कात्यायन -१ : (इ.स.पू.सु. तिसरे शतक). पाणिनीय सूत्रांवर वार्तिकग्रंथ लिहिणारा कात्यायन. `कात्यायन’ हे त्याचे गोत्रनाम असून त्याचे व्यक्तिनाम बहुधा वररुची असावे. कात्यायन हा दाक्षिणात्य असून तो पाणिनीहून भिन्न व्याकरणसंप्रदायाचा अनुयायी होता, असे एक मत आहे. कात्यायनाने पाणिनीच्या सु.१,५०० सूत्रांवर अदमासे ४,२०० वार्तिके लिहिली आहेत. वार्तिक किंवा वार्त्तिक म्हणजे सूत्रांवरील संक्षिप्त वा विस्तृत टिप्पण अथवा कोणत्याही ग्रंथावरील टीका. उक्त, अनुक्त वा व्दिरुक्त काय आहे, तसेच गुण व दोष काय आहेत, यांची मूळ ग्रंथाच्या संदर्भातील चर्चा म्हणजे वार्तिंक, अशी या शब्दाची व्याख्या प्रसिध्द आहे. कात्यायनाच्या वार्तिकांचा स्वतंत्र ग्रंथ आज उपलब्ध नाही. महाभाष्यात उद्घृत केलेली वार्तिकवचने म्हणूनच ती आज उपलब्ध आहेत. कात्यायन हा पाणिनीचा चिकित्सक टीकाकार म्हणून गणला जातो. वार्तिके लिहिण्यात कात्यायनाचा मुख्य उद्देश, पाणिनीच्या सूत्रांचे स्पष्टीकरण देऊन ती समजण्यास सोपी करुन मांडणे हा नव्हता. त्याने वार्तिके मुख्यः तीन उद्देशांनी लिहिली आहेत : (१) पाणिनीच्या सूत्रांवरील आक्षेप दूर करुन त्यांचे समर्थन करणे. (२) चिकित्सक दृष्टीने पाणिनीच्या सूत्रांची छाननी करुन त्या सूत्रांतील अनावश्यक भाग काढून टाकणे व आवश्यक भाग भरीस घालणे. (३) पाणिनीच्या सूत्रांने ज्या शब्दांची सिध्दी होत नसेल, त्यांची तरतूद करणे. पतंजलीने महाभाष्य नावाची टीका (इ.स.पू.सु.१५०) वार्तिकांवर लिहिली आहे. अष्टाध्यायीवर कात्यायन, भारव्दाज, सुनांग, क्रोष्टा इ. अनेकांनी वार्तिके लिहिली असली, तरी या सर्वांत कात्यायनाला प्रमुख स्स्थान पतंजलीने दिले आहे. कात्यायनाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे, व्याकरणशास्त्राला त्याने दिलेली तत्वज्ञानाची जोड. जातिव्यक्तिवाद, समुदायावयववाद, शब्दार्थसंबंध इ. दार्शनिक प्रश्नांचा ऊहापोह कात्यायनाने केलेला आहे. पुढच्या काळात आढळणाऱ्या विविध दार्शनिक विचारांचा उगम कात्यायनाच्या वार्तिकांत आढळतो.

जोशी, शि.द.