कागद : कागद म्हणजे चिंध्या, गवत, लाकूड इ. पदार्थापासून मिळणारे धागे एकमेकांत गुंतून व त्यांचे जाळे होऊन तयार झालेला व लिहिणे, छापणे, चित्रे काढणे, वस्तू गुंडाळणे इ. कामांसाठी वापरला जाणारा पदार्थ. कागद हा मुख्यतः वनस्पतींच्या शरीरापासून मिळणाऱ्या सेल्युलोज नावाच्या व धाग्यासारखे स्वरुप असणाऱ्या पदार्थ्याचा बनलेला असतो. क्वचित ॲस्बेस्टसारख्या खनिजाचे धागे किंवा संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेले) तंतू यांच्यापासूनही कागदासारखे पदार्थ बनविले जातात, पण त्यांचा समावेश खऱ्या कागदात केला जात नाही. खरे कागद हे मुख्यतः वनस्पतिज सेल्युलोजाचे बनलेले असतात.
सेल्युलोजाचा पाण्याने चिंब भिजलेला धागा पाण्यात खरडला किंवा चिरडला असता त्याची पाणी धारण करण्याची शक्ती उत्तरोत्तर वाढत जाते. धागा दुभंगतो किंवा त्याची सूत्रके म्हणजे अतिसूक्ष्म धाग्यासारखे तुकडे तयार होतात. पाण्याने भिजलेले वनस्पतिज पदार्थ कुटून त्यांचा लगदा तयार करीत असताना त्याच्यातील सेल्युलोजाचे असे तुकडे व सूत्रके होत असतात. शिवाय धाग्यांची पृष्ठे पिच्छिल (जिलेटिनाप्रमाणे चिकट) होत असतात. सेल्युलोजाचे छिन्नविच्छिन्न स्थितीत असलेले धागे पाण्यात निलंबित (लोंबकळत) असताना त्यांना पाण्याच्या तळाशी साचू दिले व नंतर त्यांचा थर वाळू दिला म्हणजे धागे व सूत्रके एकमेकांत गुंततात व एकमेकांस चिकटतात व सेल्युलोजाचा थर म्हणजे कागद तयार होतो. हेच कागद बनविण्याच्या कृतीचे तत्व आहे. उदा., ज्याच्यात छिन्नविच्छिन्न सेल्युलोजाचे धागे निलंबित आहेत असे पाणी तारेच्या चाळणीवर ओतले म्हणजे पाणी निघून जाते व सेल्युलोजाचा थर चाळणीच्या तारेवर उरतो. तो वाळविला म्हणजे त्याचा कागद होतो. त्या कागदाची जाडी ही चाळणीवर साचणाऱ्या थराच्या जाडीवर अवलंबून असते. प्राण्यापासून मिळणारी लोकर किंवा रेशीम ही पाण्यात भिजवून कुसकरली किंवा कुटली म्हणजे त्यांच्या धाग्यांची सूत्रके होत नाहीत किंवा त्यांची पृष्ठे पिच्छिल होत नाहीत व त्यांच्यापासून एकसंघ असा कागद तयार होत नाही. कागद तयार करण्यातील प्रक्रियांमध्ये भरपूर पाणी लागते व त्यामुळे जेथे भरपूर पाण्याच्या पुरवठयाची सोय आहे अशा ठिकाणीच कागदनिर्मिती करणे परवडते. याकरिता पाणी अल्प प्रमाणात वापरुन वा अजिबात न वापरता कागद तयार करण्याचे प्रयत्न निरनिराळया देशांत चालू आहेत. अशाच प्रकारच्या एका पद्धतीत पाण्याऐवजी तंतुवहनासाठी हवेचा उपयोग करतात. तंतू सच्छिद्र चाळणीतून पाठवून त्यांचा थर तयार करतात. तंतू एकमेकांस घट्ट चिकटण्यासाठी व कागद चिवट होण्यासाठी काही विशिष्ट रसारने वापरतात. तथापि ही पद्धती अद्याप प्रयोगावस्थेतच आहे.
इतिहास : अगदी प्राचीन काळी, कागदाचा शाध लागण्यापूर्वी लिहिण्यासाठी व चित्रे काढण्यासाठी दगड, विटा, हाडे, धातूंचे पत्रे जनावरांची चामडी, रेशमाचे किंवा लिननचे कापड, काही झाडांची पाने किंवा साली, गुळगुळीत केलेल्या लाकडी फळया इत्यादींचा उपयोग करीत. प्राचीन काळी चिनी लोक बांबूच्या कामटयांच्या पट्टयावर लेखन करीत.
प्राचीन ईजिप्तातील लोकांनी बनविलेला पपयरस नावाचा पदार्थ मात्र कागदासारखा व वापरण्यास कागदाइतकाच सोयीचा असे. तो नाईल नदीच्या किनाऱ्यावर वाढणाऱ्या एका जातीच्या बोरुपासून तयार केलेला असे. तो ज्याच्यापासून केला जाई त्या बोरुलाही पपायरस म्हणत. खि.पू.३५०० सालच्या ईजिप्तातील थडम्यास पपायरसावर लिहिलेले लेख सापडलेले आहेत. पपायरस कसा तयार करीत हे कळलेले नाही. पपायरस या वनस्पतीच्या सालीपासून तो तयार केला जात असावा. सालीचे ढलप्यांसारखे तुकडे कापून, उभ्या ढलप्यांच्या एका थरावर आडव्या ढलप्यांचा एक थर, अशा एकाआड एक असलेल्या अनेक थरांशी राशी दगडी पाटयावर रचावयाची, तिच्यावर पाणी किंवा कदाचित डिंकाचे पाणी शिंपडावयाचे आणि राशीवर दाब द्यावयाचा व नंतर ती वाळवावयाची अशी पपायरस बनविण्याची कृती असावी. पपायरसाला ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्व आहे. इसवी सनाच्या नवव्या शतकापर्यंतच्या ग्रीक व रोमन विद्वानांचे लेख बहुधा पपायरसावर लिहिलेले आहेत.
ॲलेक्झांड्रिया येथील ख्रि.पू. तिसऱ्या शतकातील फिलडेल्फस टॉलेमी यांच्या ग्रंथालयातील पुस्तके चामडयावर लिहिलेली होती असे म्हणतात. खि.पू.१७० साली इराणचे राजे यूमीनीझ यांच्या ग्रंथालयातील पुस्तके पाळीव जनावरांच्या कमावलेल्या कातडयांवर लिहिलेली होती.
कागद तयार करण्याचा शोध प्रथम चीनमध्ये लागला असे प्रचलित मत आहे. चिनी इतिहासातील नोंदीप्रमाणे त्या कृतीचा शोध इ.स.सु. १०५ साली त्साइ लुन यांनी लावला. त्यांनी मासे पकडण्याची फाटकी जाळी व चिंध्या यांचा लगदा करुन कागद तयार केला. त्यानंतर त्यांनी वरील वस्तूंशिवाय काही वनस्पतींचे धागे वापरुन लगदा बनविण्यास सुरुवात केली. चिनी लोक त्साइ लुन यांना अतिशय मान देतात चीनमध्ये तितक्या जुन्या काळी केलेलया कागदाचाही दर्जा उत्तम असे.
गेली सु.एकोणीसशे वर्षे चीनमध्ये कागद तयार केला व वापरला जात आहे. परंतु चीनबाहेरील मध्यपूर्वेतील देश, यूरोप व आफ्रिका इत्यादींतील लोकांना आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत कागदाची माहिती नव्हती. आठव्या शतकात समरकंद येथील लढाईत जे चिनी कैदी पकडले गेले त्यांच्यापैकी काहींना कागद तयार करण्याची कृती माहीत होती. त्यांच्याव्दारे अरबी लोकांस ती माहीत झाली. हरुन-अल्-रशीद राज्य करीत असताना इ.स.७९३ साली बगदाद येथे कागद तयार करण्याचा कारखाना होता व त्याच्यातील कारागीर चिनी होते. नंतर दमास्कस येथे कागदाचा कारखाना सुरु झाला. त्यानंतर कित्येक शतके यूरोपाला होणारा कागदाचा पुरवठा मुख्यतः दमास्कस येथूनच होत असे. कागद बनविण्याची कला दमास्कसहून ईजिप्तात गेली व तेथे कागदाचा प्रसार होऊन तेथील पपायरस प्रचारातून नाहीसा झाला. मोरोक्कोच्या मूर लोकांनी सु.११५० साली कागद करण्याची कला स्पेनमध्ये नेली. याला सु.पाच शतके लागली.
आधुनिक कागदनिर्मिती मोठया प्रमाणावर सुरु होण्यास कागद तयार करणाऱ्या यंत्राचा शोध तसेच नवीन कच्च्या मालाचा शोध हे कारणीभूत ठरले. एकोणिसाव्या शतकाआधी लागलेल्या खल यंत्राच्या शोधामुळे लगदा जलद तयार होऊ लागला व लगदा तयार होताना वाया जाणाऱ्या कच्च्या मालाचे प्रमाण कमी झाले. १७९९ मध्ये रॉबेअर यांनी घूर्णीय (चक्राकार) गतीवर चालणाऱ्या सलग कागदनिर्मितीचे यंत्र तयार केले. फूर्ड्रिनिअर बंधूनी ब्रायन डॉंगकिन हया अभियंत्यांच्या साहाय्याने १८०४ मध्ये सलग कागदनिर्मितीचे यंत्र तयार केले. अशी यंत्रे अद्यापही वापरली जातात. १८०९ मध्ये जॉन डिकिन्सन यांनी आणखी एक सलग कागदनिर्मितीचे यंत्र तयार केले. हे सध्या उच्च प्रतीच्या कागदासाठी व पुठ्ठयासाठी वापरले जाते. १८३९ मध्ये कागदनिर्मितीत कच्चा माल म्हणून एस्पार्टो गवताचा प्रथम उपयोग करण्यात आला. १८६१ पासून त्याचा सर्रास उपयोग करण्यास सुरुवात झाली. लाकडापासून यांत्रिक पद्धतीने लगदा प्रथम केलर यांनी तयार केला. १८६६ मध्ये टिलमन यांनी सल्फाइट प्रक्रिया कागदनिर्मितीत वापरली व त्यांनी तिचे एकखही (पेटंटही) घेतले. याच सुमारास इतर अम्लीय व क्षारीय (अल्कलाइन) प्रक्रियांत सुधारणा होऊन त्या मोठया प्रमाणावर कागदनिर्मितीत वापरण्यात येऊ लागल्या. यांत्रिक पद्धतींनी कागद करण्यास सुरुवात झाल्यावर उत्पादन खर्च कमी झाला व त्यामुळे गिरण्यांची संख्या बरीच कमी झाली.
भारतीय इतिहास : कागदासारखा ज्यांचा उपयोग प्राचीन काळापासून भारतात दीर्घ काल करण्यात आला आहे अशा दोन वस्तू म्हणजे ताडपत्र व भूर्जपत्र होत. ताडपत्र हे ताडाच्या पानांचे, २.५-१० सेंमी. पर्यंतच्या रुंदीचे तुकडे कापून तयार करीत. ते तुकडे पाण्यात उकळून नंतर वाळवीत. त्यानंतर कवडी किंवा शंख यांसारख्या गुळगुळीत वस्तूने त्यांची पृष्ठे घोटून त्यांच्यावर अणकुचीदार सळईने कोरुन लिहीत. कधीकधी कोरलेल्या लेखावर काजळ फाशीत तयामुळे कोरुन लिहिलेली अक्षरे काळी होत. अशी पाने एकत्र जुळून त्यांना एक भोक पाडीत. त्या भोकातून दोरी ओवून त्यांची पुस्तके बांधीत. दुसऱ्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात ताडपत्रावर लिहिलेली पुस्तके आढळलेली आहेत पण त्याच्या बऱ्याच आधी व नंतरही ती प्रचारात होती. कागदाचा प्रसार झाल्यावर मात्र त्यांचा वापर जवळजवळ थांबला.
भूर्जपत्रे ही भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवीत. हे वृक्ष बेट्यूला बंशातील असून हिमालयात विशेषतः काश्मीरातील हिमालयात वाढतात श्भूर्ज . यांच्या साली सोलून व वाळवून त्यांना तेल लावून त्यांची पृष्ठे गुळगुळीत करीत व त्यांचे मोठया लांबी रुंदीचे पत्रे तयार करुन त्यांच्यावर शाईने लिहीत. पत्रांना भोके पाडून व त्या भोकांत दोरी ओवून पुस्तके बांधली जात.
भारतातील व मध्य आशियातील जुने संस्कृत ग्रंथकार भूर्जपत्रावर लिहीत. अर्धवट दमट किंवा दमट हवामानात भूर्जपत्रे साधारण तीनशे वर्षापेक्षा अधिक काल टिकत नाहीत. पण शुष्क हवामान असलेल्या चिनी-तुर्कस्तानात तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील भूर्जपत्रांवरील लेख सापडलेले आहेत. कागद उपलब्ध झाल्यानंतर भूर्जपत्रांचा उपयोग जवळजवळ थांबला.
भारतावर स्वाऱ्या करणाऱ्या मुसलमानांबरोबर कागद करण्याची कला भारतात आली असे कित्येक यूरोपियन विद्वानांचे मत आहे. परंतु खि.पृ.३२७ च्या सुमारात अलेक्झांडर यांच्याबरोबर भारतात आलेल्या निआर्कस यांनी हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात अशी माहिती लिहून ठेविली आहे. यावरुन तितक्या प्राचीन काळीही भारतात कागद तयार होत असे, असे दिसते. त्याचा उपयोग मात्र विस्तृत प्रमाणात होत नसे. मुसलमानांच्या स्वाऱ्यांनंतर मात्र काश्मीरात व पंजाबात हाताने कागद तयार करण्याच्या गिरण्या निघाल्या. त्यांची वाढ झाली व नंतर तसेच कारखाने राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, कर्नाटक व तमिळनाडू या प्रदेशांत निघाले. त्या कारखान्यांत साध्या कापडाच्या व गोणपाटाच्या चिंध्या आणि रद्दी कागद यांच्या लगद्यापासून कागद तयार करीत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात या कारखान्यांनी तयार केलेला कागद चांगल्या दर्जाचा व टिकाऊ असे व कागदाच्या धंद्याची चांगली भरभराट झाली होती. पण ब्रिटिशांचे राज्य आल्यावर आणि त्यांच्या व इतर यूरोपीय देशांतील यंत्राच्या सहाय्याने तयार केलेला स्वस्त कागद भारतात येऊ लागल्यावर भारतातील हातकागदाचा धंदा साहजिकच बंद पडला (`भारतीय उद्योग’ व `हातकागद’ हे परिच्छेद पहा).
कच्चा माल : कागदांचे अनेक प्रकार आहेत. निरनिराळया प्रकारच्या कागदांच्या घटकांत थोडा फार फरक असतो. पण त्या सर्वाचा मुख्य घटक म्हणजे सेल्युलोज होय. बहुतेक सर्व सनस्पतींत सेल्युलोज असतो, पण ज्याच्यापासून सेल्युलोज मिळविणे आर्थिक दृष्टया परवडेल अशा वनस्पती थोड्याच आहेत. शिवाय अशा वनस्पतींच्या काही भागांपासूनच सेल्युलोज मिळविता येतो. ज्यांच्यापासून सेल्युलोज मिळविता येतो अशा वनस्पतिज धाग्यांचे मुख्य प्रकार पुढील होत.
(१) कपाशीच्या बियांवरील तंतूंपासून म्हणजे कापासापासून मिळणारे धागे. इतर कोणत्याही धाग्यांपेक्षा कापसाच्या धाग्यात सेल्युलोजाचे प्रमाण अधिक असते व कागद बनविताना त्यांच्यावर फारसे रासायनिक संस्कर करावे लागत नाहीत. इतर प्रकारच्या धाग्यांत सेल्युलोजाचे प्रमाण कमी किंवा बरेच कमी असते व त्यांच्यावर कमी अधिक किंवा बरेच अधिक रासायनिक संस्कार करावे लागतात.
कापासापासून चांगला कागद अनायासे तयार करता येतो पण त्याचा उपयोग मुख्यतः सूत व कापड तयार करण्यासाठी होतो. कापसापासून कागद तयार करणे खर्चाचे असते. म्हणून तो सरळ सरळा वापरण्याऐवजी वाया गेलेले सूत किंवा कापडाच्या चिंध्या ही कागद बनविण्यासाठी वापरली जातात. पूर्वी जवळजवळ सर्वच कागद चिंध्यांपासून केला जात असे व अजूनही चांगल्या दर्जाच्या कागदापैकी बराचसा कागद चिंध्यांपासून बनविला जातो.
(२) घायपात, अंबाडी, जवस (अळशी), ताग रॅमी (चायना ग्रास) इ. वनस्पतींच्या आतल्या सालीपासून मिळणारे वाखासारखे धागे. यांच्यापासूनही सुतळया, दोन, कापड इ. तयार केली जातात व तीही सामान्यतः कागद बनविण्यासाठी सरळ सरळ वापरली जात नाहीत. त्यांच्यापासून बनविलेले दोर किंवा कापड ही जीर्ण झाल्यावर त्यांचा उपयोग करतात. अशा धाग्यांपैकी मुख्य म्हणजे पुढील धागे होत.
(अ) प्लॅक्स : अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आयर्लंड, बेल्जियम, फ्रान्स, हंगेरी, रशिया इ. देशांत लागवडीत असलेल्या या जवसासारख्या वनस्पतीच्या धाग्यापासून लिनन कापड बनवितात. लिननच्या चिंध्यांपासून उत्कृष्ट दर्जाचा कागद तयार होतो. विशेषतः तो बॅंकांच्या (चलनी) नोटा छापण्यासाठी वापरला जातो.
(आ) अंबाडी : भारतात, रशियात व अमेरिकेत हिची मोठी लागवड होते. हिच्या जीर्ण वस्तूंच्या धाग्यांपासून कागद तयार केला जातो. कमी दर्जाच्या लगद्यापासून वस्तू गुंडाळण्याचा कागद आणि चांगल्या संस्कारित लगद्यापासून बॅंकांच्या नोटांचे कागद व सिगारेटींचे कागद तयार करतात.
(३) एस्पार्टो गवत (गुच्छ घास), मॅनिला हेंप (केळीसारखी एक वनस्पती) व सिसल हेंप यांच्या पानांपासून मिळणारे धागे.
(अ) एस्पार्टो गवत : स्पेनच्या दक्षिण भागात व उत्तर आफ्रिकेत या गवताची विपुल वाढ व लागवड होते. त्याच्या पानांपासून चांगले धागे मिळतात आणि त्या धाग्यांपासून चांगले छपाईचे व लिहावयाचे कागद तयार करतात. बिटनमध्ये कागद करण्यासाठी एपार्टोचा उपयोग मोठया प्रमाणात होतो.
(आ) मॅनिला हेंप : ही केळीच्या गटातील वनस्पती असून तिच्या पानांच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. जीर्ण दोऱ्यांच्या धाग्यांपासून पिशव्या बनविण्यासाठी किंवा वस्तू गुंडाळण्यास लागणारा कागद तयार करतात.
(४) गवताची किंवा मक्याची धाटे, कळक, उसातील रस पिळून काढल्यावर उरणारी चिपाडे (चोयटया) इ. तृणवर्गातील वनस्पतींपासून मिळणाऱ्या वस्तूंच्या धाग्यांपासूनही कागद तयार करतात. पण तो सामान्यतः कमी दर्जाचा असतो. उदा., चुन्याच्या निवळीत गवत शिजविल्यावर तपकिरी लगदा तयार होतो व त्याच्यापासून पुठ्ठयाचे तक्ते (स्ट्रॉ बोर्ड) तयार करतात. कळकापासून असेच तक्ते तयार करतात. उसाच्या चिपाडापासून पुठ्ठयाचे तक्ते किंवा वस्तू गुंडाळण्याचे कागदत तयार करतात.
(५) लाकूड : सध्या जो कागद बनविला जातो त्यापैकी पुष्कळसा कागद लाकडांपासून मिळविलेल्या धाग्यांपासून तयार केलेला असतो. ते धागे मुख्यतः कोऱ्या लाकडापासून सरळ सरळ मिळविलेले असतात.
लाकडापासून लगदा करण्यासाठी मुख्यतः शंकुमंत (सूचिपर्णी) वृक्षांची लाकडे वापरली जातात. त्यांपैकी मुख्य म्हणजे नॉर्वेतील स्प्रूस (पिसिया एक्सेलस) व स्कॉच पाइन (पाइनस सिल्व्हेट्स) हे होत. इतर शंकुमंत वृक्षांपासूनही जवळजवळ वरील वृक्षांच्या धाग्यांसारखे धागे मिळवितात. पानझडी वृक्षांपासून मिळणारे धागे शंकुमंत वृक्षांपासून मिळणाऱ्या धाग्यांच्या मानाने आखूड असतात. अशा प्रकारच्या वृक्षांपैकी पॉप्लर, यूकॅलिप्टस इत्यादींचा उपयोग लगदा करण्यासाठी होतो.
भारतातील कच्चा माल : वनस्पतिज लगदा तयार करण्यासाठी भारतात मुख्यतः बांबूचा उपयोग केला जातो. बांबूची वाढ वेगाने होते. दोन ते तीन वर्षात तो परिपक्व होतो व त्याची लागवड करुन लगदा बनविण्यासाठी बरेचसे बांबू मिहविता येतात. बांबूच्या कळक (बांबुसा ॲरुंडिनॅशिया) व वासा (डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस) या दोन जातींची चांगली वाढ आसाम, ओरिसा, आंध्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील वनांत होते आणि त्यांचे चांगले संवर्धन करता येते. केरळात व तमिळनाडूच्या दक्षिण भागात बांबूच्या एटा (ऑक्लॅंड्रा ब्रॅंडिसी) या जातीचे बांबू आढळतात. त्यांच्यापासून कागदाचा उत्तम लगदा तयार होतो.
लगदा करण्यासाठी १९३० सालापूर्वी भारतात मुख्यतः भाबर (साबई ग्रास, यूलॅलिऑप्सिस बायनेटा) या हिमालयाच्या पायथ्यालगतच्या डोंगराळ प्रदेशात आणि उत्तर प्रदेशाच्या व बिहारच्या काही भागांत वाढणाऱ्या गवताचा उपयोग करीत. भारताच्या निरनिराळया भागांत वाढणारी अशी अनेक गवते आहेत की, ज्यांचा फारसा उपयोग केला जात नाही पण ज्यांच्यापासून लगदा तयार करता येणे शक्य आहे. अशांपैकी मुख्यं म्हणजे कापूर घास (थेमेडा ऍरुंडिनॅशिया), वाळा (व्हेटिव्हेरा झिझेनॉइड्स), कुसळी गवत (ऍंड्रोपोगॉन कॉंटार्टस), गजराज (थेमेडा सिंबारिया व सॅकॅरम प्रोसेरम), मूंज (एरिऍथस राव्हानिया), बोरु (फ्रॅग्माइट्स कारका) व कागरा (नरेंडिया रेनॉडियाना) ही होत.
उसाचा रस काढून घेतल्यावर उरणाऱ्या चिपाडांत सु.५० टक्के जलांश व ३० टक्के भेंड (पिथ) असते आणि उरलेला भाग सेल्युलोज असतो. भेंड काढून टाकल्यावर उरणाऱ्या सेल्युलोजापासून कागदाचा लगदा तयार करता येतो. भारतातील काही थोडयाच कारखान्यांत उसाच्या चिपाडापासून लगदा करण्यात येतो. चिपाडांचा उपयोग मुख्यतः जळण म्हणूनच करण्यात येतो. तथापि तो थांबविल्यास त्यांच्यापासून बराच लगदा मिळविता येणे शक्य आहे. भात किंवा गहू यांच्या गवतापासून पुठ्ठे बनविण्याचा लगदा अल्प प्रमाणात केला जातो व ते प्रमाण वाढविणे शक्य आहे.
ज्याच्या लाकडापासून लगदा किंवा उत्तम प्रकारचा लगदा बनविता येईल असे पुष्कळ प्रकारचे वृक्ष भारताच्या निरनिराळया भागांत आढळतात. पण त्यांच्या लाकडाचा पुरवठा नियमितपणे, पाहिजे त्या प्रमाणात व दीर्घ काल होत राहील, तोडल्या गेलेल्या वृक्षांच्या प्रमाणात नवी लागवड केली जाईल इ. गोष्टींविषयी योजना आखून त्या कार्यवाहीत आणल्या गेल्याशिवाय, लगदा बनविण्यासाठी त्यांचा उपयोग करता येणार नाही. तूर्त भारतात मुख्यतः एकाच वृक्षाच्या लाकडाचा उपयोग लगदा बनविण्यासाठी होतो. तो वृक्ष म्हणजे सालई (बॉस्वे-लिया सेराटा) होय. तो मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, बिहार, ओरिसा इत्यादींतील सापेक्षतः रुक्ष वनांत आढळतो. नेपानगरच्या गिरणीत जो वर्तमानपत्री कागद तयार केला जातो तो सालईच्या लाकडापासून बनविलेला यांत्रिक लगदा साठ टक्के व बांबूपासून बनविलेला रासायनिक लगदा चाळीस टक्के यांचे मिश्रण करुन तयार केलेल्या लगद्याचा बनविलेला असतो.
लगदा बनविण्यासाठी ज्यांच्या लाकडाचा उपयोग होऊ शकेल अशा वृक्षांपैकी मुख्य म्हणजे भारताच्या हिमालयालगतच्या भागातल्या वनांत वाढणारे काही शंकुमंत वृक्ष (उदा.,स्प्रूस व फर), उत्तर प्रदेशातील व आसामातील वनांमधील देवदार (पाइन) हे होत.
ज्यांची वाढ लवकर होते अशा काही वृक्षांची उदा., यूकॅलिप्टस, पॉप्लर, पेपर मलबेरी आणि बेटल यांची लागवड करुनही लगदा करण्यासाठी लाकूड मिळविता येणे शक्य आहे.
निर्मिती : धागे असलेल्या विविध प्रकारच्या कच्च्या द्रव्यापासून कागद बनविण्याकरिता प्रथम कच्च्या द्रव्याचा लगदा तयार करतात. नंतर त्या लगद्यावर जरुरीप्रमाणे काही संस्कार करतात. हा संस्कारित लगदा पाण्यात मिसळून त्याचा पातळ काला तयार करतात. हा काला बारीक तारेच्या जाळीवर सोडतात. काल्यातील पाणी जाळीतून खाली पडते व काल्यातील धाग्यांचा ओलसर सलग पातळसा थर जाळीच्या वरच्या भागावर बसतो. हा थर वाळवून जाळीपासून सोडवून घेतला म्हणजे कच्चा कागद मिळतो. या कच्च्या कागदावर जरुरीप्रमाणे आणखी काही संस्कार करुन पाहिजे त्या जातीचा कागद तयार करता येतो.
कागदाच्या प्रकारांनुसार आणि कच्च्या द्रव्यातील धाग्यांच्या गुणधर्माप्रमाणे लगदा तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु सर्व पद्धतींत कच्च्या द्रव्यातील उपयुक्त धागे इतर पदार्थपासून सुटे करावे लागतात.
लगदा तयार करण्याच्या पद्धती : लाकडापासून लगदा करताना प्रथम लाकडाची साल काढून टाकावी लागते. असा लगदा करण्यासाठी यांत्रिक, रासायनिक व मिश्र अशा तीन पद्धती आहेत.
(१) यांत्रिक पद्धत : या पद्धतीत १-१.५ मी. लांबीचे लाकडाचे ओंडके पाण्याच्या प्रवाहात बसवलेल्या व यांत्रिक शक्तीने फिरणाऱ्या सहाणेवर जलीय शक्तीच्या यंत्राने दाबून धरले जातात. त्यामुळे लाकडे उगाळली जाऊन त्यांचा लगदा पाण्यात मिसळतो. हा लगदा स्वच्छ करुन चाळून घेतात. त्यामुळे त्यामध्ये असलेले मोठया आकाराचे किंवा दळले न गेलेले भाग वेगळे काढता येतात. पाण्यात विरघळणारे घटक वगळल्यास या पद्धतीने लाकडाच्या वजनाच्या ९०% लगदा मिळवता येतो. परंतु या पद्धतीत लाकडातील धागे अखंड न राहता त्यांचे लहान लहान तुकडे पडतात व त्यांच्या गाठी तयार होतात. त्यामुळे अशा लगद्याला चांगली मजबुती यते नाही. या लगद्यात लिग्निन, हेमिसेल्युलोज इ. द्रव्येही असल्याने हा लगदा साठवून ठेवला, तर त्याचे रासायनिक विघटन होऊ लागते व त्यावर प्रखर प्रकाश पडत असला तर किंवा नुसत्या कालांतरानेही तो बिघडतो. अशा लगद्याला मजबुती येण्यासाठी त्यामध्ये थोडा रासायनिक लगदा मिसळतात व त्यापासून स्वस्त जातीचा म्हणजे वर्तमानपत्रांना लागणारा, व्यापारी माल गुंडाळून ठेवण्याचा किंवा पुठ्ठयाचा कागद बनवितात.
(२) रासायनिक पद्धत : या पद्धतीत लाकडातील धाग्यांना सांधणारी सर्व द्रव्ये रासायनिक प्रक्रियेने विरघळून धागे सुटे केले जातात. या पद्धतीने लाकडाच्या वजनाच्या ४० ते ५० टक्के वजनाचा उत्तम लगदा मिळतो. या लगद्यातील बहुतेक सर्व भाग सेल्युलोजाचाच असतो. असा लगदा तयार करताना बऱ्याच रासायनिक विक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे तो महाग पडतो. असा लगदा टिकाऊ आणि उच्च प्रतीचा कागद बनविण्यासाठी वापरतात.
रासायनिक पद्धतीने लाकडाचा लगदा तयार करण्यासाठी `सल्फेट’ किंवा `क्रॅप्ट’, `सल्फाईट’ आणि `सोडा’ अशा तीन निरनिराळया प्रक्रिया वापरता येतात. हल्ली बहुतेक सर्व कारखान्यांत सल्फेट पद्धतीच वापरतात. कळकापासून लगदा करण्यासाठी हीच पद्धत सर्वत्र रुढ झालेली आहे.
या पद्धतीत प्रथम लाकूड किंवा कळक कापयंत्राने तोडून साधारणतः१ सेंमी. लांब आणि ५ मिमी. जाडीचे लहान लहान तुकडे तयार करतात. नंतर त्यांतून बारीक चुराव मोठया गाठी चाळून काढून टाकतात. नंतर ते तुकडे दाहक (कॉस्टिक) सोडा आणि सोडियम सल्फाइड यांच्या विद्रावामध्ये ८ किग्रॅ./सेंमी.२ दाबाखाली तीन तासपर्यंत शिजवितात. याकरिता मजबूत दाबपात्र वापरतात आणि विद्राव उकळण्याकरिता वाफेचा उपयोग करतात. शिजलेले तुकडे काळसर झालेल्या विद्रावातून गाळून वेगळे करतात व अनेक टप्प्यांच्या निर्वात यंत्रामध्ये धुवून स्वच्छ करतात. तरीही तुकडयांमध्ये काही बंधक द्रव्ये शिल्लक राहिलेली असतात व त्यांचा रंग फिकट तपकिरी असतो. हा तपकिरी लगदा पुन्हा चाहतात व त्यातील न शिजलेले तुकडे व गाठी काढून टाकतात. नंतर त्या लगद्याचे विरंजन करुन (रंग नाहीसा करुन) त्याला शुभ्र पांढरा करतात. विरंजक विद्रावाकरिता चुना किंवा दाहक सोडा आणि क्लोरीन यांच्यापासून तयार केलेले कॅल्शियम किंवा सोडियम हायपोक्लाराइट वापरतात.
विरंजित लगदा चांगला धुवून त्यामधील रसायनांचे बाकी राहिलेले अंश काढून टाकतात. हा स्वच्छ केलेला पांढरा शुभ्र लगदा लगेत वापरावयाचा असल्यास सरळ कागदाच्या कारखान्यात पाठवितात. तो साठवून ठेवावयाचा असेल तर तो आणखी थोडा वाळवितात व त्याच्या वडया करुन ठेवतात.
लाकडाचे तुकडे शिजविण्याकरिता वापरलेल्या व काळसर झालेल्या विद्रावावर काही रासायनिक विक्रिया करुन त्यामधील ८५ टक्के मूळ रासायनिक घटक काढून घेता येतात व त्यांचा पुन्हा उपयोग करता येतो. या रासायनिक विक्रियेतून सरासरीने प्रत्येक टन लगद्यामागे ५,००० किग्रॅ. वाफ उत्पन्न होते. ती कागद गिरणीतील यंत्रे आणि कागद सपाट करण्यसाठी वापरण्यात येणारी लाटणी गरम करण्याकरिता वापरता येते. त्यामुळे सल्फेट पद्धतीचा एकंदर खर्च कमी होतो.
लगदा बनविण्याच्या दुसऱ्या रासायनिक पद्धतीला सल्फाइट प्रक्रिया म्हणतात. या पद्धतीत तुकडे शिजविण्याकरिता चुना आणि गंधक यांपासून तयार केलेल्या कॅल्शियम बायसल्फाइटाचा विद्राव वापरतात. या पद्धतीत एकदा वापरलेली रसायने परत मिळविणे जुन्या पद्धतीने फार कष्टाचे असते. ते सोपे व्हावे म्हणून बरेच संशोधन होत आहे व काही नवीन पद्धती प्रचारातही आल्या आहेत.
लगदा बनविण्याच्या तिसऱ्या रासायनिक पद्धतीला सोड प्रक्रिया म्हणतात. ही पद्धत सल्फेट पद्धतीसारखीच आहे. तीमध्ये तुकडे शिजविण्यासाठी फक्त दाहक सोडयाचा विद्राव वापरतात.
(३) मिश्र पद्धत : या प्रक्रियेने मिळणारा लगदा शुद्ध रासायनिक पद्धतीपेक्षा वजनाने जास्त असतो आणि यांत्रिक पद्धतीने मिळणाऱ्या लगद्यापेक्षा श्रेष्ठ प्रतीचा असतो. या पद्धतीत लाकडाचे तुकडे अगदी सौम्य रासायनिक विद्रावात थोडा वेळच शिजवतात. त्यामुळे तुकडयांचे पूर्ण पाचन झाले नाही, तरी त्यांतील बंधक द्रव्ये अगदी नरम होतात. नरम झालेले तुकडे नंतर यंत्रामध्ये दळून, धुवून व चाळून त्यामधील धागे सुटे करतात. या पद्धतीने तयार होणारा लगदा काळसर भरडा असतो. त्याला विरंजित करणे अवघड असते. त्यामुळे तो पूर्ण विरंजित न करताच हलक्या प्रतीचा कागद म्हणून तसेच वस्तू गुंडाळण्यासाठी व पन्हळयांचा जाड कागद बनविण्यासाठी वापरतात.
वनस्पतीच्या खोडाच्या धाग्यापासून कागदाचा लगदा तयार करण्यासाठी अनेक रासायनिक व अर्धरासायनिक प्रक्रिया वापरात आहेत. कच्च् द्रव्य कोणत्या झाडापासून घ्यावयाचे आहे व कोणत्या प्रकारचा कागद तयार करावयाचा आहे, हे ठरविल्यानंतर त्यांना योग्य अशी रासायनिक प्रक्रिया ठरविली जाते. कळकापासून लगदा तयार करावयाचा असेल, तरी वर वर्णन केलेली लाकडावर वापरण्याची सप्फेट प्रक्रियाच करतात.
उसाची चिपाडे, ताग, सिसल हेंप, मॅनिला हेंप, भताच्या आणि गव्हाच्या झाडांचे बुंधे, एस्पार्टो व साबई गवत अशा कच्च्या मालापासून लगदा करावयाचा असेल, तर त्यांचा बारीक चुरा करुन चुना व दाहक सोडा आणि सोडा ऍश यांच्या विद्रावात शिजवितात. या पध्ण्दतीत एकदा वापरलेल्या विद्रावातून मूळ रसायने परत मिळविता येत नाहीत.
यूरोपात गवतापासून तयार करण्यात येणारा बराच लगदा उदासीन (अम्लधर्मी वा क्षारधर्मी नसलेल्या) सल्फाइट किंवा मोनोसल्फाइट प्रक्रियेने तयार करतात. या प्रक्रियेने जास्त उत्पादन मिळते व लगद्याचे विरंजन करणेही सोपे असते. याकरिता सोडियम सल्फाइट आणि दाहक सोडयाचे मिश्रण मुख्य पाचक (शिजविण्याचे माध्यम) म्हणून वापरतात.
कापूस व चिंध्यांपासून लगदा तयार करण्यासाठी खोडाच्या धाग्याप्रमाणेच त्यांना चुना व सोडा ऍशच्या विद्रावात शिजवितात. खोडाचे धागे आणि कापूस व चिंध्या शिजवून मिळणाऱ्या धाग्यांवर लाकडाच्या धाग्यांप्रमाणेच धुणे, चाळणे व विरंजन या प्रक्रिया करुन त्यांचा लगदा तयार करतात.
लगद्यावरील संस्करण : लगदा तयार झाल्यावर तो यांत्रिक शक्तीने वाटून पुन्हा खलतात. नंतर त्या लगद्यात प्रथम खळ आणि नंतर भरणद्रव्ये मिसळतात आणि नंतर त्यामध्ये रंगद्रव्ये घालतात. लगदा चांगला वाटला म्हणजे त्यामधील धागे अगदी सुटे होतात आणि त्यामध्ये
पाणी शेषून ते धरुन ठवेण्याची शक्ती येते. लगदा वाटण्याकरिता आ.1 मध्ये दाखविलेले वाटण यंत्र वापरतात. अशा यंत्रात पाण्यात कालवलेला लगदा एका निरंत (अखंड) मार्गातून फिरवला जातो. या मार्गामध्ये एका ठिकाणी तळावर स्थिर आडवे पोलादी दांडे बसविलेले असतात व त्यावर आडवे पोलादी दांडे असलेले एक चाक यांत्रिक शक्तीने फिरवले जाते. फिरणारे दांडे आणि स्थिर दांडे यांच्यामधून लगद्याचा काला वाहत असतो. त्यामुळे लगद्यातील कण दोन्हीकडील दांडयांमध्ये चिरडले ताता व त्यांतील बारीक धागे अगदी सुटे होतात. चिरडले गेलेले धागे मार्गामध्ये फिरुन पुन्हा दांडयाखाली येतात व ते अधिक सूक्ष्म होतात. या यंत्रात बारीक झालेले धागे आणखी सूक्ष्म करण्यासाठी आ.2 मध्ये दाखविलेले खल यंत्र वापरतात. या खल यंत्रामध्ये दोन शंकाकार भाग एकाच्या आत दुसरा असे बसविलेले असतात व त्यांच्यामधील सूक्ष्म फट तोंडाकडून दुसऱ्या टोकाकडे कमीकमी होत जाते. या यंत्राचा बाहेरचा भाग स्थिर असतो व आतला भाग उच्च वेगाने फिरतो. यंत्रामध्ये येणारा धाग्यांचा कालाव पुढे जाताना धागे आपसात आपटतात व दोन्ही बाजूंवरही आपटतात व दोन्ही बाजूंमध्ये रिडले जाऊन अतिसूक्ष्म होतात. या अतिसूक्ष्म धाग्यांचा आकार फअीवर अवलंबून असतो आणि ही फट जरुरीप्रमाणे थोडी कमीजास्त करता येते.
या यंत्रातून निघालेल्या सूक्ष्म धाग्यांच्या काल्यामध्ये खळ मिसळतात. खळ मिसळल्याने धागे द्रवरोधी होतात. टीपकागदामध्ये जलशेषक गुण हवे असतात म्हणून तो तयार करण्याच्या काल्यात खळ मिसळत नाहीत. खळ मिसळल्यानंतर त्या काल्यात रेझिनापासून तयार केलेल्या साबणाचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण) किंवा मेणाचे पायस मिसळतात. सर्व लगद्यामध्ये हे पायस चांगले मिसळले म्हणजे त्या काल्यात तुरटी घालतात. त्यामुळे ते पायस साखळून धाग्यांना चिकटून बसते.
काही पद्धतींत लगद्याच्या काल्यात खळ न मिसळता कागद तयार करतात व नंतर तो एका कुंडात ठेवलेल्या खळीत बुडवून वाळवतात. काही पद्धतींत, काही खळ लगद्याच्या काल्यामध्ये घालतात व त्यापासून तयार झालेला कागद पुन्हा कुंडात ठेवलेल्या खळीत बुडवून वाळवतात. कुंडात भरण्याच्या खळीसाठी खळीसाठी सरस, संस्कारित स्टार्च, केसीन (दूधातील एक प्रथिन) यांसारखे चिकटविण्याचे गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा उपयोग करतात. त्यामुळे खळ कागदाला चांगली चिकटते. या खळीमुळे कागदाचा द्रवरोध वाढतो, त्यावर शाईने चांगले लिहिता येते व त्यावर कोठेही शाई फुटत नाही.
टिशू आणि टीपकागदासारखे काही प्रकार सोडले, तरी बाकीच्या सर्व प्रकारांत भरणद्रव्ये घालावी लागतात. भरणद्रव्ये घातल्याने धाग्यांच्या मधील रिकामी जागा भरली जाते. त्यामुळे कागदाचा पृष्ठभाग चांगला सपाट व गुळगुळीत होऊन कागद सफाईदार दिसतो. अशा कागदावर छपाईचे काम चांगले होते. त्याची अपारदर्शकता वाढते आणि त्याची किंमतही कमी होते. कागदातील सूक्ष्म रिकामी जागा भरण्यासाठी बहुधा संगजिरे (टाल्क), चिनी माती, अवक्षेपित (पाण्यात न विरघळणाऱ्या धन स्वरुपात तयार केलेले) कॅल्शियम कार्बोनेट किंवा टिटॅनियम डाय-ऑक्साइड अशा अकार्बनी पदार्थ्यांची अतिशय बारीक पूड वापरतात.
बहुतेक सर्व प्रकारच्या कागदांत थोडेसे रंगद्रव्यही मिसळतात. हे रंगद्रव्य वाटण यंत्रात लगदा कुटला जात असतानाच मिसळतात. ही रंगद्रव्ये बहुते संश्लेषित जातींची असतात. काही विशेष प्रकारांत प्रथम रंगरहित कागद तयार करतात व नंतर तो रंगद्रव्याच्या विद्रावात बुडवून वाळवतात.
कागदनिर्मितीत वापरण्यात येणाऱ्या पाणी, स्टार्च, सरस व तत्सम पदार्थांमुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते. यामुळे लगद्याच्या प्रवाहास व लगद्याचे चादरीत रुपांतर होण्यास अडथळा होणे, कागदनिर्मिती यंत्राची कार्यक्षमता कमी होणे इ.नुकसान सर्वच कागद गिरण्यांत होते. सर्व सामग्री वारंवार धुतल्यास हा प्रश्न बराचसा सुटण्याची शक्यता असते तथापि क्लोरीनयुक्त फिनॉले, पारायुक्त कार्बनी द्रव्ये व प्रक्षालक (पृष्ठ स्वच्छ करणाऱ्या) जातीची संयुगे यांचाही सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्याकरिता उपयोग केला जातो. यामुळे निर्मितीखर्च वाढतो पण कागद उत्पादनात होणाऱ्या वाढीमुळे हा खर्च परवाडतो.
लगद्यापासून कागदनिर्मिती : लगदा तयार करताना लाकडासारख्या कच्च्या वस्तूधील धागे सुटे करुन स्वच्छ करतात व नंतर त्यांचे सूक्ष्म कण तयार करतात. कागद तयार करताना हे सूक्ष्म कण पुन्हा एकमेकांत गुंतवून त्यांपासून सलग, सपाट व सारख्या जाडीची चादर बनवावी लागते. कागद तयार करताना पाण्यात इतस्ततः लोंबत असलेले धाग्यंचे कण खाली बसवून त्यांचा ओलसर थर तयार करतात. नंतर त्या थरातील बरेचसे पाणी काढून टाकतात व तो सुकवितात. नंतर तो थर गरम लाटण्यावरुन ओढत नेतात व त्यातील बाकी राहिलेले बहुतेक पाणी क्रमाक्रमाने काढून टाकतात. लगद्यापासून कागद तयार करण्यासाठी जरुर असलेल्या सर्व क्रिया करण्याची दोन निरनिराळया जातींची यंत्रे आहेत. त्यापैकी महत्वाचे फूर्ड्रिनिअर यंत्र आ.३ मध्ये दाखविले आहे. या यंत्राच्या डावीकडील भागात ०.५ टक्के लोंबणाऱ्या धाग्यांचे कण व ९९.५ टक्के पाणी असलेले कालवण एका टाकीमधून तिच्या खालच्या बाजूने वगेगाने सरकत जाणाऱ्या तारेच्या बारीक जाळीच्या (१) या पट्टयावर सर्व रुंदीवर सारख्या प्रमाणात पडेल अशा रीतीने सोडतात. पट्टा जसजसा पुढे उजवीकडे जातो तसतसे पट्टयावर पडलेल्या कालवणातील पाणी प्रथम फक्त गुरुत्वानेच खाली पडते व नंतर पट्टा चोषक (हवा ओढून घेणाऱ्या) पेटयांवरुन जाऊ लागला म्हणजे पाणी काढून टाकण्यासाठी निर्वाताचीही मदत मिळते. धाग्यामधून पाणी काढण्याचे काम चालू असताना पट्अयावर दोन्ही बाजूंकडून आलटून पालटून सौम्य कंपने देतात. त्यामुळे जाळीवरचे ओलसर धागे एकमेकांत अडकतात व त्यांपासून सलग ओलसर चादर तयार होते. या भागात जाळीतून खाली पडणाऱ्या पाण्यात थोडे सूक्ष्म धागे व भरणद्रव्येही असतात. त्यामुळे त्याला `पांढरे पाणी’ म्हणतात. त्यातील अधिकाधिक सूक्ष्म धाग्यांचा उपयोग व्हावा, भरणद्रव्यांचा पुन्हा उपयोग करता यावा व पाण्याचा खर्च वाढू नये, तसेच बाहेरील वाहते पाणी दूषित होऊ नये म्हणून हे पांढरे पाणी पुन्हा वाटण यंत्रात सोडतात. काही कागद गिरण्यांतून पांढरे पाणी अपशिष्ट (टाकाऊ) म्हणून काढून टाकतात. विशिष्ट प्रकारचे कागद तयार करणाऱ्या गिरण्यांतील पांढऱ्या पाण्यात विशिष्ट अपायकारक पदार्थ असतात. त्यांचा अपायकारक परिणाम नाहीसा करण्यासाठी त्यांवर विशिष्ट प्रक्रिया करतात व मगच ते वाहत्या पाण्यात सोडतात.
यंत्राच्या पहिल्या भागातून दुसऱ्या भागात येणारी ८० टक्के पाणी असलेली धाग्याची चादर उजवीकडे सरकत असलेल्या (२) या निरंत लोकरी पट्टयावर येते. या भागात चादरीवर वरच्या बाजूने (३) या फिरणाऱ्या लाटण्यांचा सौम्य दाब देऊन चादरीमधील २० टक्के पाणी काढून टाकतात व चादरीवर जरुर असल्यास जलचिन्हा उठवतात.
यंत्राच्या तिसऱ्या भागात येणारी ओली चादर एकसरीत (एकापुढे एक) असवलेल्या (४) या अनेक गरम लाटण्यांभोवती फिरवून पुढे सरकवली जाते. ही लाटणी बिडाचे पोकळ दंडगोल असतात वत्यांच्या आतून कमी दाबाची नवी वाफ किंवा एंजिनाची निष्कासित (बाहेर सोडलेली) वाफ जात असते. त्यामुळे त्यांचे तपमान ठरविल्याप्रमाणे अगदी काटेकोर राखता येते. या भागात सरकत असलेल्या ओल्या चादरीवरुन लोकरमिश्रित कॅनव्हासचा पट्टा जात असतो. त्यामुळे कागदातील ओलावा व उष्णता वरच्या पट्टयामध्ये जाते. कागदाचा जाड पुठ्ठा करताना असा पट्टा वापरील नाहीत. जाड चादर तशीच सुकवतात. या विभागातून तापून बाहेर पडणाऱ्या कागदात पाच-सहा टक्के पाणी शिल्लक राहते. कागदाची चादर सुकविताना तयार होणाऱ्या प्रत्येक किग्रॅ. सुक्या कागदाबरोबर चादरीतील दोन किग्रॅ. पाणी काढून टाकावे लागते. हे पाणी वाफ रुपाने बाहेर पडते व ते कागदयंत्रापासून दूर नेऊन सोडावे लागते. या भागात विशेष पद्धतीने वायुवीजन (हवा खेळती ठेवणे) करावे लागते. यंत्राच्या वरच्या बाजूवर छत्रीच्या धुराडयासारखे वाफ-निष्कासक बसवतात व खालच्या बाजूने यांत्रिक पंख्याने हवेचा झोत सोडतात. त्यामुळे खालून वर जाणारी स्वच्छ व ताजी हवा कागदाच्या चादरीतून निघणारी वाफ व उष्णता घेऊन वरच्या बाजूने छपराबाहेर जाते.
तिसऱ्या भागातील गरम लाटण्यावरुन पुढे जाणाऱ्या कागदाचा पृष्ठभाग खरखरीत असतो व त्याची जाडी चांगली एकसारखी नसते. म्हणून त्या कागदावर (५) या लाटण्यांनी इस्त्रीसारखी कॅलेंडरिंग प्रक्रिया करतात. या प्रक्रियेमध्ये कागद नीट दाबला जाऊन त्याची जाडी एकसारखी केली जाते व त्याचा पृष्ठभाग सफाईदार केला जातो. या प्रक्रियेकरिता एका उभ्या चौकटीमध्ये अतिशय गुळगुळीत आणि चकचकीत केलेल्या पृष्ठाची अनेक पोलादी लाटणी एकावर एक अशी बसवलेली असतात. त्यामधून खरख्रीत व सुरकुतलेला कागद ओढत नेला म्हणजे कागदाची जाडी कमी होते, घनता एकसाखरी होते व तो दोन्ही बाजूंनी चांगला गुळगुळीत होतो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कागदाची सलग चादर (६) या एका मोठया रिळाभोवती गुंडाळून ठेवतात. नंतर जरुरीप्रमाणे त्यामधून लहान रिळे तयार करतात. या रिळावरचा कागद नंतर मापाप्रमाणे कापून त्यांच्या घडया करतात व मोजक्या घडयांचे गठ्ठे बांधून ठेवतात.
कागद तयार करण्याच्या दुसऱ्या प्रकारच्या यंत्राला सिलिंडर यंत्र म्हणतात. वर वर्णन केलेल्या फूर्ड्रिनिअर यंत्रामध्ये तयार होणारे धाग्यांचे जाळे सरळ रेषेत सरकत असलेल्या जाळीच्या पट्टयावर तयार होते आणि सिलिंडर यंत्रामध्ये ते गोल फिरत असलेल्या सिलिंडराच्या पृष्ठभागावर बसवलेल्या तारेच्या जाळीवर तयार होते. फूर्ड्रिनिअर यंत्रावर चांगल्या जातीचे पण पातळ कागद तयार करतात व सिलिंडर यंत्रावर बहुतेक हलक्या जातीचे जाड कागद तयार करतात. जाड कागद तयार करण्यासाठी जितके थर घ्यावयाचे असतील तितकी सिलिंडरे एकाच वेळी वापरतात. प्रत्येक सिलिंडर धाग्यांच्या कालवणाने भरलेल्या टामध्ये बसवलेले असते व ते यांत्रिक शक्तीने क्षितिज समांतर आसाभोवती अगदी हळूहळू फिरविले जाते. सिलिंडराच्या गोल पृष्ठभागावर बारीक जाळी ताणून बसवलेली असते व सिलिंडराचा आतील भाग निर्वात केलेला असतो. सिलिंडराचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग नेहमी कालवणात बुडलेला असतो व सिलिंडराच्या आतील निर्वातामुळे टाकीतले कालवण जाळीमधून सिलिंडराच्या आत ओढले जाते. कालवणातील पाणी जाळीमधून आत जाते व धागे जाळीच्या बाहेरच अडकून बसतात व त्यांचे जाळे तयार होते. सिलिंडर फिरत असताना कालवणाच्या बाहेर येणाऱ्या भागावरील धाग्यांचे जाळे एका लाटण्याने थोडे दाबले जाते व नंतर एका लांब चाकूच्या पात्याने सिलिंडरावरुन वर उचलले जाते व लगेच पुढे येणाऱ्या फिरत असलेल्या लोकरी पट्टयावर पडून पुढच्या सिलिंडराकडे जाते. तेथे दुसऱ्या सिलिंडरावरुन निघत असलेला ओला थर पहिल्या जाळयाच्या थराखाली बसवला जातो व तेथून दोन थरांचा कागद तिसऱ्या सिलिंडराकडे जातो. अशा रीतीने अनेक थरांची जाड ओलसर चादर तयार होते. ती दाबून व सुकवून तीपासून जाड पुठ्ठयाचा कागद तयार करतात. या पद्धतीमध्ये पहिला आणि शेवटचा थर चांगल्या प्रतीच्या लगद्यापासून करता येतो व मधले थर हलक्या प्रतीच्या लगद्यापासून करता येतात. त्यामुळे तयार केलेला पुठ्ठा दिसण्यास चांगल्या प्रतीचा दिसतो व तो थोडया खर्चात बनविता येतो.
कोणत्याही पद्धतीने तयार केलेला ओला कागद सुकवून त्याच्या एकाच बाजूचा पृष्ठभाग चांगला गुळगुळीत करण्यासाठी एक विशेष यांत्रिक पद्धत आहे. या पद्धतीने तयार होणाऱ्या कागदाला मशिन ग्लेझ्ड कागद म्हणतात. या पद्धतीत ओला कागद एका चार-पाच मी व्यासाच्या बिडाच्या गरम सिलिंडरावरुन ताणून सरकवत नेतात. या सिलिंडराचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत आणि चकचकीत केलेला असतो. त्यामुळे सिलिंडराच्या पृष्ठभागाला चिकटून जाणारा कागदाचा पृष्ठभाग उत्तम गुळगुळीत होतो. पूर्वीच्या कॅलेंडर पद्धतीमध्ये कागदाच्या दोन्ही बाजू सारख्याच गुळगुळीत होतात. त्याचा यंत्रसंस्कारित (मशिन फिनिश्ड) जातीचा कागद म्हणतात.
आवरण देणे : कागदाच्या पृष्ठभागावर आवरण देणे ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. ही आबरणे रंगद्रव्य (अकार्बनी) व रोध (कार्बनी) या प्रकारांची असतात. रंगद्रव्य आवरणात रंगद्रव्यांखेरीज आसंजके (चिकटविणारे पदार्थ) व काही प्रमाणात पूरक पदार्थ असतात. केओलीन माती, शुभ्र अभ्रक, अटापुलगाइट, संगजिरे, टिटॅनियम डाय-ऑक्साइड, कॅल्शियम कार्बोनेट, सजल ॲल्युमिनियम ऑक्साइड, साटीन व्हाइट (कॅल्शियम सल्फेट आणि ऍल्युमिनियम हाड्रॉक्साइड यांपासून केलेला रंग) इ. रंगद्रव्ये सरस, केसीन, आल्फा-प्रथिन, स्टार्च, रबराचा चीक व इतर पायसे इ. आसंजके आणि पॉलिफॉस्फेट, प्लॅस्टिसायझर (प्लॅस्टिक पदार्थाची लवचिकता इ. गुणधर्म सुधारण्यासाठी त्यात मिसळण्यात येणारे पदार्थ) इ. पूरक द्रव्ये यासाठी वापरतात. कागदाच्या एका किंवा दोन्ही बाजूस ही आवरणे देतात. कच्च्या कागदाच्या पृष्ठभागाचे स्वरुप बदलण्यासाठी, मऊ व छपाईस योग्य अशा कागदासाठी व अपारदर्शकता वाढविण्यासाठी रंगद्रव्य आवरणाचा उपयोग करतात. आवरणातील आसंजकांमुळे ही आवरणे सच्छिद्र स्वरुपाची होतात. जलीय निलंबन स्वरुपात ही आवरणे यंत्राच्या साहाय्याने कागदावर देतात. वेष्टनासाठी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे कागद पाणी, वाफ, ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, चरबी, तेले व इतर रसायने यांना रोधक आवरणे देतात. ज्या उद्देशाने कागद वापरावयाचा असतो त्यानुसार त्यावर रोधक आवरणे वितळलेल्या, पायस, विद्राव किंवा इतर स्वरुपात विविध प्रक्रियांनी देतात. रोधव आवरणांसाठी मेण, काही प्रकारचे चीक, रबर, पॉलिएथिलीन, कृत्रिम रेझिने, सिलीकोने, बिटयुमेन इ. पदार्थ वापरतात. विद्युत निरोधक, ज्योतरोधक, बुरशीरोधक, जलरोधक, जलबाप्परोधक, तेलरोधक, एकमेकांना न चिकटणारे इ. विविध गुणधर्मांचे कागद विविध प्रकारची आवरणे देऊन तयार करतात. यासाठी साधा ब्रश, हवा ब्रश किंवा लाटण यंत्र वापरतात. काही प्रकारांत आवरण बसविण्यासाठी बहिःसारण (दाबून बाहेर सारण्याची) पद्धतही वापरतात.
गुणधर्म : विशिष्ट कागदाचे गुणधर्म त्याच्या अंतिम कार्यावर अवलंबून असतात. मूलभूत तसेच अनुप्रयुक्त (प्रत्यक्ष वापरण्यास आवश्यक असणाऱ्या) गुणधर्मांचे मूल्यमापन करण्यासाठी काही चाचणी पद्धती आहेत. कागदाचे मूलभूत वनज, जाडी, ताणबल, प्रसर, फाटण्याचे बल, चिरण्याचे बल, चिवटपणा, घडया पडणे, जलांश, जलरोध, बाप्प-पारगम्यता (वाफ आत जाण्याची क्षमता) इ.भौतिक गुणधर्म तसेच चकाकी, रंग, प्रकाश अपारगम्यता, गुळगुळीतपणा (लकाकी), पारदर्शकता इ.प्रकाशीय गुणधर्म ठरविण्याच्या विविध पद्धती आहेत.
कागदाच्या तक्त्यामध्ये एका किंवा अनेक प्रकारांचे तंतू असतात. कागदाच्या स्वरुपावर तसेच कोणत्या प्रकारचा लगदा वापरला यांवर या तंतूचे प्रमाण अवलंबून असते. तंतू विश्लेषक तज्ञ यासाठी परिमाणात्मक (घटकांचे प्रमाण ठरविणाऱ्या) व गुणात्मक पद्धतींचा वापर करतात. सुक्ष्मदर्शक पद्धतीचा सामान्यतः यासाठी वापर केला जातो.
कागदातील तूतू, तंतुविरहित घटक व मलिनता शोधूनं काढण्यासाठी रासायनिक विश्लेषण पद्धती वापरतात. घटक शोधून काढण्यासाठी गुणात्मक तसेच विशिष्ट ज्ञात घटकाचे प्रमाण ठरविण्यासाठी परिमाणात्मक पद्धती वापरतात. विशिष्ट कागदासाठी आवश्यक गुणधर्मासाठी जी पूरक द्रव्ये वापरली जातात त्यांचे प्रमाण ठरविणे, त्यांचे अभिज्ञापन (अस्तित्व शोधून काढणे) यांसाठी वरील पद्धती काही वेळा उपयुक्त ठरत नाहीत. त्यासाठी वैश्लेषिक रासायनिक पद्धती वापरल्या जातात. भारतीय मानक संस्थेने कागदाच्या चाचण्यांसाठी विविध मानके निश्चित केलेली आहेत.
कागदांचे प्रकार : कागदांचे भिन्न भिन्न गुणधर्म असणारे अनेक प्रकार आहेत. कागद तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य व त्यावर केलेल्या प्रक्रिया उदा., लगद्यातील धागे, लगदा शुद्ध करुन तो विरंजित करण्याची पद्धत, खळ व ती बसविण्याची पद्धत, कच्च्या कागदाच्या ओल्या चादरीची जाडी, ओल्या चादरीवर दिलेला दाब, सुक्या चादरीवर दिलेला दाब, रासायनिक भरणद्रव्ये, आवरणद्रव्ये इत्यादींमध्ये फेरफार करुन विशेष गुणधर्म असलेले अनेक प्रकारचे कागद तयार करता येतात. कागदांचे मुख्य प्रकार : (१) छपाईचा कागद : हा अगदी साध्या प्रकारचा असून त्यावर खळ लावलेली असते. त्यामुळे तो शाई सहज शोषून घेतो. हा बांबू, गवत यांपासून तयार केलेला व यंत्राने संस्कार केलेला पांढरा किंवा रंगीत असतो. (२) लिहिण्याचा कागद : यावर कडक खळ लावलेली असते आणि त्याचा पृष्ठभाग चांगला गुळगुळीत केलेला असतो. (३) आरेखन (ड्रॉईंग) कागद : हा कुंडात ठेवलेल्या सरसमिश्रित खळीत बुडवून वाळवितात त्यामुळे त्यावर काढलेल्या शाईच्या रेघा अगदी कोरीव राहतात व शाई मुळीच पसरत नाही. स्वस्त जातीच्या काही आरेखन कागदांकरिता रेझिनाची खळ वापरतात. (४) काडतुसी कागद : हा आरेखन जातीचा पण स्वस्त प्रकारचा असतो. यासाठी राससायनिक लगदा वापरतात व त्यावर कडक खळ बसवतात. (५) बॅंक आणि दस्तऐवजाचा कागद : हा साधारण लिहिण्याच्या कागदासारखाच पण पातळ असतो व त्याचा पृष्ठभाग कमावलेल्या कातडयासारखा गुळगुळीत बनवलेला असतो. (६) चित्रे छापण्याचा (आर्ट) कागद : विविध छटा असलेली (हाफटोन) चित्रे छापण्यासाठी हा वापरतात. याकरिता खळ बसविलेल्या कागदावर कुंडामध्ये ठेवलेल्या चिनी माती, केसीन किंवा स्टार्च याच्या विद्रावातून रंगद्रव्याचा थर लावतात. या प्रकारातील स्वस्त जातीच्या कागदावर यांत्रिक लाटण्यानेच रंगद्रव्ये लावतात. (७) आवरणयुक्त कागद : हा तयार करण्यासाठी रंगद्रव्ये बसवण्याच्या खळीत चिनी मातीचे प्रमाण जास्त ठेवतात. या कागदाचे चित्रे छापण्याचा, क्रोम जातीचा व एनॅमल लावलेला असे विविध प्रकार असतात. (८) वेष्टन कागद : हे तयार करण्यासाठी सल्फेट किंवा सल्फाइट जातीचा अविरंजित लगदा वापरतात. या प्रकारातील खवलेदार कागद तयार करताना ओली चादर विशेष जातीच्या लोकरी पट्टयाने दाबतात आणि नंतर सुकवितात. (९) विरविरीत (टिशू) कागद : हा तयार करण्यासाठी रासायनिक लगदा वापरतात. तो अगदी पातळ आणि हलका असतो. त्यावर खळ बसवीत नाहीत. हा कागद पतंग तयार करण्यासाठी वापरतात. हात अगर बशा पुसण्याचे कागद तयार करण्यासाठी सल्फेट किंवा सल्फाइट जातीचा लगदा वापरतात व ओल्या होणाऱ्या कागदाला मजबुती येण्यासाठी तो रेझान मिश्रणात बुडवून वाळवितात. (१०) सुरकुती (क्रेप) कागद : हा तयार करण्यासाठी विरविरीत जातीचा किंवा थोडा जाड कागदही वापरता येतो. सुरकुत्या उत्पन्न करण्यासाठी ओलसर केलेला कागद सुरकुतलेला पृष्ठभाग असलेल्या दोन लाटण्यांमध्ये दाबून लाटतात. असे कागद चांगले मजबूत असतात व धातूंच्या जड वस्तू गुंडाळण्याकरिताही उपयोगी पडतात. (११) अनुरेखन (ट्रेसिंग) कागद : हा साधारणतः पातळच असतो. त्यावर भरणद्रव्य नसलेली साधी खळ बसवतात. हा कागद पारदर्शक बनविण्यासाठी त्यावर डिंक, रेझीन, तेले, पेट्रोलियम ऊर्ध्वपातिते (वाफ थंड करुन तयार केलेले पदार्थ) किंवा टर्पेटाइन अशा द्रव्यांची विशेष प्रक्रिया करतात. काचित (काचेसारखा गुळगुळीत थर असलेला) आणि नकली चामडी (पार्चमेंट) कागदही अनुरेखनासाठी वापरता येतो. (१२) चलनी नोटांचा कागद : हा विशेष पद्धतीने तयार केलेला चिवट जातीचा कागद असतो व त्यावर जलचिन्ह उमटविलेले असते. ओल्या कागदाची चादर वाळविण्यापूर्वी विशेष चिन्ह बसवलेल्या लाटण्याने दाबून तिच्यावर जलचिन्ह उमटविले जाते. जलचिन्ह उमटलेल्या भगाची जाडी कमी होते व तेवढा भाग जास्त पारदर्शक होतो. असा कागद उजेडासमोर धरला तर त्यावरचे जलचिन्हा स्पष्ट दिसते. हा कागद तयार करताना तो पूर्ण सुकविण्यापूर्वी त्यावर चांगली इस्त्री करुन त्याचा पृष्ठभाग सफाईदार बनवतात. (१३) वर्तमानपत्राचा कागद : हा तयार करण्यासाठी मुख्यतः लाकडे दळून तयार केलेल्या धाग्यांचा लगदा वापरतात. या लगद्याचे धागे अगदी आखूड असतात. त्यामध्ये लाकडातील बहुतेक सर्व मलद्रव्येही मिसळलेलीच असतात. हा कागद सर्वात कमी किंमतीचा असतो. (१४) टीपकागद आणि गाळणकागद : हे तयार करताना लगद्यासाठी अखंड धागे न घेता धाग्यांचे अगदी लहान तुकडे वापरतात. त्यामुळे कागद फार कमजोर झाला तरी त्यामध्ये पाणी शोषून घेण्याची शक्ती येते. धागे वाटून आणि पुन्हा खलून त्यांचे सूक्ष्म चूर्ण केले तर त्यांपासून नकली चामडी कागद, काचित कागद, ग्रीझरोधी कागद व अर्धपारदर्शक जातीचे कागद तयार करता येतात. (१५) कागदाचे पुठ्ठे किंवा फलक : साधा कागद आणि पुठ्ठे बनविण्याच्या लगदामिश्रणात किंवा त्यांच्या सामान्य गुणधर्मात मूलभूत असा फरक नसतो. चादरीच्या प्रती चौ.मी. क्षेत्राचे वनज २२० ग्रॅ.पेक्षा जसे जास्त असेल, त्याप्रमाणे चादरीला कार्डबोर्ड, पुठ्ठा, पेटयांचा पुठ्ठा, बलवर्धक पुठ्ठा किंवा फलक अशी नावे देतात. स्वस्त जातीचे जाड पुठ्ठे किंवा फलक तयार करताना स्वस्त जातीचा लाकडी लगदा व जुन्या कागदांचा लगदा मिसळून लाटणी साचायंत्रामध्ये दाबून पाहिजे त्या जातीचा फलक तयार करतात. काही प्रकारांत दोन किंवा तीन ओल्या कागदांचा जोडपुठ्ठा बनवितात व त्याकरिता सिलिंडर यंत्रे वापरतात. काही प्रकारांत एकाच जातीचे किंवा विविध जातींचे दोन किंवा अधिक कागद एकमेकांवर चिकटवून पाहिजे त्या जाडीलचा पुठ्ठा तयार करतात. (१६) पन्हळीदार कागद आणि फलक : हे तयार करण्यासाठी योग्य जाडीचा पुठ्ठा ओला करुन पन्हळीसारखा पृष्ठभाग असलेल्या व तापविलेल्या दोन लाटण्यांमधून लाटत नेतात. उद्योगधंद्यामध्ये माल भरण्याच्या पेटया तयार करण्यासाठी वरील सर्व प्रकारचे जाड पुठ्ठे व फलक यांचा उपयोग होतो.
कागदे व पुठ्ठे यांच्या पिशव्या व खोकी : कागदी पिशव्या व खोकी यांचे मानाने (1) जाड व (2) नम्य (कसाही आकार देता येण्यासारखे) असे दोन भाग केले जातात.
जाड खोकी व पिशव्या : सर्वसामान्यतः नुसते पुठ्ठे किंवा कागद व पुठ्ठे दोन्ही एकत्र वापरुन या प्रकारची खोकी व पिशव्या तयार करतात. ही विविध आकाराची, आकारमानाची व रचनेची असतात. विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांत वापरली जाणारी खोकी व पिशव्या ही पुढील प्रकारची असतात. (अ) साधी खोकी : ही खोकी एकथरी व न वाकणाऱ्या पुठ्ठयापासून हातांनी वा यंत्रांनी तयार करतात. पुठ्ठा बाहेरुन जाडीच्या काही प्रमाणात कापून त्या ठीकाणी पुठ्ठा वाकवून ही खोकी तयार करतात. त्यावर नंतर कागद चिकटवितात. अशा खोकी पादत्राणे, जवाहीर इत्यादींसाठी वापरतात. (आ) घडयांची खोकी : ही खोकी साध्या खोक्याप्रमाणेच बनवितात. घडयांच्या खोक्यासाठी खोक्याचा पुठ्ठा (बॉक्सबोर्ड) वापरतात. त्यावर आधी खुणा करतात. या खुणांवर पुठ्ठे वाकवून खोकी तयार करतात. टूथपेस्ट, लोणी, दुधाची भुकटी इत्यादींच्यासाठी ही खोकी वापरतात. (इ) कागदी डबे व नळयाः हयासाठी वाकणारे पुठ्ठे वापरतात. डबे व नळया विविध आकारांत यंत्रांनी बनवितात. यांचा उपयोग बऱ्याच उद्योगधंद्यांत करतात. (ई) पन्हळी खोकी : ही खोकी विशिष्ट प्रकारच्या पुठ्ठया पासून यंत्राच्या साहाय्याने तयार करतात. व्यापारी माल हाताळण्यास, साठवण्यास व वाहतूकीस सोईस्कर व्हावा म्हणून अशा खोक्यांचा अनेक धंद्यांत उपयोग करतात.
नम्य पिशव्या : कागदी पिशव्या एक, दोन किंवा अनेक थरांच्या असतात. हया पिशव्या हातांनी तसेच यंत्रानी बनवितात. यासाठी विविध प्रकारचे रोधक थर दिलेले कागद वापरले जातात. काही वेळा अनेक थरी पोतीही बनवितात. रबर, अस्फाल्ट, मेण, रेझिने इत्यादींसारखे पदार्थ ठेवण्याच्या पोत्यांना आतून ते पदार्थ चिकटू नयेत म्हणून योग्य ते प्रतिबंधक आवरण देतात.
जागतिक उत्पादन : कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान फिनलंड, रशिया, स्वीडन, नॉर्वे, प.जर्मनी, फ्रान्स इ. देशांत सर्व प्रकारच्या कागदांची निर्मिती होते. अमेरिकेत जगाच्या एकूण उत्पादनापैकी ३५ टक्के उत्पादन होते. दरमाणशी कागदाच्या वापराचे प्रमाण अमेरिकेत २५७ किग्रॅ., तर भारतात १-९ किग्रॅ. तर आफ्रिकेतील मालीमध्ये ०.०२ किग्रॅ., इतके आहे. कोष्टक क्र.१ मध्ये छपाईच्या व कोष्टक क्र.२ मध्ये इतर कागदांच्या प्रकारच्या उत्पादनाची आकडेवारी दिलेली आहे.
कोष्टक क्र. १. छपाईच्या कागदाचे उत्पादन (हजार टनांत) |
|||||
देश |
१९५३ |
१९६१ |
१९६६ |
१९६९ |
१९७२ |
कॅनडा |
५,१९७ |
६,०९५ |
७,७३९ |
७,९४४ |
८,८४० |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
९७० |
१,८६३ |
२,१२९ |
२,८७८ |
३,४०० |
जपान |
४१३ |
८०४ |
१,१७७ |
१,६१४ |
२,३०० |
फिनलंड |
४३८ |
९४५ |
१,३१७ |
१,२४० |
१,४०० |
रशिया |
३०० |
४९३ |
८८२ |
१,०५१ |
१,३५० |
स्वीडन |
३३८ |
६१९ |
६८९ |
९३४ |
१,१०० |
नॉर्वे |
१६६ |
२४१ |
३४४ |
५११ |
६०० |
प. जर्मनी |
२०२ |
२२९ |
२३२ |
३२७ |
६०० |
फ्रान्स |
३४० |
४३६ |
४६१ |
४२८ |
५०० |
ग्रेट ब्रिटन |
६१३ |
७२३ |
७४९ |
७९० |
— |
जागतिक एकूण |
९,८८२ |
१४,३२६ |
१८,२९१ |
२०,५७५ |
— |
कोष्टक क्र. २. इतर प्रकारच्या कागदांचे उत्पादन (हजार टनांत) |
||||
देश |
१९५३ |
१९६१ |
१९६६ |
१९६९ |
कॅनडा |
१,३२९ |
१,८८१ |
२,८२४ |
२,९६५ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
२१,९१९ |
२८,८९४ |
३८,५७७ |
४३,२६९ |
जपान |
१,३४९ |
४,५८९ |
७,०१८ |
९,६९६ |
फिनलंड |
४९३ |
१,४५९ |
२,१४४ |
२,८२० |
रशिया |
१,७५४ |
२,९५२ |
४,३४९ |
५,२३४ |
स्वीडन |
८८८ |
१,६७३ |
२,४९३ |
३,१७९ |
नॉर्वे |
३२८ |
५८० |
७२१ |
८५२ |
प. जर्मनी |
१,७६७ |
३,२९५ |
४,१०६ |
४,८५४ |
फ्रान्स |
१,०९० |
२,३०८ |
२,९९१ |
३,५६९ |
ग्रेट ब्रिटन |
२,०७३ |
३,२९८ |
३,७९१ |
४,१४६ |
जागतिक एकूण |
३८,८७० |
६३,२०८ |
८६,२७२ |
१,०२,३३४ |
भारतीय उद्योग : भारतातील कागदाची पहिली गिरणी कलकत्त्याजवळीत सेरामपूर येथे १८३२ साली एका ख्रिश्चन मिशनऱ्याने काढली होती पण ती चालू शकली नाही. कलकत्त्याजवळील बॅली येथे १८६७ साली रॉयल पेपर मिल्स नावाची दुसरी एक गिरणी निघाली होती. रद्दी व कापडाच्या किंवा तागाच्या चिंध्यांपासून त्या गिरणीत एकंदरीत कमी दर्जाचा कागद तयार होत असे. ती गिरणीही १९०५ साली बंद पडली.
बिटिश सरकारने १८८० साली देशी कागद गिरण्यांना काही सवलती देण्याचे कबूल केले त्यामुळे देशातच कागदाच्या गिरण्या सुरु होण्याला खूप उत्तेजन मिळाले व १८८१-९४ या अवधीत भारताच्या अनेक भागांत कागदाच्या गिरण्या सुरु झाल्या. त्यांपैकी प्रमुख म्हणजे पुढील होत : अपर इंडिया काउपर पेपर मिल्स कं. लि., लखनौ (१८८१) टिटाघर, पेपर मिल्स कं., टिटाघर, जि.चोवीस परगणा (१८८४) डेक्कन पेपर मिल्स कं.लि., पुण्याजवळील हडपसर (१८८७) बंगाल पेपर मिल्स कं. लि.? राणीगंज (१८८९) इंपीरियल पेपर मिल्स कॉर्पोरेशन, कंकिनारा, जि.चोवीस परगणा (१८९२-९४). १८८० साली केरळातील पुनालूर येथे व १८८१ साली ग्वाल्हेर येथे कागदाची एकेक गिरणी निघाली होती.
कोष्टक क्र. ३. भारतातील कागदाचे उत्पादन |
|||
वर्ष |
गिरण्यांची संख्या |
उत्पादनक्षमता (हजार टन) |
प्रत्यक्ष उत्पादन (हजार टन) |
१९५४ |
२१ |
१७३.६० |
१५५.३२ |
१९६० |
२५ |
३९९.९९ |
३४५.२२ |
१९६५ |
५२ |
६४३.८७ |
५३८.६७ |
१९७० |
५७ |
७६८.०० |
७५९.२५ |
१९७१ |
५९ |
८८२.०० |
७७४.७६ |
लाकडाच्या लगद्यापासून बनविलेला स्वस्त कागद भारतात १८९५ साली प्रथम आला व त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या कागदाच्या किंमती अर्थात उतरवाव्या लागल्या. त्यापुढील काही वर्षे भारतातील कागदाच्या गिरण्यांस अडचणीची गेली. १९१२ साली भारतातील कागदाच्या गिरण्यांचा प्रश्न जकात आयोगाकडे सोपविण्यात आला. त्याच्या शिफारशीस अनुसरुन १९२५ साली बांबूपासून कागद बनविण्याच्या धंद्यास ब्रिटिश सरकारकडून संरक्षण मिळाले. त्यानंतर भरतात कागद बनविण्याच्या धंद्याचा चांगला विकास होत गेला. दुसऱ्या जागतिक महायुध्दात भारतातील कागद गिरण्यांची संख्या वाढून ती पंधरा झाली व १९४४ सालचे कागदाचे उत्पादन एक लक्ष टनांहून किंचित अधिक झाले. त्यानंतर काळात कागद गिरण्यांची प्रगती वेगाने होत गेलेली आहे व त्यांची कागद आणि कागदी पुठ्ठे यांचे उत्पादन करण्याची क्षमता दर वर्षास साडेसात लाख अनांहून किंचित अधिक झालेली आहे. सर्वसामान्य कामासाठी भारतात लागणाऱ्या कागदाचा पुरवठा भारतातील गिरण्यांकडून होतो, पण काही विशिष्ट जातींच्या कागदाची मात्र परदेशांतून आयात करावी लागते.
मध्य प्रदेशातील नेपानगर येथे जानेवारी १९५५ मध्ये सुरु झालेली नॅशनल न्यूजप्रिंट व पेपर मिल्स लि. ही भारतातील वर्तमानपत्री कागद तयार करणारी पहिली गिरणी होय. १९५५-५६ साली तिचे उत्पादन सव्वातीन हजार टनांपेक्षा किंचित अधिक होते. ही गिरणी प्रथम खाजगी क्षेत्रातली होती. १९५८ साली तिचे पुनर्संघटन होऊन ती भारत सरकार व मध्ये प्रदेशाचे सरकार या दोहोंच्या मालकीची झाली. १९६७ साली या गिरणीतील उत्पादन तीस हजार टन इतके होते व तिचे वार्षिक उत्पादन तसेच टिकून राहिलेले आहे. आयात केलेला लगदा वापरुन कागद तयार करणारी नवी यंत्रसामग्री या गिरणीत बसविलेली आहे. या गिरणीची एकूण उत्पादनक्षमता ३०,००० टन असून ती ७५,००० टनांपर्यंत वाएविण्याची योजना आहे. या गिरणीत १९७१-७३ या तीन वर्षाच्या काळात सु.४०,००० ते ४२,००० टन वार्षिक उत्पादन झाले. पाचव्या पंचवार्षिक योजनेत वर्तमानपत्री कागदाचे उत्पादन १९७८-७९ साली २,०५,००० टन व्हावे असे
कोष्टक क्र. ४. भारतात तयार होणारे कागदाचे प्रकार व त्यांचे उत्पादन (हजार टनांत) |
||||||
वर्ष |
उत्पादन क्षमता |
प्रत्यक्ष उत्पादन |
||||
छपाई व लेखन कागद |
गुंडाळण्याचा कागद |
विशिष्ट प्रकार |
तक्ते |
एकूण |
||
१९६७ |
७०१ |
३७७.६४ |
१२०.६० |
९.२४ |
१०१.२८ |
६०८.७६ |
१९६८ |
७३० |
३९३.७२ |
१२७.४९ |
१९.४४ |
१०६.०८ |
६४६.६८ |
१९६९ |
७६८ |
४१५.९२ |
१४५.९२ |
२०.५२ |
१२४.६८ |
७०६.४४ |
उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वर्तमानपत्रांसाठी लागणारा सु.७० टक्के (सु.आठ कोटी रुपयांचा) कागद दरवर्षी कॅनडा, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, पोलंड व रशिया या देशांतून आयात केला जातो.
१९५० मध्ये भारतातील कागदाचे उत्पादन १,०९,००० टन होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीस भारतात कागद व पुठ्ठा तयार करणाऱ्या १७ गिरण्या होत्या. त्यांची उत्पादनक्षमता जवळ-जवळ १,३७,००० टन एवढी होती. १९७१ मध्ये गिरण्यांची संख्या ५९ होती. त्यांची उत्पादनक्षमता ८,८२,००० टन इतकी आहे. हयामध्ये छपाईचा कागद तयार करणाऱ्या नेपानगर येथील गिरणीचा अंतर्भाव नाही. कागदाची मागणी आणि निर्मिती यांत फरक पडू लागल्यामुळे देशात कागदाचा तुटवडा पडू लागला. म्हणून केंद्र सरकारने देशाची कागदाची गरज भागविण्यासाठी सरकारी क्षेत्रात
कोष्टक क्र. ५. भारतातील कागदाची आयात-निर्यात (लक्ष रुपयांत) |
||||
प्रकार |
आयात |
निर्यात |
||
१९६८ – ६९ |
१९६९ – ७० |
१९६८ – ६९ |
१९६९ – ७० |
|
कागद, पुठ्ठे व इतर वस्तू |
१,८३१ |
२,३७१ |
५१५ |
४८८ |
लगदा व टाकाऊ कागद |
१,०४३ |
१,२४७ |
५९ |
५२
|
हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशन या संस्थेची १९७०मध्ये स्स्थापना केली. या संस्थेकडे देशातील कागद प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे काम सोपविले. सध्या या संस्थेतर्फे दररोज १०० टन उत्पादनक्षमतेच्या नागालॅंड येथील लिहावयाच्या कागद गिरणीचा, दररोज २५० टन उत्पादनक्षमतेच्या नौगॉंग व सिल्वर (आसाम) येथील दररोज २५० टन उत्पादनक्षमतेच्या छपाईच्या कागदाच्या गिरण्यांचे अशा चार प्रकल्पांचे काम चालू आहे. पहिल्या तीन प्रकल्पांसाठी बांबूचा तर चौथ्या प्रकल्पासाठी यूकॅलिप्टसचा उपयोग करण्यात येणार आहे. बांबूऐवजी दुसरा पर्यांयी कच्चा माल शोधण्याचे कार्य कॉर्पोरेशन करीत आहे. सध्या देशात असलेल्या गिरण्यांकडून त्यांच्या उत्पादनक्षमतेप्रमाणे जास्तीत जास्त उत्पादन कसे होईल याकडे, तसेच बंद पडणाऱ्या गिरण्यांना आर्थिक साहाय्य देणे व त्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे यांकडेही कॉर्पोरेशन लक्ष पुरवीत आहे. सध्या देशात वर्षाला सु.१,६०० लक्ष रु. चा छपाईचा कागद आयात करण्यात येतो. कोष्टक क्र.३ मध्ये देशातील कागदाच्या उत्पादनाची आकडेवारी, क्र.४ मध्ये कागदाच्या प्रकारांच्या उत्पादनाची आकडेवारी व क्र.५ मध्ये आयात निर्यातीची आकडेवारी दिली आहे.
देशातील ५९ कागद गिरण्यांची वार्षिक उत्पादनक्षमता ९,५३,६००० टन आहे. आणखी २,००,००० टन उत्पादनक्षमता वाढविण्याची योजना आहे. कागद व कागदाचे पुठ्ठे यांचे १९७१-७२ साली ७,९१,१६२ टन १९७२-७३ साली ८,२५,००० टन व १९७३-७४ साली (अंदाजे) ७,६०,००० टन इतके उत्पादन झाले. काही विशिष्ट प्रकारच्या कागदांचीच आयात करण्यात येते. १९७०-७१ साली १४,७८० टन, १९७१-७२ साली १४,२८० टन व१९७२-७३ साली २१,६५० टन इतक्या कागदाची आयात करण्यात आली. सिगारेटचा टिशू कागद, काही प्रकारचे लिहिण्याचे, छपाईचे व औद्योगिक उपयोगाचे कागद अशा काही विशिष्ट प्रकारच्या कागदांचीच निर्यात करण्यात येते की निर्यात सु.दोन कोटी रुप्यांची होते. लिहिण्याच्या व छपाईच्या कागदाच्या देशातील टंचाईमुळे त्यांच्या निर्यातीवर १९७४ मध्ये बंदी घालण्यात आली. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांनुसार १९७८-७९ साली कागद व कागदाचे पुठ्ठे तयार करण्याची उत्पादनक्षमता १४,००,००० टन होईल असा अंदाज आहे.
कागदाचा लगदा व कागद तयार करण्यासाठी लागणारी बहुतेक यंत्रसामग्री देशातच उपलब्ध असून तिच्या आयातीस परवानगी नाही. देशामध्ये तयार करण्यात येत नाहीत अशी काही विशिष्ट अंतिम संस्करणाची द्रव्ये मात्र आयात करण्यात येतात.
हातकागद : भारतात मोगल अंमत सुरु झाल्यावर सोळाव्या शतकात हातकागदाची निर्मिती होऊ लागली. हया काळात कागद तयार करणे ही एक कला मानली जात असे. उत्तर भरतामध्ये त्यावेळी हातकागद बनविण्याचे `कागझीपुरे’ बरेच होते व धंदेवाईक कागद बनविणारे `कागझी’ भरपूर कमाई करीत. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी हया धंद्यास, भारतात कागद तयार करण्याची कारखाने निघाल्याने उतरती कळा लागली. तसेच हातकागदास लागणारा प्रमुख कच्चा माल भारतातून इंग्लंडला निर्यात होऊ लागल्याने विसाव्या शतकात निर्मिती झपाटयाने कमी होऊ लागली व उच्च दर्जाचे कागद बनविणारे बेकार झाले. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे भारतात २,००० कागझी आहेत. कागझी जुने तंत्र वापरत व नवीन पद्धत, तंत्र, यंत्र इ. स्वीकारण्यास ते नाखूष असल्याने उत्पादन घटले. प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिल्यानंतरच उत्पादन वाढ करण्याकडे, तसेच नवीन प्रकारचे कागद बनविण्याकडे त्यांनी लक्ष दिले. खादी व ग्रामोद्योग आयोगाने नवीन यंत्रे, कच्चा माल आणि रसायने यांचा वापर करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले.
अखिल भरतीय ग्रामोद्योग मंडळ या संस्थेने १९३५ सालापासून हाताने कागद बनविण्याच्या धंद्याच्या विषयाकडे बरेच लक्ष दिले. १९३९ साली या संस्थेने पुणे येथे एक अन्वेषण (संशोधन) प्रयोगशळा सुरु केली व त्या प्रयोगशाळेत हाताने कागद बनविण्याच्या कृतीसंबंधी पुष्कळ अन्वेषण होऊन कागद तयार करण्याच्या उपयुक्त अशा पद्धतींचा शोध लावण्यात आला. या पद्धतीत लगद्यापासून कागद हात पद्धतीने केला जातो पण लगदा मात्र यांत्रिक शक्ती वापरुन केला जातो. त्यामुळे हातपद्धतीने कागद बनविण्याचे काम सुटसुटीत झालेले आहे.१९५७ साली खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्स्थाना झाली. त्या आयोगाने हातकागदाच्या धंद्याचा प्रसार करण्याकडे विशेष लक्ष दिले. कामकारांना धंद्याचे प्रशिक्षण व कारखान्यांना तांत्रिक सल्ला देण्याची सोय केली. यंत्रे व उपकरणे विकत घेण्यासाठी व कारखाना सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल कर्जाच्या सवलतीच्या दराने व अंशतः अनुदान म्हणून मिळण्याची सोय केली. अशा सवलती उपलब्ध झाल्यामुळे हातकागदाच्या धंद्याचा बराच प्रसार झाला. १९५३-५४ साली देशात हातकागद बनविणारे पस्तीस कारखाने व त्यांचे उत्पादउन सु.दोनशे टन होते. १९६०-६१ साली कारखान्यांची संख्या दोनशे टन होते. १९६०-६१ साली कारखान्यांची संख्या दोनशे चौदा झाली व उत्पादन चार हजार टनांहून किंचित अधिक झाले.
हातकागद कारखान्यात तयार होणारा माल म्हणजे मुख्यतः टीप-कागद, गाळण्याचा कागद (फिल्टर पेपर), चित्रे काढण्याचा व दस्तऐवज कागद, पातळ पुठ्ठे (कार्डबोर्ड) हा होय. लिहिण्याचा किंवा छापण्याचा कागदही थोडया प्रमाणात केला जातो. हातकागद तयार करण्याचा लगदा हा रद्दी कागद, कापडाच्या किंवा गोणपाटाच्या चिंध्या, वाया गेलेले सूत किंवा कापूस, गवते आणि काही झाडांच्या साली यांपासून तयार केला जातो.
हातकागद तयार करण्याची कृती साधी आहे. प्रथम तंतूयुक्त कच्च्या मालाचे बारीक बारीक तुकडे करुन त्यातील कचरा व टाकाऊ भाग अलग करुन नंतर ते तुकडे दाहक सोडयात सु.आठ तास शिजवितात. हा भाग वाटण यंत्रात घलतात. या यंत्रात त्याचे बारीक बारीक तुकडे होऊन लगदा तयार होतो व त्याचबरोबर ते तुकडे धुतलेही जातात. लगद्याचा रंग घालविण्यासाठी त्यात विरंजक पदार्थ घालतात व त्याचे कूट करतात. जाळी बसविलेल्या लाकडी चौकटीत हा लगदा ओततात. या वेळीच कागदाला आवश्यक ती जाडी व त्याचबरोबर आवश्यक ते गुणधर्मही त्यात आणले जातात. काही वेळेनंतर चौकटी उलटया करुन आतील कागद नमद्यावर (फेल्टवर) पसरतात व दाबयंत्राने तो दावून त्यातील पाणी काढतात. नंतर तो वाळवितात व त्यावर सरस इ. पदार्थांचे संस्कार करतात. परत एकदा कागद दाबतात. अशा तऱ्हेने तयार झालेल्या हातकागदाचे योग्य त्या आकाराचे तुकडे कापतात. भारतात १९७१ मध्ये ३०० हून अधिक कारखाने हातकागद तयार करीत होते. त्यापैकी १३ मोठे, ११४ मध्यम व १३४ लहान स्वरुपाचे कारखाने असून ५० हून जास्त कारखाने घरगुती स्वरुपाचे होते. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेखालील हातकागद कारखान्यांची संख्या, उत्पादन, विक्री व त्यामधील कामगार यांची माहिती कोष्टक क्र.६ मध्ये दिली आहे.
कोष्टक क्र. ६. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेखाली येणाऱ्या हातकागद कारखान्यांची संस्था, उत्पादन व विक्री व कामगार. |
||||||||
वर्ष |
कारखाने |
उत्पादन |
विक्री |
कामगार (हजारात) |
||||
नोंदलेले |
सहकारी |
नग (टन) |
किंमत (रु. कोटी) |
नग (टन) |
किंमत (रु. कोटी) |
पूर्ण वेळ |
अर्ध वेळ |
|
१९५५ – ५६ |
— |
६६ |
६६१ |
०.१८ |
— |
०.०४ |
२ |
— |
१९६० – ६१ |
— |
१०८ |
१,२४८ |
०.२४ |
९८१ |
०.२१ |
४ |
२ |
१९६५ – ६६ |
— |
१४९ |
१,९६० |
०.३९ |
१,७२८ |
०.३६ |
४ |
१ |
१९६८ – ६९ |
११५ |
४७ |
२,७८८ |
०.५४ |
२,४३१ |
०.५५ |
४ |
१ |
१९७० – ७१ |
१२८ |
४८ |
३,०७१ |
०.७१ |
२,७२७ |
०.७५ |
३ |
१ |
१९६९-७० मध्ये हातकागदाचे उत्पादन ६०.८६ लाख रुप्याचे होते, म्हणजे ते १९६८-६९ च्या उत्पादनापेक्षा१३ टक्क्यांनी जास्त झाले. १९६९-७० मध्ये २,६५६ टन हातकागदाची (६६.४३ लाख रु.) विक्री करण्यात आली.
संदर्भ : 1. Britt, K. W., Ed. Handbook of Pulp and Paper Technology, New York, 1964.
2. Cassey, J. P. Pulp and Paper Chemistry and Chemical Technology, 3 Vols., New York, 1960.
3. Libby, C. E., Ed. Pulp and Paper Science and Technology, 4 Vols., New York, 1962.
धारपुरे, म. य. (इं.) ओक, वा. रा. (मं.) केळकर, क. वा. मिठारी भू. चिं.
“