवृत्ती असते आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने महाकाव्याला व्यापक महत्व असते. कादंबरी या साहित्यप्रकाराने या विशेषांच्या बाबतींत स्वतःच्या मर्यादांत महाकाव्याशी समांतरत्व राखले आहे. टॉलस्टॉयच्या वॉर ॲन्ड पीस (१८६६) किंवा जेम्स जॉइसच्या यूलिसीज (१९२२) यांसारख्या कादंबऱ्यांना गौरवाने `एपिक’ कादंबऱ्या म्हणण्याचा जो प्रघात आहे, तो लक्षणीय आहे. या विवेचनावरून कादंबरी या साहित्यप्रकाराचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य कोणत्या पार्श्र्वभूमीवर सिद्ध झाले, याची कल्पना येऊ शकेल.

या पार्श्वभूमीतच कादंबरीच्या प्रकृतीत वास्तवाभिमुखता राखण्याचा गुण होता. या वास्तवभि मुखतेमुळेच कादंबरी एक बहुपैलू व अतिपरिवतनशील साहित्यप्रकार ठरला. गेल्या दोनशेहून अधिक वर्षांत कादंबरीचे हे प्रकृतिविशेष अधिकाधिक स्पष्ट होत गेले. याची दोन प्रमुख कारणे होतीः एक म्हणजे जीवनाचे, विशेषतः व्यक्तिजीवनाचे, बदलते स्वरूप् व अर्थ आणि दुसरे म्हणजे त्याचा गांभीर्याने आविष्कार करू पाहणारे प्रतिभावंत कादंबरीकार. आपणास असेही म्हणता येईल, कि ज्यांना जीवनाकडे कलात्मक गांभार्याने पाहता आले, त्यांना त्यांना जीवनचित्रणासाठी कादंबरी हा साहित्यप्रकार सुलभ व सतर्थ वाटला. द पिलग्रिम्स प्रोग्रेस (१६७८) लिहिणारा जॉन बन्यन हा पहिला कादंबरीकार व यमुनापर्यटन (१८५७) ही पहिली मराठी कादंबरी लिहिणारे बाबा पदमनजी या सुरूवातीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या व पेशाच्या कादंबरीकारांपासुन तो थेट या शतकातील मानवी अनुभवांचा सामान्यतः तात्त्विक, नैतिक, लैंगिक, सामाजिक, मानसिक इ. स्वरूपाचा अर्थ समजून घेणाऱ्या व समजावून सांगणाऱ्या अनेक कादंबरीकारापर्यंत, मानवी जीवनाकढे गंभीरपणे पाहण्याची आणि जे पाहिले, त्याची कादंबरीतून अभिव्यक्ती साधण्याची एक ठळक प्रवृत्ती दिसून येते. जीवनाच्या बदलत्या स्वरूपाचे आणि अर्थाचे वर्णन कलासाहित्याच्या क्षेत्रांत विधि विचारप्रणालींद्वारा केले जाते. स्वप्नरंजन, अद्भुतरम्यता, आदर्शवाद, दृकप्रत्यवाद, स्वच्छंदतावाद, निसर्गवाद, वास्तववाद, अभिव्यक्तिवाद, अतिवास्तववाद, आदिमतावाद, अस्तित्ववाद, मृषावाद वगैरे वादांनी सूचित होणाऱ्या जीवविषयक दृष्टिकोनाचे आणि आशयाचे दर्शन कादंबरीने घडविले आहे. धर्म, इतिहास, समाज, कुटुंब, विज्ञान, इ. क्षेत्रांतील मानवी अनुभवांचे चित्रणही कादंबरीने केले आहे. मनोविश्लेषण आणि काममानसशास्त्र यांनी संशोधित केलेल्या मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे व मार्क्सवादासारख्या विचारप्रणालींनी मांडलेल्या सामाजिक वास्तवाचे अर्थपूर्ण दर्शनही कादंबरीने घडविले आहे. मानवी जीवनाच्या वास्तवतेत जे जे बदल घडत राहिले व अशा बदलांची जी जी वैज्ञानिक आणि तात्त्विक मीमांसा करण्यात आली, त्यांच्या आधाराने कादंबरीने आपली जीवनवर्णनाची उद्दिष्टे अप्रतिहतपणे साध्य करून घेण्याचा प्रयत्न केला. १९५० नंतर तर फ्रान्समध्ये ज्ञानमीमांसेचा तपशील देणारी प्रतिकादंबरी (अँटीनोव्हेल) निर्माण होऊ लागली. थोडक्यात मानवी अनुभव सृष्टीचे व परिसराचे विज्ञान, तंत्रविद्या व मानव्यविद्या यांनी जे जे वास्तव शोधले व मांडले त्या त्या वास्तवांचा आविष्कार कादंबरीने करण्याचा प्रयत्न केला. एका उदाहरणाने हे स्प्ष्ट करता येईलः कादंबरीपूर्व काळात व्यक्तिजीवनाचा अर्थ धार्मिक-नैतिक दृष्टिने सुष्टदुष्टादि साचेबंद परिभाषेत जाणला जाई व त्याच परिभाषेत तो कथासाहित्यात व्यक्तही होई. अठराव्या शतकातील व्यक्तिवादामुळे कुटुंब, समाज, धर्म, राजसत्ता, विज्ञान इ. शक्तिकेंद्रे आकण व्यक्ती यांतील द्वंद्व स्प्ष्ट झाले व त्या .ष्टीने व्यक्तिजीवनाचा बदललेला अर्थ कादंबरीत प्रकट झाला. या शतकातील मानसशास्त्राच्या प्रगतीमुळे व्यक्तीच्या अंतःसृष्टीचे अतिवास्तव व वर्तनाचे अपसामान्य स्वरूप विशद केले व ते कादंबरीतून प्रकट होऊ लागले. काममानसशास्त्राच्या विकासामुळे व्यक्तीच्या लैंगिक वर्तनाचे वास्तवही या साहित्यप्रकारात उमटू लागले. दोन जागतिक महायुद्धांच्या परिणामांमुळे मानवी जीवनाची मूल्येच कोलमडली आणि अस्त्त्विवादासारख्या विचारप्रणालींच्या आधारे स्वत्वहीन आणि सत्वहीन व्यक्तिजीवनाचे चित्रण कादंबरी करू लागली. थोडक्यात केवळ व्यक्तिचित्रण या घटकापुरते पाहिले, तरी कादंबरीतून त्याचे स्वरूप मानवी अनुभवसृष्टीच्या शोधाबोधानुसार कसे बदलत गेले, हे दिसून येईल.

जीवनाशी समांतर राहण्यासाठी एक प्रकारच्या हेतुगांभीर्याने कादंबरीची निर्मिती होणे आवश्यकच होते. सुरूवातीच्या काळात पूर्वकालीन कथासाहित्याचा एक वारसा म्हणून केवळ वाचकांचे मनोरंजन करण्यापुरतेच कादंबरीचे उद्दिष्ट मर्यादित होते. हळूहळू जीवनातील सत्यदर्शनाच्या गंभीर हेतूने कादंबरी निर्माण होऊ लागली. अशा सत्यदर्शनाचे एक साधन म्हणून किंवा प्रतहक अथवा प्रतिमा म्हणून कादंबरीने जुन्या अद्भुताचा आणि नव्या अतिवास्तवाचा उपयोग करून घेतला. जीवनाचे सत्य व त्याचे दर्शन घडविण्याची रीत व्यक्तिपरत्चे बदलते. याला कादंबरीकारही अपवाद नाहीत. स्वानुभवांच्या संदर्भात प्रत्येक कादंबरीकार विविध प्रकारे कादंबरीची रचना करीत असतोः सर वॉल्टर स्कॉट किंवा हरिभाऊ आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांत इतिहासाचे रंतक पुनरूज्जीवन व उदात्तीकरण आढळते, तर टॉलस्टॉय या रशियन कादंबरीकाराच्या वॉर अँड पीससारख्या कादंबरीत किंवा हेमिंग्वे या अमेरिकन कादंबरीकाराच्या फॉर हूम द बेल टोल्स (१९४०) या कादंबरीत एका धामधुमीच्या ऐतिहासिक कालखंडाचे करूणोदात्त, सूक्ष्म चित्रण दिसते. स्वामीसारखी रणजित देसाई यांची कादंबरी ऐतिहासिक व्यक्तिंच्या अंतर्मनांचा प्रत्ययकारी मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. जेन ऑस्टन या इंग्रजी कादंबरीकर्त्रीच्या लेखनात कुटुंबचित्रणाला एक स्वायत्त स्वरूप प्राप्त झाले, तर हरिभाऊ आपट्यांच्या तशा चित्रणाला सामाजिक परिवर्तनाची उद्बोधक पार्श्र्वभूमी लाभली. समाजाच्या उपेक्षित व अभागी वर्गातील व्यक्तिजीवनाचे वास्तव चित्र रेखाटण्याचा प्रयत्न चार्ल्स डिकिन्झ या इंग्रजी कादंबरीकाराने केला, तर अमेरिकन नीग्रो समाजाचे जीवघेणे प्रश्न रिचर्ड राइट (१९०८-१९६०) सारख्या कादंबरीकारानी मांडले. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्या संबंधाचे सत्य, प्रादेशिकतेच्या व नियतिवादाच्या पातळीवर टॉमस हार्डी या इंग्रजी कादंबरीकाराने रंगविले, तर औद्योगिक समाजाच्या पातळीवर निसर्गापासून दूरीकरण झालेल्या मानवाचे व त्याच्या लैंगिक वर्तनाचे वित्रण डी, एच्. लॉरेन्स या इंग्रजी कादंबरीकाराने केले. सत्यदर्शनासाठी फ्रेंच कादंबरीकार एमिल झोला आणि लोबेअर अनुक्रमे निसर्गवादाचा व वास्तववादाचा पुरस्कार करतात. टॉलस्टॉय व डॉस्टोव्हस्की यांसारख्या रशियन कादंबरीकारांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या भौतिक व नैतिक परिसराच्या संदर्भात सूक्ष्म व मूलभूत शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर व्हर्जिनिया वुल्फ, जेम्स जॉइस इ. इंग्रजी कादंबरीकारांनी व्यक्तिच्या अंतर्मनाचा संज्ञाप्रवाहाद्वारा वेध घेण्याचा प्रयत्न केला. हेन्री जेम्स या अमेरिकन कादंबरीकाराने कादंबरीचे अभिव्यक्ति सामर्थ्य प्रयोगपूर्वक परिणत केले. प्रस्थापिताविद्ध निषेधाची व बंडाची भावना जॉन वेनसारख्या कादंबरीकाराने व्यक्त केली, तर अस्तित्ववादी जीवनार्थाचे स्वरूप सार्त्र आणि आल्बेअर काम्यू यांसारख्या फ्रेंच कादंबरीकारांनी प्रकट केले.

जीवनविषयक आत्मप्रत्ययाचा कादंबरीकार आविष्कार करीत असतो, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. या दृष्टीने कादंबरी हा एक प्रकारचा आत्माविष्कार होय, असे म्हणता येईल. चार्ल्स डिकिन्झ, लोबेअर, एमिल झोला, हेन्री जेम्स, हेमिंग्वे, डॉस्टोव्हस्की, टॉलस्टॉय, डी. एच. लॉरेन्स, जेम्स जॉइस, फ्रांटस काका, सार्त्र, आल्वेअर काम्यू व आपल्याकडे शरच्चंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद, हरिभाऊ आपटे वगैरे प्रतिभावंत कादंबरीकाराच्या कादंबऱ्यातूनच कादंबरी या प्रकाराला मौलिकता आणि श्रेष्ठता प्राप्त झाली आहे.


म्हणूनच कादंबऱ्यांचे कामचलाऊ वर्गीकरण करणे शक्य असले, तरी आवश्यक ठरत नाही. विवेचनाच्या सोयीसाठी अर्थातच विविध प्रकारच्या निकषांद्वारे कादंबऱ्यांचे वर्गीकरण केले जाते. निवेदनतंत्र, स्थलकालतत्वे, व्यक्तिचित्रणाचे स्वरूप, कादंबरीचा विषय इ. निकष कादंबरीच्या वर्गीकरणात वापरले जातात. निवेदनतंत्राच्या दृष्टीने आत्मनिवेदनात्मक, इतिवृत्तात्मक, त्रयस्थ-निवेदनात्मक, नाट्यात्मक, पत्रात्मक यांसारखे कादंबरीप्रकार संभवतात. कालतत्वाच्या दृष्टीने पौराणिक, ऐतिहासिक, समकानीन, भविष्यकालीन, असे प्रकार करता येतील. स्थलव्याप्तीच्या दृष्टीने प्रादेशिक कादंबऱ्याचा प्रकार महत्वाचा ठरतो. व्यक्तिचित्रणाच्या दृष्टीने चरित्रपर, आत्मचरित्रपर, एकव्यक्तिप्रधान, बहुव्यक्तिप्रधान, नायकप्रधान किंवा   नायकी स्वरूपाच्या कादंबऱ्यांचे गट पाडता येतात. पात्रांच्या सामाजिक वर्गावरून किंवा व्यवसायावरूनही मध्यमवर्गाच्या कादंबऱ्या, दलितांच्या कादंबऱ्या, नीग्रोंच्या कादंबऱ्या यांसारखे प्रकार संभवतात. याशिवाय धार्मिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानीक (उदा. एच्. जी. वेल्सची द वॉर ऑफ द वर्ल्डस, १८९८) असेही कादंबरीप्रकार सांगता येतील. विषयदृष्टीने साहसांच्या, गुप्तहेरांच्या, वैज्ञानीक यासारखे वर्गीकरण करता येते.

कादंबरी या साहित्यप्रकाराचे जे सर्वसामान्य घटक आहेत, त्यांत कथानक, व्यक्तिचित्रण, शैली, कादंबरीकाराचा दृष्टीकोन इत्यादींचा अंतर्भाव होतो. हे सर्व घटक कादंबरीतील आशयाची एक सुसंगत व अर्थपूर्ण संघटना घडवून आणतात. ही संघटना मुख्यतः कादंबरीकाराच्या उद्दिष्टाचर किंवा दृष्टीकोनावर अवलंबून असते. या दृष्टिकोनानुसार कादंबरीतील कृतीप्रसंग आणि तिच्यातील पात्रे यांचे परस्पर सापेक्ष महत्त्व निश्चित होते. त्यापैकी कोणत्या घटकाला किती महत्व द्यावयाचे, हे कादंबरीकारावरच अवलंबून असते.

कादंबरीतील कृतीप्रसंगात नाविन्य असते (लॅटिन `नॉव्हस’ शब्दाचा अर्थ `नाविन्यपूर्ण’ असाच आहे) म्हणजेच, ते सद्यःकालाला अनुरूप असतात. ऐतिहासिक कादंबऱ्यांत किंवा भविष्यकालीन कादंबऱ्यात (उदा. जॉर्ज ऑर्वेल याची नाइन्टीन एटीफोर) गतकालीन किंवा भविष्यकालीन कृतिप्रसंग, जणू इथे आणि आता घडत आहेत, असेच दाखविले जाते. कृतिप्रसंग आणि कादंबरीतील पात्रे यांच्यातील अन्योन्य संबंधामुळे कथानकतयार होते. ते कितपत गुंतागुंतीचे करावयाचे, हे कादंबरीच्या एकूण आशयावर व कादंबरीकाराच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. अशी गुंतागुंत उपकथा, उपपात्रे, उपप्रसंग वगैरेंनी निर्माण होते. कादंबरीच्या विकासक्रमात कथानकाचे महत्व व्यक्तिचित्रणाच्या सापक्षतेने कमी होत गेल्याचे दिसून येते.

कादंबरीतील व्यक्ती या वास्तविक जगरतील असतात. याचा अर्थ महाकाव्य, धार्मिक साहित्य इत्यादींतील वीरपुरूष, अवतारी विभूती, संतमहात्मे वगैरेंच्या तुलनेने त्या अधिक वास्तव असतात. किंबहुना ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तींमधीलही सर्वसामान्य व्यक्ती दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ई. एम्. फॉर्स्टर या इंग्रजी समीक्षकाने राऊंड आणि लॅट म्हणजे अनुक्रमे विकसनशील आणि साचेबंद अशी दोन प्रकारची पात्रे सांगितली आहेत. तथापि हे वर्गीकरण फार स्थूल स्वरूपाचे आहे. व्यक्तिचित्रण आधुनिक कादंबरीत महत्वाचे असते कारण व्यक्तिजीवनाचा शोधबोध घेण्यासाठीच बहुतेक कादंबऱ्या अवतरतात. मनोविश्लेषण आणि संज्ञाप्रवाह यांच्या आधारे व्यक्तीच्या अंतःसृष्टीच्या व स्वप्नसृष्टीच्या अतिवास्तवाचे प्रभावी दर्शन घडविता येते. नायक-नायिकांची परिभाषा सगळयाच कादंबऱ्यांतील व्यक्तिचित्रणाला सरसकट लागू पडत नाही. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जे जीवनविषयक मूल्यांचे अराजक निर्माण झाले, त्यामुळे प्रत्यक्षातील व्यक्ती ज्याप्रमाणे आपले नायकत्व हरवून बसली त्याचप्रमाणे कादंबरीतील व्यक्तीही अनायकी ठरली. तथापि महाकाव्याप्रमाणे व्यक्तीची धीरोदत्तता व शोकात्मिकेप्रमाणे तिची शोकात्मिका कादंबरीत व्यक्त होऊ शकते. (उदा., हेमिंग्वेच्या द ओल्ड मॅन अँड द सीमधील नायक). गेल्या दोन शतकांत व्यक्ति जीवनाच्या ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या, त्यांचे दर्शन प्रामुख्याने कादंबरी या साहित्यप्रकारातच आपणास घडते. कादंबऱ्यातील प्रमुख पात्रे पुष्कळदा कादंबरीकाराच्या आत्मचरित्राची प्रतीके ठरतात. चार्ल्स डिकिन्झची डेव्हिड कॉपरफील्ड (१८५०) याचे उत्तम उदाहरण होय.

कादंबरीतील कृतिप्रसंग आणि व्यक्तिचित्रण व त्यांच्या अनुषंगाने येणारी वर्णने, वातावरणनिर्मिती, प्रतीके आणि प्रतिमा या सर्वांच्या संश्लेषणातून कादंबरीचा घाट तयार होतो. हा घाट लेखकाच्या दृष्टिकोनानुसार घडत असतो. या घाटाचे कृतिप्रसंगादी घटक किंवा त्यांची बेरीज म्हणजे हा घाट नव्हे. स्त्रीच्या लावण्याप्रमाणेच तो एक अमूर्त परंतु प्रयत्नपूर्वक गोचर होणारा किंवा समजू शकणारा कादंबरीचा एक विशेष होय. ई. एम. फॉर्स्टर या इंग्रजी समीक्षकाने हा घाट दिग्दर्शित करण्यासाठी चित्रकलेतील आकृतिबंधाची (पॅटर्न) संज्ञा वापरली आहे. शृंखला, वर्तुळ, वाळूचे घड्याळ वगैरे परिभाषेत चोखंदळ वाचकाला कादंबरीचा घाट कसा आहे, ते सांगता येते. अखेर कादंबरीचा घाट म्हणजे तिचे एक प्रकारचे मूलभूत संघटनतत्त्व होय. कार्यकारणभावाच्या संगतीने ज्याप्रमाणे असे संघटन साधले जाते, तसेच व्यक्तीच्या अंतःसृष्टीच्या अतिवास्तवानेही ते साधले जाते. अनुभवांच्या किंवा संवेदनांच्या क्षणिक प्रत्ययाचे सत्यही कादंबरीचा आशय संघटित करू शकते.

आधुनिक मराठी कादंबरीचा उदय, विस्तार व विकास लक्षात घेताना हरिभाऊपूर्व अद्भुतरम्य कादंबरी, हरिभाऊंची सामाजिक कादंबरी, वा. म. जोशी यांची तात्त्विक व चर्चाप्रधान कादंबरी, श्री. व्यं. केतकर यांची समाजशास्त्रीय कादंबरी, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ग. ष्यं. माडखोलकर यांच्या कलात्मक कादंबऱ्या, विश्राम बेडेकर, मर्ढेकर, इत्यादींच्या मनोविश्लेषणात्मक व संज्ञाप्रवाहात्मक कादंबऱ्या, श्री. ना .पेंडसे, गो. नी. दांडेकर इत्यादींच्या प्रादेशिक कादंबऱ्या इत्यादींनी या साहित्यप्रकाराचे विकसनशील स्वरूप आधि सामर्थ्य स्पष्ट केले आहे. साठीच्या दशकात ऐतिहासिक व पौराणिक कादंबरीलेखनात रणजित देसाई, ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत वगैरेंनी ण्क नवे चैतन्य निर्माण केले आहे.

सृष्टीतील कोणताही विषय कोणत्याही घाटात अनुरूप अशा वर्णनशैलीने व्यक्त करू शकणारा कादंबरी हा साहित्यप्रकार प्रत्येक प्रगल्भ भाषेच्या साहित्याचा एक मानबिंदू ठरला आहे.

पहा:- कथा

संदर्भ:- 1. Forster, E.M.Aspects of the Novel, England, 1966.

2. Liddell, Robert, A Treatise on the Novel, Londaon, 1967.

3. Lubbock, Percy, The Craft of Fiction, London, 1965.

4. Muir, Edwin, The Structure of the Novel, Bombay, 1966.

5. Wayne, C.B. The Rhetoric of Fiction, London 1966.

जाधवरा. ग.