करौली संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्व राजस्थानातील एक जुने संस्थान. त्याचे क्षेत्रफळ ३,१८० चौ. किमी. असून लोकसंख्या १,५२, ४१३ ( १९४१) एवढी होती. १९४७ मध्ये विलीनीकरणाच्या वेळी त्याचे उत्पन्न सु. ६,२८, ००० रुपये होते. संस्थानची राजधानी करौली ह्या ठिकाणी होती. ह्या संस्थानात एकूण ४३७ खेडी व लहानमोठी गावे होती. हे जयपूरच्या पूर्वेस १२० किमी. वर आहे. करौलीपासून मथुरा , ग्वाल्हेर , अलवर व टोंक ही शहरे जवळजवळ सारख्या अंतरावर आहेत. उत्तरेस भरतपूर , व्यायव्येस व पश्चिमेस जयपूर , दक्षिणेस व आग्नेयीस ग्वाल्हेर आणि पूर्वेस धोलपूर ह्या संस्थानांनी त्याच्या चतुःसीमा व्यापलेल्या असून त्याचा बहुतेक भाग डोंगराळ आहे. हा भाग डांग ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
या संस्थानचे राजे स्वतःस यदुवंशी म्हणवीत. यादव राजपूत वंशातील ह्या राजांकडे एके काळी अलवर, भरतपूर व धोलपूर हे सर्व प्रदेश होते. त्यानंतर त्यांच्याकडे फक्त करौली संस्थानचा भाग राहिला. अकराव्या शतकामधील विजयपाल हा राजा स्वतःस श्रीकृष्णाचा ८८ वा वारस समजत असे त्याच्या तहनपाल मुलाने करौलीतील प्रसिद्ध तहनगढ हा किल्ला बांधला आणि १०५८ च्या सुमारास करौली संस्थानात समाविष्ट होणारा सर्व मुलूख घेतला. ११९६ मध्ये कन्वरपालाच्या वेळी मुहम्मद घोरीने याचा पराभव करून करौलीचा मुलूख पादाक्रांत केला. पुढे अर्जुनपाल ह्या त्याच्या एका वंशजाने करौली संस्थान १३४८ मध्ये पूर्ववत स्थापन करून सीमा वाढविल्या. १४५४ मध्ये माळव्याचा सुलतान मुहम्मद खल्जी याने पुन्हा करौली जिंकले. अकबराच्या वेळी हे संस्थान त्याच्या ताब्यात गेले. मोगलांच्या पडत्या काळात यावर मराठ्यांनी आपली अधिसत्ता स्थापन केली. १८१७ मध्ये ते ब्रिटिशांकडे गेले. १८५२ मध्ये तेथील सत्ताधारी नरसिंगपाल मरण पावला तेव्हा वारसाचा प्रश्न निर्माण झाला. १८५७ मध्ये झालेल्या उठावात त्या वेळचा गादीचा वारस मदनपाल याने ब्रिटिशांना पूर्ण राजनिष्ठा दाखविली. यामुळे ब्रिटिशांनी १८६२ मध्ये दत्तक घेण्यास परवानगी दिली त्यामुळेच त्यास पुढे जी. सी. एस्. आय्. किताब मिळाला व तोफांच्या मानात वाढ झाली. ह्याशिवाय त्याने ब्रिटिश सरकारकडून घेतलेले सु. अडीच लाख रुपये कर्ज माफ करण्यात आले. १८६२ नंतर करौलीच्या गादीवर आलेले बहुतेक राजे दत्तकच होते. भूमिपालदेव याच्या कारकीर्दीत १९४९ मध्ये संस्थान विलीन होऊन राजस्थान संघात सामील झाले.
खरे, ग. ह.