कंकणमय गोल : (आर्मिला किंवा आर्मिलरी स्फिअर). खगोलीय विषुववृत्त, याम्योत्तर वृत्त (खगोलांचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खःस्वस्तिक यांतून जाणारे वर्तुळ), क्रांतिवृत्त (सूर्याच्या भासमान वार्षिक गतीचा मार्ग), कर्क व मकर वृत्ते दर्शविणारी ज्योतिषशास्त्रीय प्रतिकृती. वर्षातील दिवस व रात्र समान असणारे दिवस म्हणजे विषुवदिन काढण्यासाठी उत्तरायण व दक्षिणायन संपण्याचे दिवस म्हणजे अयनान्त दिन काढण्यासाठी तसेच ग्रहांच्या भ्रमणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी याचा उपयोग करीत. यालाच भास्कराचार्यांनी गोलबंध असे नाव दिलेले होते व त्याचे विस्तृत वर्णनही त्यांनी केलेले आढळते. भारतीय गोलबंधावर ग्रहांची फिरती वृत्तेही असत. या गोलावर कोनमापासाठी अंशाच्या खुणा केलेल्या असत. यूरोपात अशा तऱ्हेच्या प्रतिकृती सतराव्या व अठराव्या शतकांत, टॉलेमी यांची भूकेंद्रीय (पृथ्वी विश्वाच्या मध्याशी असणारी) प्रणाली आणि कोपर्निकस यांची सूर्यकेंद्रीय (सूर्य विश्वाच्या मध्याशी असणारी) प्रणाली यांतील फरक समजावून सांगण्यासाठी वापरीत  असत.

ज्ञात असलेला सर्वांत जुना संपूर्ण कंकणमय गोल, इ. स. पू. १४० मधील ॲलेक्झँड्रिया येथील ग्रीकांनी तयार केलेला नऊ वृत्तांचा गोल हा आहे. तथापि त्यापूर्वीही अधिक साध्या स्वरूपाचे गोल वापरात होते. टॉलेमी यांनी अल्माजेस्ट या आपल्या ग्रंथात अशा तीन गोलांचा उल्लेख केलेला आढळतो. एरॉटास्थीनीझ (इ. स. पू. २७६—१९६) यांनी क्रांतीवृत्ताची तिर्यकता मोजण्यासाठी याचा उपयोग केलेला असावा.

अरबांनीही असे गोल वापरले होते व त्यांत निरीक्षणासाठी व्यासावरून गेलेल्या पट्ट्या (ॲलिडेड) वापरलेल्या होत्या व या गोलांवरून यूरोपात नंतर वापरात आलेले गोल बनविण्यात  आलेले असावेत असे म्हणतात. पेकिंग येथे अद्यापि अस्तित्वात असलेला एक कंकणमय गोल तेराव्या शतकातील आहे असे म्हणतात.  

करमळकर, स. मा.