काट्झ, सरबर्नार्ड : (२६ मार्च १९११). बिटिश शरीरक्रियावैज्ञानिक. १९७० चे वैद्यक विषयाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म जर्मनीतील लाइपसिक येथे झाला. १९३४ मध्ये लाइपसिक विद्यापीठाची वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले व तेथे तंत्रिका (मज्जातंतू) व स्नायू यासंबंधी त्यांनी अभ्यास केला. १९३९ मध्ये ते ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे कार्नेजी संशोधक म्हणून गेले व तेथेच पीएच.डी. पदवी संपादन केली. दुसऱ्या महायुध्दात त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या विमानदलात रडार अधिकारी म्हणून काम केल्यानंतर १९५० मध्ये त्यांची लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रथम प्रपाठक (रीडर) व नंतर प्राध्यापक आणि शरीरक्रियाविज्ञान शाखेचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली.
तांत्रिकांच्या आवेगाचे (तंत्रिकेमार्गे पुढे पाठविल्या जाणाऱ्या क्षोभावस्थेचे) प्रसरण ॲसिटिलकोलीन या पदार्थामुळे होते व यासंबंधीच काट्झ यांनी संशोधन केले. तंत्रिकाग्रांमध्ये ॲसिटिलकोलीन या पदार्थाचे मोचन (अलग होणे) तंत्रिका निष्किय असताना आणि त्यांमध्ये आवेग चालू असताना कसे होते हे त्यांनी दाखवून दिले. याबद्दलच ॲक्सलारॉड व ऊल्फ ऑयलर यांच्याबरोबर त्यांना वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. ते रॉयल सोसायटीचे सदस्य असून १९७० मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला.
ढमढेरे, वा.रा.