कात्यायन – ३ : (सु.चौथे शतक). हा स्मृतिकार कात्यायन होय. व्यवहार प्रकरणावरील नारदस्मृति व बृहस्पतिस्मृति लक्षात घेऊनच ह्या कात्यायनाने व्यवहारावरील, म्हणजे प्राचीन भारतीय कायद्यावरील, स्मृतिग्रंथ लिहिला. हा ग्रंथ सलग स्वरुपात उपलब्ध नाही. परंतु ह्यातील शेकडो श्लोक विश्वरुप, विज्ञानेश्वर, मेधातिथी, जिमूतवाहन, अपरार्क इ.प्राचीन धर्मशास्त्रटीकाकारांनी उद्धृत केलेले आहेत. आचार व प्रायश्चित्त ह्या विषयांवरील कर्मप्रदीपनामक स्मृतिग्रंथ ह्याच कात्यायनाचा असावा, असा पां.वा.काणे इ. पंडितांचा कयास आहे. 

जोशी, लक्ष्मणशास्त्री